लष्कर भरती घोटाळाः ५ कर्नल, १७ अन्य जणांवर गुन्हे दाखल

लष्कर भरती घोटाळाः ५ कर्नल, १७ अन्य जणांवर गुन्हे दाखल

नवी दिल्लीः लष्करी अधिकारी भरती घोटाळ्यात मंगळवारी सीबीआयने लेफ्टनंट कर्नल रँकचे ५ अधिकारी, १२ अन्य कर्मचारी व ६ व्यक्तींवर भ्रष्टाचाराचा आरोप करत खटला दाखल केला आहे. सोमवारी सीबीआयने दिल्ली कँटोन्मेंट भागातल्या एका रुग्णालयाची तपासणी केली तसेच १३ शहरातील ३० ठिकाणी छापे टाकले. हे छापे कपूरथळा, बठिंडा, दिल्ली, कैथल, पलवल, लखनौ, बरेली, गोरखपूर, विशाखापट्टणम, जयपूर, गुवाहाटी, जोरहाट व चिरांग या शहरांमध्ये टाकण्यात आले.

या भरती घोटाळ्यासंदर्भात सीबीआयने भारतीय लष्करातील लेफ्ट कर्नल एसीएसएनए भगवान यांना ताब्यात घेतले. भगवान हे या प्रकरणाचे मास्टर माइंड असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.

गेल्या महिन्यात २८ फेब्रुवारी रोजी ब्रिगेडियर वी. के. पुरोहित यांनी दिल्लीतील एका रुग्णालयात उमेदवारांच्या शारिरीक चाचणीत घोटाळा होत असल्याची तक्रार दाखल केली होती. लाच देऊन उमेदवारांना उत्तीर्ण केले जात असल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले होते. त्या तक्रारीची दखल घेत सीबीआयने चौकशी सुरू केली.

या प्रकरणातील मुख्य आरोपी लेफ्ट. कर्नल भगवान हे अभ्यास सुटीवर असून नायब सुभेदार कुलदीप सिंह हे उमेदवारांकडून लाच स्वीकारत होते, असे सीबीआयचे म्हणणे आहे. त्याच बरोबर ३१ एसएसबी केंद्र उत्तरचे लेफ्ट. कर्नल सुरेंद्र सिंह, ६ माउंटन डिव्हिजन ऑर्डिनन्सचे लेफ्ट. कर्नल वाय एस चौहान, भरती महासंचलनालयाचे लेफ्ट. कर्नल सुखदेव अरोडा, लेफ्ट. कर्नल विनय व मेजर भावेश कुमार हे अधिकारी या भरती घोटाळ्यात सामील असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. या अधिकार्यांना व त्यांच्या नातेवाईकांना लाखो रुपयांची लाच देण्यात आली असून लेफ्ट. कर्नल सुरेंद्र सिंह व मेजर भावेश कुमार यांनी आपल्या नातेवाईकांच्या माध्यमातून १० ते १५ उमेदवारांकडून लाच स्वीकारल्याचा सीबीआयचा दावा आहे. भावेश कुमार यांची पत्नी देवयानी, त्यांचे वडील सुरेंद्र कुमार व आई उषा कुमावत यांनी लाच स्वीकारली असून त्यांच्याविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

लेफ्ट. कर्नल नवजोत सिंह यांनी नायब सुभेदार कुलदीप सिंह यांच्या मार्फत लेफ्ट. कर्नल भगवान यांना १० लाख रु.ची लाच दिली होती.

लेफ्ट. कर्नल विनय यांनी काही उमेदवारांच्या निवडीसाठी लेफ्ट. कर्नल सुरेंद्र सिंह यांच्याशी संपर्क साधला होता. लेफ्ट. कर्नल चौहान व लेफ्ट. कर्नल अरोडा या दोघांची नावे लेफ्ट. कर्नल सुरेंद्र सिंह यांच्या चौकशीतून पुढे आली आहेत, असे सीबीआयचे म्हणणे आहे.

सीबीआयकडे केलेल्या तक्रारीत मेजर अमित फागना यांच्यासहित ६ अन्य अधिकार्यांची नावे असून यांनी उमेदवारांच्या शारिरीक तपासणीत कथित मदत केली आहे, असाही सीबीआयचा आरोप आहे.

मूळ बातमी

(लेखाचे छायाचित्र – केवळ प्रतिकात्मक )

COMMENTS