‘भारतीय गोबेल्सचा विजय’

‘भारतीय गोबेल्सचा विजय’

मतपेटीमधून नरेंद्र मोदी यांचा विजय झाला आहे. त्यांनी ३०० जागा जिंकून बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न, आधुनिक शिक्षण इत्यादी मुद्द्यांना परभूत केले आहे. त्याविषयी काही पत्रकार आणि कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

आठशे वर्षांच्या संवादाची पार्श्वभूमी
‘तुम्ही सेक्युलर नाही?’
‘भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने अशक्य’

लोकसभेच्या निवडणुकीत ३०० जागा मिळवून भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करीत आहे. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या नेतृत्त्वाखालील ‘एनडीए’ने ३५१ जागा जिकल्या आहेत. काँग्रेस आणि त्यांच्या नेतृत्त्वाखालील ‘युपीए’ला ९२ जागा मिळाल्या आहेत, तर इतर पक्षांना एकूण ९९ जागा मिळाल्या आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप आणि मित्रपक्षांचे सरकार पुन्हा एकदा येणार आहे.

या निकालामध्ये माध्यमांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ‘द वायर’ने वेळोवेळी माध्यमांच्या पक्षपाती भूमिकांवर प्रकश टाकला आहे. अनेक माध्यमांचे सत्ताधारी आघाडीशी असलेले हितसंबंध उघड केले आहेत. या निवडणुकीमध्ये आभासी प्रचारतंत्राचा मोठा वापर झाला. हाच मुद्दा पुढे नेत, हा भारतीय गोबेल्सचा विजय असल्याचे, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी म्हंटले आहे. ते म्हणाले, “बेकारी, कृषी समस्या, आर्थिक संकट, धार्मिक तेढ, खोटारडेपणा.. काहीच नव्हतं का या देशात? मी व्यथीत आहे, चिंतित आहे. आवडला नाही, तरी हा लोकशाही निर्णय मला मान्य करावा लागेल. संविधानाच्या संरक्षणाची लढाई पुढे चालू राहील. भारत सेक्युलर राहील असा प्रयत्न करणार आहे.”

२०१४ मध्ये झालेल्या निवडणुका आणि नंतरची परिस्थिती यामध्ये खूप फरक पडला आहे. भारताचे गेल्या अनेक वर्षात उभे राहिलेले एक प्रारूप, गेल्या ५ वर्षात विस्कटत गेले आहे. याचा सातत्याने अभ्यास करणारे ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक सुनील तांबे म्हणाले,

२०१४ साली लोकसभेतील आपल्या पहिल्या भाषणात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२०० वर्षांच्या गुलामगिरीचा उल्लेख केला होता. आजवरच्या लोकसभेतील एकाही भाषणात सत्ताधारी वा विरोधी पक्षाने असा उल्लेख केला नव्हता. अटलबिहारी वाजपेयी वा लालकृष्ण आडवाणी यांनीही! हा नवा भारत आहे. सिंधू आणि गंगा या दोन नद्यांच्या खोर्‍यांमध्ये मुसलमानांची सत्ता स्थिरावल्यानंतर भारताच्या गुलामीला सुरुवात झाली अशी ही मांडणी आहे. विनायक दामोदर सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी केलेल्या या मांडणीचा स्वीकार म्हणजेच नवा भारत आहे.

जुना भारत राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या आंदोलनातून निर्माण झाला होता. व्यक्तीमूल्य, सर्वसमावेशकता, सर्वधर्मसमभाव, सामाजिक समता आणि आर्थिक न्याय या मूल्यांना मानणारा होता. नवा भारत ही मूल्यं झुगारणारा आहे. महात्मा गांधींचा खुनी नथूराम गोडसे देशभक्त होता असं मानणारा आहे. प्रज्ञा सिंग यांना उमेदवारी देताना भाजपचा तर्क हाच होता. आणि मतदारांनी त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. नवा भारत हिंदू बहुसंख्यांकवादाचं प्रच्छन्न समर्थन करणारा आहे. हिंदी भाषिक राज्यांमधील हिंदुत्ववाचा स्वीकार बंगाल, आसाम, ओडीशा या राज्यांनीही केला. तमिळनाडू आणि केरळ येथील द्रविड अस्मिताही लवकरच हिंदुत्वाच्या ओळखीचा स्वीकार करेल अशी लक्षणं आहेत. नव्या भारतात व्यक्तीमूल्याच्या खांद्यावर राष्ट्रभक्ती, राष्ट्रवाद, हिंदुत्ववाद यांचं जोखड असेल.

नवा भारत नवा भारत शत्रुलक्ष्यी आहे. घोडा, गाढव, उंट, याक, म्हैस, शेळी, मेंढी यांच्यापेक्षा गाय नावाचा प्राणी वेगळा आहे, पवित्र आहे असं मानणारा आहे. गाईचं शेण, मूत यामध्ये दिव्य गुणधर्म असतात यावर नव्या भारताचा विश्वास आहे. त्यासाठी माणसांची कत्तल करणं क्षम्य आहे, अशी नव्या भारताची धारणा आहे. नव्या भारतात इंग्लडच्या रॉयल सोसायटीचे सभासद असणारे भारतीय शास्त्रज्ञ गाईच्या दिव्य गुणधर्मावर संशोधन करतात आणि चंद्र, मंगळ या ग्रहांवर मोहिमाही आखतात.

कबीरावर तुलसीदासाचा प्रभाव होता. कबीराचा प्रभाव तुकारामावर होता. बुल्लेशा, नानक देव हे सहप्रवासी होते. एका धर्माचं, पंथांचं दर्शन सहजपणे दुसर्‍या पंथातील, धर्मातील शिकवणुक आत्मसात करणारं होतं. नवा भारत ही बहुप्रवाहिता नाकारणारा आहे. नवा भारत विविधतेचा पुरस्कार करेल. हिंदुत्वाच्या हुकूमतीखाली विविध भाषा, वेशभूषा, खाद्यपदार्थ यांनी गुण्यागोविंदाने राहावं असं तो सांगतो.”

गेल्या पाच वर्षांत झुंडीने येऊन मारहाण करणे, दलितांना मारहाण करणे, विद्यापीठांची गळचेपी असे अनेक प्रकार झाले, पण निवडणुकीत हे सगळे मुद्दे बाजूला पडले. याचा संदर्भ घेऊन पर्यावरण कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी त्यांच्या फेसबुक खात्यामध्ये लिहिले, “रोहीत वेमुलाची शहादत आणि अखलाख हरले आहेत. अनुक्रमे समता आणि स्वातंत्र्य हरले आहे, उर्वरित समता आणि स्वातंत्र्याला आहे तेवढं टिकून राहण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. भांडवलशाही प्रचंड बहुमतानं जिंकत आहे. कामगारांना त्यांच्या जिवंत राहण्याच्या धडपडीसाठी शुभेच्छा. शेतकरी आत्महत्त्या हरल्या आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या अस्तित्वासाठी शुभेच्छा. सव्वाशे लाख हेक्टर वनजमीन नष्ट आधीच नष्ट करण्यात आली आहे. जंगलं, झाडं, पशू पक्षांना त्यांच्या जगण्यासाठी शुभेच्छा.वैदिक शिक्षण जिंकत असून भारतीय शिक्षण हारत आहे, भारतीय शिक्षणाला शुभेच्छा. नोटाबंदीत रगडलेल्या गोरगरिबांनीही मोदी शहानाच मत दिले असेल तर त्यांना यापुढील आर्थिक आरिष्टातून वाचण्यासाठी शुभेच्छा. साध्वी-मोदी-योगी जिंकत आहेत, धर्मनिरपेक्षतेला माझ्या शुभेच्छा.सीबीआय पासून आरबीआय पर्यंत सगळ्यांचे स्क्रू मागच्या पाच वर्षात ढिल्ले करून ठेवणारे पुन्हा जिंकत आहेत. व्यवस्थेचे डोलारे कोसळणार आहेत म्हणून व्यवस्थेला शुभेच्छा.संसद, सरकार आणि न्यायालयापेक्षाही स्वतःला मोठं समजणारांचा विजय होत असतांना लोकशाहीच्या सगळ्या स्तंभांना शुभेच्छा. सगळ्यात महत्वाचं. भारतीय राज्यघटनेला खूप खूप शुभेच्छा.”

भारतीय किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे म्हणाले, ‘जनतेचे हक्क, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक-आर्थिक न्याय आणि संविधान यांच्या रक्षणाचा संयुक्त लढा अनेकपट जास्त तीव्र व व्यापक करण्याची गरज असल्याचे, या निवडणूक निकालातून स्पष्ट झाले आहे.’

कार्यकर्त्या आणि प्राध्यापक मुग्धा कर्णिक यांच्या मते ‘आपण एका प्रदीर्घ स्थित्यंतराच्या काळात अडकलो आहोत.या स्थित्यंतराच्या शतकभराच्या काळात इस्लामिक स्टेट, तालिबान, ट्रम्प, पुतीन, मोदी यांच्या सारखी भिरभिरी उठतील जरूर. पण काळ त्यांना अखेर पाचोळ्यासारखा फेकून देईल. विज्ञानाचे वारे, विवेकाचे शब्द जगाचे सारे वातावरण निश्चित करतील असा विश्वास आपण बाळगायलाच हवा कारण ते सत्य आहे.आपल्या हृदयातली विवेकाची ज्वाळा सतत जळत ठेवण्याची भाषा आपण सर्वांनी शिकायला हवी. भीती ही अत्यंत भीतीदायक गोष्ट आहे हे एकदा स्वच्छपणे कळले की त्यावर मात करायला वेळ लागत नाही. आपल्या विचारांचे फळ चुटकीसरशी किंवा एकाददुसऱ्या निवडणुकीसरशी नाही मिळणार कदाचित्. पण तरीही हाच विचार खरा आहे. आपली देशभक्ती खरी आहेच आणि आपले मानववंशावरले प्रेम असे कुंपणांत बांधले जाणारे नाही याचे भान आपण कधीही सोडता कामा नये.’

“कन्हैयाकुमार, प्रकाश राज, राहुल गांधी हे जुनाट मागासलेल्या अविकसित भारताचे प्रतिनिधी असून योगी आदित्यनाथ, साक्षी महाराज, प्रज्ञासिंह ठाकूर हे पंतप्रधानांच्या स्वप्नातल्या नव्या आधुनिक विकसित प्रगतीशील भारताचे प्रतिनिधी आहेत. याआधीची सत्तर वर्षे फुकटच गेलेली असली तरी, योगी, साक्षी, प्रज्ञा अशांसारख्या तेजस्वी सोबत्यांच्या साथीने याखेपी देशाचा उत्तम विकास होईल, अशी आशा आहे.” अशी उपहासात्मक प्रतिक्रिया कवी आणि लेखक बालाजी सुतार यांनी दिली आहे.

नव्या सरकारचे मी अभिनंदन करते. लोकशाहीचा आदर करते. पण विवेकवादाचे आता काय होणार? धर्मनिरपेक्षतेचे आता काय होणार? ही चिंता मला सतावते आहे. एनडीएचेच सरकार येईल असे वाटत होते मात्र त्यांच्या जागा कमी होतील अशी अपेक्षा होती. जागा कमी झाल्या नाहीत मात्र वाढल्या आहेत. या निकालाचे दुःख यासाठी आहे की हे सरकार धनधांडग्यांचे आहे. श्रीमंत धार्जिणे आहे. मेट्रो, फ्लाय ओव्हर्स किंवा तत्सम गोष्टी नकोत असे नाही पण विकासाची मूळ व्याख्या काय असायला हवी याचा विचार सरकारने करणे गरजेचे असते. गरीब, दलित, मुस्लिम, शेतकरी, महिला या घटकांकडे दुर्लक्ष होते आहे. यानंतर काय होईल माहित नाही. 

एक मात्र खरं द्वेषाच्या आणि हिंसेच्या राजकारणाला राहुल गांधीने प्रेम आणि अहिंसेने उत्तर दिले आहे. राहुल गांधीने स्वतःची प्रतिमा बदललेली आहे. आलेल्या निकालाचे दुःख आहे. पुरोगामी विचारांच्या तरुणाईला ऊर्जा कशी आणि कुठून मिळणार ही चिंताही सतावते, पण काही बदल घडून यायचे असतील तर ते प्रेमाच्या, शांततेच्या आणि अहिंसेच्या मार्गानेच घडून येऊ शकतात यावर माझा विश्वास आहे.” ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी अशा शब्दात चिंता व्यक्त केली.

मी गेली अनेक वर्ष मतदान करत नाही. कारण निवडणुकीतून लोकशाही साकारता येऊ शकत नाही असे मला वाटते. २०१४ नंतर आता २०१९च्या निकालांनी माझ्या मतावर शिक्कामोर्तब झाले आहे. सामान्य माणसे द्वेषाने, अहंकाराने, अस्मितांनी पछाडलेली असतात. धर्म-देश-जात-प्रांत यांच्या भक्तीने काहीवेळा अंध होतात. हे मी फक्त भारतापुरते म्हणत नाही, जगभर हीच परिस्थिती आहे. मला कशाचेही सरसकटीकरण करायचे नाही. मारा द्वेष-अहंकार-अनैतिकता यांचाच आहे! मोठ्या संख्येने लोक मतदान करतात म्हणजे योग्य नेता निवडून देतात असा अर्थ लावणे चुकीचे आहे. 

हिटलरने जर्मनीचा विध्वंस करून आत्महत्या करेस्तोवर कुणीही सामान्य माणूस रस्त्यावर उतरला नाही. तोवर हिटलर तारणहारच वाटत होता. ज्यूंना मारले, युद्ध केले तरीही मध्यमवर्गाने जाब विचारला नाही. इतिहासात आपण हे अनेकदा बघितले आहे. या परिस्थितीची पुनरावृत्ती होत असते. निवडणुकीतून लोकशाही येऊ शकत नाही या माझ्या मतावर नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या निकालांनंतर मी अधिक ठाम झालो आहे. पण मग लोकशाही प्रस्थापित करण्याचे मार्ग काय? मला अजून उत्तर सापडलेले नाही. माझा शोध चालू आहे. पण ज्या क्षणी माणसे जात-धर्मद्वेष, राष्ट्रवाद, अस्मिता, प्रांतवाद या कारणांसाठी मतदान करत आहेत तोवर लोकशाही मूल्ये रुजणे कठीण आहे.” लोकेश शेवडे या फासीवादी विचारांच्या अभ्यासकाची अशी गंभीर प्रतिक्रिया चिंतित करणारी आहे.

जे झाले आहे त्यावरून समाजामधला वैचारिक दुभंग स्पष्ट झाला आहे. सत्य पारखण्यात वेळ घालवण्यापेक्षा तोंडात घातलेला घास गिळणे सोपे असल्याने बहुतांशी लोक स्वीकारतात. दुखरे वास्तव बघण्यापेक्षा स्वपनावस्थेत रमणे भावणारे असते. शेवटी आभासाच्या मागची माया/ असत्य दुर्योधनाने ओळखले असते तर महाभारतातील संहार घडला असता का?

लेखामध्ये प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या मान्यवरांची मते, त्यांची स्वतःची आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0