पतंजलीकडून कोरोनावर औषध; सरकारने मागितले स्पष्टीकरण

पतंजलीकडून कोरोनावर औषध; सरकारने मागितले स्पष्टीकरण

नवी दिल्ली: कोरोना विषाणूवर मंगळवारी योगशिक्षक रामदेव बाबा यांच्या पतंजली ग्रुपने ‘कोरोनील’ व ‘श्वासरी’ असे आयुर्वेद कीट प्रसिद्ध केले खरे पण आयुष मंत

रामदेवबाबांचा गोलमाल, भूलला ‘भक्त’जन
कोरोनाचे औषध नव्हे, केवळ बनवाबनवी!
‘संभ्रम करणारा कोरोना विषाणूचा फोटो त्वरित हटवावा’

नवी दिल्ली: कोरोना विषाणूवर मंगळवारी योगशिक्षक रामदेव बाबा यांच्या पतंजली ग्रुपने ‘कोरोनील’ व ‘श्वासरी’ असे आयुर्वेद कीट प्रसिद्ध केले खरे पण आयुष मंत्रालयाने मात्र या औषधाचा शास्त्रीय अभ्यास आम्हाला सादर केलेला नाही असे स्पष्ट केले आणि पतंजली ग्रुपला या औषधावरील संशोधन कार्य, औषधातील रासायनिक घटक व त्याचा नमूना सादर करायचे आदेश दिले आहेत. पतंजलीचे दावे जोपर्यंत शास्त्रीय कसोट्यांवर उतरत नाहीत तोपर्यंत या औषधाचे वितरण व त्याची जाहिरात करू नये असेही आदेश दिले आहेत.

आयुष मंत्रालयाने या संदर्भात उत्तराखंड सरकारमधील ज्या लायसेन्सिंग प्राधिकरणाने या औषधाला मंजुरी दिली आहे त्याची प्रतही मागितली आहे.

मंगळवारी हरिद्वारमध्ये योगविद्यापीठात पतंजली ग्रुपचे संस्थापक बाबा रामदेव यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या कंपनीने कोरोना विषाणूंना रोखणारे ‘कोरोनील’ व ‘श्वासरी’ अशी दोन आयुर्वेदिक औषधे शोधल्याचे जाहीर केले. त्यांनी या दोन आयुर्वेदिक औषधांचे कीटही सर्वांना दाखवले. यावेळी ते म्हणाले, देशभरातील २८० कोरोना बाधित रुग्णांवर या औषधांच्या चाचण्या घेतल्या असून आमचे हे औषध गुणकारी ठरले आहे व त्याने दोन क्लिनिकल ट्रायलमध्ये १०० टक्के परिणाम दिले आहेत. या चाचण्या दिल्ली, अहमदाबाद व अन्य शहरात केल्या असून १०० कोरोनाबाधित रुग्णांमधील ६७ टक्के रुग्ण पहिल्या ३ दिवसांत तर उर्वरित रुग्ण ४ दिवसांत १०० टक्के खडखडीत बरे झाले आहेत.

रामदेव बाबांनी असाही दावा केला की, सगळे जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अनेक देश कोरोनावरचे औषध शोधण्यात गुंतलेले आहेत. अशा परिस्थितीत आम्हाला आमच्या आयुर्वेदिक औषधाची घोषणा करताना आनंद होत आहे. हे औषध पतंजली रिसर्च सेंटर व जयपूरयेथील निम्स युनिव्हर्सिटीने संयुक्तपणे तयार केले असल्याची त्यांनी माहिती दिली.

हे औषध तयार करताना गिलोय, तुलसी, अश्वगंधा व श्वासरी रस यांचा उपयोग केल्याचे रामदेव बाबा यांनी सांगितले. या औषधाची किंमत ५४५ रु. असून या आठवड्यात ते पतंजलीच्या दुकानात विक्रीस उपलब्ध होईल तसेच या औषधाच्या विक्रीसाठी एक ऍप लवकरच उपलब्ध होणार असून त्याद्वारे ऑनलाइन मागणी करता येईल, असेही रामदेव बाबांनी सांगितले.

कोरोनावर हे औषध प्रमाण असल्याचा कोणताही पुरावा नाही

कोरोनावर आपले औषध गुणकारी असल्याचा दावा पतंजली ग्रुपने केला असला तरी या औषधांची वैज्ञानिक तपासणी झालेली नाही व या औषधांना केंद्रीय आरोग्य मंत्रालय व आयसीएमआरने मान्यताही दिलेली नाही.

दरम्यान पतंजली ग्रुपने आपल्या औषधाची घोषणा केल्यानंतर काही तासातच आयुष मंत्रालयाने एक पत्रक जारी करून या औषधाच्या वैज्ञानिक सत्यतेचे पुरावे व माहिती सरकारला सादर करावी व तोपर्यत प्रचार व प्रसार करू नये असे आदेश दिले आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0