‘बंदिश बँडिट’ – दोन घराण्यातील जुगलबंदी

‘बंदिश बँडिट’ – दोन घराण्यातील जुगलबंदी

ताल आणि सूर शिकवता येत असले तरी संगीताची लय गायकाला स्वतःच शोधावी लागते. ही लय बऱ्याचदा आपल्या जीवनानुभवातून येत असते. या मालिकतेतील नायकाला हा अनुभव देऊन त्याला ही लय सापडण्यासाठी या मालिकेत प्रेमकथा गुंफली गेली आहे.

नॉर्थ ब्लॉकमध्ये बदल होणे हे हितावह
जगणं शिकवून गेलेला माणूस
स्वर्गीय नर्तकाच्या पिल्लांचे पुनर्वसन

‘बंदिश बँडिट’ ही अमेझॉन प्राईमची नवी वेब सिरीज अशाच एका प्रतिभावंत, शिस्तप्रिय आणि अहंकारी राजाची आणि त्याच्या राठोड घराण्याची कहाणी आहे, ज्याचं नाव आहे पंडित राधे मोहन उर्फ पंडितजी.

जोधपूर नावाच्या एका नगरात एक राजा राहात असतो. त्याचं साम्राज्य असतं सुरांवर! अचाट प्रतिभेचा तो धनी असतो. त्यामुळे सगळे रसिक त्याचा आदर करतात, त्याला आदर्श मानतात. राजालाही आपल्या कलेचा अहंकार असतोच. पण आपल्या प्रतिभेचा आवाका त्याला माहीत असतो. त्यामुळेच राजा आपला प्रतिस्पर्धी निर्माण होऊ देत नाही. साम, दाम, दंड, भेदाचा वापर करून, शिस्त, कठोर नियम आदींच्या वापरातून जनतेत आपली अदब तो कायम ठेवतो आणि स्वतःचं साम्राज्य अनभिषिक्त ठेवतो. त्यामुळेच राजाचे अवगुण माहीत असूनही त्याचे रसिक त्यालाच आपला गुरू मानतात, त्याच्याच आशीर्वादाची अभिलाषा ठेवतात. बंदिश बँडिट ही अमेझॉन प्राईमची नवी वेब सिरीज अशाच एका प्रतिभावंत, शिस्तप्रिय आणि अहंकारी राजाची आणि त्याच्या राठोड घराण्याची कहाणी आहे, ज्याचं नाव आहे पंडित राधे मोहन उर्फ पंडितजी. (नसिरुद्दीन शाह)

या आगळ्यावेगळ्या संगीत सीरीजच्या ट्रेलरवरून ‘बंदिश बँडिट’ ही सीरीज शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या मुलाच्या आणि बॉलिवूड संगीत गाणाऱ्या नवख्या गायिकेच्या प्रेममय जुगलबंदीची कथा आहे असं वाटतं. पण ट्रेलरमधील चित्रण ही मुख्य कथा नसून तो एक वाढवून दाखवलेला सब प्लॉट आहे असं वाटत राहतं. कारण राठोड आणि बिकानेर या दोन घराण्यांतील स्पर्धा आणि आपल्या घराण्याचं संगीत जिवंत राहावं यासाठी राठोड परिवारीची धडपड हा या मालिकेचा मुख्य केंद्रबिंदू आहे आणि त्यावर आधारित मालिकेचा क्लायमॅक्स देखील आहे.

ताल आणि सूर शिकवता येत असले तरी संगीताची लय गायकाला स्वतःच शोधावी लागते. ही लय बऱ्याचदा आपल्या जीवनानुभवातून येत असते. या मालिकतेतील नायकाला अर्थात राधेला ( ऋत्विक भौमिक) हा अनुभव देऊन त्याला ही लय सापडण्यासाठी या मालिकेत प्रेमकथा गुंफली गेली आहे असं वाटत राहतं. मात्र त्यामुळे ही मालिका तरुण प्रेक्षकांना आकर्षून घेते.

पंडित राधे मोहन राठोड हे २५ वर्षांपासून जोधपूरचे संगीत सम्राट असतात आणि आता उतारवयात आपल्या नातवात (राधे) ते आपला उत्तराधिकारी शोधत असतात. पण त्यासाठी ते संगीत कलेशी कोणतीही तडजोड करत नाही आणि जोपर्यंत राधे संगीत कलेसाठी लागणारी साधना आणि शिस्त अंगिकारत नाही तोपर्यंत ते त्याचं गंडा बंधन करीत नाही. (गंडाबंधन हे सर्वांत योग्य शिष्याचं केलं जातं आणि त्याला घराण्याचं वैशिष्ट्य असलेल्या संगीताचं खास प्रशिक्षण दिलं जातं)

पंडितजीप्रती राधेला प्रचंड आदर असतो आणि त्यांच्याप्रमाणेच त्यालाही संगीत सम्राट व्हायचं असतं. अशावेळी जोधपूरमध्ये येते स्टेज परफॉर्मर बिनधास्त मुंबैय्या गर्ल तमन्ना. तमन्नाचा एका म्युझिक कंपनीशी ३ हिट गाणे देण्यासाठीचा करार झालेला असतो. पहिलचं गाणं फ्लॉप झाल्याने उदास झालेली तमन्ना नव्या हिटच्या शोधात जोधपूरला आपल्या वडिलांकडे येते. तिच्या कॉन्सर्टने राधे दिपून जातो आणि राधेच्या शास्त्रीय संगीताचा ऑटो ट्यूनवर गाणाऱ्या तमन्नावर देखील प्रभाव पडतो. घरावरील कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी राधे तमन्नासोबत आवाज बदलून गाण्यासाठी तयार होतो. गाणं हिट होतं आणि ‘मास्कमॅन’ राधे यू ट्यूब सेन्सेशन बनतो.

दरम्यानच्या काळात नुकतंच प्रौढत्वात प्रवेश केलेल्या राधे-तमन्नाचं प्रेम फुलत जातं. तिसऱ्या हिट गाण्यानंतर तमन्नाला स्वतःच्या सुमार गायकीबाबत विश्वास बसतो आणि गाण्याचं योग्य प्रशिक्षण घेण्यासाठी राधेच्या जीवनातून ती निघून जाते. पण राधेसाठी दुःख कुरवाळत बसायला वेळ नसतो कारण पंडितजींच्या पहिल्या बायकोपासूनचा मुलगा दिग्विजय (अतुल कुलकर्णी) आपल्या बापाला-पंडितजीला संगीत सम्राट स्पर्धेचं आव्हान देतो. पंडित राधे मोहनची पहिली पत्नी ही गुरुपुत्री असते. पंडितजींनी त्यांची गायकी दिग्विजयच्या आजोबापासून (बिकानेर घराणा) शिकलेली असते. पण पंडितजी जोधपूरमध्ये येऊन धनाढ्य मुलीसोबत दुसरं लग्न करतात ( या विवाहापासून त्यांना दोन मुलं राहतात- राजेंद्र आणि देवेन्द्र ) आणि स्वतःचं राठोड घराणं सुरू करतात. त्यामुळे ‘संगीत सम्राट’ हरल्यास राठोड घराणं कायमचं नष्ट व्हावं अशी शर्त दिग्विजयने घातलेली असते. या स्पर्धेत दिग्विजयसारख्या मातब्बर गायकासमोर राधे या आपल्या नवख्या पण महत्त्वाकांक्षी नातवाला पंडितजी उतरवतात. पण ‘मास्कमॅन’ राधेबाबत कळल्यावर ते राधेचं प्रशिक्षण बंद करतात. मग शेवटी सगळं कुटुंब एकत्र येऊन ही स्पर्धा जिंकतात, अशी या वेब सिरीजची कथा आहे.

