गेहलोत सरकारला जोशी मदत करतील का?

गेहलोत सरकारला जोशी मदत करतील का?

राजकीय संकटात सापडलेल्या मुख्यमंत्री गेहलोत यांचे राजस्थानमधील सरकार वाचवण्याचे प्रयत्न सहजासहजी सफल होतील याची खात्री नाही कारण त्यांचेच एक विरोधक व विधानसभेचे अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्या हातात पुढील खेळाची सूत्रे आहेत.

बंडखोर आमदारांची किंमत अनलिमिटेड : गेहलोत
राजस्थानमध्ये पायलट-गेहलोत गटात समेटाचे प्रयत्न?
राजस्थान काँग्रेस सरकारकडून प्रत्येक आमदाराला आयफोन

जयपूरः बंडखोर काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्या समर्थक आमदारांना गट अपात्र ठरवण्याचा अशोक गेहलोत सरकारचा प्रयत्न आहे. असे केल्याने गेहलोत सरकारला विधानसभेत सहज बहुमत जिंकता येईल. पण मुख्यमंत्री गेहलोत यांचे हे प्रयत्न सहजासहजी सफल होतील याची खात्री नाही कारण त्यांचेच एक विरोधक व विधानसभेचे अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्या हातात पुढील खेळाची सूत्रे आहेत.

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षपद दिल्याने सी.पी. जोशी नाराज झाले होते. त्यामुळे गेहलोत व त्यांच्या संबंधांमध्ये अजून कडवटपणा आहे.

या संदर्भात जयपूर येथील पत्रकार राजेंद्र बोरा सांगतात, जोशी व गेहलोत यांच्यातील वैर जुने आहे. अशा वेळी जोशी यांना गेहलोत सरकारमध्ये मंत्रीपद दिले असते तर त्यांनी गेहलोत यांच्यापुढे अनेक अडचणी उभ्या केल्या असत्या आणि हे गेहलोत यांना सहन झाले नसते.

सी. पी. जोशी यांचा जन्म राजसमंद जिल्ह्यातल्या कुनवारिया येथे झाला. मानसशास्त्र शाखेत पदवीधर असलेल्या जोशी यांच्याकडे कायद्याचीही पदवी आहे. एका महाविद्यालयात शिक्षक म्हणून काम करत असताना तत्कालिन मुख्यमंत्री मोहनलाल सुखाडिया यांच्या संपर्कात ते आले आणि जोशी यांनी राजकारणात सुखवाडिया यांच्या प्रचाराचे काम स्वीकारत उडी मारली. सुखाडिया यांना निवडणुकीत यश मिळाल्यानंतर त्यांनी पक्षातील अनेक दिग्गजांचे तिकीट कापत १९८०मध्ये जोशी यांना उमेदवारी दिली आणि वयाच्या २९व्या वर्षी जोशी आमदार म्हणून राजस्थानच्या विधानसभेत गेले.

अल्पावधीत जोशी यांनी राजस्थानात लोकप्रियता मिळवली. ते नाथडवारा येथून चार वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. १९९८मध्ये गेहलोत मुख्यमंत्री असताना त्यांनी शिक्षणखाते सांभाळले होते. त्या वेळी या दोघांमध्ये संघर्षाची पहिली ठिणगी उडाली होती.

राजस्थानची साक्षरता वाढण्यास कारणीभूत ठरलेल्या अनिल बोर्डियाप्रणित लोक जुंबिश प्रकल्पाला जोशी यांचा प्रखर विरोध होता. जोशी यांना या प्रकल्पावर सरकारचे अधिक नियंत्रण हवे होते पण बोर्डिया यांना हा प्रकल्प जनचळवळ म्हणून हवा होता. त्यामुळे गेहलोत यांच्याबरोबर जाहीरपणे जोशी यांचे काही खटके उडालेले होते.

बोर्डिया हे माजी सनदी अधिकारी व लोकप्रिय शिक्षणतज्ज्ञ होते, त्यांनी नंतर लोक जुंबिश प्रकल्प गुंडाळल्याबद्दल गेहलोत सरकारवर टीका केली होती. हा प्रकल्प गेहलोत सरकारने जागतिक बँकेच्या हवाली केला होता. या घटनेनंतर गेहलोत यांनी जोशींच्या बाबतीत अधिक काळजी घेण्यास सुरूवात केली.

२००८मध्ये सी. पी. जोशी राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष बनले. त्यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकात त्यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी घेतले जात होते. पण ते एका मताने निवडणूक हरले व गेहलोत यांच्या गळ्यात राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. गेहलोत यांनी जोशी यांना बाजूला काढण्यासाठी हे प्रयत्न केल्याचा आरोप त्यावेळी अनेकांनी केला होता.

पण या निवडणुकीच्या बाबतीत माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांचा किस्सा वेगळा आहे. “मतमोजणी झाल्यानंतर रिटर्निंग ऑफिसरने पोस्टल बॅलटची मोजणी करावी अशी मागणी जोशी यांनी केली होती. मतमोजणीत काही चुका झाल्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली. २० मिनिटाने पुन्हा निकाल जाहीर करण्यात आला त्यात जोशी यांचा पराभव अधोरेखित करण्यात आला. पण जोशी यांनी पुन्हा सर्व मतदानयंत्रे तपासून निकाल द्यावा अशी मागणी केली. जोशी यांची ही मागणीसुद्धा रिटर्निंग ऑफिसरने मान्य केली पण त्याने जोशी यांचा निकाल बदलला नाही.”

२००९मध्ये भिलवाडा येथे लोकसभेसाठी जोशी यांना तिकीट देण्यात आले. त्यांना केंद्रात बोलावून घेतले. या काळात गेहलोत यांनी राजस्थानच्या राजकारणात आपली पकड अधिक मजबूत केली.

जोशी यांच्याकडे पंचायत राज खात्याचे मंत्रिपद (२००९-११) देण्यात आले होते. या खात्याकडून काँग्रेसची महत्त्वाकांक्षी मनरेगा योजना देशभर राबवण्यात आली. पण नंतर २०११मध्ये मंत्रिमंडळात बदल करून जोशी यांच्याकडे रस्ते वाहतूक व महामार्ग खाते दिले. हे खाते त्यांच्याकडे २०१३पर्यंत होते. या काळात मुकूल रॉय यांनी रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने त्याचा अतिरिक्त भार जोशी यांच्याकडे आला.

जोशी हे गांधी घराण्याशी निकटवर्तीय असले तरी गेहलोत यांच्यासोबतचे त्यांचे संबंध फारसे चांगले नव्हते.

२०१३च्या राज्यातल्या विधानसभा निवडणुकांत जोशी यांनी गेहलोत यांच्यासोबत मंचावरही बसण्याचे टाळले होते. गेहलोत यांची मेवाड पट्ट्यातील संदेश यात्रा त्यांनी टाळली होती. वास्तविक याच पट्ट्यात जोशी यांनी दशकभर काम केले होते व त्यांचा मतदार तेथे पक्का होता.

काँग्रेसने जोशी यांच्याकडे नंतर बिहारचे प्रभारी म्हणून जबाबदारी दिली होती पण २०१८मध्ये त्यांच्या जागी तरुण नेता म्हणून शक्तीसिंह गोहील यांना आणले गेले.

दरम्यान २०१९मध्ये जोशी यांनी राजस्थान क्रिकेट अकादमीच्या अध्यक्षपदी गेहलोत यांचा मुलगा वैभव निवडून यावा यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या मदतीमुळे गेहलोत यांच्या सोबतचे त्यांचे जुने वैर संपले असा अर्थ काढला गेला. आता गेहलोत यांच्या सरकारवर जे राजकीय संकट आले आहे, त्यात ते निर्णायक भूमिका बजावतात की नाही हे पाहणे उत्सुकतेचे आहे.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0