छद्म राष्ट्रवादामध्ये अडकलेली निवडणूक

छद्म राष्ट्रवादामध्ये अडकलेली निवडणूक

महाराष्ट्रातील निवडणूक महाराष्ट्रातील मुद्द्यांवर लढवली जावी, असे वाटत असेल, तर ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा या व्यक्तींना आणि भाजपला अजिबात मंजूर नाही.

सांस्कृतिक खात्याकडून गोळवलकरांच्या जयंतीचे ट्विट
४० टक्क्याहून मुस्लिम टक्केवारीचे ५ मतदारसंघ ‘आप’कडे
कर्नाटकात विद्यार्थ्यांकडून बाबरी मशीदीचा प्रतिकात्मक विध्वंस

संघाचे प्रचारक ठिकठीकाणी फिरतात आणि इकडच्या गोष्टी तिकडे सांगत असतात. एकाचा अर्थातच दुसऱ्याशी काही संबंध नसतो. जेमतेम बुद्धी आणि तोकड्या अनुभवाच्या जोरावर ही मंडळी प्रचंड बुद्धीभेद करीत असतात. विश्वास बसत नसेल, तर सध्याची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पाहता येईल. थोड्याश्या नकला आणि आरडाओरडा करीत काश्मीर आणि ३७० कलमाचा मुद्दा, हा राज्याचा मुख्य मुद्दा म्हणून समोर आणण्यात आला आहे.

८ ऑक्टोबरला भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी बीडमध्ये परळी जवळ सावरगाव घाट येथे ३७० कलम हटविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली. ते म्हणाले, की मोदी यांनी जम्मू काश्मीरला भारताशी जोडले. त्यांचे हे काम घराघरात जायला हवे. या सभेपूर्वी अमित शहा यांचे ३७० गोळ्यांच्या फैरी झाडून स्वागत करण्यात आले. यावेळी ३७० ध्वज फडकविण्यात आले. केंद्राच्या ३७० कलम हटविण्याच्या मुद्द्याला पाठींबा देण्याचा हा प्रतीकात्मक प्रयत्न होता. ३७० कलम हटविण्याच्या मोदी यांच्या प्रयत्नांना मतपेटीतून पाठींबा देण्याचे, शहा यांनी यावेळी आवाहन केले.

मराठवाडा दुष्काळाने होरपळत आहे.

१० ऑक्टोबरला कोल्हापूरमध्ये अमित शहा यांनी तोच ३७० चा मुद्दा पुन्हा वाजवला आणि याच मुद्द्यावर मत देण्याचे आवाहन केले.

ऑगस्ट महिन्यात सांगली आणि कोल्हापूरमध्ये भयानक पूर आला होता. लोक अजूनही त्या दुःखातून बाहेर आलेले नाहीत. पूर आला त्यावेळी पहिले काही दिवस मुख्यमंत्री ‘महाजनादेश यात्रेमध्ये’ ‘बिझी’ होते. भयानक पुराच्या बातम्या आल्यावर त्यांनी यात्रा थांबवली आणि पुराकडे लक्ष दिले.

९ आणि १० ऑक्टोबरला भाजपने पुण्यात लडाखचे भाजपचे खासदार जमयांग नामग्याल यांचे बरेच कार्यक्रम आयोजित केले आणि पुण्यात ३७० कलमावर प्रचार सुरु केला. भाजपने कोथरूडमध्ये सध्याच्या आमदार मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापून, कोल्हापूरचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली. त्यांना सुरुवातीला मेधा कुलकर्णी आणि काही स्थानिक कार्यकर्ते यांच्याकडून आणि सोशल मिडीयावर बाहेरचे असल्याने विरोध झाला. पण पाटील यांनी त्यांची पहिली सभा नामग्याल यांच्याबरोबर आयोजित केली आणि ३७० आणि काश्मीरवर प्रचार सुरु केला. पहिल्याच भाषणात पाटील म्हणाले, “काश्मीरच्या मुद्द्यावर आम्ही प्रचार करीत असल्याने लोक आमच्यावर टीका करीत असले, तरी हा मुद्दा आमच्या श्रद्धेचा असल्याने आम्ही हाच मुद्दा पुढे आणणार.”

२५ सप्टेंबरला पुण्यामध्ये खूप मोठा पाऊस झाला. ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली. ठिकठीकाणी घरांमध्ये पाणी घुसले, चिखल झाला. सगळी परिस्थिती भीषण झाली होती. त्यावेळी चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री दिल्लीमध्ये जागा वाटपामध्ये व्यस्त होते. इतकी परिस्थिती भयानक असूनही पुण्याचे पालकमंत्री असणारे पाटील लगेच पुण्यात आले नाहीत. ते दोन दिवसांनी आले, तेंव्हा त्यांना लोकांच्या रागाचा सामना करावा लागला. लोकांनी त्यांना अक्षरशः काढता पाय घ्यायला लावले.

१३ ऑक्टोबरला जळगावमध्ये पंतप्रधान मोदी यांनी ३७० आणि काश्मीरचा मुद्दा घेऊन विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले की विरोधकांनी पुन्हा ३७० कलम लागू करण्याचा मुद्दा त्यांच्या निवडणूक जाहिरनाम्यामध्ये घेऊन दाखवावाच. त्यांच्या भाषणाचा बहुतांशी भाग हा कलम ३७० याच मुद्द्यावर होता.

१६ ऑक्टोबरला मोदी यांनी अकोला येथे केलेल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसवर टीका केली. कोणाचेही नाव न घेता मोदी म्हणाले, “ते निर्लज्जपणे विचारतात की काश्मीर आणि ३७० कलमाचा महाराष्ट्राशी संबंध काय, मी म्हणतो बुडून मरा (डूब मरो) बुडून मरा. त्यांनी ३७० ला संपत्तीसारखे अनेक वर्षे जपून ठेवले होते मात्र आता ते देशाला अर्पण झाले आहे.” त्यांनी लगेच भावनिक आवाहन केले. ते म्हणाले, “ज्या महाराष्ट्रीय जवानांनी काश्मीरसाठी आपले प्राण अर्पण केले, त्यांना मी सलाम करतो.”

या ३७० च्या मुद्द्यावर ‘द वायर मराठी’शी बोलताना राजकीय विश्लेषक आणि पत्रकार विनय हर्डीकर म्हणाले, “ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भाषा आहे. अंतर्गत सुरक्षा, बाह्य सुरक्षा, हिंदू, महान संस्कृती हेच शब्द ते वारंवार बोलत राहतात. नरेंद्र मोदी यांच्याकडे हा संघाचाच डीएनए आहे आणि तीच संघ प्रचारकाची भाषा ते बोलत आहेत.”

या सगळ्या ३७० च्या मुद्द्यामध्ये विरोधक उगाचच अडकत तरी गेले किंवा शांत तरी झाले.

निफाड येथील सभेमध्ये बोलताना शरद पवार, हे डूब मरो, या मोदींच्या वक्तव्यावर म्हणाले, की अशी वादग्रस्त तरतूद पुन्हा आणण्याची काय गरज आहे. ते म्हणाले, “एकदा संसदेने ३७० ची घटनेतील तरतूद जर काढून टाकली आहे, तर मोदी परत विरोधी नेत्यांना त्या मुद्द्यांमध्ये का ओढून आणत आहेत.”

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृह निर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनीही असेच भावनिक मुद्दे वापरले.

१७ ऑक्टोबरला अहमदनगर येथे बोलताना विखे पाटील यांनी विरोधकांना विचारले, की नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे भाषणातून राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय एकात्मता याविषयी युवकांना प्रेरणा देत असतील, तर त्यांनी कलम ३७० वर का बोलायचे नाही.

त्याच्या आदल्या दिवशी सातारा येथे उदयनराजे राजे भोसले म्हणाले, की ३७० कलमाचा आणि महाराष्ट्राचा संबंध काय, असे विचारणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. ३७० हटविल्यानंतर आमचे जवान आणि देशाला सुरक्षित झाल्यासारखे वाटत आहे.

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण ‘द वायर मराठी’शी बोलताना म्हणाले, “हे वास्तव आहे, की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी ३७० कलमाचा एक अजेंडा पुढे ठेवला. कारण त्यांच्याकडे आर्थिक मंदी, बेरोजगारी, असे लोकांच्या रोजच्या जगण्याच्या प्रश्नांबाबत बोलण्यासारखे काहीच नाही. त्यांनी लोकसभेला ‘पुलवामा’चा मुद्दा केला आणि आता ते काश्मीर आणि ३७० चा मुद्दा चालविण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा मुद्दा खरे तर न्यायालयात आहे आणि त्यावर सुनावणी सुरु आहे. पण ते यावर बोलतात आणि मिडियामधून त्या बातम्या येतात. पण आम्ही मात्र लोकांच्या मूळ मुद्द्यांवर बोलत राहू.”

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाच वर्षांची कारकीर्द ही तर घसा ताणून ओरडण्यात, भाषणांमधून विरोधकांवर टीका करण्यात आणि आपल्याच सहकाऱ्यांचे पंख कापण्यात गेली.

‘महाजनादेश यात्रा’ सुरु असताना एका सभेमध्ये एका शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना विचारले, की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे काय झाले, तर मुख्यमंत्र्यांनी त्याची संभावना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा एजंट अशी केली आणि ‘भारत माता की जय, अशा घोषणा द्यायला सुरुवात केली.

राजकीय विश्लेषक डॉ. विश्वंभर चौधरी यांनी फडणवीस यांची कारकीर्द विश्लेषणाच्या नजरेतून पाहिली आहे. ते म्हणाले, “सरकारला दाखविण्यासाठी काहीच नाही. फडणवीस यांची खास अशी ‘जलयुक्त शिवार योजना’ही फसली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे ३७० वर बोलण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही.”

फडणवीस यांच्या कारकिर्दीबद्दलचे मुद्दे या निवडणुकीच्या प्रचारामध्ये क्वचितच वर आले. दुष्काळ, पूर, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आर्थिक मंदी, डब्यात गेलेल्या पीएमसी आणि इतर सहकारी बँका आणि पर्यावरणाचे मुद्दे, या निवडणुकीमध्ये गायब झाले.

वरिष्ठ पत्रकार आणि संपादक अरुण खोरे म्हणाले, “भाजपने ३७० कलमाचा प्रचार करून जणू काही काश्मीर पुन्हा जिंकल्याचा आभास निर्माण केला आहे. त्यांनी हा मुद्दा भावनिक करून राष्ट्रवादाशी जोडला आहे. काही आर्थिक आणि राजकीय दबावांमुळे मिडियामधूनही हा मुद्दा पुढे येताना दिसतो. हे लोकशाहीसाठी घातक आहे.”

गुजरात निवडणुकीपूर्वी दिल्लीत पाकिस्तानी नेत्यांना डॉ. मनमोहनसिंग भेटल्याच्या बातम्या येतात. त्यावर चर्चा घडविल्या जातात. लोकसभा निवडणुकीपूर्वी पुलवामा घडते. पंतप्रधान त्याचवेळी अभयारण्यात असतात तरी लोकसभा निवडणुकीत हेच मुद्दे वापरले जातात. पाकिस्तानमध्ये केलेल्या सर्जिकल हल्ल्यावर समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. तरी तेच मुद्दे निवडणुकीत पुढे येतात. आताही हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या बरोबर एक दिवस आधी पाकिस्तानव्यापात काश्मीरमध्ये हल्ल्याच्या बातम्या येतात.

खरे तर विकासाची कामे होणे, हाच खरा राष्ट्रवाद असायला हवा, मात्र छद्मी राष्ट्रवादामध्ये ही निवडणूक अडकविण्यात आली आणि खरे मुद्दे बाजूला गेले. आता हे उगाचच छाती फुगवणारे मुद्दे दुष्काळ, पुरात झालेले नुकसान, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी आणि आर्थिक मंदीवर कसे मात करणार आहेत, हे येणारा काळच ठरवेल.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: