भोपाळ पीडितांसाठी ३५ वर्षे लढा देणारे अब्दुल जब्बार

भोपाळ पीडितांसाठी ३५ वर्षे लढा देणारे अब्दुल जब्बार

३५ वर्षे या कार्यकर्त्याने न्यायासाठी चळवळ उभी करण्यात खर्च केली. दुर्दैवाने भोपाळला आज त्याच्या योगदानाची आठवण राहिलेली दिसत नाही.

काश्मीर प्रश्नी मध्यस्थी : ट्रम्प यांचे विधान भारताने फेटाळले
अमिताभ बच्चन यांच्या व्हिडिओतून दिशाभूल करणारी माहिती!
विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्व नागालँडला वेगळे राज्य करण्याची मागणी

भोपाळ वायू दुर्घटनेत मृत झालेल्या आणि वाचलेल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी अब्दुल जब्बार यांनी केलेल्या अद्भुत संघर्षामधून भारताला बरेच काही शिकण्यासारखे आहे.

आत्ताच्या हिंसक काळात, सरकारांना समाज माध्यमांवरचा विरोधही सहन होत नसताना, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम करणारा हा कार्यकर्ता म्हणजे समताधिष्ठित समाजाचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वांसाठी एक दिशादर्शक तारा आहे.

लोक त्यांना प्रेमाने जब्बार भाई म्हणत. १२ नोव्हेंबर ला भोपाळमधल्या एका रुग्णालयात त्यांचे निधन झाले. पण त्यांचा वारसा शिल्लक आहे. हातपंप बसवणाऱ्या एका फिटरपासून ते एका आग्रही रणनीतीज्ञापर्यंतचा त्यांच्या ३५ वर्षांच्या दीर्घ संघर्षमय प्रवासाला स्वतंत्र भारतातील लोकचळवळींच्या इतिहासात तोड नाही.

आठ खांबांवर त्यांची रणनीती आधारलेली होती: धर्मनिरपेक्षता, महिलांचे सबलीकरण, कौशल्य विकासातून स्वयंरोजगारावर भर, लढ्यातील सहकाऱ्यांबरोबर नियमित संवाद, जनलढ्यांबद्दल माहितीचा प्रसार, जनताभिमुख वकिलांच्या मार्फत वारंवार न्यायालयीन लढे, रस्त्यावरील आंदोलने, समविचारी लोकचळवळींमधील सहभाग आणि कोणत्याही विचारधारेच्या सरकारच्या विरोधात विनातडजोड विरोधात्मक पवित्रा.

त्यांच्या संस्थेचे नाव होते भोपाल गॅस पीडित महिला उद्योग संघटन. महिलांच्या एका छोट्या गटापासून या संस्थेचे रुपांतर एका सुसंघटित लढाऊ चळवळीमध्ये झाले. हे काम अत्यंत कठीण होते, आणि जब्बार यांना स्वतःला त्याबाबत काहीच कल्पना नव्हती. मात्र ही हजारो निष्पापांचा जीव घेणारी जगातील सर्वात भयानक औद्योगिक दुर्घटनाच इतकी संतापजनक होती, की काहीही झाले तरी ही दीर्घ लढाई लढायचीच हा त्यांचा निश्चय पक्का झाला.

हे कसे झाले ही एक प्रेरणादायी कथा आहे. युनियन कार्बाईडच्या कारखान्यातून ४० टन विषारी एमआयसी वायू बाहेर पडला त्या दिवशी ती सुरू झाली. २-३ डिसेंबर १९८४ रोजी, ही प्राणघातक वायुगळती झाली त्या दिवशी अब्दुल जब्बार त्यांच्या राजेंद्र नगरमधील घरी झोपले होते.

युनियन कार्बाईडच्या कीटकनाशकांच्या कारखान्यातून बाहेर पडलेल्या विषारी वायूमुळे ८,००० लोकांचा लगेचच मृत्यू झाला, त्यानंतरच्या काही दशकांमध्ये २५,००० लोकांचा मृत्यू झाला. शिवाय १,५०,००० लोकांना श्वसनाचे, संप्रेरकांच्या असंतुलनाचे आणि मानसिक आजार झाले.

कार्बाईडच्या प्लँटमधून येणाऱ्या वायूचा तीव्र वास जब्बार यांच्या घरात घुसला तेव्हा त्यांनी त्यांच्या आईला बरोबर घेतले आणि स्कूटरवरून ४० किलोमीटर प्रवास करून त्यांनी तिला सुरक्षित ठिकाणी नेले. भोपाळ सोडून ते अब्दुल्ला गंज येथे गेले. मात्र त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. काही काळातच या वायूच्या परिणामांमुळे त्यांनी त्यांची आई, वडील आणि मोठा भाऊ यांना गमावले. त्यांची स्वतःची फुफ्फुसे आणि दृष्टीलाही मोठा अपाय झाला.

ते भोपाळला परत आले तेव्हा शहर नरक बनले होते – सर्वत्र मृत शरीरे पडलेली होती.

त्यावेळी २८ वर्षांचे असलेले जब्बार घरी परतले तेव्हा पूर्णतः बदलून गेले होते. त्यांनी त्यांचे वैयक्तिक दुःख बाजूला ठेवले आणि त्यांनी इजा झालेल्या लोकांना उपचारांकरिता सरकारी रुग्णालयात घेऊन जाण्यास सुरुवात केली. मृत शरीरे पोस्टमॉर्टेमसाठी घेऊन जाण्याच्या कामातही ते स्वयंसेवक म्हणून सहभागी झाले. मदत केली. ते जितके या कामांमध्ये अधिकाधिक सहभागी होत होते, तितका त्यांचा संताप वाढत होता.

त्यांनी नंतर आठवण सांगितली होती, “माझ्या सभोवती अन्याय दिसू लागला तेव्हा मी माझ्या वस्तीपासूनच मोहीम सुरू केली. कार्बाईडच्या भ्रष्टाचाराचा लाभ मिळणारे राजकारणी आम्हाला मदत करायला पुढे येत नव्हते. त्यामुळे आम्हा पीडितांनाच हे प्रकरण आमच्या हातात घेणे भाग होते.”

त्यानंतर सुमारे ३ वर्षांनंतर, १९८७ मध्ये त्यांनी भोपाळ गॅस पीडित महिला उद्योग संगठन या संस्थेची स्थापना केली. दुर्घटनेचा बळी ठरलेले, त्यातून वाचलेले लोक आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी सल्ला देणारा गट. त्यांनी विशेषतः दुर्घटनेत नवरे गमावलेल्या विधवा महिलांसाठी भत्ते आणि नुकसानभरपाई मिळवण्यासाठीच नव्हे तर काहीतरी नोकरीव्यवसाय मिळावा यासाठीही अनेक निदर्शनांचे नेतृत्व केले.

“खैरात नही, रोजगार चाहिये” ही त्यांची पहिली घोषणा होती. संस्था मोठी होत गेली तसा हा रणघोष बनला.

त्यांच्या संस्थेतील महिलांना सरकारने नोकऱ्या देण्याची जब्बार वाट पाहत बसले नाहीत. त्यांनी शिवण केंद्रे सुरू केली, ज्यामध्ये सुमारे २,३०० महिलांनी जरदोसी पट्ट्या आणि पिशव्या कशा बनवाव्या याचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी त्यांना वकील, डॉक्टर, नोकरशहा, पोलिस अशा सगळ्यांशी लढण्यात मदत केली. लवकरच भोपाळ येथे जवळजवळ ३०,००० पीडित जब्बार यांच्या संस्थेचे सदस्यझाले, त्यापैकी बहुतांश महिला होत्या.

१९४२ साली ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या विरोधातल्या संघर्षाची सुरुवात जिथून झाली ते यादगार-इ-शाहजहानी पार्क हे भोपाळमधील एक ऐतिहासिक ठिकाण. त्याच ठिकाणी या सदस्यांनी दर मंगळवार आणि शनिवारी जमायला सुरुवात केली.

१९८८ मध्ये जब्बार यांनी या पीडितांना त्यांची अंतिम नुकसानभरपाई मिळेपर्यंत अंतरिम भरपाई दिली जावी यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली. पुढच्या वर्षी केंद्रसरकारने युनियन कार्बाईडबरोबर केलेल्या वाटाघाटींमध्ये ४७० दशलक्ष डॉलर किंवा ७,२०० कोटी रुपये इतक्या रकमेची नुकसानभरपाई निर्धारित केली गेली. सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केले. इतक्या कमी भरपाईमुळे वायूगळतीच्या पीडितांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली. त्यांना आपली फसवणूक झाल्यासारखे वाटले. जब्बार यांच्या संस्थेने एक दशक न्यायिक आणि रस्त्यावरची लढाई लढल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आणखी १,५०३ कोटी रुपये दिले जावेत असा सरकारला आदेश दिला.५,७०,००० पेक्षा जास्त लोकांना नुकसानभरपाई देणे गरजेचे आहे असेही न्यायालयाने कबूल केले. आधी केवळ १ लाख लोकांनाच भरपाई मिळणार होती.

सर्वोच्च न्यायालयातील त्यांच्या या पहिल्या विजयाची सर्व कागदपत्रे आहेत. वायू गळतीच्या पीडितांना ज्यामुळे नुकसानभरपाई मिळाली, घरे मिळाली, उपचार मिळाले तसेच गुन्हेगारांवर गुन्हे दाखल झाले त्या सर्व न्यायालयीन प्रक्रियांवर तसेच जन आंदोलनांवर जब्बार यांचे नाव ठळकपणे कोरलेले आहे. तीन दशकांहून जास्त काळ ते आंदोलने करत राहिले, न्यायालयात याचिका दाखल करत राहिले, पीडितांसाठी आणखी वैद्यकीय पुनर्वसनाची, आणि स्थानिक युनियन कार्बाईड अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत राहिले.

मागच्या तीन महिन्यांमध्ये, प्रचंड मधुमेह असलेल्या जब्बार यांना हृदयाचे विविध आजार झाले, आणि ते एका रुग्णालयातून दुसरीकडे फिरत राहिले.

मृत्यूच्या आधी काही दिवस त्यांनी एक व्हॉट्सॅप संदेश पाठवला होता. भोपाळ मेमोरियल हॉस्पिटल (BMHRC) सारखे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्येही पुरेशा सुविधा नसल्याने ते आपल्याला बरे करू शकत नाहीत असे त्यांनी खेदाने नमूद केले होते. हे लाजिरवाणे आहे, असे त्यांनी म्हटले होते. त्यांची स्थिती आणखी वाईट झाली आणि त्यांना गँगरिन झाले तेव्हा मध्यप्रदेश सरकारने त्यांना विमानाने मुंबईच्या एशियन हार्ट इन्स्टिट्यूट मध्ये उपचारांसाठी हलवण्याची तयारी केली. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.

ते बरेचदा हे आवर्जून सांगत, की न्यायासाठीची लढाई केवळ भोपाळसाठी नव्हे तर संपूर्ण भारतासाठी महत्त्वाची आहे.

ते ज्या तऱ्हेने त्यांच्या संस्थेतील स्त्रियांना विविध विषयांवर शिक्षित करत, त्यावरून त्यांचा व्यापक दृष्टिकोन दिसून येतो. या विषयांमध्ये मध्यपूर्वेतील संघर्ष, आदिवासी आणि दलित हक्कांच्या चळवळी, जसे की नर्मदा बचाव आंदोलन, वगैरेंचा समावेश असे.

जब्बार यांचे आदर्श मात्र केवळ संस्थेपुरते मर्यादित नव्हते.

मागच्या काही वर्षांमधील भगव्या लाटेच्या दरम्यान आमचे संभाषण वायूगळतीच्या पीडितांच्या समस्येपेक्षाही भारतीय समाजाच्या उसवत चाललेल्या विणीबद्दल जास्त असत. भोपाळमधील लोकांचे धार्मिक पायावर ध्रुवीकरण झाल्याने त्यांच्या संघर्षातील धार कमी होत चालल्याचे ते मान्य करत.

त्यांच्या नुकसानभरपाईसाठीच्या आंदोलनांचा ज्यांना लाभ घेतला ते नागरिक आणि रुग्णालयेसुद्धा बाकी वंचितांच्या समस्यांच्या प्रति किती असंवेदनशील झाले आहेत याचे त्यांना अतीव दुःख वाटे.

“पीडितांना पैसे मिळाल्यामुळे न्यायासाठीची लढाई आता संपली आहे अशी या लोकांनी स्वतःची समजूत काढल्यासारखे वाटते. भोपाळच्या अनेक हिंदूंना असे वाटते, की माझ्या लढाईचा लाभ जास्त प्रमाणात मुस्लिमांनाच झाला आहे, तर मग त्यांनी त्याची चिंता का करावी?” बदलत्या काळाप्रमाणे बदलण्यास इच्छुक नसलेल्या मुस्लिम समुदावरही ते तितक्याच कटू शब्दात टीका करत.

जब्बार यांना प्रसारमाध्यमांविषयीही अनेक तक्रारी होत्या. वायूगळतीच्या पीडितांना, विशेषतः गरीबांकडे व्यवस्था दुर्लक्ष करते याचा दोष ते जनतेच्या आणि प्रसारमाध्यमांच्या उदासीनतेला देत.

त्यांचा राग बिनबुडाचा नव्हता. मध्यप्रदेशमधील भारतीय जनता पक्षाच्या १५ वर्षांच्या राजवटीत, वायूपीडितांना फारसे काहीच मिळाले नाही. एकदा तर वायूगळती बचाव व पुनर्वसन विभाग पूर्णतः बंद करण्याचे घाटत होते. वायू पीडितांसाठी चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयांमध्ये पुरेसे कर्मचारी किंवा उपकरणे नसतात.

दुर्दैवाची गोष्ट अशी, की जब्बार भाईंच्या स्वतःच्या आजारपणाच्या वेळी, आणि त्यातून ओढवलेल्या मृत्यूच्या पश्चात त्यांचा प्रसारमाध्यमे, व्यवस्था आणि एकंदर समाजाबद्दलचा हा रोष योग्यच होता हे दिसून आले. त्यांच्याच सर्वोच्च न्यायालयातील याचिकेमुळे उभ्या राहिलेल्या रुग्णालयात त्यांनाच थारा मिळाला नाही. दोन महिने उपचारांनंतर कफल्लक झाल्यानंतर त्यांना आजवर कधी न केलेली गोष्ट करावी लागली ती म्हणजे सरकारकडे मदत मागणे. सरकारी मदतीचे वचनही मिळाले, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

आपले पूर्ण आयुष्य पाच लाख वायूपीडितांचे सन्मानाने पुनर्वसन व्हावे यासाठी वाहिलेल्या या कार्यकर्त्याचा अखेरचा प्रवास भोपाळच्या कृतघ्नतेची दुःखद आठवण करून देणारा होता.

त्यांच्या अंत्यविधीला काहीशे लोक हजर होते. त्यांचे पत्रकार आणि कार्यकर्ते मित्र आणि काही राजकारणी वगळता दफनभूमी म्हणजे मुस्लिमांचा मेळावा वाटत होती. त्याही पेक्षा वाईट गोष्ट म्हणजे, त्यांच्या खांद्याला खांदा लावून इतकी वर्षे लढलेल्या त्यांच्या महिला साथीदारांना अंत्यविधींपासून दूर राहण्यास सांगण्यात आले होते. या शोकाकुल लढवय्या महिला अब्दुल जब्बार यांच्या जुन्यापुराण्या दोन खोल्यांच्या घरात जमल्या आणि तिथेच थांबल्या.

त्यांच्या घरात त्या दिवशी जे काही झाले त्याने या जात्या आत्म्याला नक्कीच बरे वाटले नसते.

अविभाजित मध्यप्रदेशने तीन संस्मरणीय जनचळवळी पाहिल्या – शंकर गुहा नियोगी यांचा छत्तीसगड मुक्ती मोर्चा, मेधा पाटकरांचे नर्मदा बचाओ आंदोलन आणि तिसरी अब्दुल जब्बार यांच्या नेतृत्वाखालील.

जब्बार यांच्या चळवळीचे वेगळेपण असे, की भोपाळच्या या लढवय्याने एका प्रचंड मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीबरोबर शिंगे भिडवली होती.

जब्बार यांना असंख्य गुंतागुंतीच्या सामाजिक-आर्थिक आणि राजकीय अडथळ्यांचाही सामना करावा लागला. जब्बार यांच्या लढ्यात शहरातील हिंदू आणि मुस्लिमांमधील जटिल नातेसंबंधांच्या समस्येलाही हात घालावा लागत होता. तसेच त्यांच्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात मध्यम वर्ग होता, ज्याने जब्बार यांच्या परिश्रमाचे फळ तर चाखले पण नंतर जेव्हा गरिबांच्या उपचारांसाठी त्यांना मदतीची गरज होती तेव्हा शांतपणे त्यांच्याकडे पाठ फिरवली.

राकेश दीक्षित हे भोपाळ स्थित पत्रकार आहेत.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: