भारत ते इंडिया एक  ट्रॅक्टर परेड

भारत ते इंडिया एक ट्रॅक्टर परेड

जय जवान जय किसान ही तर भारताची ओळख. पण भारत इंडिया मध्ये परावर्तित होत असतानाच ह्रदयाला भिडणाऱ्या जय जवान आणि जय किसान या घटकांना सोयीस्कर वापरले

गो-तस्करीच्या संशयावर मुस्लिम व्यक्तिची जमावाकडून हत्या
असहमतीचे आवाज
अमेरिकेला शह देणारे तेलयुद्ध
  • जय जवान जय किसान ही तर भारताची ओळख. पण भारत इंडिया मध्ये परावर्तित होत असतानाच ह्रदयाला भिडणाऱ्या जय जवान आणि जय किसान या घटकांना सोयीस्कर वापरले जाऊ लागले. जवानांपासून किसानाचा वापर राजकीय स्वार्थापोटी करण्यात येऊ लागला. स्वतंत्र भारताच्या इतिहासात याच किसानांना स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्षाच्या लढाईचे अनेक प्रसंग यापूर्वी घडले. तर हजारो बळीराजा आत्महत्येच्या पर्यायाला सामोरे गेले. सत्तेत कोणीही असो , काळ्या मातीत राबून त्याच मातीत शेवटी मिसळून जाणाऱ्या शेतकऱ्यांना कोणीच वाली नसते. अनेक जुलमी कायदे माथी मारून या शेतकऱ्यांना गुलाम बनविण्याचा प्रयत्न आणि त्यातून सुरू झालेल्या ऐतिहासिक आंदोलनाचा एक अनोखा पैलू हा ऐतिहासिक क्षण. संयम आणि विश्वास याचा बांध फुटल्यानंतर याच बळीराजाचा हिंसक आक्रोश तो सुद्धा प्रजासत्ताक या दिनी. निमित्त ट्रॅक्टर परेड आणि त्यातून 62 दिवस शांत पणे राहिलेल्या बळीराजाच्या मनातील खदखदनारा संताप हिंसेच्या रूपातून बाहेर आला आणि समस्त जगाने तो पहिला.

ट्रॅक्टर परेड.. प्रजासत्ताक दिनी राजधानी नवी दिल्लीत लष्कर संचलन आणि विविध राज्यांच्या चित्तवेधक रथाची परेड हे वर्षोनुवर्षेचे समीकरण. पण यंदाचा प्रजासत्ताक दिन त्याला अपवाद ठरला. नेहमीच्या परेड नंतर सर्वांचे लक्ष लागले होते ते ऐतिहासिक ट्रॅक्टर परेड चे . ज्याचा नारा दिला होता तो शेतकऱ्यांनी. पण या ट्रॅक्टर परेड ला एक मोठा ऐतिहासिक संदर्भ आहे.

जवळजवळ 70 वर्षांपूर्वी म्हणजे 1952 मध्ये 26 जानेवारी ला असाच एक ट्रॅक्टर परेड काढण्यात आली होती . त्यावेळी सुद्धा शेकडो ट्रॅक्टर या परेड मध्ये सहभागी झाले होते. सध्या राजपथावर लष्करी संचलन आणि अन्य कार्यक्रम होतात. पण त्यावेळी बिटींग द रिट्रीत ची सुरवात ही दिल्ली मधील रिगल सिनेमागृह समोरील मैदान ते लाल किल्ला अशी करण्यात आली होती. त्या परेड मध्ये सहभागी झालेल्या ट्रॅक्टर वर शांती चे प्रतीक असलेल्या कबुतरांच्या चित्रांना भव्य रुपात साकारण्यात आले होते. याचा अर्थ भारत हा शांती आणि बंधुता याना प्राधान्य देतो. प्रत्येक ट्रॅक्टर वर तिरंगा मोठ्या अभिमानाने फडकत होता. परेड मध्ये सहभागी शेतकऱ्यांना जवान प्रशिक्षण देत होते. आणि त्याच वेळी महात्मा गांधी यांच्या आवडीची ‘ अबाईड विद मी’ ही धून जवानांच्या बँड पथकाने वाजविली होती. ही परेड त्यावेळी जवान आणि किसान यांच्या ऐक्याचे एक प्रतीक म्हणून जगासमोर गेले. त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

1955 मध्ये पहिल्यांदा राजपथावर प्रजासत्ताक दिन परेड सुरू करण्यात आली. त्याआधी 1950 ते 54 दरम्यान हा सोहोळा कधी इरविंन स्टेडियम, लाल किल्ला तर कधी रामलीला मैदान येथे होत असे.

तब्बल 70 वर्षां नंतर हीच संकल्पना घेऊन हाच किसान पुन्हा ट्रॅक्टर परेड च्या माध्यमातून पुन्हा आला. पण तो पर्यंत भारताचा इंडिया झाला होता. वास्तविक ही ट्रॅक्टर परेड काढण्यासाठी 1952 च्या संकल्पना घेण्यात आली होती. त्यासाठी काही निवृत्त जवानांनी शेतकऱ्यांना परेड साठी विशेष प्रशिक्षण दिले होते. सारे काही व्यवस्थित ठरविण्यात आले होते पण त्याला हिंसेचे गालबोट लागले. बेफाम झालेल्या आंदोलकांनी शांती चे अस्त्र झुगारून हिंसेचा मार्ग स्वीकारला. हे या नवीन इंडिया चे दर्शन समजले जाते. भारतात अहिंसा चा मार्ग स्वीकारून एका ध्येयवादी व्यक्तीने म्हणजे महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य मिळविले. ती एक वेगळी क्रांती होती. पण आजची ही शेतकऱ्यांची एक क्रांती समजली जाते. त्यांनी स्वीकारलेला मार्ग योग्य की अयोग्य आणि या सर्व स्थितीला कोण जबाबदार याची कारणमीमांसा होईलच. पण भारत आणि इंडिया या दोन चौकटीत झालेले हे दोन ट्रॅक्टर परेड त्यांच्या त्यांच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा सोडून गेल्या आहेत.

अतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0