रशियाशी चर्चा करण्यास बायडेन यांची ‘तत्त्वत:’ मान्यता

रशियाशी चर्चा करण्यास बायडेन यांची ‘तत्त्वत:’ मान्यता

वॉशिंग्टन, किव्ह आणि मॉस्को: रशिया युक्रेनवर आक्रमण करणार नसेल, तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याशी चर्चा करण्याची तयारी अमेरिकेचे अध्यक्ष जो

कांदा निर्यातीवर केंद्र सरकारकडून बंदी
पंतप्रधान तुरुंगाच्या वाटेवर…
कोरोना लस ९० टक्क्याहून प्रभावीः फायझरचा दावा

वॉशिंग्टन, किव्ह आणि मॉस्को: रशिया युक्रेनवर आक्रमण करणार नसेल, तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याशी चर्चा करण्याची तयारी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी, फ्रान्सच्या मध्यस्थीनंतर, दाखवली आहे. व्हाइट हाउसतर्फे रविवारी रात्री उशिरा ही माहिती देण्यात आली.

व्हाइट हाउसतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट अँटनी ब्लिंकेन आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जी लावरोव, २४ फेब्रुवारी रोजी भेटतील.

अर्थात पुतीन लवकरच युक्रेनवर आक्रमणाचे आदेश देतील, अशी दाट शक्यता असल्याने ही भेट प्रत्यक्षात होईल की नाही याबद्दल खात्री नाही, असेच संकेत व्हाइट हाउसच्या प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी दिले. त्याचप्रमाणे भेटीची वेळ, स्वरूप किंवा ठिकाण यापैकी काहीच स्पष्ट करण्यात आलेले नाही.

“आम्ही राजनैतिक चर्चेसाठी तयार आहोत. त्याऐवजी रशियाने युद्धाचा मार्ग निवडला, तर त्यांच्यावर सौम्य ते तीव्र निर्बंध लादण्यासही आम्ही तयार आहोत. सध्या तरी रशिया युक्रेनवर हल्ला करण्यासाठी तयारी करत आहे असे चित्र आहे,” असे साकी यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

फ्रान्सचे अध्यक्ष एमॅन्युएल मॅक्राँ यांनी रविवारी बायडन आणि पुतीन यांच्याशी लागोपाठ फोनद्वारे चर्चा करून, भेटीचा प्रस्ताव, दोघांपुढे ठेवल्याचे समजते. मात्र, पुतीन व बायडन बैठकीची कोणतीही ठोस योजना अद्याप तयार झालेली नाही, असे पुतीन यांच्या अधिकृत प्रेस सेक्रेटरींनी कळवले आहे.

“मंत्र्यांच्या स्तरावरील चर्चा सुरू ठेवणे आवश्यक आहे याबद्दल सहमती झाली आहे. मात्र, दोन्ही राष्ट्रांच्या अध्यक्षांमध्ये शिखर परिषद घेतली जाईल याबद्दल आत्ताच काही सांगणे कठीण आहे,” असे क्रेमलिन प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी स्पष्ट केले. अर्थात, शिखर परिषदेची शक्यता आम्ही फेटाळून लावत नाही. आवश्यकता भासल्यास, रशिया व अमेरिकेचे अध्यक्ष चर्चा करू शकतात. ही चर्चा फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून होईल, असेही त्यांनी नमूद केले.

युक्रेन प्रकरणात फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्राँ यांनी राजनैतिक वाटाघाटींची जबाबदारी स्वत:कडे घेतली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला त्यांनी मॉस्को येथे पुतीन यांची भेट घेतली होती. त्यानंतर रविवारी त्यांनी दिवसभरात दोनदा पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. संघर्ष टाळण्याचा प्रत्येक मार्ग चोखाळून बघणे हा त्यांच्या मध्यस्थीमागील उद्देश आहे, असे फ्रान्समधील अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.

अमेरिका व रशिया यांच्यातील शिखर परिषदेनंतर, युरोपमधील धोरणात्मक स्थैर्य व सुरक्षिततेबद्दल चर्चा करण्यासाठी सर्व संबंधितांचे संमेलन होईल, असे फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. या चर्चांचा आशय निश्चित करण्यासाठी मॅक्राँ सर्व संबंधितांसोबत चर्चा करणार आहेत, असेही यात नमूद करण्यात आले आहेत. मात्र, हे संबंधित म्हणजे नेमके कोण हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

अमेरिकेचे अध्यक्ष बायडन पुतीन यांच्यासोबत चर्चा करण्यास तयार आहेत असे अमेरिकी अधिकारी सातत्याने सांगत आहेत. मात्र, रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यास रशियावर आर्थिक निर्बंध लादण्याची तयारीही त्यांनी सुरू केली आहे. गेल्या जूनमध्ये जिनिव्हात झालेल्या एका शिखर परिषदेदरम्यान बायडन पुतीन यांना प्रत्यक्ष भेटले होते. गेल्या शनिवारी या दोघांची फोनवरून चर्चा झाली होती.

पुतीन यांची योजना नेमकी काय आहे हे ओळखणे कठीण आहे, असे अमेरिकी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांनी युक्रेनच्या सीमेवर सैन्याची जमवाजमव केली आहे. मात्र, पुतीन यांनी आपल्या योजना अगदी वरिष्ठ सल्लागारांमध्येही उघड केलेल्या नाहीत, असे म्हटले जात आहे.

२४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मंत्रीस्तरीय बैठकीत शिखर परिषदेच्या तपशिलांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

युक्रेनच्या ईशान्य सीमेवर रशियाचे सैन्य क्रियाशील झाल्याचे उपग्रह छायाचित्रांतून दिसत आहे. युद्धबंदीचे रविवारच्या दिवसभरात अनेकदा उल्लंघन झाल्याचेही यातून पुढे आले आहे.

बायडन यांनी रविवारी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सर्वोच्च सल्लागारांची बैठक घेतली. युक्रेनवर हल्ला करण्याचे आदेश रशियाच्या सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहेत, असे अमेरिकेच्या गुप्तचर खात्यातील सूत्रांनी सांगितले आहे. मात्र, ‘युक्रेनवर हल्ल्याची कोणतीही योजना नाही’ असे रशियाच्या अमेरिकेतील राजदूतांचे म्हणणे आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0