बिहारमध्ये एनडीए फुटली; नितीशविरोधात पासवान

बिहारमध्ये एनडीए फुटली; नितीशविरोधात पासवान

बिहारच्या राजकारणात रविवारी राम विलास पासवान व चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीने खुलेआम नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त)ला (जेडीयू) आव्हा

माझी अखेरची निवडणूकः नितीश कुमार
जीएसटी कमी करण्यास बिहार, केरळ, पंजाब, प. बंगालचा नकार
बिहार: शिक्षणमंत्र्याचा ३ दिवसात राजीनामा

बिहारच्या राजकारणात रविवारी राम विलास पासवान व चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीने खुलेआम नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त)ला (जेडीयू) आव्हान दिले. आगामी विधानसभा निवडणुकांत त्यांनी जेडीयू व भाजपशी आपली मैत्री तोडली पण भाजपच्या विरोधात आम्ही एकही उमेदवार उभे करणार नाही, असे सांगत जेडीयूच्याविरोधात मात्र उमेदवार उभे करणार असल्याचे स्पष्ट करत आगामी सरकार भाजप व लोकजनशक्ती पक्षाचे असेल अशीही घोषणा केली आहे.

एनडीएमध्ये सामील असूनही केंद्रात जेडीयूशी मैत्री पण राज्यात मात्र जेडीयू शत्रू असे विचित्र संबंध लोकजनशक्ती पार्टीने राजकारणात दाखवले आहेत.

लोक जनशक्ती पार्टी व जेडीयूचे संबंध बरे नाहीत अशी चर्चा राजधानी दिल्लीत सुरूच होती पण बिहारमध्ये लढताना एनडीए आघाडी म्हणून जेडीयू सोबत लढवण्याशिवाय लोक जनशक्ती पार्टीसमोर पर्याय नव्हते.

काही दिवसांपूर्वी जीतनकुमार मांझी यांनी एनडीए प्रवेश केला होता. त्यामुळे लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान नाराज झाले होते. पासवान व मांझी हे दोघेही दलित असल्याने आपल्याला शह दिला जात असल्याची भीती लोक जनशक्ती पार्टीकडून व्यक्त केली जात होती.

 

लोक जनशक्ती पार्टीला भाजपकडून १५ जागा दिल्या जाणार होत्या पण लोजपाला ४२ जागा हव्या होत्या. जेडीयूचे म्हणणे होते की त्यांची युती केवळ भाजपसोबत आहे लोजपासोबत नाही. त्यामुळे जागा वाटपांचा तिढा चिघळला होता.

 

२०१५च्या विधानसभा निवडणुकांत लोजपाने ४२ जागा लढवल्या होत्या पण त्यांना फक्त दोन ठिकाणी विजय मिळाला होता. अखेर जागा वाटपांवर जेडीयू अडून बसल्यानंतर आणि या कोंडीतून स्वतःची सुटका करून घेताना पक्षाने नितीश कुमार यांनाच आव्हान देण्याचे ठरवले. भाजपशी आमचे संबंध उत्तम आहेत, पण जेडीयूशी वैचारिक मतभेद असून ते सुटत नसल्यामुळे केवळ भाजपसोबत आम्ही आहोत व नितीश कुमार यांच्या उमेदवारांविरोधात आमचे उमेदवार निवडणूक लढवतील असे पक्षाने सांगितले.

 

दरम्यान, लोक जनशक्ती पार्टीच्या या नव्या राजकीय खेळीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना जेडीयूचे प्रवक्ता राजीव रंजन म्हणाले, जोपर्यंत भाजप व नितीश यांची युती आहे तोपर्यंत आम्हाला पुन्हा सत्ता मिळणारच आहे.

 

बिहारमध्ये एनडीए उमेदवार निश्चित करण्यासाठी चिराग पासवान यांनी भाजप व नितीश कुमार यांच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव आणला होता. आपल्याला योग्य प्रमाणात जागा मिळाव्यात अशी त्यांची मागणी होती. पण किती जागा द्याव्यात यावर भाजपने मौन साधले होते. काही दिवसांपूर्वी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी एक बैठक घेतली होती. या बैठकीत पासवान यांनी अल्टिमेटम दिला होता. पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

अखेर रविवारी पासवान यांनी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली.

२००५च्या विधानसभा निवडणुकांत लोक जनशक्ती पार्टीने अशाच प्रकारची राजकीय खेळी लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल व काँग्रेसविरोधात केली. ऐनवेळी त्यांनी केवळ राजदच्या विरोधात आपले उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा केली. या निर्णयामुळे बिहारमध्ये त्रिशंकू सरकार आले व लालूंची तिसर्यांदा सरकार स्थापन करण्याची संधी गेली होती.

त्यानंतर पुन्हा निवडणुका होऊन नितीश कुमार व भाजप युतीने बहुमत मिळवले व सरकार स्थापन केले होते.

 

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0