आनंद तेलतुंबडेंमुळे कोण भयभीत झाले आहे?

आनंद तेलतुंबडेंमुळे कोण भयभीत झाले आहे?

तेलतुंबडे यांच्या लेखनामुळे नवउदारतावादी भांडवलशाहीचे समर्थक, जातींचे अस्तित्व नाकारणारे आणि हिंदुत्वाचे वृथाभिमानी या सर्वांच्या दांभिकतेचा बुरखा फाटला आहे.

खासगीकरण भारतासाठी खरंच हितकारक आहे का?
‘आमची पत्रे दिली जात नाहीत’; तेलतुंबडेंच्या पत्नीची हायकोर्टात धाव
तेलतुंबडेंच्या बचावासाठी उभे राहणे अत्यावश्यक का आहे?

“ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचा अभ्यास करताना, आपल्या देशात सर्रासपणे केल्या जाणाऱ्या विभूतीपूजेचे थोतांड नाकारण्याचे लोकविलक्षण धैर्य डॉ.तेलतुंबडे यांनी दाखवले आहे. त्यांनी विश्लेषण केलेल्या समस्यांचा आता तरी बारकाईने लक्ष देऊन अभ्यास केला जाईल अशी आपण आशा करूया. त्यांच्या भूमिकेची व्यापक चर्चा होणे, त्यावर  टीकात्मक वाद-विवाद होणे गरजेचे आहे. क्रांतिकारी सिद्धांत मांडण्याचे प्रयत्न केले जात असताना, या नवीन विचारांबद्दल मतभेद आणि विवाद निर्माण होतच असतात. असे होणे अगदी स्वाभाविक आहे. यामुळेच डॉ.तेलतुंबडे यांनी सध्या हाती घेतलेल्या प्रकल्पाचे आपण स्वागत करायला हवे. भविष्यात त्यांचे अधिकाधिक लेखन वाचायला मिळेल अशी अपेक्षा करूया.”

हे उद्गार होते पुणे येथील एक लोकप्रियमराठी लेखक,राजकीय शास्त्रज्ञ आणि प्रसिद्ध विचारवंत राम बापट यांचे. आनंद तेलतुंबडे यांच्या ‘Ambedkar’ In and of the Post- Ambedkar Dalit Movment’ या नव्वदीच्या दशकात लिहिलेल्या मौलिक चिंतन करणाऱ्या  छोटेखानी पुस्तकाची ओळख करून देताना बापट यांनी ही भविष्यवाणी केली होती. त्यानंतर पुढील दोन दशकांमध्ये इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकलीसाठी दीर्घकाळ लिहिलेल्या सदराच्या माध्यमातून, विविध भारतीय वृत्तपत्रांमधील लेखांच्या माध्यमातून आणि पुस्तकांद्वारे प्रसिद्ध केलेल्या संशोधांतून, किंवा देशभर घडणाऱ्या अन्याय व अत्याचाराच्या असंख्य घटनांचे सत्यशोधन अहवाल प्रसिद्ध करूनडॉ.तेलतुंबडे सामाजिक घडामोडींवर व समस्यांवर जाहीर भूमिका घेत आले. देशातील सर्वांत माननीय व प्रतिष्ठित विचारवंतांपैकी ते एक मानले जाऊ लागले.

जागतिकीकरणाचे यथार्थ राजकीय व आर्थिक विश्लेषण असो,जातीय अस्मितांचे सांस्कृतिक राजकारणआणि जातीय-वर्गीय विरोधविकासवाद असो की ट्रेड जर्नल्समध्ये प्रसिद्ध होणारे तांत्रिक-व्यापारी धोरणात्मक निर्णय असोत, बहुमुखी प्रतिभा असणारे तेलतुंबडे अगदी सहजतेने सर्व विषयांमध्ये संचार करतात.

भारतीय लोकशाहीची सकारात्मक व मूलगामी चिकित्सा करून तिला खऱ्या अर्थाने मुक्त श्वास घेता येईल अशा वास्तवामध्ये बदलण्यासाठी तेलतुंबडे तहहयातआपले विचार आणि संकल्पना मांडत राहिले.

साम्राज्यवादाचा प्रखर विरोधक आणि आंतरराष्ट्रीयवादी(internationalist) भगतसिंह हे आनंद यांचे तरुणपणीचे आदर्श. विविध घटनांमध्ये वेळोवेळी हस्तक्षेपकरत,भारतात आणि भारतासंबंधी आज सुरु असलेल्या चिकित्सक विवादांच्या कायम केंद्रस्थानी राहणे हा आनंद यांनी आपल्या आदर्शाशी राखलेल्या इमानाचीच पोचपावती म्हणता येईल.आपल्या लेखनाद्वारे ते एखाद्या युक्तिवादाला सबळ पुरावा उपलब्ध करून देतात किंवा अन्य एखादा युक्तिवाद समूळ उद्ध्वस्त तरी करून टाकतात. त्यांनी मांडलेल्या संकल्पनांचा गांभीर्याने विचार करणाऱ्या वाचकांची कधीच निराशा होत नाही हे मात्र खरे.

चर्चा जागतिकीकरणाची : आपण सर्व याबद्दल खुशच आहोत, नाही का? 

१९९१ पासून आर्थिक उदारीकरणावर जितकी चर्चा, वाद-विवाद झाले तितके खचितच दुसऱ्या कुठल्याही गोष्टीवर झाले नसतील. अगदी सुरवातीच्या काळात १९९६ साली ऑक्सफर्ड विद्यापीठात व्याख्यानाच्या रूपात प्रस्तुत केलेल्या आपल्या शोधनिबंधात, आनंद यांनी या ‘नवउदारतावादी जागतिकीकरणा’च्या धोरणांच्या, भारतीय लोकसंख्येत बहुसंख्य असणाऱ्या गरीब आणि दलित समूहांवर होणाऱ्या परिणामांची रूपरेषा स्पष्टपणे मांडली.

आजही त्या निबंधात वापरण्यात आलेल्या पद्धती, निकष (अन्न सुरक्षा, महागाई, रोजगार, दारिद्रय), सोबत सादर करण्यात आलेले पुरावे आणि युक्तिवादात असलेली ताकद यामुळे तो शोधनिबंध वाचलाच पाहिजे असा आहे. यामुळेच हा निबंध काळाच्या कसोटीवर खरा उतरला आहे. जागतिकीकरणावर आज होणाऱ्या कोणत्याही चर्चेला त्या निबंधात केलेल्या दोन दाव्यांकडे दुर्लक्ष करता येत नाही. त्यांनी केलेला पहिला दावा म्हणजे ‘कुठलीही राजकीय व्यवस्था असली तरी आर्थिक सुधारणांमध्ये जात्याच ‘श्रीमंताच्या बाजूला झुकणारी’ प्रवृत्ती पहावयास मिळते’, आणि दुसरा म्हणजे ‘आर्थिक सुधारणा कुठल्याही धोरणांची फलश्रुती नसते तर उद्भवलेल्या पेचप्रसंगातून मार्ग काढणे हाचचा मुख्य उद्देश असतो.’ १९९०च्या शेवटी पहावयास मिळालेले त्यांच्या या निष्कर्षांचे सूचक उदाहरण बघूया:

(आर्थिक) सुधारणांमुळे ओढवलेल्या आर्थिक संकटांचे सामाजिक दुष्परिणाम दलित समूहांसाठी निश्चितच अनिष्टसूचक ठरणार आहेत. एका बाजूला ते अधिकाधिक दरिद्री होत जाणार आहेत तर दुसरीकडे बाजारातील रोजगाराच्या संधींसाठी विविध जनसमूहांमध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण होणार आहे. मनुष्यबळ कमी करण्याची. व्यवसायांची वाढती प्रवृत्ती, खाजगीकरणामुळे आरक्षण व्यवस्थेचे वास्तवातहोणारे उच्चाटन, श्रमांना अधिकलवचिक आणि अनौपचारिक करण्याची धोरणे, शेतीचे कॉर्पोरेटायजेशन आणित्यातून शेतकऱ्यांचे विस्थापन इत्यादिमुळे रोजगाराच्या बाजाराकडे लोकांचा लोंढा वाढेल. अश्या परिस्थितीत लोकांच्या मनात खोलवर रुजलेले जातींविषयीचे पूर्वग्रह पुन्हा उफाळून येतील. दलित समूहांसाठी हे नक्कीच नुकसानकारक ठरणारे आहे. (तेलतुंबडे, ‘Globalization and the Dalits’, 2001)

सध्या मोठ्या संख्येने होणारी शेतकरी आंदोलने, युवकांसाठी रोजगाराचा प्रचंड अभाव, सत्ताधाऱ्यांच्या धोरणांना दलित समूहांमधून होऊ लागलेला प्रतिकार पाहता, तेलतुंबडे यांच्या लेखणीमुळे ‘अच्छे दिन आनेवाले है’ सारख्या तुपकट घोषणा देणाऱ्या मंडळींची चांगलीच गोची झाली आहे.

जागतिकीकरणाचा अनुभव असे सांगतो की तो काहींना जेते बनवतो तर काहींच्या माथी पराभवाचा शिक्का मारतो.  सौजन्य : होरीया वेरीयन / फ्लिकर

चर्चा जातीवादाची : आपण अजूनही त्यापलीकडे गेलो नाही?

भारतातील कुठल्याही घटनेबाबत,जात आणि जातीव्यवस्थेबाबत बोलणे अपरिहार्य ठरते. जात आणि जातीव्यवस्था ही इतिहासातील मिथके आहेत असे सर्रासपणे बोलले जात असले तरी आनंद तेलतुंबडे यांनी, तत्कालीन राजकीय व आर्थिक परिप्रेक्ष्यानुसार बदलत राहून,‘जात’किती हानिकारक ठरत राहिली आहे हे दाखवून दिले.

ही ‘जुनी व्यवस्था’ जातींच्या ‘नव्या रचनेमध्ये’ अजूनही कशी टिकून आहे (किंबहुना अधिक बळकट झाली आहे) याबाबत त्यांनी रोचक आणि सातत्यपूर्ण विचार मांडला आहे. २००६ साली महाराष्ट्रामध्ये भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी येथे झालेल्या अत्याचाराच्या त्यांनी केलेल्या विश्लेषणामधूनजातीवादाला समजणे इतिहासातील मिथके किंवा आजच्या भारतातील मध्यवर्ती घटना नाही असे समजणे किती धोकादायक आहे हे स्पष्ट दिसून येते. प्रतिमाभंजन करणाऱ्या तेलतुंबडे यांच्या सर्वोत्कृष्ट लेखनाचा हा एक नमुना:

भारतातील जात प्रश्न हा अनेक मिथकांमध्ये हरवून गेला आहे. खैरलांजीच्या घटनेमुळे यांपैकी अनेक मिथके उद्ध्वस्त झाली आहेत. जागतिकीकरणामुळे जातीवाद नष्ट होईल हे अगदी सुरुवातीचे नव-उदारमतवादी मिथक होते. दलितांचा आर्थिक विकास आणि त्याच्याशी निगडित सांस्कृतिक विकास झाला कि दलितांचे होणारे जाती आधारित शोषण संपुष्टात येईल असे एक मिथक काही अर्थतज्ञांनी तयार केले होते. सहा दशकांत झालेल्या विकासामुळे येथे एक सभ्य नागरी समाज उदयास आला असून त्यामध्ये जातीव्यवस्थेचा विरोध करणाऱ्या दलितेतर मंडळींची संख्या लक्षणीय आहे असेही एक मिथक येथे पहावयास मिळते. येथील सर्वात प्रातिनिधिक म्हणता येईल असे मिथक म्हणजे, जर दलितांना प्रशासनात आणि इतर प्रत्येक क्षेत्रात बसवले तर ही मंडळी व्यवस्थेतील जातीदोष नष्ट करतील व स्वतः न्याय मिळवू शकतील.  खैरलांजी आणि तिच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या घटनांनी ही सर्व मिथके उद्ध्वस्त केली.

(तेलतुंबडे,The Persistance of Caste: The Khairlanji Murders and India’s Hidden Apartheid, 2010, p. 173-4)

जातप्रश्नावरील कुठल्याच रूढ संकल्पनेला तेलतुंबडे सोडत नाहीत. मग ते जातीला वर्ग व्यवस्थेहून भिन्न मानून जातवास्तवाशी जोडून घेण्यासाठी झगडणारे डावे असोत, की भारतीय प्रशासनात मोक्याच्या जागामिळवून त्याद्वारे भारतीय राज्यव्यवस्थेचेचरित्र बदलण्याची श्रद्धा उराशी बाळगणारे ऊर्ध्वगामी दलित असोत, किंवा आधुनिक सभ्यतेमुळे जातीव्यवस्था नष्ट होईल या स्वप्नरंजनात रमणारी जातीवादविरोधी दलितेतर मंडळी असोत!

या सर्वांवर तेलतुंबडे सहानुभूतीपूर्ण टीका करत असले तरी भारतीय राज्यव्यवस्था आणि भांडवलशाही यावर त्यांनी नेहमीच अत्यंत कठोर टीका केली आहे. पुरोगामी दलित चळवळींच्या अतिशय पद्धतशीरपणे केल्या जाणाऱ्या ऐतिहासिक खच्चीकरणाचे पुरावे त्यांनी राज्याच्या नव-उदारमतवादी आणि हिंदुत्ववादी वृत्तीचे विश्लेषण करणाऱ्या आपल्या पुस्तकात विस्ताराने मांडले आहेत.

चर्चा हिंदुत्वाची : त्याकडे आपण लक्ष देण्याची खरच गरज आहे का ?

आज भारतभर घडणारी व लोकांचे मत बनवणारी तिसरी चर्चा म्हणजे हिंदुत्वाचे महत्त्व. भारतात हिंदुत्ववादी चळवळींचे मोठ्या प्रमाणात होणारे सैनिकीकरण आणि त्यांच्या विचारधारेतला कमालीचा कडवेपणा या गोष्टी नाकारणे आता अशक्य आहे. पोलिसांना सापडलेले शस्त्रसाठे असोत की बॉम्बस्फोट घडविण्याचा कट उघड होणे असो, हिंदुत्ववादी संघटनांबद्द्ल दररोज काहीतरी बातमी (मुख्य प्रवाहातील माध्यमांमधूनही) समोर येतच असते.

असे असूनही मध्यम-वर्गातील अनेकांना हिंदुत्ववाद हा एक परीघावरील किंवा निरुपद्रवी विचार वाटत असतो. याविषयी लेखमालिका आणि एक संपादित खंड (Hindutva and Dalits: Perspectives for Understanding Communal Praxis, 2005)यांद्वारे तेलतुंबडे यांनी आपल्या चिकित्सक अभ्यासाद्वारे  भारतातील या प्रमुख राजकीय चळवळीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला आहे. यात त्यांनी विशेषतः हिंदुत्व दलितांना कसे आपले सहकारी बनवू इच्छित आहे, आंबेडकरांच्या भगवेकरणाचे असंख्य प्रयत्न होऊनही ते हिंदुत्वाच्या इप्सितामध्ये अडथळा कसे ठरले आहेत, हिंदुत्वाच्या धोक्याबद्दल दिवसेंदिवस दलितांमध्ये जागृती कशी येत आहे,इत्यादि घडामोडींवर लक्ष केंद्रित केले आहे.

त्यांच्या अगदी अलीकडच्या पुस्तकात (ज्याचे मी इतरत्रयाठिकाणी पुस्तक परीक्षण केले आहे) त्यांनी हिंदुत्व या संकल्पनेची अतिशय कठोर शब्दात ज्या पद्धतीने चिरफाड केली आहे तशी चिकित्सा क्वचितच आजवरच्या कुणी अभ्यासकाने केली असेल. त्यांचे हे पुस्तक येत्या काळात भारतावरील एक महत्वाचे संदर्भपुस्तक म्हणून नावाजले जाईल हे नक्की.

आंबेडकरांना आपल्या बाजूला ओढण्याचा भगवा ब्रिगेडचा डाव आनंद यांनी आपल्या उत्कृष्ट विश्लेषणाद्वारे उघडा पाडला आहे. ते लिहितात :

मोहम्मद अखलाक आणि रोहित वेमुला यांच्या हत्येच्या मुळाशी ब्राह्मणी व्यवस्था असून, याच व्यवस्थेला पुनर्स्थापित करण्यासाठी भाजप आणि त्यांच्या परिवारातील इतर भ्रातृसंघटना कंबर कसून मैदानात उतरल्या आहेत. शोषित-वंचितांचे पद्धतशीरपणे खच्चीकरण करून अभिजनवाद पोसणे हीच त्यांची विचारधारा राहिली आहे. हा परस्परसंबंध लपवून ठेवण्यासाठीच या मंडळींकडून आंबेडकरांना आपल्या गोटात सामील करून घेण्याची धडपड सुरु असते. दलित आणि मुस्लिम या दोन समूहांची आपापसात युती होऊ न देणे, त्यात अडथळे निर्माण करणे संघ परिवाराच्या अग्रक्रमावर आहे. संघ परिवाराने आंबेडकरांबद्दल पसरवलेल्या खोट्या माहितीचा समाचार घेऊन त्याला आंबेडकरांच्याच लेखनातील संदर्भांच्या आधारे प्रत्युत्तर देऊन ते Ambedkar on Muslims: Myths and Facts (2003) या पुस्तकरूपाने प्रसिद्ध करायला मला अवघे चार दिवस लागले. यावरूनच या मंडळींनी चालवलेले ‘संशोधन’ किती तकलादू आहे याचा अंदाज आपल्याला येईल. (Teltumbde, Republic of Caste: Thinking equality in the Time of Neoliberal Hindutva, 2018, pp. 280-2).

तेलतुंबडे यांच्या लेखनातून त्यांच्या संकल्पनांचा दारुगोळा सातत्याने असा काही बरसत राहिला की ‘राजा नागडा असल्याचे’वारंवार सिद्ध झाले. त्यांनी दाखवून दिले की वर नमूद केलेल्या तीनही चर्चांचे धागे हा शेवटी एकाच गोष्टीचा परिपाक आहे. फासिझम लादला जाण्याची शक्यताही भारतीय लोकशाहीच्या मानगुटीवरभुतासारखी बसली आहे.

डॉ. आंबेडकरांना आपल्या गोटात सामील करून घेण्याचे संघ परिवाराचे प्रयत्न फोल ठरले आहेत.सौजन्य : पीटीआय फाईल फोटो

मग डॉ.तेलतुंबडे यांच्यामुळे नक्की कोण भयभीत झाले आहे?

आज जेव्हा ‘फेक न्यूज’ने उच्छाद मांडलाय, पठडीबद्ध विचारांनाच जेव्हा नाविन्यपूर्ण विचार म्हटले जात आहे, सत्तेच्या उन्मादामुळे सत्य दाबले जात आहे, अनैतिहासिक अश्या सामान्य धारणा ज्ञान म्हणून मिरवल्या जात आहेत, अशा वेळीतेलतुंबडे यांचा तर्कशुद्ध विचार,कोण नष्ट करू पाहत आहेत?  तेलतुंबडे यांच्या लेखनामुळे कुणाच्या पोकळ विचारांचा फुगा फुटणार आहे? तेलतुंबडेंनी कुणाचा राग ओढवून घेतला आहे? तेलतुंबडे यांच्या अभ्यासू मांडणीमुळेकुठल्या समूहाच्या अस्तित्वाला आव्हान मिळाले आहे, कुणाला जाब विचारले जाऊ लागले आहेत?

तेलतुंबडेंना घाबरणाऱ्यांमध्ये असंख्य अभ्यासक, विद्यार्थी, कार्यकर्ते, शिक्षक-प्राध्यापक,एकतेवर विश्वास ठेवणाऱ्या विविध समूहांचे सदस्य, दलित, मुस्लिम, जातीवादाच्या विरोधात असणारे दलितेतर हिंदू ही मंडळी नक्कीच नाहीत. त्यांच्या जवळ जाण्याची, सोबत काम करण्याची संधी मिळालेले त्यांचे सहकारी असोत की कॉर्पोरेट क्षेत्रातील सहकारी, शहरी आणि ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेले त्यांचे ज्ञातीबांधव असोत, ही सारी मंडळी सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या खऱ्या विचारवंताला ओळखायला शिकली आहेत.

भारतात आज तेलतुंबडे यांना दिल्या जाणाऱ्या अपमानस्पद वागणुकीच्या विरोधात जनमानसात प्रचंड रोष आहे. ही मंडळी मोठ्या संख्येने तेलतुंबडे यांच्या समर्थनार्थ उभी राहिली आहेत. त्यांचे वैचारिक आणि राजकीय प्रतिस्पर्धी तेलतुंबडे यांनी मांडलेल्या लढ्याच्या स्वरूपाविषयी व उपायांविषयी त्यांच्याशी भांडतही जरी असले तरी तेलतुंबडे यांनी सध्याच्या परिस्थितीबद्दल मांडलेल्या संकल्पना व तर्क, ही मंडळीही नाकारू शकत नाहीत.  शेवटी वैचारिक युद्ध म्हणजे व्यक्तीवर हल्ला करणे नसून एखाद्या संकल्पनेवर किंवा आशयावर मतभिन्नता प्रकट करणे होय.

मग ही मंडळी कोण असू शकतील? हे समूह कुठल्या विचारधारेचे समर्थक असतील? बेलगाम झालेल्या नव-उदारमतवादी भांडवलशाहीचे की आधुनिक भारतात अप्रासंगिक ठरू लागलेल्या जातींचे? जगातील सर्वात मोठ्या (तथाकथित) लोकशाहीच्या यशाच्या उपहासाने घोषणा देत मृतदेहाचे खच पाडत निघालेल्या हिंदुत्वाच्या विजयरथाचे?

तेलतुंबडे यांनी सत्य मांडल्यामुळे ज्यांच्या अंगावर काटा येतो, ज्यांच्या भूमिकांमधील दुटप्पीपणा उघडा पडतो तेच आज घाबरले आहेत. या भूतलावरील दुर्बल, शोषित-वंचित समूहांनीच या भूमीचा सद्सद्विवेक जागा ठेवला आहे. पुन्हा इतिहास घडवायचा असेल तर याच समूहांनी जागृत व्हायला हवे हे भारताबद्दलचे आजवर अनेकांना केवळ ढोबळपणे जाणवलेले सत्य त्यांनी धैर्याने आपल्या लिखाणातून स्पष्टपणे मांडल्यामुळे ज्यांच्या तटबंदीला खिंडार पडू लागते, अश्या मंडळींमध्ये तेलतुंबडे यांच्यामुळे अस्वस्थता पसरली आहे.

या निबंधाच्या सुरुवातीला उद्धृत केलेला उतारा तेलतुंबडे यांच्या ज्या पुस्तकातील आहे, ते पुस्तक त्यांनीलाल सलाम आणि जय भीम मधील भिन्नता नाकारणाऱ्या, दलित वस्तींमधील बुद्ध विहारांतून आणि अशाच अपेक्षा करणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तींकडूनही इन्क़लाब झिंदाबादच्या घोषणांचा जयघोष ऐकण्यासाठी आतुर असलेल्या विलास घोगरे सारख्या द्रष्ट्या कवीला अर्पण करावे यात नवल वाटण्यासारखे काही नाही.

——————————————————————

एन. बालमुरली हे अमेरिकेतील न्यू जर्सी येथील विल्यम पॅटर्सन विद्यापीठात मानववंश शास्त्रज्ञ आहेत. 

सदर लेख मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे.

(अनुवाद : समीर दि. शेख)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0