राज्याच्या गृहमंत्रीपदी दिलीप वळसे पाटील

राज्याच्या गृहमंत्रीपदी दिलीप वळसे पाटील

महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ आमदार दिलीप वळसे पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

मराठा आरक्षण मर्यादेचा अडसर दूर करा; ठराव संमत
कोरोनावरच्या औषधाचा दावाच नव्हताः पतंजली
लखीमपूर हत्याकांडः सुनियोजित कट, एसआयटीचा दावा

महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ आमदार दिलीप वळसे पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

सध्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा आणि या विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा, असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठविले आहे.

दिलीप वळसे पाटील हे ठाकरे मंत्रीमंडळामध्ये कामगारमंत्री आणि उत्पादन शुल्क मंत्री म्हणून काम पाहत होते. त्यांच्याकडे असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत ठाकरे यांनी राज्यपालांना पत्रात विनंती केली आहे. ही माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली.

सचिन वाझे प्रकरणामध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आल्यानंतर त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. त्यासंदर्भात चौकशी करण्यासाठी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज निर्णय देण्यात आला. त्यात उच्च न्यायालयाने देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ही चौकशी १५ दिवसांत पूर्ण करावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या आदेशानंतर नैतीक जबाबदारी घेत राजीनामा देत असल्याचे सांगत अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला. त्यानंतर राष्ट्रवादीकडून दिलीप वळसे पाटील यांचे नाव मुख्यमंत्र्यांना सुचविण्यात आले.

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे असणारे दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून सलग सातवेळा विधानसभेवर निवडून गेले असून विधिमंडळाच्या कामकाजाचा त्यांना मोठा अनुभव आहे. २००९ ते २०१४ या काळामध्ये ते महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते. शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून सार्वजनिक जीवनात काम सुरू केलेल्या दिलीप वळसे पाटील यांनी वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ऊर्जा या खात्यांचे मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: