बर्ट्रंड रसेल दर्शन : पूर्वपीठिका

बर्ट्रंड रसेल दर्शन : पूर्वपीठिका

'विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ तत्वचिंतक आणि जनविवेकवेत्ता' म्हणून बर्ट्रंड रसेलला ओळखले जाते. या उपाधीत काहीच वावगे वाटू नये, इतके सर्व क्षेत्रातील रसेलचे लेखन अत्युच्च कोटीचे आहे, मानव जमातीला जितके सल्ले रसेल देऊ शकला, तितके सल्ले अन्य कोणत्याही ‘विवेकवादी’ विचारवंताने दिलेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. रसेलने लेखन-चिंतनाद्वारे साऱ्या जगाला विवेकवादाचे, बुद्धिवादाचे जणू शिक्षणच दिले. व्यापक अर्थाने 'जागतिक शिक्षक' अशीही उपाधी रसेलला सार्थपणे जोडता येते. मानवातील विधायक प्रेरणांचा विकास आणि विघातक प्रेरणांचे दमन हेच शिक्षणाचे उद्दिष्ट आहे, हे रसेलच्या शिक्षणविषयक चिंतनाचे मध्यवर्ती सूत्र आहे. आज ०५ सप्टेंबर रोजीच्या 'भारतीय शिक्षक दिना'चे औचित्य साधून "बर्ट्रंड रसेल दर्शन" या लेखमालिकेस 'द वायर मराठी' मध्ये प्रारंभ करीत आहोत. महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या रविवारी ही लेखमाला प्रसिद्ध होईल.

बर्ट्रंड रसेलची तत्त्वज्ञानात्मक लेखनशैली
तत्त्वचिंतनाचे शत्रू
तत्त्वज्ञानाचा नकाशा कसा वापरावा?

उभे आयुष्य रसरसून आणि समरसून जगलेल्या जगतविख्यात तत्त्ववेत्ता बर्ट्रंड रसेल याचे हे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्मवर्ष. गणितज्ज्ञ, तत्ववेत्ता, साहित्यिक, न्यायप्रिय, मानवतावादी अशा बहुविध रुपांत विसाव्या शतकातल्या विचारविश्वावर रसेलने आपला ठसा उमटविला. विध्वंसक अण्वस्त्र स्पर्धेत उतरलेल्या युद्धखोर देशांना प्रखर विरोध करत त्याने, बुद्धिप्रामाण्यवाद अधिष्ठित उन्नत आणि प्रगत जीवनाचे प्रारुप शांतताप्रिय समाजापुढे, किंबहुना सार्या जगापुढे ठेवले. ज्या सामाजिकराजकीयसांस्कृतिक आणि कलाविषयक प्रश्नांनासंकल्पनांना तो भिडला, त्या प्रश्नांचेसंकल्पनांचे आता चिंताजनक उत्परिवर्तन झालेले दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मानवी अंत:प्रेरणा, नीतिशास्त्र, तत्त्वज्ञान आदींची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी करणार्या रसेलच्या विचारदर्शनाचा वेध घेणार्या “बर्ट्रंड रसेल दर्शन” या लेखमालिकेची ही पूर्वपीठिका

शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्ष 

भारतीय शिक्षक दिना प्रमाणेच या लेखमालिकेची आणखी दोन औचित्ये आहेत. पहिले औचित्य असे की मे २०२१ हे रसेलच्या जन्माचे (१८ मे १८७२) दीडशेवे वर्ष आहे. त्या निमित्ताने जगभरातील तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात आणि अन्य विवेकवादी वर्तुळांमध्ये रसेलच्या विचारांचे स्मरण, चिंतन आणि काटेकोर परीक्षण केले जात आहे. हा व्यापक संदर्भ साधून रसेलसारख्या विश्वविख्यात तत्त्ववेत्त्याच्या विचारविश्वाची मराठी बुद्धिप्रामाण्यवादी जगतात, वैचारिक क्षेत्रात आणि सामाजिकराजकीय जीवनाच्या प्रत्येक अंगात दखल घेणे, हे महाराष्ट्रीय वैचारिक क्षेत्राच्या प्रौढत्वाचे अनेकापैकी एक सुजाण लक्षण मानणे शक्य आहे. राष्ट्रीय आणि महाराष्ट्रीय जीवनातील वैचारिक गोंधळ व अनेक तऱ्हांची अवनत अवस्था पाहता एका आपल्याला आपल्या व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनाच्या काटेकोर तात्त्विक विश्लेषणाची नितांत गरज आहे, जी रसेलच्या लेखनातून लाभू शकेल.

दुसरे औचित्य म्हणजे मे २०२१ हे रसेलच्या जन्माचे दीडशेवे वर्ष जसे आहे तसे रसेलच्या मृत्यूदिनाचेही (०२ फेब्रुवारी १९७०) आज अर्धशतक सरले आहे. रसेलच्या हयातीत ब्रिटन-युरोपमध्ये त्याच्या सामाजिक चिंतनाचा मोठा परिणाम झाला. अधिक परिणाम व प्रभाव शुद्ध तत्त्वज्ञानात व त्याअनुषंगाने विज्ञानाच्या क्षेत्रात तसेच विज्ञानाच्या तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात झाला. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्राने वेगळी भरारी घेतली. रसेलचेतार्किक विश्लेषक तत्त्वज्ञानविसाव्या शतकातील आणि एकविसाव्या शतकाचा उंबरठा ओलांडून आलेल्या विद्यमान तत्त्वज्ञानाच्या परिवर्तनाचे भक्कम अधिष्ठान ठरले आहे, यात शंका नाही.

असाच प्रभाव रसेलच्या मृत्यूनंतरही जागतिक पटलावर झाला. ‘भाष्यकाराते वाट पुसतू’ उक्तीनुसार रसेलच्या विचारांची, त्याच्या तत्त्वज्ञानाची दखल घेऊनच निखळ तत्त्वचिंतनाच्या क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. गेल्या काही दशकात अधिक व्यावसायिक झाले आहेत (भारतात ही प्रक्रिया अद्यापि सुगम शैलीत आकारलेली नाही).   

रसेलच्या तात्त्विक लेखनावरच त्याचे सामाजिक व राजकीय विचार आधारलेले आहेत. ते आज जास्तच समकालीन व फलवादी ठरले आहेत. रसेलचे लेखन अफाट आहे. त्यातील काही निवडक विचारांचा परिचयद वायर मराठी च्या वाचकांसाठी या लेखमालेत करून देण्याचे योजिले आहे. म्हणूनच या लेखमालिकेचे नामाभिधानबर्ट्रंड रसेल दर्शनअसे केले आहे

= =

बर्ट्रंड रसेलचे संपूर्ण नाव बर्ट्रंड आर्थर विल्यम रसेल, तिसरा अर्ल रसेल (Bertrand Arthur William Russell, 3rd Earl Russell). रसेलचा जन्म इंग्लंडच्या आग्नेय वेल्स विभागातील ट्रेलेक येथे १८ मे १८७२ रोजी झाला तर मृत्यू त्याच विभागातील पेन्रीनडाइड्राइथ येथे रोजी झाला. ‘पहिल्या रिफॉर्म बिलाचे (The Great Reform Bill 1882) उद्गाते म्हणून प्रसिद्ध असलेल्या ब्रिटिश पंतप्रधान लॉर्ड जॉन रसेलपहिले अर्ल रसेल यांचा नातू म्हणजे बर्ट्रंड रसेल.

गणित, भूमिती, विज्ञान या विषयातील वैज्ञानिक जगतात आणि शुद्ध तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात रसेलचे स्थान उच्चकोटीचे होतेच; पण त्याहीपेक्षा सामाजिक व राजकीय लेखनचिंतनामुळे रसेल जगभरातील इंग्रजी जाणणार्या सुशिक्षितात लोकप्रिय झाला.

दोन मूलभूत प्रेरणा

रसेलच्या तात्त्विक, सामाजिक व राजकीय भूमिकेनुसार मानवात दोन मूलभूत प्रेरणा असतात: विधायक आणि विघातक. विधायक प्रेरणेचा आविष्कार विज्ञान, कला, प्रेम, मैत्री व तत्त्वज्ञान यातून जाणवतो, तर विघातक प्रेरणेचा दारुण अनुभव असूया, मत्सर, स्पर्धा, हिंसा यातून येतो. विधायक प्रेरणांचा विकास आणि विघातक गोष्टींना प्रखर विरोध हे मानवी जीवनाचे स्वरूप आहे. म्हणूनच विधायक प्रेरणांचा विकास करण्याचे सामर्थ्य आणि विघातक प्रेरणांचे दमन करण्याची शक्ती प्रत्येक व्यक्तीत निर्माण करणे, हेच शिक्षणाचे उद्दिष्ट असले पाहिजे. शिक्षणाच्या या ध्येयाचा अंतिम आविष्कारचांगला माणूस बनणेहाच असला पाहिजे, असा त्याचा आग्रह आहे. म्हणूनच तर कोणतीही संस्थात्मक रचना रसेलला मान्य नव्हती. “तो म्हणतो, ज्याची प्रेरणा प्रेमात आहे आणि ज्याचे मार्गदर्शन ज्ञानाने होते, असे जीवन म्हणजे शुभजीवन होय.” हा विचार त्याच्या सामाजिक व नैतिक शिकवणुकीचा गाभा आहे.

दोन प्रवृत्ती

रसेलच्या या दोन प्रेरणांनीच जणू त्याच्या दोन प्रवृत्ती घडत गेल्या. पहिली तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात मूलगामी ज्ञानाच्या शोधात आढळते, तर दुसरी त्याच्या भोवतालचे जग यथार्थतेने सुखी करता येण्याचा मार्ग शोधात आढळते. त्यातूनच रसेलचे व्यक्तिमत्व दुपेडी बनते. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात तो अस्सल तत्त्ववेत्ता म्हणून आणि उत्तम दर्जाचा व्यावसायिक तत्त्ववेत्ता म्हणून गणला जातो आणि सार्वजनिक जीवनात तो उच्चकोटीचा विचक्षण जनबुद्धीप्रामाण्यवादी म्हणून जगाला परिचित होतो.

व्यावसायिक तत्त्वज्ञान आणि लोकप्रिय नीतिशास्त्र यात अचूक फरक करणारा रसेल हा यशस्वी विचारवंत होता. मानवी जीवन रसेलच्या मते, हीतत्त्वज्ञानाची प्रयोगशाळाच असते. आधुनिक माणसापुढे असलेल्या नैतिक, सामाजिक, राजकीय व आर्थिक समस्यांवरचे त्यांचे लिखाण म्हणजेतत्त्वज्ञानातील सिद्धांतांचा योग्य वापर सामाजिक अंगाने कसा करावायाचा वस्तुपाठच म्हणता येईल.

रसेलचे सुबोध, प्रसन्न आणि उपरोध व नर्मविनोद यांनी नटलेले विवेचक तत्त्वज्ञानात्मक चिंतन ही पाश्चात्य तत्त्वज्ञानाची थोर व सभ्य मिळकत आहेच; पण त्याचे तत्त्वज्ञानात्मक लेखन आणि सामाजिक व राजकीय लेखन अभिजात जागतिक इंग्रजी साहित्यविश्वाचे अविभाज्य अंग बनलेले आहे. स्वातंत्र्यप्रियता, सामाजिक समता व उदारमतवाद हारसेलया उमराव घराण्याचा वारसाच त्याने उच्चपदाला नेला. व्यक्तिस्वातंत्र्य, सुखदुःख, व्यक्तिविकास या गोष्टींनाच त्याच्या मते खरे मूल्य आहे. जबाबदारीचे सुयोग्य भान देणाऱ्या व्यक्तिस्वातंत्र्याचा पराकोटीचा पुरस्कार त्याने केला, त्यातूनच माणसाला दुःखमुक्तीचा मार्ग सापडू शकेल, या दिशेने त्याने चिंतनलेखन केले.  

= =

येथे मीबर्ट्रंड रसेल दर्शनअसे शीर्षक दिले आहे. ‘रसेल’ हा इंग्लिश पाश्चात्य विचारवंत तर ‘दर्शन’ हे अस्सल भारतीय ‘विशेषण आहे. भारतीय ‘दर्शन’ संज्ञा बिगर-भारतीय विचाराला व विचारवंताला उपयोजित ठरू शकते का? हा प्रश्न मी उपस्थित करतो. त्याचे उत्तर सकारात्मक आहे. त्यातून विकसित होणारा दृष्टीकोनही विधायक अंगाने जाणारा आहे.  

बर्ट्रंड रसेल दर्शनचे दोन अर्थ मला अभिप्रेत आहेत. पहिला तात्त्विक (Philosophical) आणि दुसरा व्यावहारिक (Practical) आहे. पहिल्या अर्थाची पूर्वपीठिका म्हणून पहिली गोष्ट अशी की ‘Philosophy, ‘तत्त्वज्ञान’ आणि ‘दर्शन’ या संज्ञाप्रयोगांची माहिती घेणे आवश्यक आहे. दुसरी गोष्ट अशी की, ह्या केवळ संज्ञाप्रयोग नसून त्या स्वतंत्र संकल्पना आहेत, हे अधोरेखित करणे आवश्यक आहेच. तिसरी गोष्ट म्हणजे ह्या तिन्हींचा रसेलच्या विचारांशी विशिष्ट स्वरूपाचा आंतरिक वैचारिक नातेसंबंध जोडता येतो, हे अधोरेखित करतो. त्या नात्याची थोडक्यात माहिती घेणे, आवश्यक आहे.

बर्ट्रंड रसेल दर्शनदुसरा व्यावहारिक (Practical) अर्थ त्या मागोमाग मी स्पष्ट करेन

=३=

Philosophy आणि तत्त्वज्ञान

इंग्लिशमधील Philosophy चे मराठी भाषांतर म्हणूनतत्त्वज्ञानही संज्ञा उपयोगात आणली जात असली, तरी Philosophy आणितत्त्वज्ञानशब्दांचे मूलार्थ वेगवेगळे आहेत. पहिला आणि सहज जाणवणारा फरक असा कीतत्त्वज्ञानहा प्राचीन संस्कृत शब्द आहे तर Philosophy हा इंग्लिश भाषेतील शब्द आहे.

Philosophy हा शब्द इंग्लिश असला तरी त्याचे मूळ कुळ प्राचीन ग्रीक भाषेत आहे. ‘तत्त्वज्ञानशब्दाचे मूळ प्राचीन संस्कृतमध्ये असून ती प्राचीन वैदिक हिंदूंची भाषा आहे (आजच्या आधुनिक हिंदूंची भाषा नाही). ग्रीक, इंग्लिश व संस्कृत तिन्ही भाषा भिन्न संस्कृतीत विकसित झाल्या तरी त्यांचे वैचारिक नाते गहन स्वरूपाचे आहे

 इंग्लिश Philosophy ही संज्ञा ज्या ग्रीक संज्ञेचा उच्चार Philosophia असा होतो, त्या शब्दापासून (Philosophein) बनते. Philosophia चा शब्दशः अर्थ शहाणपणाविषयीचे प्रेम अथवा चातुर्याबद्दल प्रेम (Philosophy = Love of Wisdom) असा आहे. म्हणून Philosophy चे मराठी वास्तव भाषांतरप्रज्ञानाचे प्रेमअसे केले जाते.

 तत्त्वज्ञानही संस्कृत संज्ञा तत्त्व + ज्ञान अशा संधीने बनते. तत्त्व = तत् + त्व. ‘तत्चातत्पणा’ = तत्त्व, त्यातत्त्वचे ज्ञान म्हणजे तत्त्वज्ञान.

 तत्म्हणजेते’. ज्याचा ज्याचा निर्देशते असा करता येतोती, तीप्रत्येक वस्तू, व्यक्ती, घटना इत्यादी म्हणजे ‘ते’ अथवा ‘तत्’. जे अस्तित्वात आहे ते सर्व अखिल विश्व म्हणजे ‘तत्’. म्हणून सार्या भौतिक वस्तू, सर्व निर्जीव आणि सजीव प्राणी-व्यक्ती यातत्आहेत. अखिल विश्व स्वरूपाच्या यातत्चे ज्ञान ते तत्त्वज्ञान.  ‘तत्’चा निर्देश शब्दाने होतो, शब्द म्हणजे ‘पद’. प्रत्येक ‘पद’ कोणता तरी ‘अर्थ’ विशद करते, पदाला अर्थ असणे ह्याचा अर्थ ‘पदार्थ’. कोणती तरी वस्तू म्हणजे पदार्थ. म्हणून भारतीय वैदिक तत्त्वज्ञानात ‘पदस्य अर्थ: पदार्थ’ असे म्हटले आहे. अर्थात केवळ भौतिक वस्तू म्हणजे पदार्थ नव्हे, तर वस्तूचे द्रव्य (substance), गुण (quality) कर्म (action) अभाव (absence/non-availability) या मानसिक वैशिष्ट्यांनाही ‘पदार्थ’ मानले आहे.     

 थोडक्यात, ‘तत्त्वम्हणजे ज्ञानाचा विषय असणार्या प्रत्येक पदार्थाचे यथार्थ स्वरूप किंवा त्याचे सारतत्त्व. त्यामुळे भारतीय दर्शनांच्या मते, तत्त्वज्ञान याचा अर्थ पदार्थाचे यथार्थ ज्ञान.

 येथे एक अधिकचा खुलासा आवश्यक आहे. तो असा की, भारतीय परंपरेनुसारतत्या संकल्पनेत केवळ जे दृश्य आहे, अस्तित्वात आहे, त्याचेच ज्ञान होते, असे नाही; तर जे अस्तित्वात नाही त्याचेहीते नाहीअसे ज्ञान होत असते; जसे  की आज रसेल, गांधीजी, नेहरु अस्तित्वात नाहीत, किंवा माझे खापरखापर पणजोबापणजी अथवा देवीचा रोग आज अस्तित्वात नाही. तेव्हारसेलगांधीनेहरुमाझे खापरखापर पणजोबापणजी अथवा देवीचा रोग, यांचेते नाहीतअसे ज्ञान आज होतेच. ‘रसेलअस्तित्वात होता, पण आज हयात नाही, म्हणूनचरसेलचे ज्ञानआज आपण करवून घेत आहोत!

थोडक्यात, ‘असणेआणिनसणेदोन्हीला उद्देशूनतत्त्वही संकल्पना उपयोगात आणली जाते. म्हणूनतत्किंवातत्त्वचा अर्थसत्आणिअसत्दोन्ही होतो.

सत्म्हणजे जे आहे ते आणिअसत्म्हणजे जे नाही ते. त्या दोन्हींचेहीजसे आहे तसेचवेगळे नाही असे’ – अविपरीत स्वरूपातील ज्ञान होणे म्हणजेतत्त्व.’ अविपरीत याचा अर्थ जर ज्ञानवस्तू असेल तर ती नाही, असे नाही आणि जर ज्ञानवस्तू नसेल तर ती आहे, असे नाही. ती असेल तरआहेम्हणून आणि तो नसेल तरनाहीम्हणूनच ती ज्ञात झाली पाहिजे. ‘आज रसेल अस्तित्वात नाहीम्हणूनरसेल नाहीअसेच ज्ञान झाले पाहिजे, ‘रसेल आहेअसे अविपरीत ज्ञान झाले नाही पाहिजे

 असे हे तत्त्वज्ञान प्रत्यक्ष, अनुमान, शब्द इत्यादी प्रमाणाने होते. म्हणूनवस्तुस्थितीयाचा अर्थअसणेकिंवानसणेदोन्हीही.

दर्श

तत्त्वज्ञान संज्ञेला समानार्थी शब्द म्हणजे दर्शन. ‘दर्शनही भारतीय परंपरेतील खास संकल्पना आहे. ‘दर्शनहोणे याचा अर्थ साक्षात्कार होणे, सत्याचे थेट दर्शन होणे.

संस्कृत, आधीलदृधातूपासूनदृश्य’, ‘दर्शन’, ‘द्रष्टाआणिदार्शनिकया संज्ञा बनतात. ‘दर्शनचा मूलार्थदृष्टी(दर्शनसंज्ञेला बौद्ध दर्शनातदिठ्ठीम्हटले आहे).

दृश्म्हणजे पाहाणे, म्हणून दर्शन म्हणजेचाक्षुष ज्ञान’ (डोळ्यांना प्रत्यक्ष होणारे), आलोकन, ईक्षण (ईक्ष = पाहणे, अनुभवणे; ईक्षणम् = पाहण्याची वर्तमानकालीन गतिमान प्रक्रिया आणि ईक्षिका= डोळा).  थोडक्यात, डोळ्याने प्रत्यक्ष पाहाणे.

अन्य ज्ञानेंद्रियांच्या तुलनेत डोळा हे इंद्रिय ज्ञेयविषयाच्या किंवा सत्याच्या जवळ जाणारे असल्याने सत्य शोधणार्या कोणत्याही अध्यात्मशास्त्राला (Metaphysics)दर्शनम्हटले जाते. चक्षुमहत्ता जाणूनच भारतीय परंपरेतचक्षुर्वैसत्यम्अथवाचक्षुर्वैप्रतिष्ठाअसे म्हटले आहे.

(चक्षुज्ञान किंवाप्रत्यक्ष ज्ञानया संकल्पनेला गेल्या दशकभरात डिजिटल माध्यमांनी क्षेत्रात आव्हान दिले आहे. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अत्याधुनिक नवतंत्रज्ञानाने इलेक्ट्रॉनिक माध्यमे, महाजाल माध्यमे आणि समाजमाध्यमे, या विविध माध्यमपीठांद्वारेडिजिटल मिथ्यारोपणकरण्याची प्रचंड लाट उसळली आहे. ‘असत्याचे सत्य आणि सत्याचे असत्यरुपात सादरीकरण होते आहे. परिणामी माध्यमविषयक नव्या आणि जटील ज्ञानशास्त्रीय आणि नीतिशास्त्रीय समस्या उद्भवत आहेत, हेही अधोरेखित होणे नितांत आवश्यक आहे.)

 या परंपरेतदर्शनच्या तीन व्याख्यांना सर्वमान्यता आहे. त्या अशा:

  • दृश्यतेहि अनेन इति दर्शनम् (‘सत् आणि असत्यांचे ज्ञान)
  • दृश्यते यथार्थ तत्त्वम अनेन इति दर्शनम् (ज्याच्या योगाने यथार्थ तत्त्व पाहिले जाते, ते शास्त्र म्हणजे दर्शन.)
  • तत्त्वज्ञान साधनं शास्त्रम(तत्त्वांचे ज्ञान होण्याला साधक असे शास्त्र म्हणजे दर्शनन्यायकोश)

अशीही एक व्याख्या आहे. ज्या शास्त्राच्याद्वारे लौकिक आणि पारलौकिक तत्त्वांचे ज्ञान होते, त्या शास्त्राला जाणणे म्हणजे, ‘तत्त्वज्ञानाच्या साधनशास्त्राचे दर्शनहोणे.

भारतीय दर्शनांचा हेतू

दुःखाचा परिहार हा सर्व भारतीय दर्शनांचा हेतू आहे, महात्मा गौतम बुद्धाने तरदुःखहेच अंतिम सत्य मानले. अर्थात हे अधोरेखित होणे आवश्यक आहे की दुःखमुक्तिची सिद्धी करण्याचा प्रत्येक दर्शनाचा मार्ग भिन्न आहे. तरीही त्या सर्वांमध्ये एक विशिष्ट तर्हेची अंतर्निहित सूत्रता आहे. ती उच्च दर्जाची आहे, पण दुर्दैवाने भारतीय दर्शनांच्या धर्मप्रभावित, किंबहुनादर्शनांच्या धर्मग्रस्तबाजूने मात्र वास्तवात दुःखपरिहाराऐवजी दुःखनिर्मितीच केली; म्हणजे हेतू आणि सिद्धी यात महत्तम अंतर पडत गेले. भारतीय परंपरेत हा खूप मोठाहेत्वाभासनिर्माण झाला. दुःखनिर्मितीत प्रामुख्याने इतर कोणत्याही दर्शनापेक्षापूर्वमीमांसा दर्शनअग्रस्थानी आहे

भारतीय दर्शने आणि रसेल दर्शन

भारतीय दर्शने आणि रसेलचे सामाजिक व राजकीय तत्त्वज्ञान यात काहीएक अंतर्निहित नाते आहे. त्यासाठी पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की अद्वैत वेदांतातील ब्रह्म, आत्मा, माया, या संकल्पना वगळता पूर्वमीमांसेसह सारी दर्शने मूलतः भौतिक विश्वाचा आणि भौतिक मानवी जीवनाचा गंभीर विचार करतात. परिणामी वरील सार्या व्याख्या भौतिक स्वरुपाच्या व्याख्या ठरतात, त्यांच्यात धार्मिक अथवा तथाकथित आध्यात्मिक अर्थ नाही

ही वस्तुस्थिती लक्षात घेता भारतीय दर्शनव्यवस्था आणि रसेलचे विचार यांच्यातदुःखाचा परिहारहे समान सूत्र आहे, ही दुसरी गोष्ट आहे. आधुनिक कालखंडात रसेलच्या आधी कार्ल मार्क्सने जगातील दुःखाचा शोध घेतला. त्याची कारणे धुंडाळली. समाजात दुःख पसरवणारे स्त्रोत त्याने निश्चित केले. शोषणातून दुःखाची निर्मिती होते आणि त्यासाठी केवळ धर्म हीच व्यवस्था जबाबदार नाही, हे देखील त्याने मान्य केले. पण सामान्यांच्या कल्याणासाठी असलेली धर्म नावाची व्यवस्था, शोषकांच्या मक्तेदारीत अडकल्याचे त्याच्या नजरेने हेरले. सर्वहारांचे दुःख कसे नष्ट होईल, आणि त्यांचीखर्या अर्थाने माणूसम्हणून कशी प्रतिष्ठापना शक्य होईल, या तर्कशास्त्राचे आणि समाजशास्त्राचे एक विदारक दर्शनच मार्क्सने घडवले. पण रसेल मार्क्सच्याही पुढे जाऊन नैसर्गिक जगत आणि मानवी जग यांच्यातील विशिष्ट नात्याचे विवेचन विश्लेषणाच्या साह्याने तपशीलात समोर ठेवतो, मानवी दुःखाचे अत्याधुनिक अर्थविवरण देतो.

वैदिकअवैदिक तत्त्वज्ञानाबरोबरच चौकटीबाहेरचे इहवादी तत्त्वज्ञान म्हणून आपण चार्वाक तत्त्वज्ञानही आपण मान्य करतो. चार्वाक तत्त्वज्ञान वैदिकधर्माचा, त्यातील कर्मकांडाचा स्वीकार नव्हे तर पूर्ण धिक्कार करणारे आहे. केवळ वैदिकच नव्हे, तर अवैदिक बौद्ध आणि जैन धर्मातील कर्मकांडांचाही ते संपूर्ण धिक्कार करते. हे तत्त्वज्ञान केवळ व्यक्ती व समाज यांची केवळ इहलोकातील म्हणजे या दृश्य प्रत्यक्ष अनुभवाला येणार्या जगातील माणसाची भौतिक प्रगती साधू इच्छिते, आत्मिक किंवा धार्मिक प्रगती नाही. म्हणून त्यासइहवादी तत्त्वज्ञानअसे म्हटले आहे. या तत्त्वज्ञानास कोणताही धर्म नाही, म्हणून त्याचे  ‘धार्मिक तत्त्वज्ञानही निर्माण झालेले नाही. या भौतिकवादी किंवा इहवादी चार्वाक दर्शनाशीही रसेल नाते जोडतो, असे दाखवून देता येते.

 तत्त्ववेत्तेप्रोफेसर सुरेंद्र बारलिंगे यांच्या मते, ‘भारतीय दर्शनअसा शब्दप्रयोग केला जातो, तेव्हा भारतीय दार्शनिकांनी तपशीलवार मांडलेले तत्त्वज्ञान असा अर्थ घेणे उचित आहे, ‘भारतीयहे विशेषण तत्त्वज्ञानाचे नाही तर लेखकांचे असले पाहिजे. म्हणजेभारतीयहे लेखकतत्त्ववेत्ते यांना उद्देशून केलेले परिवर्तीत गुणवाचक विशेषणाचे उदाहरण (epithet) मानले पाहिजे, त्यांच्या विचारांना उद्देशून उयोजनात आणलेले विशेषण नव्हे.

प्रोफेसर सुरेंद्र बारलिंगे याचे हे विवेचन अत्याधुनिक आहे. या विवेचनामुळेदर्शनया शब्दाशी निगडीत झालेलेभारतीयत्वाचे अथवावैदिकत्वाचे दडपण दूर होते आणिदर्शनही संकल्पना मुक्त होते, ती अधिक व्यापक विचारांना उद्देशून वापरता येते.   

याचा अर्थ असा की जी कोणी व्यक्ती एखाद्या विचारांनादर्शनअसे म्हणते, तेव्हा व्यक्तिपरत्वे आणि संस्कृतिपरत्वे उद्भवणार्या विविध विचारांमधील अर्थच्छटा एकवटणार्या एका विशिष्ट अर्थानेच ती हा शब्दप्रयोग करीत असते. तोच अर्थ मलाही येथे अभिप्रेत आहे.

दर्शनया संज्ञेसंबंधाची व्याप्ति विस्तारली की भारतीय, विशेषतः वैदिक परंपरेबाहेरच्या इतरत्र विकसित होणार्या विचारांबद्दल आपुलकी व ममत्व वाढेल, असेही मला मनापासून वाटते

हे सारे विवेचन ही तिसरी गोष्ट आहे.

चौथी गोष्ट अशी की, Philosophyचे नवे आधुनिक भाषांतरदर्शनअसे करण्यात येते. हिंदी भाषिक प्रदेशात Philosophyलादर्शन/दर्शनशास्त्रहे नामाभिधान प्रचलित आहेच. शिवाय कर्नाटक, आंध्रप्रदेश इत्यादी काही दक्षिणी राज्यात ‘तत्त्वशास्त्र असाही शब्दप्रयोग केला जातो.

या सार्या व्यापक तत्त्वज्ञानात्मक आधारावर रसेलच्या विचारसरणीलाही भारतीय परिभाषेतरसेल दर्शनम्हणण्यास हरकत नसावी. हिंदीत रसेल शिकविला जातो, तेव्हा तिथेरसेल का दर्शन’, ‘रसेल के दार्शनिक विचार’, ‘रसेल का दर्शनशास्त्रअसेच उल्लेख केले जातात. मराठीत अथवा समजा संस्कृत भाषेत त्याचे तत्त्वज्ञान मांडले, गेलेच तर त्याचे नामाभिधानरसेलदर्शनअसेच होईल, यात शंका नाही. काही संस्कृत संभाषण वर्गात रसेलदर्शनअसा शब्दप्रयोग केला जात आहेच. परिणामीरसेल दर्शनम्हणण्यात समपर्कता, कालोचितता आहे, आणि ते जास्त समकालीन होईल, असे मला वाटते.  

 =४=

पूर्वपीठिका (Prolegomena)

येथे जे काही लिहिले आहे, त्यासाठी वस्तुतःपूर्वपीठिका(Prolegomena) ही संज्ञा अधिक योग्य वाटते. रसेलच्या विचारविश्वाबद्दल (किंवा एकूणच तत्त्वज्ञानाबद्दल किंवा कोणत्याही ज्ञानाबद्दल) आदर, प्रेम, आपुलकी आणि जिज्ञासा या अभिवृत्ती व्यक्त करण्यासाठी जे काही करावयाचे आहे, त्या सार्या प्रयत्नांनापूर्वपीठिकाम्हणता येईल. येथे परिचय (Introduction) आणि पूर्वपीठिका (Prolegomena) या दोन संकल्पनांमध्ये फरक करणे आवश्यक आहे.

परिचय (Introduction) या संकल्पनेत अनंत विद्वतजड पंडिती गोष्टींची अपेक्षा असते. ज्यांना परिचय करून दिला जातो त्या वाचकांनाप्रेक्षकांना काहीएक पूर्वज्ञान आहे, असे गृहीत धरलेले असते. त्या गृहितावर आधारित प्रदीर्घ युक्तिवाद मांडणे आणि निष्कर्षाप्रत येणे असे परिचय देताना घडते. ‘पूर्वपीठिका(Prolegomena) या संकल्पनेत अशा तांत्रिकदृष्ट्या किचकट गोष्टींची गरज नसते. पूर्वपीठिका ज्ञानासाठी उत्सुक असलेल्या सामान्यजनासाठी असते, तशी ती बहुश्रुत विद्वान जिज्ञासूजनांसाठीही असते. शब्दबंबाळ, जडजंबाळ, बोजडपण टाळून सामान्य भाषेत ती मांडलेली असते. त्याचवेळी पुढील चर्चेची पूर्वतयारी म्हणून परिभाषेची, वादविवादाच्या उपकरणांची, काही मूलभूत सिद्धांताची ओळख पूर्वपीठिकेत करून दिली जाते.

 आधुनिक काळातील सर्वश्रेष्ठ तत्ववेत्ता इमॅन्युएल कांटने(१७२४ ते १२ फेब्रुवारी १८०४) आपले प्रगल्भ तत्वज्ञानशुद्ध बुद्धीची मीमांसा(The Critique of Pure Reason) या ग्रंथात प्रामुख्याने मांडले, पण त्याला सुशिक्षित वर्गाकडून आणि तत्त्ववेत्त्यांकडूनही प्रतिसाद मिळेना. अखेर त्याने सर्वसामान्य वाचकांसाठी सोप्या रीतीने साध्या भाषेत Prolegomena to Any future Metaphysics हा ग्रंथ लिहिला. कांटने वापरलेला ‘Prolegomena’ हा शब्द मी त्याच अर्थाने येथे आणत आहे.

विसाव्या शतकातील प्रसिद्ध तत्ववेत्ते हान्स रायखेनबाख (Hans Reichenbach, जन्म:२६ सप्टेंबर १८९१,मृत्यू:०९ एप्रिल १९५३) यांच्या भाषेत सांगावयाचे, तर सहजबुद्धी जे शिकविते त्यापेक्षा  ते अधिक शिकण्याची इच्छा होण्याइतपत वाचकाकडे सहजबुद्धी असेल तर या लेखमालिकेतील प्रतिपादन समजण्यासाठी तेवढी तयारी पुरेशी आहे.

वाचकांना रसेलच्या लेखनचिंतनाविषयी रुची वाढावी तसेच त्याने विद्यमान जग, त्यातील वास्तवाचे विविध स्तर, समस्या आणि त्यांची गुंतागुंत याचे विश्लेषण करण्यासाठी कोणती तत्वज्ञानात्मक आयुधे वापरली, याची माहिती त्यांना असावी, हा उद्देश या पूर्वपीठिकेमागे आहे, त्याचप्रमाणे जे वाचक अधिक काही जाणू इच्छित आहेत, त्यांना त्यासाठी काय करावे लागेल, याचे सूतोवाच करण्याचा प्रयत्न येथे मी करू पाहातो आहे.

कोणताही विचार (जो मूलतः स्वरूपाने तत्त्वज्ञानात्मकच असतो) लोकांना उपलब्ध करून देणे, म्हणजे त्या विचारांचे अर्थहीन सुलभीकरण करणे नाही, तर लोकांना त्या विचारांच्या व आणि विचार निर्माण करणार्या विचारवंताच्या वैचारिक शैलीचा आणि लेखन शैलीचा परिचय करून देणे असते. आणि त्यानंतर त्यांना त्या रीतीने विचार करण्यास उत्तेजन देणे, असा केला पाहिजे. त्यामुळेजगाचे स्पष्टीकरण कसे करावे?’, ही समस्या न बनता जगाचे जे काही स्पष्टीकरण देण्यात आले आहे ते समजावून घेण्याची क्षमता विकसित होते, असे मला वाटते.

 =५=

रसेल दर्शनमधील हे पहिल्या अर्थाचे विवेचन होते. आता, मी दुसरा अर्थ स्पष्ट करू, तो असा :

हा दुसरा अर्थ, त्याच्या घडणीशी निगडीत आहे. त्याचे व्यक्तिमत्व, त्याची मानसिकता आणि त्याचा तत्त्वज्ञानात्मक परिसर, त्याचे सामाजिक जीवन, राजकीय जीवन आणि त्याचे तत्त्वज्ञान यांचा परस्पर संबंध शोधता येईल का, याचाही परामर्श घेणे आवश्यक आहे.

एक लक्षात ठेवणे आवश्यक आहे, की बर्ट्रंड रसेल हा तुमच्याआमच्यासारखा माणूस होता. त्यालाही काही मर्यादा होत्या. त्याची बुद्धिमत्ता, क्षमता अफाट असली तरी तोही अखेर माणूसच होता, माणसाच्या सार्या मर्यादा त्यालाही लागू होत्या‘तत्त्वज्ञानातील समस्या’ या त्याच्या प्रसिद्ध पुस्तकाच्या सुरुवातीस त्याने एक वचन उद्धृत केले आहे. ते असे :

 पीटरचे पॉलविषयीचे मत

आपल्याला पॉलविषयी जेवढे सांगते

त्यापेक्षा पीटरविषयी अधिक सांगते.

हे मूळ वचन डच तत्त्ववेत्ता भरूच स्पिनोझाचे (Baruch Spinoza १६३२-१६७७) आहे. त्याच्या जगतविख्यात ‘Ethics’ या महाग्रंथात तो एके ठिकाणी हे विधान करतो. मूळ लॅटिन भाषेतील या वाचनाचा इंग्लिश अनुवाद What Paul says about Peter tells us more about Paul than about Peter असा आहे. रसेलने Ethics, Demonstrated in Geometrical Order या महान ग्रंथामधून विधान घेतले आहे.

त्याचा अर्थ असा की, What Paul says about Peter tells us more about Paul than about Peter या विधानाचा लक्षणार्थ असा की कोणाविषयी कोणतेही मत व्यक्त करणे म्हणजे, मत व्यक्त करणार्या व्यक्तीने स्वतःविषयीचे मत स्वतःच सांगणे.

मत व्यक्त करणे, हे परीक्षण असते. ते करणारी व्यक्ती जिच्याविषयी मत व्यक्त करते, तिच्यापेक्षा काही गोष्टी अधिकच्या जाणत असते, म्हणून ती अधिकारी असते. तिचा अधिकारच ती व्यक्त करत असते. परीक्षेचे पेपर तपासताना शिक्षकाला जास्तीचे ज्ञान आहे, असे गृहीत धरलेले असते. तेच इथे घडते. हे विधान समीक्षेत, मग ती तात्त्विक असो वा वैज्ञानिक असो वा साहित्यिक समीक्षा असो वा वृत्तपत्रीय समीक्षा असो, समीक्षकाला लेखकापेक्षा अधिक जाणकार असण्याची गरज अधोरेखित करते.

हे लक्षात घेता, रसेलचे दर्शन त्याच्या ज्ञानाचा अधिकार व्यक्त करतेच, त्याची जडणघडणही व्यक्त करते. रसेलमधील तत्त्ववेत्ता जसा त्याच्या विचारातून समजावून घेता येईल, तसा रसेल हा माणूसही समजून घेता येईल. पण त्याचबरोबर आपली वस्तुनिष्ठताही अधोरेखित होईल. म्हणूनच रसेलचे दर्शन घडते, तसे आपल्याला आपलेही दर्शन घडते, हे आपण लक्षात ठेवणे नितांत गरजेचे राहील.

(ही लेखमालिका रसेलच्या जन्मशताब्दीनिमित्तानेमुक्तसंवाद या वैचारिक मासिकात जून २०२१ मध्ये सुरू झाली. प्रस्तुत लेख तेथे प्रसिद्ध झालेल्या लेखाचे पुनर्संस्करण आहे. लेख उपलब्ध करून देत असल्याबद्दल ‘मुक्तसंवाद’ चे संस्थापक, संपादक यांचे मनःपूर्वक आभार.  )

श्रीनिवास हेमाडे, हे तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक आणि व्यावसायिक तत्त्ववेत्ते आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0