पण कोणताही चित्रपट किंवा मालिका ही उत्तम ठरते जेव्हा त्यात अनेक मथितार्थ दडलेले असतात. प्रत्येक पात्राचे अनेक पैलू हळुवार उलगडले जातात. ‘बंदिश बँडीट’ ही याबाबतीत सरस ठरते. सांस-बहु छाप पराकोटीचा त्याग आणि पराकोटीचा अत्याचार यात नाही. उलट सामान्य माणूस जसा वागतो, तशीच यातील पात्र वागतात आणि त्यामुळेच ती अधिक जवळची वाटतात. या मालिकेतील महत्त्वाच्या सर्वच पात्रांना ग्रे शेड आहे. कारण सामान्य माणूस तसाच असतो आणि कधी कधी असामान्य कलाकार सुद्धा! पंडितजींना संगीतसम्राट स्पर्धेत हरविणारी एकमेव व्यक्ती म्हणजे त्यांची सून मोहिनी-राधेची आई. ती आपल्यापेक्षा उत्तम गाते हे ठाऊक असल्यानं पंडितजी तिला सून करून आणतात आणि सून-पत्नी-मातेचा आदर्श निर्माण करण्यासाठी संगीत त्यागण्याचं तिच्याकडून वचन घेतात. शिवाय आपल्याच मुलाशी-दिग्विजयशी स्पर्धा करतात. वास्तवात संगीत क्षेत्रातील ईर्षा, स्पर्धा आणि अहंकार हा नवा विषय नाही. ‘कट्यार काळजात घुसली’ मध्येही त्याचं चित्रण दाखवलं गेलं आहे. नसिरुद्दीन शाहने उत्तमरीत्या हे ग्रे शेड्स त्यांच्या भूमिकेत साकारले आहेत.

पहिल्या पिढीनंतर तिसरी पिढी महान कलावंत झालेली संगीत क्षेत्रात अनेकदा पाहायला मिळते. बऱ्याचदा आई किंवा वडिलांच्या प्रतिभेच्या प्रकाशात त्यांच्या मुलांचं चकाकणं ओळखू येत नाही किंवा संगीताच्या साधनेची आर्थिक झळ लागल्याने दुसऱ्या पिढीतील अपत्य आर्थिक सुबत्तेला अधिक महत्त्व देतात. या मालिकेत देखील पंडितजींची दोन्ही मुलं राजेंद्र आणि देवेन्द्र हे उत्तम पखवाज आणि सारंगी वादक असतात. पण राजेंद्र घर-संसाराच्या रहाटगाडग्यात संगीतापासून दुरावतो तर देवेन्द्रला पंडितजींच्या अनुशासनामुळे प्रेम आणि गायन दोन्ही सोडावं लागतं. व्हायोलिन आणि सारंगीच्या मिलाफातून त्याने तयार केलेल्या देवलीन या नव्या वाद्याला पेटंट करण्याची त्यांची इच्छा असते. या दोघांच्याही पात्राला ग्रे शेड्स आहेतच. बापाला शास्त्रीय संगीताशिवाय दुसरं काहीही चालत नाही तरीही जगण्यासाठी पैसा देखील लागतो. त्यामुळेच देवेन्द्र जिंगल गातो. तर ‘इस घर में रहना हैं तो थोडी बहुत धोकाधडी तो करनी पडती हैं बेटा’, असं राजेंद्र आपल्या पोराला सांगतो. दिग्विजय आणि मोहिनी पूर्वाश्रमीचे प्रेमी. जेव्हा राजेंद्र मोहिनीला विचारतो, “क्या अब भी प्यार करती हो उससे?” त्यावर मोहिनी गप्प बसते तर मोहिनीवर प्रेम करत असूनही तिचा मुलगा राधे संगीत सम्राट जिंकू नये यासाठी दिग्विजय सतत प्रयत्न करत राहतो.

नाटककार महेश एलकुंचवार एका मुलाखतीत म्हणाले होते की “भारतात सुमारपणा हा फार नैसर्गिक मानला जातो. त्यामुळे एखाद्या शास्त्रात जीव ओतण्याची प्रवृत्ती सहसा आढळत नाही. त्यामुळेच आपल्याकडे अभिजात कलाकृती क्वचित निर्माण होते.” ‘बंदिश बँडिट’मधील हिरोईन तमन्ना या सुमारपणाचं प्रतिनिधित्व करते. संगीत शिकण्यापेक्षा ऑटो ट्यून करून १० सेकंदात लाखोंचं लक्ष काबीज करायचं हा तिचा अजेंडा. पण सुमारपण जेव्हा व्यासंगी कलाकाराला भिडतं तेव्हा त्याची हजारो शकलं पडतात. हेच तमन्नाच्या बाबतीतही होतं. श्रेया चौधरीने तमन्नाच्या सुमारपणाचा हा संघर्ष अगदी सहज आणि ट्रेंडी पद्धतीनं उतरवला आहे. तर शास्त्रीय संगीताची साधना करणारा राधे अगदी निरागस पद्धतीनं टिपला आहे ऋत्विक भौमिक यानं. मालिकेच्या सुरुवातीलाच काहीसा साशंक आणि आत्मविश्वास नसलेला राधे या मालिकेच्या अंतापर्यंत खऱ्या अर्थानं हिरो बनताना दिसतो. भौमिक आपल्या थेटर पार्श्वभूमीमुळं हा प्रवास उत्तमरीत्या अभिनयात उतरवू शकला. त्यामुळेच ही मालिका ‘कमिंग ऑफ एज’ बनली.

‘बंदिश बँडिट’ ही मालिका शास्त्रीय संगीतावर आधारित असल्यानं त्याच्या रियाजाचा अभिनय सर्वच कलाकारांनी उत्तम साकारला आहे. लिपसिंकची नेहमीच भीती वाटत असणाऱ्या नसिरुद्दीन शाहनी ‘सर्फरोश’चा गुलफाम हसन विसरून शास्त्रीय संगीत गाणारा पंडित प्रभावीपणे उभा केला आहे. मालिकेच्या सुरुवातीलाच पहिले ३ मिनिटं असलेल्या शॉट्समध्ये नसिरुद्दीन फक्त अभिनयातून कसलेला पंडित उभा करतात. तर अतुल कुलकर्णी ‘ए री सखी’ चा विरह आपल्या अभिनयात अशा प्रकारे उतरवतात की पाहणारा थक्क होतो. सुरांच्या रियाजाचा अभिनय सर्वाधिक ऋत्विक भौमिकच्या वाट्याला आला आहे आणि काही ठिकाणी तो स्वतःच ते गाणं गातोय असा भास निर्माण होतो.

‘गो गोआ गॉन’ फेम अभिनेता आनंद तिवारी याने ‘बंदिश बँडिट’ या मुख्यतः शास्त्रीय संगीतावर आधारित मालिकेचं दिग्दर्शन करणं ही भारतीय सिनेसृष्टीत ‘कंटेंट’च्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आणि तितकंच महत्त्वाचं आहे या मालिकेला लाभलेलं शंकर एहसान लॉय यांचं ‘देसी’ संगीत. संगीत म्हणजे या मालिकेचा आत्मा. एकापेक्षा एक बंदिशी, ठुमरी यात ऐकायला मिळतात. खुद्द पंडित अजय चक्रवर्ती, श्रेया सौंदर यांच्या आवाजातील बंदिशी म्हणजे संगीत रसिकांना पर्वणीच. शास्त्रीय संगीत लोकप्रिय करण्यात चित्रपटांचं योगदान नाकारून चालणार नाही. शेकडो हिंदी गाणी रागांवर आधारलेली आहे. अनेक शास्त्रीय गायकांनी देखील चित्रपटांसाठी शास्त्रीय गायन केलं आहे. ‘बसंत बहार’मधील केतकी गुलाब जुही या पंडित भीमसेन जोशींच्या जुगलबंदीपासून ते सुलतान खान यांनी गायलेलं अलबेला सजन (राग अहिर भैरव) आणि ‘जब वी मेट’ या चित्रपटात उस्ताद रशीद खान यांनी गायलेल्या ‘आयोगे जब तुम’पर्यंत, चित्रपटांतील शास्त्रीय गाणी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहे. ‘बंदिश बँडिट’ हाच वारसा पुढं नेणारी आहे कारण ही मालिका पाहणारा प्रेक्षक यातील संगीताच्या मोहिनीपासून वाचू शकणार नाही.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0