नफ्ताली बेनेट इस्रायलचे नवे पंतप्रधान

नफ्ताली बेनेट इस्रायलचे नवे पंतप्रधान

जेरुसलेमः इस्रायलचे १३ वे पंतप्रधान म्हणून रविवारी ४९ वर्षीय नफ्ताली बेनेट यांनी शपथ घेतली. त्यामुळे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची १२ वर्षांची सल

शाह फैजल गुंड नाही, कुटुंबियांचा संताप
माहिती अधिकार : बळ आणि कळ
बर्ट्रंड रसेलचा लेखनसंसार

जेरुसलेमः इस्रायलचे १३ वे पंतप्रधान म्हणून रविवारी ४९ वर्षीय नफ्ताली बेनेट यांनी शपथ घेतली. त्यामुळे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची १२ वर्षांची सलग कारकीर्द संपुष्टात आली. नेतन्याहू यांनी इस्रायलचे सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवले आहे. १९९६ ते १९९९ व नंतर २००९ ते २०२१ असा काळ ते इस्रायलच्या पंतप्रधानपदी होते. बेनेट हे नेतन्याहू नंतर दुसरे असे पंतप्रधान आहेत की ज्यांचा जन्म इस्रायलच्या स्थापनेनंतर झाला आहे. आता नेतन्याहू प्रमुख विरोधी पक्षाचे नेते म्हणून इस्रायलच्या राजकारणात काम पाहतील.

इस्रायलच्या संसदेत बेनेट यांच्या यामिना पार्टी व अन्य घटक पक्षांचे एकूण ६१ सदस्य आहेत. हे सरकारही काठावर आहे. त्यांच्या सरकारमध्ये ९ महिलांचा समावेश असून एकूण २७ मंत्री आहेत.

नेतन्याहू पंतप्रधान असताना बेनेट हे २०१३ ते २०१५ या काळात अर्थव्यवस्था व धार्मिक सेवा मंत्री म्हणून कार्यरत होते. त्याच बरोबर २०१३ ते २०१९ काळात ते श्रम खात्याचे मंत्री, २०१५ ते २०१९ शिक्षणमंत्री, २०१९ ते २०२० संरक्षण मंत्री म्हणून काम करत होते.

इस्रायलमध्ये बेनेट यांच्या नेतृत्वाखाली आलेले नवे सरकार अरब गट, कट्टरतावादी गट, डावे व उदारमतवादी-केंद्रवादी अशी भिन्न राजकीय विचारसरणीची एक अभूतपूर्व महाआघाडी सरकार असून १२० सदस्यांच्या संसदेत त्यांना काठावर बहुमत आहे.

पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर बेनेट यांनी आपले सरकार देशातील सर्व विचारसरणींचे प्रतिनिधित्व करत असल्याचे सांगितले. बेनेट यांचा पक्ष हा आत्यंतिक राष्ट्रवादाचा पुरस्कर्ता असून ते स्वतः स्वतंत्र पॅलिस्टाइन राष्ट्राच्या विरोधात आहेत. पश्चिम किनारपट्टी व पूर्व जेरुसलेम येथे ज्यूंनी काबिज केलेल्या प्रदेशाचे ते समर्थक आहेत. ते इस्रायल-पॅलेस्टाइन व आंतरराष्ट्रीय समुदायाकडून सुरू असलेल्या शांतता प्रक्रियेचेही विरोधक आहेत. पण आता त्यांना कट्टरतावादी, डावे व उदारमतवादी सदस्यांशी जुळवून घ्यावे लागणार आहे. ते २०२३ पर्यंत पंतप्रधानपद सांभाळतील, त्यानंतर या सरकारला पाठिंबा देणारे उदारमतवादी नेते याइर लापिद हे २०२५ अखेर पंतप्रधानपद सांभाळतील. लापिद हे येश एटिड पार्टीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी बेनेट यांच्याशी सत्तासंपादनाचा करार केला आहे.

कोण आहेत नफ्ताली बेनेट?

बेनेट हे कट्टर सनातनी ज्यू असून ते ज्यू पुनर्वसन चळवळीत तेल अविवमध्ये राहात होते. आपल्या राजकीय कारर्किदीत ते नेतन्याहू यांचा उजवा हात समजले जात होते. पण नेतन्याहू यांच्या कार्यपद्धतीवर ते नाराज होते. त्यांनीच नेतन्याहू यांची १२ वर्षांची अनिर्बंध सत्ता बरखास्त व्हावी म्हणून मध्यम केंद्री व डाव्यांशी युती केली.

बेनेट यांची यामिना पार्टी ही मार्चमध्ये झालेल्या निवडणुकीत १२० जागांपैकी केवळ ७ जागांवर निवडून आली होती. पण त्यांनी नेतन्याहू यांच्यापुढे मान तुकवली नाही. या पक्षाने संसदेत नेतन्याहूंकडे कमी संख्याबळ असल्याचा फायदा घेत किंग मेकर होण्याची भूमिका बजावली आहे.  

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0