भुरा: ज्ञानलालसेचं एक संपृक्त द्रावण

भुरा: ज्ञानलालसेचं एक संपृक्त द्रावण

लेखक शरद बाविस्कर म्हणजेच भुरा हा त्याच्या आईने लहानपणापासून सांगितलेलं श्रमाचे महत्त्व आणि आईच्या जगण्यातून निर्माण झालेलं तिचं स्वतःचं असं तत्त्वज्ञान ते म्हणजे “झिजीन मराणं पण थिजीन नाही मराणं”, हे अहिराणी भाषेत आहे. याचा अर्थ ‘झिजून मरा पण थिजुन मरू नका’, हे भुराच्या म्हणजेच लेखक शरद बाविस्करच्या आयुष्याच्या शैक्षणिक प्रवासाच्या आणि देदीप्यमान यशाच्या वाटचालीतील अत्यंत प्रेरणादायी असं वाक्य आहे.

तिस्ता सेटलवाड, श्रीकुमार यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
महिन्याला १०० कोटी द्या, देशमुखांची मागणी – परमवीर सिंग
‘रामभक्त’ गोपाल कट्‌टर उजव्या विचारसरणीशी संबंधित

शरद बाविस्कर यांनी लिहिलेलं ‘भुरा’ हे आत्मकथन लोकवाङमय प्रकाशन संस्थेतर्फे नुकतेच प्रकाशित झालं. प्रत्येकाचा वाचनानुभव वेगळा असतो. मी माझ्या ‘भुरा’च्या माझ्या वाचनापुरतीच मांडणी करतो आहे.

धुळे जिल्ह्यातल्या रावेर या गावातील शालान्त परीक्षेतील इंग्रजी विषयात अनुत्तीर्ण झालेला हा भुरा थेट जे.एन.यु. (जवाहरलाल नेहरू विद्यापीठ) मध्ये प्रोफेसर होतो.  त्याची ही आत्मकथा आहे. खरं तर ही गोष्ट आहे असं म्हणावं लागेल. कारण स्वतः लेखक ही आत्मकथा आहे असं म्हणायला तयार नाही. ज्येष्ठ कादंबरीकार रंगनाथ पठारे यांनी याला आत्मकथन न म्हणता आत्मशोध असे म्हटलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे पुस्तक वाचताना मग ते तुम्ही आत्मकथा म्हणून वाचा की गोष्ट म्हणून वाचा, यात कादंबरीसारख्या वाङमयप्रकाराची काही बीजं आपल्याला आढळून येतात. पण आपण याला समजून घेण्यासाठी आत्मकथा असंच म्हणू या.

लेखक शरद बाविस्कर म्हणजेच भुरा हा त्याच्या आईने लहानपणापासून सांगितलेलं श्रमाचे महत्त्व आणि आईच्या जगण्यातून निर्माण झालेलं तिचं स्वतःचं असं तत्त्वज्ञान ते म्हणजे “झिजीन मराणं पण थिजीन नाही मराणं”, हे अहिराणी भाषेत आहे. याचा अर्थ ‘झिजून मरा पण थिजुन मरू नका’, हे भुराच्या म्हणजेच लेखक शरद बाविस्करच्या आयुष्याच्या शैक्षणिक प्रवासाच्या आणि देदीप्यमान यशाच्या वाटचालीतील अत्यंत प्रेरणादायी असं वाक्य आहे. तो म्हणतो, की वेळोवेळी आलेल्या डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी मला या वाक्याची एखाद्या औषधासारखी मदत होत असे. दहावीतील अपयशानंतर अपमान, अवहेलना, निराशा या गोष्टी पचवून आईने म्हटल्याप्रमाणे इंग्रजीला घेरून त्याने शालांत परीक्षेत यश मिळवलं आणि नंतर सोबतीला असलेल्या वेदनादायक दारिद्र्यावर मात करत कसलीही माघार न घेता ज्ञानाच्या अखंड प्रक्रियेत स्वतःला गुंतवून घेऊन युरोपातल्या पाच पदव्युत्तर पदव्या घेतलेल्या माणसाची ही अभूतपूर्व अशी आत्मकथा आहे.

ज्ञानलालसा जागती ठेवून शिक्षण घेत असताना आणि त्यानंतरही मनात निर्माण झालेल्या प्रश्नांना, संवेदनांना, जाणिवांना ज्ञानात्मक पातळीवर तपासून घेणे तसेच दैनंदिन जीवन जगताना आलेल्या अनुभवांचा तत्त्वज्ञानात्मक पातळीवर विचार करून अर्थ निर्णयन करणे हा या लेखकाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तो म्हणतो ‘तत्त्वज्ञान म्हणजे आपले मूलभूत प्रश्न कोणते हे ठरवण्यासाठी लागणारे अत्यावश्यक चिंतन आहे.’

कोणत्याही प्रकारचे जीवन जगत असताना काही मूलभूत मूल्यांची जाणीव प्रत्येकातच असते, पण त्या मूल्यांसाठी स्वाध्याय किंवा माउंट अबूसारख्या धार्मिक कर्मकांडाची गरज पडत असेल तर स्वतःला मनुष्य म्हणवून घेण्यात काय अर्थ आहे. ही त्याची म्हणजे लेखकाची विद्यार्थी दशेतील जाणीव आहे. म्हणजे समाज व्यवस्थेकडे पाहण्याची ही सूक्ष्म दृष्टी लहानपणापासूनच त्याच्यात आहे. हे प्रतिभा असल्याशिवाय शक्य नाही.

ग्रामीण भागातील मुलांमध्ये आधीच बौद्धिक न्यूनगंड असतो. त्यात धार्मिक बुवाबाजीमुळे सांस्कृतिक न्यूनगंडात भर पडते, यातून कोणतेही प्रश्न सुटत नाहीत. उलट बौद्धिकतेची फारकत होऊन भावनात्मकतेला महत्त्व प्राप्त होते. आणि जगण्यातील अस्सल सांस्कृतिक जाणिवा धूसर होतात असे त्याला वाटत असते. आपल्यावरील सामाजिक,सांस्कृतिक किंवा शोषणातून झालेल्या आर्थिक अन्यायाची भावना आणि त्याविषयीचे आकलन यातील अंतर शिक्षणानं कापावं लागतं आणि हे करत असताना मानसिक गुलामगिरी नाकारावी लागते, याचे भान या लेखकाला आहे. त्यातून आलेल्या अंतर्मुखतेमुळे त्याच्यात एक प्रकारची स्वातंत्र्याची आस निर्माण होते आणि त्याला दुसऱ्या जगाची चाहूल लागते.

लेखकाला असं वाटतं, की स्वतःला समजून घेण्यासाठी स्वतःपासून दूर आणि स्वतःच्या बाहेर जाणं आवश्यक असतं. हे तत्त्वज्ञानातील मूलभूत तत्त्व तो नकळतपणे अमलात आणतो आणि अनोळखी ठिकाणी जाणं गरजेचं वाटलं असं तो म्हणतो.

पुढे धुळ्यातील जयहिंद कॉलेजमधील पदवीपर्यंतचे शिक्षण संपवून तो लखनौला जातो आणि त्याच्यात अंतर्बाह्य बदल घडून येतो. तिथे गेल्यानंतर स्वतःच्या जिद्दीवर तो स्वतः फ्रेंच भाषा शिकतो आणि त्याचा फ्रेंच तत्वज्ञानाची संबंध येतो. तो फ्रेंच साहित्य-संस्कृतीची जोडला जातो आणि त्याचं वैचारिक जग बदलतं. आधीपासूनच त्याच्या मनात स्वतःच्या जगण्याविषयी आणि शिक्षणाविषयी एक द्वंद्व चालू असतं. ते म्हणजे पारंपरिक पद्धतीने शिक्षणाचा वापर करून समाज नावाच्या विशाल यंत्रात एक चिमुकला स्पेअर पार्ट म्हणून स्वतःची जडणघडण करावी, की संपूर्ण यंत्राचं आकलन तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून करून स्वतःची ओळख करून घ्यावी? अर्थातच दुसरा पर्याय भुराने म्हणजेच शरद बाविस्कर यांनी निवडल्याचे स्पष्ट होत. फ्रेंच भाषा अवगत झाल्यानंतर फ्रेंच साहित्य, संस्कृती आणि तत्त्वज्ञान यातलं जे जे त्याला विधायक वाटलं ते ते त्यांनी आत्मसात केलं आणि त्या दृष्टीने तो आपल्या दैनंदिन आयुष्याचा विचार करू लागतो भारतासारख्या देशात तत्त्वज्ञान म्हणजे अव्यवहारी विषय आहे अशी समजूत आहे. परंतु तत्वज्ञान मानवी आयुष्यात स्थळ-काळा पलीकडे जाऊन माणसाच्या मनुष्यत्वाचा शोध घेणारं असतं, असं तो ठामपणे म्हणतो आणि जगण्यातल्या प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी तत्वज्ञान असतं याचा तो खोलवर विचार करायला लागतो. माणसाने सतत बौद्धिकतेला आवाहन करून विचारपूर्वक, कृतिशील जगलं पाहिजे आणि त्यातून स्वतःला बदलवत राहिले पाहिजे. तरच भाषिक, सांस्कृतिक, शैक्षणिक भांडवल नसणाऱ्या वर्गासाठी ताठ उभी असलेली व्यवस्था आपण बदलू शकतो, यावर त्याचा विश्वास आहे. याचा अर्थ असा की जे नाहिरे वर्गातले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे. जीवनात यश मिळवणं आणि यशस्वी जीवन जगणं यात सूक्ष्म फरक असला तरी तत्वज्ञानात हा फरक महत्त्वाचा आहे हे ओळखले पाहिजे. यासाठी त्यांनी युलिसिसचे उदाहरण दिले आहे. जीवन जगण्यातला सूक्ष्म फरकही या लेखकाने ओळखला आहे. म्हणूनच दैनंदिन यांत्रिक सवयी बाजूला सारून अर्थपूर्ण वैचारिक जीवन जगण्याचा अट्टाहास भुराचा म्हणजेच शरद बाविस्कर यांचा आहे.

दैनंदिन दुःखाच्या डोंगरातून जाताना लेखकाच्या हे लक्षात आलं आहे, की जीवनात फार कमी गोष्टी महत्त्वाच्या आणि बहुसंख्य गोष्टी अर्थहीन असतात. तरीही व्यवस्था अशाच गोष्टींविषयी स्पर्धा आयोजित करते की ज्याचा खऱ्या जीवनाशी दुरान्वयानेही संबंध नसतो. व्यवस्थेचं परखड विश्लेषण जागोजागी या पुस्तकातून प्रत्ययास येतं.

शिक्षण घेत असताना त्याला इरास्मस शिष्यवृत्ती मिळते आणि तो युरोपला जातो. तिथेही तो सतत ज्ञानाच्या शोधात आहे. तत्त्वज्ञान हा विषय त्याच्या रक्तातच भिनलेला आहे. तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून आठ वेगवेगळ्या भाषांच्या शब्दाशी संपर्कात राहणारा हा लेखक म्हणतोय, ‘मनुष्यप्राण्यात किती मनुष्यत्व आहे याचा अंदाज लावण्याचा एक निकष म्हणजे मनुष्याचे शब्दाशी असणारं नातं.’ आता हे शब्द किंवा हे शिक्षण ज्या शिक्षणसंस्थांमधून दिलं जातं त्यातल्या दोन ठळक विकृतींचाही तो उल्लेख करतो. एक म्हणजे इंग्रजीतूनच सर्व शिक्षण शक्य आहे. आणि दुसरं म्हणजे संस्कृतमध्येच सर्व ज्ञान आहे.या विकृती समाजाचं कसं नुकसान करतात हे आपणा सर्वांना विदीतच आहे. लेखक म्हणतो, “शिक्षणाचे लोकशाहीकरण झालं पाहिजे आणि ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा लोकभाषांचा वापर सर्व स्तरांवर आणि सगळ्या ज्ञान शाखांसाठी केला जाईल. कोणत्याही शैक्षणिक संस्थेची प्राथमिक जबाबदारी सामाजिक बदलासोबत ज्ञानाची निर्मिती आणि प्रसार असली पाहिजे.” भारतीय शिक्षण व्यवस्था कोणत्या ज्ञानाची निर्मिती करते आहे आणि आपली ज्ञानकेंद्रं असलेल्या विद्यापीठाबद्दल सरकारचे काय मत आहे हेही अनुषंगाने यात आलेलं आहे. वस्तुनिष्ठ आणि सखोल ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय माणसांमध्ये पोलिटिकल करेक्टनेस येऊ शकत नाही. आणि खऱ्या अर्थाने आपण आत्मनिर्भर होऊ शकत नाही याबद्दल एके ठिकाणी लेखक म्हणतो अलीकडे काही नवप्रस्थापित मंडळी जेव्हा समाजात मोटिव्हेशनल गुरु म्हणून यशापयशाविषयी भाष्य करतात, तेव्हा व्यवस्थेची जबाबदारी वगळून सोईस्कर रीतीने व्यक्तिनिष्ठ घटकांवर पूर्ण जबाबदारी टाकून आत्मनिर्भरतेचे उपदेश देताना दिसतात. केवळ व्यक्तिनिष्ठ घटकावर जबाबदारी टाकून लोकांना आत्मनिर्भरतेचे उपदेश देणे म्हणजे व्यवस्थेपासून दूर स्थित असणाऱ्या लोकांची क्रूर थट्टा करण्यासारखा हा प्रकार आहे. आज आत्मनिर्भरतेच्या नावाखाली सबंध देशभरात काय चाललंय हे आपल्याला माहीत आहे. या आत्मकथेत कुटुंबाबद्दलच्या बऱ्याच कडवट आठवणी जागोजागी येतात. हालअपेष्टांची दु:स्वप्नही आपल्याला वाचायला मिळतात. लेखकाची आई म्हणजे कुटुंब व्यवस्थेने चिरडून टाकलेलं व्यक्तिमत्व आहे, पण विचारानं ती लवचिक आहे. रामदासी बैठकांना उपस्थित राहणारी आई, लेखकानं जेव्हा आ. ह. साळुंखे यांचं “विद्रोही तुकाराम” हे पुस्तक आणून वाचायला दिल्यानंतर ती ते वाचते आणि आपली भूमिका बदलते, तसंच वडिलांच्या बद्दल. बाहेरचं विस्तृत व्यवहारिक ज्ञान असलेला हा माणूस म्हणजे सूर्य पाहिलेला माणूस आहे असं त्याला वाटतं. गरिबीमुळे आणि ग्रामीण मानसिकतेमुळे झालेला बहिणीचा छळ, भावाचं बदलत जाणारं वर्तन, पत्नी सुरभी आणि तीचं कुटुंब इत्यादींच्या आठवणींचा कोलाज या पुस्तकात आहेच.

इतरांशी संवाद साधण्याबरोबरच स्वतःशी संवादी असणं लेखकाला खूप महत्त्वाचं वाटतं. जगभरच्या तत्वज्ञानाचा अभ्यास असूनही त्याला महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जवळचे वाटतात याचे कारण अस असावं, की आपल्या भारतीय समाजव्यवस्थेत ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीशी दोन हात करायचं तर इथलीच वैचारिक शस्त्रं वापरणं अतिशय महत्वाचे असतं. इथे लेखकाने देशीवादाबद्दल ही स्वतःचे विचार मांडले आहेत. यापूर्वी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लेखक नेमाडे यांनीही देशीवादाबद्दल आपले विचार मांडले आहेत हे ही आपल्याला माहित आहे. देशीवादाबद्दल शरद बाविस्कर म्हणतात, “देशीवाद हा आत्ममग्नतेसाठी वापरण्यात येणारा शब्द नसून त्यात वैश्विकतेचे अंकुर आणि शक्यता दडलेल्या असल्या पाहिजेत. जर देशीवादाचे तोंड वैश्विकतेकडे वळून त्या अनोळखी आणि अनंत अवकाशाला कवेत घेऊन आलिंगनासाठी सतत तत्पर नसेल तर असा देशीवाद म्हणजे अश्वत्थाम्याची जखम होऊन बसतो.”

महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म सांगितला आहेच. पण शरद बाविस्कर हेही स्वतःच्या धर्माविषयी म्हणतात माझा धर्म म्हणजे माझा नैतिक दृष्टिकोन. तो मला जबाबदार बनवतो. तो सम्यक स्वातंत्र्याचा पुरस्कार करतो आणि मला निर्भीडपणे जगायला शिकवून नैतिक बळ देत असतो. भारतात आल्यानंतर ‘जे.एन.यु.’मध्ये स्थिरावल्यानंतर जे.एन.यु.मधील घडामोडी, सरकारी धोरण, विद्यार्थी संघटना त्यांच्या निवडणुका, प्राध्यापक वर्ग, केंद्रातील राजकारण या सर्व गोष्टींची वस्तुनिष्ठ चर्चा या पुस्तकात आलेली आहे. एकुणात काय तर ग्रामीण भागातील तकलादू शिक्षण, ग्रामीण मानसिकता, सतत एकच बाजू मांडणारी पुस्तकं, विषम समाजव्यवस्था, नातेसंबंधातील निरर्थकता, शिक्षण संस्थेतील गुलामी मानसिकता, स्वतःची आत्मपरीक्षण केल्यानंतर त्या नोंदी इत्यादी इत्यादी गोष्टी यात आहेत. संघाबद्दल ते असं म्हणतात की दोन वर्ष माझ्यावर संघाचा प्रभाव होता तेव्हा त्या वयात बऱ्याच गोष्टी अस्पष्ट होत्या, “पण एक भावना सुस्पष्ट होती ती म्हणजे देशाविषयी प्रेम आणि देशद्रोहींविषयी तिरस्कार. या मंडळींनी देशप्रेमी कोण आणि देशद्रोही कोण यांची मांडणी त्यांच्या सोयीप्रमाणे करून ठेवली होती. दुसरं असं की आपण हाताला जी पुस्तकं लागतात ती वाचत नसून हाताला जी पुस्तकं लागू दिली जातात तीच वाचत असतो असा. उदाहरणार्थ, ५५ कोटींचे बळी, सहा सुवर्णपानं, मी आणि गांधी हत्या, गीतारहस्य वगैरे वगैरे. समर्थ वाग्देवता मंदिर ग्रंथालयात चुकूनसुद्धा बाबासाहेब आणि महात्मा फुले यांची पुस्तके माझ्या नजरेस पडली नव्हती.”

भारतात शिक्षण घेत असताना महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर के बी पाटील, अहिरे मॅडम, प्राध्यापक दिलीप चव्हाण उर्फ डी सी यांच्या आठवणी, त्यांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त झालेली आहे. लखनऊ, दिल्ली आणि जगभरातील मैत्रीचे नाते यासंबंधीच्याही आठवणी आहेत.

शेवटी आत्मकथनाच्या मर्यादा काय आहेत हेही लेखकाने सांगितलेलं आहे. धर्मानंद कोसंबी यांचे ‘निवेदन’ आणि हिंदीतलं डॉ.तुलसीराम यांचं ‘मुर्दहिया’ अशा श्रेष्ठ आत्मचरित्राच्या पंगतीतलं हे आत्मकथन आहे. इथे एक गोष्ट मला आठवते आहे हिंदीतील श्रेष्ठ कवी श्रीकांत वर्मा जे आज आपल्यात नाहीत, त्यांनी १९६३ साली ‘आॅक्टावियो पाॅज’ या कवीची मुलाखत घेतली होती. एका प्रश्नाला उत्तर देताना पाॅज म्हणाले होते, “मुझे लगा की भारत मे साधारण जनता की तो बात ही छोड दे, बुद्धीजीवी कहलानेवाले वर्ग के बीच भी बौद्धिक वातावरण का अभाव है. ” दुसरे उदाहरण म्हणजे मराठीतील ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांनी आपल्या ‘वाङमयीन संस्कृती’ या पुस्तकात असे म्हटले आहे, की “ज्ञान क्षेत्रातील वाचन संस्कृती आपल्या देशात जवळपास अस्तित्वातच नाही असे जर म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. ” ही दोन्ही गोष्टींना सडेतोड उत्तर देणारं आणि त्याची पूर्तता करणाऱ्या तसेच जीवनाकडे तत्त्वज्ञानात्मक दृष्टीने पहात मूलभूत चिंतन करायला भाग पाडणारं हे आत्मकथन आहे.

राजा होळकुंदे, यांनी ३२ वर्ष महाविद्यालयीन स्तरावर मराठी भाषेचे अध्यापन केले असून, ते समीक्षक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0