बेगानी शादीमे…….!

बेगानी शादीमे…….!

आम्हाला काश्मीरविषयी काही माहिती नाही. आमचा तिथे जन्म झाला नाही. पण आम्हाला ३७० हटविण्याचा आनंद झाला आहे. का? लग्न दुसऱ्याचे होत असताना, त्याविषयी काही माहित नाही, पण आम्ही मात्र अशा बेगानी शादीमध्ये उगाचच नाचत आहोत.

‘काश्मीर प्रश्न भारताचा अंतर्गत प्रश्न, आम्ही हस्तक्षेपाच्या विरोधात’
केंद्रशासित जम्मू व काश्मीरमध्ये दुसऱ्या दिवशीही बंद
काही जणांना भेटू दिले नाही : ईयू सदस्याची प्रतिक्रिया

परवा एक मुलगी भेटली. तीने कम्युनिकेशनचा अभ्यास केला आहे. म्हणजे तिच्याकडे त्या शाखेची डिग्री आहे. आम्ही काही मित्र काश्मीरविषयी बोलत असताना, तिने मध्येच प्रश्न केला, की तुमचा ३७० कलम हटविण्याच्या निर्णयाला पाठींबा आहे की नाही. आम्ही नाही म्हणालो. ती म्हणाली की म्हणजे तुम्ही पाकिस्तानच्या बाजूचे आहात. मी तिला काही प्रश्न विचारले, तेंव्हा ती म्हणाली, की मला एवढे काही माहित नाही. माझे एवढे काही वाचन नाही.

आम्हाला काश्मीरविषयी काही माहिती नाही. आमचा तिथे जन्म झाला नाही. पण आम्हाला ३७० हटविण्याचा आनंद झाला आहे. का? लग्न दुसऱ्याचे होत आहे. आम्हाला त्याविषयी काही माहित नाही पण आम्ही मात्र अशा बेगानी शादीमध्ये उगाचच नाचत आहोत.

श्रीनगरच्या जवळच असणाऱ्या आंचर भागामध्ये राहणाऱ्या अझी बेगमचा ३१ ऑगस्टला रात्री मृत्यू झाला. १ किलोमीटरवर असणाऱ्या घरी, सकाळी मृतदेह नेण्यात आला. तेंव्हा घरची मंडळी सकाळचा चहा पीत होती. त्यांना माहित नव्हते, की त्यांच्या घरातील आजीचा रात्री मृत्यू झाला. श्रीनगर पासून ३० किलोमीटरवर असणाऱ्या तिच्या धाकट्या मुलीला मेह्जबीनला याची खबर तीन दिवसांनी मिळाली. त्यानंतर ती दुखः व्यक्त करायला आली.

दिल्लीमध्ये असणाऱ्या एका वृत्तपत्रात काम करणाऱ्या एका वरिष्ठ पत्रकाराला जवळच असतानाही स्थानिक वृत्तपत्रात वाचून कळले, की त्याची मावशी ४ दिवसांपूर्वी वारली.

श्रीनगरच्या डाऊनटाऊन भागामध्ये मलखा नावाची दफनभूमी आहे. तिथे जेंव्हा मृतदेह दफन करण्यासाठी येतात. तेंव्हा नेहमी ही सगळी प्रक्रिया तीन तासांमध्ये होते आता मात्र त्याच प्रक्रियेला एक अख्खा दिवस लागतो. कारण दिवसभर नातेवाईक येत राहतात आणि त्यांच्यासाठी थांबण्याचा आग्रह केला जातो.

श्रीनगर आणि संपूर्ण काश्मीर खोऱ्यामध्ये संपर्क यंत्रणा बंद आहे. फोन बंद आहेत. मोबाईल बंद आहे. इंटरनेट बंद आहे.

आम्हाला त्याचे काहीच वाटत नाही. ३७० हटवल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. कारण आता आम्हाला ती एक अनेक वर्षांची सल होती. कसली सल होती, माहित नाही. पण होती. आम्हाला तिथे जाता येत नव्हते का, तिथे जायला अरुणाचल प्रदेश सारखा परवाना लागत होता का, असे काहीच नव्हते. तिथे मुक्तपणे फिरता येत होते. तिथे गेल्यावर तुमचे स्वागत होत होते. तरीही आम्हाला ३७० हटवून हवे होते. म्हणजे काय हवे होते माहित नाही. माहिती करून घ्यायची इच्छा नाही. कारण वाचायची इच्छा नाही. काही वाचलेले नाही. मुस्लीम बहुसंख्य असूनही काश्मीर भारतामध्ये कसे राहिले, माहित नाही. राजा हरिसिंगची काय भूमिका होती, माहित नाही. पण आम्हाला आनंद झाला आहे. पुण्यातील एका महाविद्यालयात जल्लोष झाला म्हणे! महाराष्ट्रातील एक मंत्री तिकडे कोल्हापुरात पूर आलेला असतानाही इकडे नाचले. कसला आनंद झाला.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे काश्मीरमधील माजी आमदार युसुफ तारीगामी यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. ते आजारी होते. त्यांना भेटण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सीताराम येचुरी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी राजा गेले. त्यांना श्रीनगर विमानतळावरून परत दिल्लीला पाठविण्यात आले. काश्मीरमधील परिस्थिती पाहण्यासाठी जम्मू काश्मीरचे राज्यपाल यांनी राहुल गांधी यांना आमंत्रण दिले होते. त्यांच्याबरोबर १२ नेते होते. त्यामध्ये येचुरी यांचा समावेश होता. त्यांना श्रीनगरच्या विमानतळावरून परत एकदा मागे पाठविण्यात आले. शेवटी येचुरी सर्वोच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली. ते भेटायला गेल्यावर त्यांच्याबरोबर सतत पोलीस होते. येचुरी यांनी पोलीस अधिकाऱ्याला विचारले, की तारीगामी यांना कोणत्या कलमाखाली अटक केली आहे. तर अधिकाऱ्याने सांगितले, की त्यांना अटक केलेलीच नाही. ते कुठेही जाऊ शकतात. शेवटी येचुरी यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आणि न्यायालयाने तारीगामी यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलविण्याचे आदेश दिले.

इल्तीजा. जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची धाकटी मुलगी. ती राजकारणात नाही. तरीही ती नजरकैदेत होती. तिला आपल्या आईला, आजीला भेटण्यासाठी न्यायालयात जावे लागले. काश्मीरमध्ये १४४ कलम लागू करण्यात आले आहे. म्हणजे जमाव बंदी. इल्तीजा हिला झेड सिक्युरिटी आहे. म्हणजे तिच्याबरोबर तिच्या सुरक्षेसाठी काही लोक असणार. त्यामुळे १४४ कलमाचा भंग होणार असल्याने, तिला बाहेर पडता येणार नाही.

राजस्थानमध्ये एका काश्मिरी विद्यार्थ्याला महिलांचे कपडे घालून बाजारामध्ये फिरवण्यात आले. काश्मीरमध्ये लोकांनी मतदान करावे, यासाठी प्रयत्न करणाऱ्या काश्मीर बार असोसिएशनच्या माजी अध्यक्षांना, नझीर अहमद रोंगा यांना जनसुरक्षा कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. जेंव्हा अतिरेक्यांनी निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते, तेंव्हा रोंगा यांनी लोकांना निवडणुकांमध्ये मतदान करायला लावले होते. आत्ताचे बार असोसिएशनचे अध्यक्ष मिया अब्दुल कयूम यांनाही याच कायद्याखाली अटक करून आग्रा येथे तुरुंगात पाठविण्यात आले आहे. काश्मीरमधील न्यायालये ओस पडली आहेत. काही वकिलांनाही अटक करण्यात आली आहे.

जनसुरक्षा कायदा (पब्लिक सेफ्टी) (पीएसए) हा अतिशय वादग्रस्त कायदा आहे. या कायद्याअन्वये सरकारला कोणत्याही खटल्याशिवाय व्यक्तीला ६ महिन्यांसाठी तुरुंगात टाकता येते.

श्रीनगरमधील ‘द काश्मीर मॉनीटर’चा पत्रकार मुदस्सर कुलू याच्याशी बोलण्याचा मी ४ दिवस प्रयत्न करीत होतो. एका आठवड्यानंतर त्याच्याशी दररोज एक मेसेज असे बोलण्यात मी यशस्वी झालो. त्याचा फोन बंद होता. व्हॉटसअपवर त्याला मी, हाय असा मेसेज टाकला. तो त्याला दुसऱ्या दिवशी मिळाला. त्याने मला हाय असे उत्तर दिले. तिसऱ्या दिवशी मी त्याला मेसेज केला, की मला बोलायचे आहे. असे करीत मी त्याच्याशी बोललो. तो म्हणाला, की फोन बंद आहे. इंटरनेट बंद आहे. काश्मीरमध्ये सुमारे १०० वृत्तपत्रे आहेत. बहुतेकांची कार्यालये बंद आहेत. सर्व वृत्तपत्रांनी आपल्या १६ आणि १२ पानांऐवजी ८ किंवा ४ पानांची आवृत्ती काढणे सुरु केले आहे. माहिती आणि प्रसारण खात्याने श्रीनगरमध्ये एक मिडीया सेंटर तयार केले आहे. तेथे इंटरनेट आहे. तिथे ५ संगणक आहेत आणि पत्रकारांची संख्या ३०० आहे. प्रत्येक पत्रकाराला एक मेल पाठवण्यासाठी काही तास वाट पहावी लागते.

काश्मीरमधील संपर्क माध्यमांवरील निर्बंध उठवावेत यासाठी ‘काश्मीर टाईम्स’ या वृत्तपत्राच्या कार्यकारी संपादिका अनुराधा भसीन या २५ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात गेल्या. तर वृत्तपत्रे आणि पत्रकार यांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सि के प्रसाद यांनी कौन्सिलच्या वतीने स्वतःच सर्वोच्च न्यायालयात भसीन यांच्या याचिकेमध्ये त्यांच्या विरोधात पक्ष म्हणून अर्ज दाखल केला. राष्ट्रहिताचा मुद्दा येतो आणि सुरक्षेचा मुद्दा येतो तेंव्हा निर्बंध आवश्यक असतात, असे कौन्सिलतर्फे न्यायालय सांगण्यात आले. त्यांच्यावर देशभरात टीका झाल्यावर त्यांनी आपले म्हणणे बदलले.

काश्मीरमध्ये राहणारे लेखक-पत्रकार गोहर गिलानी ३१ ऑगस्ट रोजी जर्मनीतील बॉन शहरात जाण्यासाठी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून निघाले होते. त्यांना इमिग्रेशन अधिकाऱ्याने थांबवले आणि नंतर परदेशात जाण्यापासून रोखले. ‘डॉइशे विले’, या जर्मन या वृत्तसंस्थेसाठी ते नुकतेच संपादक म्हणून रुजू झाले आहेत. ते प्रशिक्षणासाठी वृत्तसंस्थेच्या मुख्य कार्यालयात निघाले होते. त्यापूर्वी भारतीय प्रशासन सेवेतील माजी अधिकारी आणि आता स्वतःचा राजकीय पक्ष काढणारे शाह फैजल यांना अमेरिकेच्या बोस्टन शहरात जाण्यापासून रोखण्यात आले होते. विमानतळावर ताब्यात घेऊन त्यांना परत काश्मीरमध्ये पाठविण्यात आले.

काश्मीरच्या अशा एक एक कहाण्या बाहेर येत आहेत. पण आम्हाला त्या माहित नाहीत. कारण त्या माध्यमांमध्ये येत नाहीत. वृत्तपत्रांच्या दृष्टीने काश्मीरमध्ये काहीच घडत नाही. म्हणजे सगळे कसे आलबेल आहे. कोणालाही वाटत नाही, की आपला प्रतिनिधी तिथे पाठवावा. कारण वाचकांनाही तसे वाटत नाही. ‘इस्रो’चे संचालक कसे भावविवश झाले आणि लता मंगेशकर राणू मंडलविषयी काय म्हणाल्या, हे वाचण्यात आणि चर्चा करण्यात वाचकांना रस आहे.

गेले ३५ दिवस काश्मीर कुलपामध्ये बंद आहे. ‘एएफपी’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार सुमारे ४००० माणसांना ताब्यात घेण्यात आले आहे. संपर्कच नसल्याने सगळे ठप्प आहे. पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. आम्हाला मात्र तिथे आता जमीन घेण्याची स्वप्ने पडत आहेत. इथे फ्लॅटचे हप्ते भरण्याची कसरत करावी लागत आहे. कारण देशाची आर्थिक स्थितीच खराब झाली आहे. पण लाहोर-कराचीमध्ये जागा घेण्याच्या पोस्ट फिरत आहेत.

अशाच प्रकारे पॅलेस्टीनचा प्रश्न उग्र झाला आणि वर्षानुवर्षे माणसे मारली गेली. अजूनही मारली जात आहे. काश्मीर त्या दिशेने चालला आहेच. पण आम्हाला माणसांशी देणेघेणे नाही. त्या जागेशी देणेघेणे आहे. माणसे नसलेली जागा हवी आहे.

काश्मीरमधील मुलींशी आता लग्न करायचा संदेश खुद्द भाजपच्या आमदार आणि मुख्यमंत्र्यांनीच दिल्याने आता तीही स्वप्ने पडू लागली आहेत. किती उन्माद भरला आहे.

आम्हाला काश्मीर केवळ चित्रपटातून माहिती आहे. तिथे सगळेच देशद्रोही आणि पाकिस्तान समर्थक राहतात, असा आमचा समज करून देण्यात आला आहे. जो पुसण्याचा आम्ही मध्यमवर्गीयांनी कधीही प्रयत्न केला नाही. त्यामुळे आम्हाला आता आनंद झाला आहे आणि आम्ही उगाचच नाचत आहोत.

आम्हाला घटना माहित नाही. कलमे माहित नाही. आम्हाला माहित करून घ्यायचीही नाही. पण आम्ही नाचत आहोत.

नितीन ब्रह्मे, ‘द वायर मराठी’चे समन्वयक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: