अरबी आणि फारसीचा भारतीय भाषांवरील प्रभाव

अरबी आणि फारसीचा भारतीय भाषांवरील प्रभाव

हिंदू-मुस्लिम संवाद - भारतातील हिंदी, पंजाबी, गुजराती, बंगाली, आसामी, उडिया आणि मराठी या आधुनिक भाषा जर आपण तपासायला लागलो तर असे लक्षात येते की, या भाषा बोलणाऱ्या प्रांतामधून जसा हिंदू-मुस्लिम संवाद सुरू झाला तसा अरबी आणि पर्शियन या दोन भाषांचा वेगवेगळा प्रभाव या प्रत्येक भाषेवर पडला.

शैलीदार आद्यनायक
गुजरातमध्ये पराभवाचा केजरीवालांचा भाजपला इशारा
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात नेहरूंचा ‘ठळकपणे अनुल्लेख’

कुठल्याही भाषेचा जर इतिहास तपासला तर असे लक्षात येईल की भाषा हे जरी मानवी संवादाचे प्रभावी माध्यम असले तरी जोपर्यंत अशी भाषा लिहिण्याचे साधन जोपर्यंत माणूस निर्माण करीत नाही तोपर्यंत भाषेत बोलले गेलेले संवाद आणि विचार हे इतर माणसांपर्यंत पोहोचवता येत नाहीत. जगभर जे असे पुरालेख सापडलेले आहेत त्यांचा इतिहास हा पाच हजार वर्षांहून जुना नाही. कागदाचा शोध दोन हजार वर्षांपूर्वीचा. मुद्रणाचा शोध पाचशे वर्षांपूर्वीचा तर ध्वनीमुद्रणाचा शोध फक्त सव्वाशे वर्षांपूर्वीचा.

भारतात इ. स. १००० पर्यंत जे पुरालेख सापडलेले आहेत ते प्रामुख्याने तीन प्रकारच्या लिपींमधील आहेत. एक सिंधू लिपी, दुसरी ब्राह्मी लिपी आणि तिसरी तमीळ-ब्राह्मी लिपी. यांपैकी सिंधू पुरालेख अनेक आणि अनेक ठिकाणी जरी सापडले असले तरी त्यांचे वाचन आणि त्या भाषेचा काहीही मागोवा कुणालाही घेता आलेला नाही. इ. स. पूर्व ५०० पासून पुढे सुमारे हजार वर्षे भारतात ब्राह्मी लिपीतले पुरालेख सापडतात. दक्षिण भारतात जे प्रांतीय बदल आहेत ते प्रामुख्याने तमिळबाबत आहेत आणि त्यामुळे तमिळ-ब्राह्मी लिपी असा एक वेगळा वर्ग मानला जातो. आधुनिक भारोपीय भाषा ज्या देवनागरी कुळातील लिप्यांमध्ये लिहिल्या जातात. त्या लिपीतील पुरालेख इ. स.च्या बाराव्या शतकाच्या पुढचे आहेत. थोडक्यात म्हणजे मुसलमान इथे यायच्या आधी भारतीय भाषांचा भाषाशास्त्रीय दृष्ट्या उत्तम विकास झाला होता.

मुसलमानांनी तत्कालीन पर्शियन राज्य जिंकले आणि मिळेल त्या मार्गांनी तिथल्या लोकांचे इस्लामीकरण केले. हे इस्लामीकरण इतके सार्वत्रिक होते की, आजच्या इराणी लोकांना त्यांचे हजार वर्षांपूर्वीचे पूर्वज इस्लामहून वेगळ्या धर्माचे होते हे इतिहासात वाचावे लागते. इस्लाममध्येच इसवीसनाच्या सातव्या शतकाच्या शेवटी सुन्नी आणि शिया हे दोन प्रमुख उपपंथ निर्माण झाले होते. आज संपूर्ण जगात इराण हा एकमेव देश असा, जो शियाबहुल मुसलमानांचा आहे. म्हणजे जर खरे बघितले तर अरबस्तानातल्या मूळचा अरबी मुसलमानांना इराणचेही संपूर्ण इस्लामीकरण करणे जमले नाही. इराकपासून पश्चिम आशिया आणि येमेन पर्यंतचे अरबस्तान आणि इराण हे हजार वर्षांपूर्वीपासून एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. इस्लाम हा धर्म आणि दोन देशांमधले राजकारण यांची फारकत ही अशी इराणपासून झालेली आहे.

इराणमध्ये अवेस्ताकाळापासून म्हणजे इ. स. पूर्व १००० पासून प्राचीन पर्शियन भाषा बोलली जाते. पर्शियन ही इंडो-युरोपियन म्हणजे भारोपीय भाषा आहे. अवेस्ता आणि भारतीय ऋग्वेद यांच्यातले साम्य लक्षणीय आहे. याच भाषेला झरत्रुष्टी असेही म्हणतात. भारतातल्या आधुनिक सर्व भाषा उर्दूचा अपवाद वगळता डावीकडून उजवीकडे लिहिल्या जातात. भारतात सर्वत्र आढळणारे ब्राम्ही, तमिळ-ब्राम्ही, आधुनिक देवनागरी आणि आधुनिक द्रवीड भाषांमधले पुरालेख हे ज्या लिप्यांमध्ये लिहिले जातात, त्या सर्व लिप्या कागदाच्या डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाणाऱ्या लिप्या आहेत. भारतात बुद्धपूर्व पुरालेख फारसे सापडत नाहीत. सिंधू संस्कृतीतील चिन्हांकित पुराचिन्हे आजवर वाचता आलेली नाहीत. ही लिपी चिनी चित्रलिपी प्रमाणे असावी असा कयास आहे. भारतातले पहिले वाचले गेलेले पुरालेख सम्राट अशोकाच्या काळातले आहेत. जे भारतभर आणि श्रीलंकेतही सापडले आहेत. हे सर्व ब्राम्ही लिपी कुटुंबातील आहेत. अशोकानंतर मौर्य साम्राज्य उतरणीला लागले. याच सुमारास बॅक्ट्रिया या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशातून हूण वंशाचे आणि भारतात कुशाण साम्राज्य म्हणून ओळखले गेलेले राज्य निर्माण झाले. इराणच्या पूर्वेला संपूर्ण अफगाणिस्तान, मध्य आशियातील पामीरचे पठार,उत्तरेला फरगाणा प्रांतातून हिमालयाच्या उत्तरेला चीनपर्यंत आणि भारतीय उपखंडात पूर्वेला मथुरा, साकेत (सारनाथ), पाटलीपुत्र आणि दक्षिणेला उज्जैन, विदिशेपर्यंत इतक्या मोठ्या विशाल भूभागावर कुशाणांचे राज्य होते. इ. स. पूर्व पहिल्या शतकापर्यंत यांच्या राजव्यवहाराची भाषा ग्रीक होती. नंतरची सुमारे दोनशे वर्षे यांनी बॅक्ट्रियन भाषा राजव्यवहारात वापरली. यांच्या राज्यात यांनी प्रामुख्याने बौद्ध धर्माला आश्रय दिला. त्याच बरोबर यांच्या राज्यात हिंदू आणि झरत्रुष्टी लोकही राहात असत. यांचे सर्व पुरालेख हे खरोष्टी लिपीत आहेत. यांच्यामुळे भारतात उजवीकडून डावीकडे लिहिली जाणारी लिपी प्रथमच अवतरलेली दिसते. याच लिपीचा प्रभाव नंतरची दोन हजार वर्षे इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील सर्व प्रांतांवर राहिला.

मुसलमानांची मूळ भाषा जी अरबी, ती भाषाही उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. अरबस्तानातल्या वैराण वाळवंटामुळे अरबी भाषेतले पुरालेख किंवा ख्रिस्ताच्या अरेमिक या मातृभाषेतील पुरालेख इ.स.च्या तिसऱ्या शतकाआधीचे फारसे सापडत नाहीत. जे सापडतात ते उत्तरेतल्या सीरिया, तुर्कस्तान या युरोपातील काही देशांमधून सापडतात आणि असे पुरालेख बहुतांश प्राचीन ग्रीक आणि ग्रीको-रोमन पद्धतीचे आहेत. पाकिस्तानात आणि अफगाणिस्तानात बोलल्या जाणाऱ्या बहुतांश सर्व भाषांची लिपी ही खरोष्टी प्रमाणे उजवीकडून डावीकडे लिहिली जाणारी लिपी आहे. आजच्या भारतात उर्दू ही एकमेव भारोपीय भाषा आहे जी इतर भारतीय भाषांहून वेगळी म्हणजे उजवीकडून डावीकडे लिहिली जाते.

मंगोलांनी बगदादमधील अरबी साम्राज्य नष्ट केल्यावर इराणपासून पूर्वेला जरी धर्म म्हणून इस्लाम भारतातल्या सिंध प्रांतापर्यंत शिल्लक राहिला तरी माणसांची भाषा म्हणून किंवा राजव्यवहाराची भाषा म्हणून अरबी भाषेचे महत्त्व संपले होते. इस्लामचा धर्मग्रंथ कुरआन अरबीमध्ये असल्याने अरबीचे मुसलमान धर्मातले, धार्मिक व्यवहारांमधील आणि धर्मशास्त्रातले महत्त्व मात्र शिल्लक राहिले.

भारतात खरा हिंदू-मुस्लीम संवाद सुरू व्हायच्या आधी सुमारे चारशे ते पाचशे वर्षे इराण आणि अरबस्तान असा दोन भिन्न वंश, भाषा, वर्ण आणि संस्कृती असा संवाद होत राहिला. हा संवाद समजल्याशिवाय भारतातील हिंदू-मुस्लीम संवाद समजणे अवघड आहे. आजच्या इराकपासून पाकिस्तानपर्यंत आणि मध्य आशियातील कझाकिस्तान, किर्गिझस्तान, ताजिकीस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकीस्तान हे देश आणि भारतातील अयोध्यापर्यंत पूर्वेकडे आणि दक्षिणेला उज्जैनपर्यंत इस्लामपूर्व पाचशे वर्षांपासून ते इस्लामनंतर पाचशे वर्षे खूप मोठी सांस्कृतिक घुसळण होत राहिली.

इस्लामपूर्व काळात इराक वगळता या संपूर्ण भूभागात झरत्रुष्टी, बौद्ध आणि भारताच्या पश्चिम भागात हिंदू या तीन धर्मांचे प्राबल्य राहिले. बोलल्या जाणाऱ्या भाषा मात्र ब्राहुईचा अपवाद वगळता पूर्णपणे भारोपीय भाषाच राहिल्या. अगदी सुरवातीला जरी या सर्व भूभागावर ग्रीक प्रभाव दिसत राहिला तरी तो प्रभाव शे-दोनशे वर्षांहून कुठेही जास्त टिकला नाही. या संपूर्ण भूभागाचे आणि संस्कृतीचे समग्र आकलन घेऊन भारतात आक्रमण करणारे पहिले राज्यकर्ते मुघल.

हे वंशाने तुर्क-मंगोल. यांची मातृभाषा तुर्की बोलीची एक बोली होती. अरबी नव्हे. चेंगिझखानाचा धर्म जरी इस्लाम नसला तरी चेंगिझखानाच्या नातवापासून पुढे सर्व मंगोलांनी इस्लाम स्वीकारला. चेंगिझने जी कत्तल बगदादमध्ये केली त्यानंतर तिथल्या संग्रहालयांमधून निर्माण केलेली सर्व अरबी साधने बगदादबरोबरच संपली.

मुघलांनी त्यांच्या प्रजेसाठी वापरायची भाषा म्हणून पर्शियन भाषा निवडली. कारण पर्शियन भाषा इस्लामपूर्व काळापासून समृद्ध भाषा होती. अरबीमध्ये भारोपीय भाषांमधून आढळणारी अनेक व्यंजने किंवा वर्णच नाहीत. ‘प’ हे व्यंजन अरबी भाषेमध्ये नाही. अरबी माणसाला ‘प’ किंवा रोमन लिपितल्या ‘पी’ या वर्णाचा चिन्हाचा उच्चारच करता येत नाही. परवेझ या पर्शियन नावाचा उच्चार अरबी माणूस बरवेझ असा करतो.

भारतातील हिंदी, पंजाबी, गुजराती, बंगाली, आसामी, उडिया आणि मराठी या आधुनिक भाषा जर आपण तपासायला लागलो तर असे लक्षात येते की, या भाषा बोलणाऱ्या प्रांतामधून जसा हिंदू-मुस्लिम संवाद सुरू झाला तसा अरबी आणि पर्शियन या दोन भाषांचा वेगवेगळा प्रभाव या प्रत्येक भाषेवर पडला. भारतीय उपखंडातील मुसलमानांनी सामाजिक आणि राजकीय व्यवहारांसाठी स्वीकारलेल्या उर्दू या भाषेला तर जेमतेम तीनशे वर्षांचा इतिहास आहे. औरंगजेबानंतर भारतात सगळीकडे मुसलमानी सत्ता उतरणीला लागली तरी नेमका हाच काळ उर्दूच्या भाषा म्हणून उदयाचा आहे.

भारतातील भाषांचे प्रभाव, वापर, प्रगती, साहित्यनिर्मिती, एकमेकींमधले आदान-प्रदान हे सर्व भाषाशास्त्रातील संशोधनाचे आणि अभ्यासाचे स्वतंत्र विषय आहेत. एका लेखात लिहिण्याचे विषय नाहीत. उदा. दक्षिण अमेरिकेतून स्पॅनिशांनी युरोपात नेलेला बटाटा हा सर्वप्रथम अरबांना मिळाला. अरबांनी बटाटा समुद्रमार्गाने भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर उतरवला. त्यामुळे उत्तर भारताच्याही आधी महाराष्ट्रात बटाटा सोळाव्या शतकात पोहोचला. बहुतेक युरोपियन भाषांमधून बटाट्याला पोटॅटो किंवा ‘प’ या व्यंजनाने सुरू होणारा शब्द वापरला जातो. अरब मात्र या पोटॅटोला म्हणून लागले बताता. संपूर्ण हिंदी भाषिक भारत बटाट्याला आलू म्हणतो. मराठी मात्र बटाटा म्हणते. जे उघड उघड बताताचे मराठीकरण आहे.

मागील शंभर वर्षेतरी भारतातल्या आधुनिक भाषांवर अरबी आणि फारसीचा प्रभाव किंवा या दोन भाषा आणि प्रांतीय भाषा यांच्यातला संवाद या विषयावर अभ्यासक अभ्यास करत आहेत.

मराठीत अशा प्रकारचे काम मराठीचे सुप्रसिद्ध प्राध्यापक डॉ. यु. म. पठाण यांनी साठच्या दशकात केले आहे. पठाण सरांचा पी.एचडी. प्रबंध या विषयावर आहे. जो नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठाने अधिकृत प्रकाशन म्हणून प्रकाशित केला. तत्कालीन मराठीतील अरबी आणि पर्शियन शब्दांची यादीच पठाण सरांनी या प्रबंधाचे परिशिष्ट म्हणून जोडली आहे. मराठीतले सुमारे पंधरा टक्के शब्द हे अरबी किंवा पर्शियन मूळाचे (Roots) आहेत, असा या प्रबंधाचा निष्कर्ष आहे. भारतातील जवळपास सर्वच आधुनिक भाषांना ही टक्केवारी लागू पडते. फक्त शब्दांची यादी भाषापरत्वे बदलत राहते.

उत्तर भारतात सुमारे सातशे वर्षे आणि द. भारतात सुमारे पाचशे वर्षे राजव्यवहाराची भाषा म्हणून पर्शियन भाषा वापरली गेल्याने भारतातील प्रत्येक भाषेवर अरबी आणि पर्शियनचा प्रभाव असणे साहजिकच आहे. कुठल्याही समुहाची भाषा हा एक प्रवाह असतो. जो सर्वसाधारणपणे पन्नास ते शंभर वर्षांमध्ये बदलत राहतो. आधुनिक मराठीचेही ज्ञानेश्वर आणि महानुभाव कालापासून एकूण साताठ कालखंड करावे लागतात.

भारतात विसाव्या शतकात हिंदू आणि मुसलमान धर्मियांमध्ये जे सामाजिक आणि राजकीय संघर्ष घडले त्याची परिणती भारतीय उपखंडात तीन स्वतंत्र देश निर्माण होण्यात झाली. मागील तीस वर्षांमध्ये विशेषत: हिंदुत्ववादी विचारसरणीने राजकीय वर्चस्व मिळवल्याने मागील हजार वर्षांपासून जो हिंदू-मुसलमान संवाद सुरू आहे, तो फक्त संघर्षमय आहे, असे राजरोज इथल्या हिंदूंना सांगायला सुरूवात झाली आहे.

हिंदू-मुस्लिम संवादाचे भाषिक वास्तव अजून थोडे मांडणार आहे. ते पुढील लेखात.

राजन साने, हिंदू-मुस्लिम संवादाचे अभ्यासक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1