चुरशीची व उत्कंठावर्धक स्पर्धा

चुरशीची व उत्कंठावर्धक स्पर्धा

या वर्षीच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत नाणेफेक जिंका आणि सामना जिंका हे जणू समीकरणच झाले होते. दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे दवांमुळे अवघड होत असल्याने नाणेफेक जिंकून प्रतिस्पर्ध्याला फलंदाजीसाठी आमंत्रित करणे हा जणू नियमच झाला होता.

भारत-पाक क्रिकेट- उन्माद निर्माण करण्यात काय अर्थ
बौद्धिक संपदा अधिकार म्हणजे काय? : भाग १
दिग्गज लेग स्पीनर शेन वॉर्नचे निधन

टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अतिशय रोमांचक उपांत्य सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा आणि न्यूझीलंडने इंग्लंडचा पराभव केला. दुबई इंटरनॅशनल स्टेडियममधे ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी खेळला गेला. दोन्ही चमू संतुलित असल्याने कोण विजयी होईल हे सांगणे कठीणच होते. या वर्षीच्या विश्वचषक स्पर्धेत नाणेफेक जिंका आणि सामना जिंका हे जणू समीकरणच झाले होते. दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे दवांमुळे अवघड होत असल्याने नाणेफेक जिंकून प्रतिस्पर्ध्याला फलंदाजीसाठी आमंत्रित करणे हा जणू नियमच झाला होता. अरोन फिंचने अतिशय महत्त्वाची नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला फलंदाजीस पाचारण केले. किवी कर्णधार विलियमसनने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील उत्तम खेळी करत ८५ धावा काढल्या. क्रिकेटप्रेमींच्या आठवणीत बराच काळ लक्षात राहील अशी ही खेळी ठरेल. मार्टिन गुप्तीलच्या २८ धावा वगळता कोणीही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी समोर टिकू शकले नाही. आज स्टार्कचा दिवस नव्हता. त्याच्या निर्धारित चार षटकात किवी फलंदाजांनी ६० धावा काढल्या. हेझलवूडने १६ धावात तीन गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाज झंपाची कामगिरी उत्तम राहिली. त्याने स्पर्धेत १३ खेळाडू बाद केले. केन विलियमसनच्या अप्रतिम खेळीमुळे किवी संघ १७२ धावा फळ्यावर लावू शकला.

खरंतर ही धावसंख्या ऑस्ट्रेलियाला नमवण्यासाठी पुरेशी होती. पण डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्शच्या मनांत वेगळेच होते. मार्शने पहिल्याच चेंडूवर षटकार मारत आपले मनसुबे जाहीर केले. वॉर्नर या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे फलंदाजीतील चलनी नाणे ठरला. मार्श (७७), वॉर्नर (५३) आणि मॅक्सवेल (२८) यांनी अंतिम सामना ऑस्ट्रेलियाच्या खिशात घातला. न्यूझीलंडतर्फे केवळ बोल्ट (२/१८) प्रभावी गोलंदाज ठरला. ऑस्ट्रेलियाने १९ व्या षटकात सामना जिंकला आणि तो सुद्धा ८ गडी राखून. उपांत्य फेरीत धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने १९व्या षटकात अभूतपूर्व खेळ करीत सामने जिंकले. अंतिम सामन्यात सुद्धा तीच पुनरावृत्ती झाली. ऑस्ट्रेलियाने प्रथमच टी-20 विश्वचषक जिंकला. न्यूझीलंडचा खेळ चांगला होऊनही त्यांना मार्श, वॉर्नरच्या आक्रमक फलंदाजी पुढे नमावे लागले.

डेव्हिड वॉर्नर मालिकावीर तर मिचेल मार्श सामनावीर ठरला. एव्हढे मात्र नक्की, अंतिम सामना दोन्ही उपांत्य सामन्यासारखा उत्कंठावर्धक झाला नाही. संपूर्ण सामन्यात ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व जाणवत होते.

२०२१ची टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा बऱ्याच बाबतीत भिन्न ठरली.

१. ग्रुप १ आणि ग्रुप २च्या प्रथम क्रमांकाचे संघ इंग्लंड आणि पाकिस्तान उपांत्य फेरीत बाद झाले.

२. सातव्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रथमच पारंपारिक विरोधी ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड एकमेकांसमोर उभे ठाकले. यावर्षी विश्वचषक स्पर्धेत नवीन विश्वविजेता मिळणार हे नक्की झाले.
३. उपांत्य फेरीतील दोन्ही सामने एकतर्फी न होता रंगतदार झाले
४. गेल्या दोन वर्षात न्यूझीलंड चमू सतत तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहचली. त्यापैकी फक्त विश्वचषक कसोटी क्रिकेट स्पर्धा जिंकू शकली. एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शेवटच्या क्षणी पंचाचा निर्णय इंग्लंडकडून लागल्यामुळे त्यांना २०१९चा विश्वचषक मिळाला नाही. एकंदरीत गेल्या दोन वर्षातील न्यूझीलंड चमूची प्रगती लक्षणीय ठरली.
५. क्रिकेट हा सांघिक खेळ असून वैयक्तिक कामगिरीवर कुठलाही सामना जिंकणे अशक्य आहे हे या स्पर्धेत वारंवार सिद्ध झाले.
६. पुढील वर्षीच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. भारताला या स्पर्धेतील अपयश धुवून काढण्याची संधी लवकरच मिळणार आहे. २०२१ स्पर्धेतील भारताचे अपयश भारतीय क्रिकेटप्रेमींना कायमच बोचत राहील.
७. खेळ म्हटला की हारजीत आलीच. पण हार सुद्धा सन्मानजनक राहू शकते, हे २०२१ स्पर्धेतील उपांत्य आणि अंतिम लढतीत विदित झाले.
२०२२चा विश्वचषक भारत जिंकेल अशी अपेक्षा करूया.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0