नवी दिल्लीः जागतिक हवामान बदलाविरोधात जगभर आंदोलन करणार्या पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांनी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्विटरवर प्रसिद्ध क
नवी दिल्लीः जागतिक हवामान बदलाविरोधात जगभर आंदोलन करणार्या पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांनी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्विटरवर प्रसिद्ध केलेल्या टूलकिट प्रकरणात दिल्ली पोलिसांनी शनिवारी बंगळुरूमधून २१ वर्षांच्या पर्यावरण कार्यकर्त्या दिशा रवी यांना अटक केली.
रविवारी त्यांना पतियाला हाउस न्यायालयात हजर करण्यात आले, त्यानंतर त्यांना ५ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आहे. पोलिसांनी ७ दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती.
या संदर्भात दिशा रवी यांनी, टूलकिटमधील दोन ओळी संपादित केल्याचे सांगितले. माझा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असून शेतकरी आपल्याला अन्न व पाणी देतात, ते आपले अन्नदाते आहेत, त्यांच्या आंदोलनाचा आपल्यावर प्रभाव पडल्याचे रवी यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणात अन्य दोन कार्यकर्ते निकिता व शांतनु यांना अटक केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दिशा रवी यांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात ग्रेटा थनबर्ग यांनी ट्विटरवर प्रसिद्ध केलेले टूलकिट आपल्या ट्विटर खात्यावर शेअर केले होते. दिशा रवी यांनी हे टूलकिट शेअर करताना त्यामध्ये काही बदल केले होते व ते पुढे फॉरवर्ड केले असा दिल्ली पोलिसांचा आरोप आहे.
दिशा रवी या ‘फ्राइडे फॉर फ्यूचर इंडिया’ या संस्थेच्या भारतीय शाखेच्या संस्थापक सदस्य असून या संस्थेमार्फत पर्यावरण जागृती, जागतिक तापमान बदल या संदर्भात विद्यार्थ्यांच्या पातळीवर प्रबोधनात्मक चळवळ चालवली जाते. फ्राइडे फॉर फ्यूचर ही आंतरराष्ट्रीय चळवळ आहे. या चळवळीच्या माध्यमातून ग्रेटा थनबर्ग यांनी स्वीडनच्या संसदेबाहेर निदर्शने केली होती.
दिशा रवी या बंगळुरू येथील प्रतिष्ठित विमेन्स कॉलेजमधील माउंट कार्मेल शाळेच्या विद्यार्थीनी आहेत.
दिल्ली पोलिसांनी या अगोदर ग्रेटा थनबर्ग यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या टूलकिटसंदर्भात देशद्रोह, देशात अशांतता माजवणे अशा कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
टूलकिट प्रकरण काय आहे?
गेल्या ४ फेब्रुवारीला दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन करणारे ट्विट केल्याने दिल्ली पोलिसांनी पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांच्या टुलकिटवर सायबर गुन्हा दाखल केला होता. धर्म व जातीच्या आधारांवर दोन समाजांमध्ये मत्सर पसरवणे व गुन्हेगारी स्वरुपाचे षडयंत्र रचणे असे आयपीसी १५३ अ व १२० ब अंतर्गत गुन्हे या टूलकिटवर लावण्यात आले होते.
दिल्ली पोलिसांनी फिर्यादीत मात्र ग्रेटा थनबर्ग यांचा उल्लेख केलेला नव्हता. पण दिल्ली आंदोलनावर मत व्यक्त करणार्या सोशल मीडियावरच्या सुमारे ३०० हून अधिक अकाउंटवर आमचे लक्ष असल्याचे सांगितले होते.
ग्रेटा थनबर्गने ३ फेब्रुवारीला मी शेतकर्यांच्या सोबत आहे, त्यांना शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार असून त्यांना माझे समर्थन आहे. घृणा, धमकी किंवा मानवाधिकाराचे उल्लंघन याने त्यात बदल होणार नाही, असे ट्विट केले होते. त्यानंतर देशभर गदारोळ उडाला होता.
४ फेब्रुवारीला ग्रेटाने तिच्या टुलकिटवर फिर्याद नोंदवल्यानंतरही आपला शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा कायम असल्याचे पुन्हा ट्विट केले होते.
द हिंदूच्या वृत्तात दिल्ली पोलिसांनी आपल्या फिर्यादीत थनबर्गवर आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा एक भाग असल्याचा आरोप करत देशाला बदनाम करण्याचे त्यांचे प्रयत्न असल्याचा ठपका ठेवल्याचे म्हटले होते.
ग्रेटाने ट्विटरवर एक टूलकिट शेअर केले होते, त्याचीही फिर्यादीत नोंद आहे. या टूलकिटमध्ये शेतकर्यांच्या आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळावा व भारतीय दुतावासांपुढे निदर्शने केली जावीत, यासाठी कोणते प्रयत्न करायला हवेत, याची माहिती आहे.
४ फेब्रुवारीला दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध गायिका व सेलेब्रिटी रिहाना, ग्रेटा थनबर्गने ट्विट केल्याने मोदी सरकार हादरले होते.
त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोणताही दुष्प्रचार भारताच्या एकतेला संपवू शकत नाही. कोणताही दुष्प्रचार भारताची प्रगती रोखू शकत नाही. भारत विकासाच्या दिशेने एकजूट असल्याचे ट्विट करावे लागले होते.
या दोन व्यक्तींव्यतिरिक्त अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची भाची मीना हॅरिस, यूट्यूबर लिलि सिंह आदींनी शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा दिला होता.
त्या अगोदर भारतीय परराष्ट्र खात्याने तातडीने एक ट्विट करून भारतातील शेतकरी देशाचा एक अविभाज्य भाग असून त्यांच्या समस्येवर तोडगा काढण्याचे हरप्रकारे प्रयत्न सरकारकडून केले जात आहे व त्यावर उत्तरही मिळत आहे. अशावेळी फूट पाडणार्या वक्तव्यांकडे लक्ष न देता सौहार्दपूर्ण वातावरण राहावे व त्याचे समर्थन करावे, अशी विनंती केली होती. यासाठी परराष्ट्र खात्याने #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda…” असा हॅशटॅगही लावला होता.
या घटनेनंतर तासाभरात बॉलीवूडमधील काही सरकार समर्थक सेलेब्रिटींनी सरकारच्या बाजूने #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda…” हा हॅशटॅग वापरत ट्विट करण्यास सुरूवात केली. या सेलेब्रिटींमध्ये अक्षय कुमार, करण जोहर, अजय देवगण, एकता कपूर, सुनील शेट्टी आदींचा समावेश होता. तसेच बहुसंख्य मंत्र्यांनीही हे ट्विट रि-ट्विट केले होते. नंतर भारतरत्न व जगप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनीही सरकारच्या समर्थनार्थ ट्विट केले होते.
भारताच्या सार्वभौमत्वशी कधीच तडजोड केली जाणार नाही. भारताला भारतीय लोकच ओळखतात आणि भारताबाबतचे निर्णय भारतीयांनीच घेतले पाहिजेत. एक देश म्हणून आपण एकत्र राहूयात, असे सचिन तेंडुलकर यांनी सोशल मीडियावर म्हटले होते.
अक्षय कुमारने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते कीः शेतकरी भारताचा अत्यंत महत्त्वाचा व अविभाज्य भाग आहे. त्यांच्या प्रश्नाचा तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशावेळी सरकारच्या प्रयत्नांना साथ देणे महत्त्वाचे असून मतभेद निर्माण करणार्यांकडे दुर्लक्ष करणे या घडीला महत्त्वाचे आहे.
करण जोहरने आपल्या ट्विटमध्ये आपण सर्वांनी समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रत्येकाचे त्यातून हित साधले जावे, कुणीही त्यापासून वंचित राहू नये, असे म्हटले होते.
एकता कपूर यांनी आपल्या ट्विटद्वारे, अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रचाराविरोधात एकत्र उभे राहूया असे आवाहन केले होते.
अजय देवगण यांनी जनतेने अशा प्रचाराला बळी पडू नये असे आवाहन केले होते.
तर सुनील शेट्टी यांनी असा प्रचार अर्ध सत्याहून अधिक भयंकर असल्याचे मत व्यक्त करत परराष्ट्र खात्याचे ट्विट शेअर केले होते.
संगीतकार कैलाश खेर यांनी भारत असा प्रचार सहन करणार नाही, असे ट्विट केले होते.
मूळ बातमी
COMMENTS