भारतबंदला काही राज्यांमध्ये यश

भारतबंदला काही राज्यांमध्ये यश

मोदी सरकारच्या तीन वादग्रस्त शेती कायद्यांना विरोध म्हणून सोमवारी पुकारण्यात आलेल्या भारतबंदचे पडसाद काही राज्यात दिसून आले. सोमवारी सकाळपासून पंजाब,

संरक्षण मंत्रालयाची ढोल बडवण्याची परंपरा कायम
भारत हे करोनाचे पुढील केंद्रस्थान : डॉ. लक्ष्मीनारायण
सरसंघचालकांचे विधान आणि भारताचे दुर्दैव

मोदी सरकारच्या तीन वादग्रस्त शेती कायद्यांना विरोध म्हणून सोमवारी पुकारण्यात आलेल्या भारतबंदचे पडसाद काही राज्यात दिसून आले. सोमवारी सकाळपासून पंजाब, हरयाणा, दिल्लीतील हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले व त्यांनी रास्ता रोको केले. यामुळे राजधानी नवी दिल्लीतील वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक रस्त्यांवर ट्रॅफिक जॅम झालेला दिसून आला.

शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारतबंदचा परिणाम पंजाब, हरयाणा, पश्चिम उ. प्रदेश या राज्यांत प्रामुख्याने दिसून आला. तर केरळ, बिहार, झारखंड, प. बंगाल व ओदिशा येथे काही ठिकाणी शेतकर्यांनी सरकारविरोधात निदर्शने केली. काही संघटनांकडून रेल्वे रोकोही झाला. त्यामुळे २५हून अधिक रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बिघडले. शेतकर्यांनी दिल्ली, अंबाला व फिरोजपूर रेल्वे विभागात रेलरोको केले. त्यामुळे दिल्ली-अमृतसर शान-ए-पंजाब, नवी दिल्ली-मोगा एक्स्प्रेस, पठाणकोट एक्स्प्रेस, वंदे भारत एक्स्प्रेस, अमृतसर शताब्दी एक्स्प्रेस या रेल्वे थांबून राहिल्या होत्या.

भारत किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी शेतकर्यांच्या भारतबंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा केला. आम्हाला देशातील सर्व थरातील शेतकर्यांकडून पाठिंबा मिळाला. आम्ही सरकारशी चर्चा करण्यास तयार आहोत पण सरकार त्याला प्रतिसाद देत नसल्याचा आरोप टिकैत यांनी केला.

महाराष्ट्रात काही ठिकाणी शेतकरी संघटना व अन्य संघटनांनी शेती कायद्यांविरोधात मोर्चा काढला. या भारतबंदला सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता. पण शिवसेना या बंदबाबत तटस्थ राहिली.

औरंगाबादेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील मोर्चात सहभागी झाले होते. मुंबईत नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.

राजस्थानात गंगानगर, हनुमानगड, बिकानेर, सिकार, नागौर येथे भारतबंदचा परिणाम दिसून आला. येथील स्थानिक बाजारपेठा बंद होत्या. जयपूरमध्ये भारतीय किसान युनियनने मोर्चा काढला होता.

बिहारमध्ये पाटणा, भोजपूर, लाखीसराई, जहाँबाद, पूर्व चंपारण, बेगुसराई, मधेपुरा, नालंदा जिल्ह्यात भारत बंदचा परिणाम दिसून आला.

झारखंडमध्ये रांची-पाटणा महामार्ग, रामगड-बोकारो महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. झामुमो, माकप, राजद, काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: