ओबामा यांचं आत्मचरित्र ‘ए प्रॉमिस्ड लँड’

ओबामा यांचं आत्मचरित्र ‘ए प्रॉमिस्ड लँड’

'ए प्रॉमिस्ड लँड' हे प्रेसिडेंट बराक ओबामा यांचं आत्मचरित्र आहे. ओसामा बिन लादेनला मारलं तिथवर ओबामा या पुस्तकात थांबले आहेत. आणखी दोन खंड ते लिहितील

भारतीय राष्ट्रवादाची ओळख : भारत अमुचि माता
फसलेला पुस्तकी डाव
टॅटूवाला विराट

‘ए प्रॉमिस्ड लँड’ हे प्रेसिडेंट बराक ओबामा यांचं आत्मचरित्र आहे. ओसामा बिन लादेनला मारलं तिथवर ओबामा या पुस्तकात थांबले आहेत. आणखी दोन खंड ते लिहितील किंवा लिहीत आहेत असं दिसतंय. मुळात  चारपाचशे शब्दांत पुस्तक संपेल असा ओबामा यांचा अंदाज होता, पण पुस्तक वाढत गेलं.

अध्यक्षपद संपलं त्या दिवसापासून ओबामा यांनी आत्मचरित्र लिहायला घेतलं.

ओबामा यांनी तीन पुस्तकं लिहिली. त्या पुस्तकांत त्यांनी त्यांचं लहानपण, त्याचं सार्वजनिक जीवन यावर सविस्तर लिहिलं आहे. त्यांचे सामाजिक कार्यातले अनुभव, निवडणुक लढवतांना आलेले अनुभव याचंही एकदम सविस्तर वर्णन त्यांच्या पुस्तकात आलेलं आहे. ओबामा अभ्यासू आहेत, संशोधक आहेत, लिहितांना ते कष्ट करतात. लिहिणं आणि बोलणं, म्हणजे व्यक्त करणं ही कला त्यांनी खूप कष्ट करून साध्य केली आहे. ते सारं त्यांच्या सर्व पुस्तकांत, प्रस्तुत पुस्तकातही दिसतं.

अध्यक्षपदाची निवडणूक लढवत असताना ते भाषण करायला जात. जमत नसे. नेमके मुद्दे लोकांपर्यत जात नसत. त्यात खूप माहिती, विश्लेषण असे, मुद्दे असत, विद्वत्ता असे, पण नेमकेपणा नसे, श्रोत्यांना त्यातून मुख्य मुद्दे कळत नसत. हिलरी क्लिंटन आणि इतर उमेदवार अधिक प्रभावी ठरत.

एक्सलरॉड त्यांचे सल्लागार होते. ते अॅडव्हरडायझिंग व्यवसायातले होते.ते ओबामाना कसं बोलायचं इत्यादी शिकवण द्यायचे. ओबामा चक्क अभ्यासू विद्यार्थ्याप्रमाणे धडे गिरवत असत, आरशासमोर उभे रहात, रेकॉर्डिंग करत, ऐकत.

प्रस्तुत पुस्तकात निवडणुक लढवेपर्यंतचं त्यांचं आयुष्य त्यांनी झरझर मांडलं आहे. नंतर ते संथपणे अध्यक्षपदाकडं सरकले आहेत.

अमेरिका म्हणजे अनंत शिक्षण संस्था, अनंत उद्यम, अनंत वित्त संस्था, जगातलं सर्वात बलवान लष्कर. तांत्रीक दृष्ट्या अध्यक्ष नावाचा माणूस तिथं राज्य करत असला तरी एवढा अवाढव्य कारभार करण्यासाठी फार मनुष्यबळ लागत असतं. जगाचा आवाका असणारी माणसं, प्रचंड माहिती आणि अनुभव असणारी माणसं आणि तीही प्रचंड संख्येनं देश चालवतात, अध्यक्ष हा त्यांच्यापैकी एक असतो. रेगन नावाचा सिनेमातला माणूस अध्यक्ष होवो किवा ट्रंप नावाचा राजकारणाशी काडीचाही संबंध नसणारा उद्यमी अध्यक्ष होवो, शेवटी देशाचा गोवर्धन पर्वत उचलायला किती तरी लोकांचे हात लागलेले असतात.

हे सारं कसं घडतं याचा काही एक अंदाज ओबामा यांचं पुस्तक वाचताना येतो. अध्यक्षपदासाठी प्रचारात उतरले तेव्हां पासूनच विविध विषयांच्या अभ्यासकांचे सल्लागार गट त्यांच्या सोबत होते. आर्थिक, लष्करी, परदेश इत्यादी धोरणांचा अभ्यास ही माणसं करत, ओबाना यांना सल्ला देत, हीच माणसं ओबामा यांना भाषणं तयार करून देत आणि धोरणांचे आराखडे लिहून देत.

साधारणपणे प्रत्येक अध्यक्षाच्या बाबतीत हे घडतं. अध्यक्षाच्या व्यक्तिमत्वानुसार ही प्रक्रिया  वेगवेगळी रुपं घेत असते. ओबामाच्या आईनं ओबामाना एक मुक्त जागतीक नागरीक म्हणून वाढवलं, सगळं जग पहा आणि आपले निर्णय स्वतंत्रपणे घे ही आईची शिकवण होती.ओबामा  प्राध्यापक होते, सार्वजनिक कार्यकर्ते होते, नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा अनुभव त्यांना होता. सर्वसाधारण माणसाप्रमाणंच ते प्रेमात पडले, आपली मुलं सज्जनपणे वाढली पाहिजेत असं त्यांना वाटलं, त्यांची पत्नीही त्याच मताची होती. तळातली, मध्यम वर्गातली, विचार करणारी माणसं त्यांच्याभोवती गोळा झाली.

ट्रंप उडाणटप्पू होते, शाळा कॉलेजात ते वर्गांना दांड्या मारत, कॉपी मारत. उद्योग करताना त्यांनी कायदा आणि नीतीमत्ता पाळली नाही. दांडगाई करणारी माणसं त्यांनी सल्लागार आणि सहकारी म्हणून निवडली, सभ्य माणसं त्यांच्यासोबत टिकू शकली नाहीत.

राष्ट्रपतीपदासाठी जॉन मॅक्केन ओबामांचे प्रतिस्पर्धी होते. प्रचार मोहिमेच्या काळात दोघांनी एकमेकांच्या मतं आणि धोरणांवर टीका केली पण ती सज्जनपणानं, कोणी कोणाला देशद्रोही म्हटलं नाही. दोघांनाही एकमेकांबद्दल आदर होता आणि तो प्रचाराच्या काळात आणि नंतर मॅक्केन यांच्या मृत्यूपर्यंत शाबूत होता. ओबामा मॅक्केन यांच्या अंत्ययात्रेत भाऊक होऊन हजर होते.

मॅक्केन यांच्याच पक्षाचे नंतर अध्यक्ष झालेले ट्रंप यांनी मात्र अंत्ययात्रेत सामिल व्हायला जाहीर नकार दिला. साधा सभ्यपणाही ट्रंप यांनी दाखवला नाही.

तसं आत्मकथनात वाचण्यासारखं बरंच आहे. दोन मुद्दे उल्लेखता येतील.

ओसामा लादेन याला मारणं हा निर्णय घेताना त्यांनी सरकारातल्या विविध खात्यांतल्या अनेक लोकांशी चर्चा केली. लष्कराच्या संबंधित विभागांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य होतं. जो बायडन हे उपाध्यक्ष निर्णयाच्या विरोधात होते. चर्चा खरमरीत होत असत. पण शेवटी मारण्याचा निर्णय झाला.

ओबामांची प्रतिक्रिया अशा आशयाची होती. ओसामाला मारणं यावर सारी अमेरिका एकवटली. पण अमेरिकन माणसाला आरोग्य लाभावं, त्यासाठी आरोग्य व्यवस्था उभी करावी यावर मात्र अमेरिकेत एकमत झालं नाही.

जग भावनांतिरेकाकडं चाललंय ही ओबामा यांची खंत होती.

मनमोहन सिंग आणि राहूल गांधी यांचे उल्लेख धावते उल्लेख कथनात आहेत. मनमोहन सिंग हे विचारी, संयमी, अर्थशास्त्राची जाण असणारे गृहस्थ आहेत असं ओबामा लिहितात. ते भारताला आर्थिक दृष्ट्या वाचवतील परंतू जातीय विषारी प्रभाव वाढत असताना देशाला  वाचवणं त्यांना जमेल काय असा प्रश्न ते विचारतात. ते थेट भाजपनं निर्माण केलेल्या वातावरणाचा संयमानं पण स्पष्ट उल्लेख करतात.

राहुल गांधीचं चित्रण त्यांनी मोजक्या शब्दात केलंय. एक धडपड्या विद्यार्थी हे त्यांचं वैशिष्ट्यं असल्याचं ओबामा म्हणतात. पण ते असंही म्हणतात की त्यांच्या आई म्हणजे सोनिया गांधी आपल्या मुलाला गादीवर बसवण्याच्या खटपटीत आहेत.

भारताची स्थिती चिंताजनक आहे असं ओबामा यांनी एकाद दोन ओळीत म्हटलंय.

ओबामा यांची निरीक्षणं सुमारे आठ वर्षांपूर्वीची आहेत. चरित्र प्रसिद्द झालं २०२० साली. सुमारे २०१९ साली चरित्राचा अंतिम मसुदा तयार झाला असणार. आठ वर्षांपूर्वीची निरिक्षणं त्यांना बदलावीशी वाटली नाहीत काय? कदाचित असंही असेल की ती त्या काळातली निरीक्षणं असल्यानं त्याना हात लावणं आवश्यक किंवा योग्य वाटलं नसेल.

ओबामा यांच्या २००८ ते २०१६ या आठ वर्षाच्या कारकीर्दीत अमेरिका आणि जगात खूप महत्वाच्या घटना घडल्या. इराक, अफगाणिस्तान, सीरिया या ठिकाणचे रक्तबंबाळ संघर्ष; इराणशी संबंध सुधारण्यातून आखाती देशातल्या राजकारणाला दिलेली कलाटणी, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेतल्या अमेरिकेशी चांगले संबंध नसलेल्या देशांशी संबंध सुधारणं, खुद्द अमेरिकेतील सब प्राईम घोटाळ्यानंतर निर्माण झालेलं जटील आर्थिक संकट ही काही उदाहरणं. या घटनांना वळण देण्याचा विचारपूर्वक सामुहीक प्रयत्न ओबामा यांनी केला.

अनेक बाबतीत त्यांना यश मिळालं नाही. काळ्यांना न्याय देणं त्याना जमलं नाही. आरोग्य सेवा अमलात आणता आली नाही.सब प्राईम घोटाळ्यात लाखो गरीब आणि मध्यम वर्गीय संसार धुळीला मिळाले, त्यांना न्याय देता आला नाही. इराण, आफ्रिका, मध्यपूर्व, दक्षिण अमेरिका असं करता करता साऱ्या जगात सौहार्द निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न अपूर्ण राहिला.

या सर्वाबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे ते कळण्यासाठी त्यांच्या आत्मचरित्राच्या पुढल्या भागांची वाट पहावी लागेल.

जगाला वळण लावणं, सार्वजनीक घटनांना वळण लावणं ही गोष्ट कधीच कोणा एका माणसामुळं घडत नसते. ते निर्णय सामुहीक असतात आणि त्या त्या देशातल्या परंपरांचा प्रभाव त्या निर्णयांवर असतो. या निर्णय प्रक्रिया आणि यंत्रात अध्यक्ष हा एक महत्वाचा घटक असतो. हा घटक योग्य, विचारी, सभ्य असला तर ठीक. ओबामा तसे होते.  हा घटक निक्सन किंवा ट्रंप यांच्यासारखा असेल तर तो महाकाय यंत्रही नीट काम करेनासं होतं.

म्हणून अध्यक्ष हा गृहस्थ कसा असतो, तो कसा विचार करतो, त्याचं व्यक्तिमत्व कसं असतं हे कळणं महत्वाचं असतं.

जाता जाता.

बेन कार्सन हे ओबामा यांचे सहकारी होते. त्यांनी दी वर्ल्ड अॅज इट ईज या शीर्षकाच्या पुस्तकात त्यांच्या आठवणी आणि निरीक्षणं लिहिली आहेत. ते पुस्तक ओबामांच्या पुस्तकासोबत सहवाचन म्हणून केलं तर ओबामा समजायला मदत होऊ शकते.

निळू दामले लेखक आणि पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: