सुशांतचा मृत्यू भाजपला प्रचाराचा विषय का वाटतो?

सुशांतचा मृत्यू भाजपला प्रचाराचा विषय का वाटतो?

बिहारमध्ये भाजपने केवळ राजपूत जातीलाच नव्हे तर बिहार अस्मितेच्या नावाखाली अन्य जातींमध्येही सुशांतचा मुद्दा रुजवला आहे, या जाती बिहार अस्मितेच्या नावाखाली आपल्याला मत देतील असा भाजपचा प्रयत्न आहे.

इकडे आड, तिकडे विहिर….
कर्नाटक: भाजप आमदाराची महिलेला धमकी
राज्यसभा निवडणुका : गुजरात काँग्रेस आमदारांची चौकशी शक्य

मूळचा बिहारचा व बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह याच्या मृत्यू प्रकरणाचा आधार घेत बिहारमधील एनडीए सरकार राज्यात भावनात्मक वातावरण उभे करण्याचा प्रयत्न करत आहे. बिहारच्या जनमताचा कानोसा घेत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सुशांत सिंह याच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्याची शिफारस केंद्र सरकारला केली, यावरूनच लक्षात यायला लागले की सरकार सुशांत सिंहच्या मृत्यूचे भावनात्मक वातावरण तयार करण्याच्या दिशेने पावले उचलत आहे.

गेल्या शनिवारी भाजपच्या कला व संस्कृती गटाने ‘जस्टिस फॉर सुशांत सिंह राजपूत’ या हॅशटॅगचा स्टिकर व सुशांतच्या चेहर्याचा मास्क प्रसिद्ध केला. या स्टिकरवर सुशांतचा हसरा चेहरा असून त्यावर ‘न भूले है, न भूलने देंगे’, असा संदेश लिहिला आहे.

भाजपने असे २५ हजार स्टिकर व ३० हजार मास्क तयार केले असून ते आता जनतेत वाटले जाणार आहेत.

भाजपच्या कला व संस्कृती गटाचे समन्वयक वरुण कुमार सिंह यासंदर्भात सांगतात, की सुशांत सिंहचे स्टिकर व मास्क पूर्वीपासून वाटप केले जात होते पण आता ते लोकांच्या नजरेस पडत चालले आहे. सुशांतला न्याय मिळावा अशी आमची पहिल्यापासून मागणी होती. हा विषय राजकारणाचा नसून भावनेचा आहे. त्याला न्याय मिळावा म्हणून आमचे प्रयत्न सुरू असल्याचे वरुण कुमार सिंह यांचे म्हणणे आहे.

भाजपचे नेते रविशंकर प्रसाद, सुशील कुमार मोदी व रामकृपाल यादव सुशांतच्या कुटुंबियांना लवकरच भेटणार आहेत, असेही समजते.

भाजप एवढ्याच प्रचार साहित्यावर थांबलेले नाही. त्यांनी सुशांतच्या आयुष्यावर एक व्हीडिओ तयार केला असून तो लवकरच सोशल मीडियावर प्रसिद्ध केला जाणार आहे.

भाजपची रणनीती अधिक स्पष्ट होते ती बिहारचे भाजप प्रवक्ता डॉ. निखिल आनंद यांच्या ट्विटवरून. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये सुशांतच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी भाजपच्या कला-संस्कृती मंचाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याचे म्हटले आहे.

मूळ मुद्द्यांना बगल देण्यासाठी भावनात्मक मुद्दा

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा विषय एकाएकी भाजपने उचललेला नाही. सुशांतचा मृत्यू झाल्यानंतर आस्तेआस्ते हा विषय राजकीय मूळ पकडू लागला व आज तो देशात विविध मीडियाच्या माध्यमातून चघळला जात आहे.

सुशांतच्या मृत्यूनंतर भाजपचे समर्थन करणारे सोशल मीडियातील विविध ग्रुप, पेज या विषयावर आक्रमक झाले. त्यांनी दुसर्या दिवसापासून सोशल मीडियावर सुशांतसंदर्भात भावूक व्हीडिओ, मजकूर प्रसिद्ध करण्यास सुरूवात केली.

नंतर हा विषय बिहारी अस्मितेशी जोडला गेला, या दरम्यान सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी पटण्यात एका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

नियमानुसार हा विषय पटना पोलिसांनी मुंबई पोलिसांकडे द्यायला हवा होता. पण तसे झाले नाही. बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडेय यांनी बिहार पोलिसांचे एक पथक थेट मुंबईत पाठवले. त्यावर दोन्ही राज्यांच्या पोलिसांमध्ये संघर्ष उडाला. हा संघर्ष चिघळतानाच बिहार सरकारने सीबीआयकडे हे प्रकरण सोपवण्याची शिफारस केली व केंद्र सरकारने लगेच ही शिफारस मान्य केली. केंद्राने या केसचे मेरिटही लक्षात घेतले नाही.

सध्या सुशांतच्या केसची चौकशी सीबीआय करत असून आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणाची चौकशी ईडीकडून तर अंमली पदार्थाबाबतचा तपास नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून केला जात आहे.

या तीनही संस्था केंद्र सरकारच्या अखत्यारित येत आहे. केंद्रात भाजपचे व बिहारमध्ये भाजप-जनता दलाचे सरकार आहे. अशा वेळी प्रश्न उपस्थित होतो की ‘जस्टिस फॉर सुशांत सिंह राजपूत’ असा हॅशटॅग लावून भाजप कोणाकडून न्याय मांगत आहे?

भाजपची व्यूहरचना

सध्याचे वातावरण पाहता भाजपला खात्री झाली आहे की, सुशांतच्या मृत्यूवरून राज्यात एक भावनात्मक वातावरण तयार झाले आहे. सुशांतचा केवळ फोटो, स्टिकर व सीबीआय चौकशीवरून त्याला न्याय मिळेल व जनता आपल्याला मत देईल असे त्यांना वाटत आहे. त्यामुळे भाजप या विषयावर अधिक आक्रमक झाला आहे.

पण प्रश्न वेगळा आहे. गेली १५ वर्षे बिहारमध्ये नितीश कुमार व भाजप यांचे सरकार असताना त्यांना सुशांतच्या मृत्यूचा विषय निवडणुकांत प्रमुख मुद्दा म्हणून का घ्यावा लागतोय?

या संदर्भात राजकीय विश्लेषक डीएम दिवाकर यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, भाजपने अत्यंत विचारपूर्वक ही रणनीती तयार केली असून ते पद्धतशीररित्या सुशांतचा मुद्दा भडकवत आहे. भावनात्मक राजकारणाचे भाजपला आजपर्यंत लाभ मिळत गेले आहेत. देशातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याने भाजपवर सर्वत्र टीका होत आहे. देशाचा जीडीपी निगेटिव्ह आला आहे. राज्यात परत आलेल्या श्रमिकांना रोजगार मिळत नाहीये. बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. अर्धा बिहार महापुराने वेढलेला आहे. या सर्व मुद्द्यांवर भाजपकडे उत्तर नसल्याने ते सुशांतचा मुद्दा उचलत आहेत. सुशांतच्या मृत्यूचा मुद्दा उचलून त्याचा तपास सीबीआयकडे देऊन आम्ही बिहारी अस्मितेचे पाठराखण करत आहोत, असेही मतदारांना भाजप भासवत आहे.

भाजपची सध्याची ही वाटचाल पाहता निवडणूक प्रचारात पक्षाच्या बड्या नेत्यांकडून हाच मुद्दा उगळला जाईल, यात शंका वाटत नाही.

अशा परिस्थिती विरोधी पक्षांपुढे दोन आव्हाने आहेत. एक म्हणजे, त्यांना लोकांमध्ये जाऊन सुशांतच्या मृत्यूपेक्षा बेरोजगारी, गरीबी, महापूर, कोरोना या विषयांतील गांभीर्य मांडावे लागेल. व दुसरे आव्हान म्हणजे भाजप सुशांतच्या मुद्द्यापासून मागे जाईल अशा पद्धतीचे वातावरण राज्यात तयार करावे लागेल.

विरोधी पक्ष काय करतील?

काही विश्लेषक सांगतात, सुशांतच्या मृत्यूचे प्रकरण विरोधी पक्षांनी हाती घेतले असते तर भाजपला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला असता. पण तसे झाले नाही. विरोधी पक्षांनी सुशांतच्या विषयाकडे साफ दुर्लक्ष केले.

जेव्हा सुशांतचा मृत्यू झाला त्यावेळी राजदचे तेजस्वी यादव हे पहिले

नेते सुशांतच्या कुटुंबियांना भेटले व त्यांनी या मृत्यूप्रकरणाची चौकशीची मागणी केली होती. सीबीआयकडे हा विषय गेल्यानंतर विरोधी पक्षांनी हा मुद्दा सोडून दिला.

राजदचे एक नेते रामचंद्र पूर्वे यांनी द वायरशी चर्चा करताना सांगितले की, आमचे नेते तेजस्वी यादव यांनी पहिल्यांदा सुशांतला न्याय मिळावा म्हणून मागणी केली होती, त्यांनी हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे, असेही सांगितले होते. तेजस्वी यांनी राजगीर येथे तयार होत असलेल्या फिल्मसिटीला सुशांत सिंह राजपूतचे नाव द्यावे अशीही मागणी केली होती. त्यांनी आपली पूर्ण सहानुभूती सुशांत सिंह यांच्या कुटुंबियांप्रती व्यक्त केली होती.

ते पुढे म्हणतात, बिहारची जनता भावनांचा सन्मान करते पण बेरोजगारी, गरीबी, कोरोना, महापूर हे महत्त्वाचे प्रश्न आहे. स्थलांतरित श्रमिकांना राज्यात काम मिळत नसल्याने नितीश कुमार यांचे सर्व दावे पोकळ ठरले आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कौकब कादरी म्हणतात, सुशांतच्या मृत्यूचे राजकारण भाजपने सुरू केले असून ते अत्यंत घृणास्पद आहे. सुशांत बिहारची शान होता. त्याच्या कुटुंबाबद्दल आम्हाला सहानुभूती वाटते, अशा वेळी भाजपने या मुद्द्याला राजकीय केल्यामुळे सुशांतच्या कुटुंबाला न्याय मिळेल याची शक्यता कमी झाली आहे. भाजपला आपल्या सरकारची कामगिरी सांगत येत नाही, त्यामुळे त्यांनी हा विषय हाती घेतला आहे.

राजपूत मतांवर नजर

बिहारमध्ये ५ टक्के मतदार हा राजपूत असून या राज्यातील उच्चजाती भाजपावर प्रचंड नाराज आहे. या वर्गाने भाजपची गेली १५ वर्षे साथ दिली आहे. त्यामुळे भाजप आजही १५ वर्षाने लालूंच्या ‘जंगल राज’ची आठवण काढत असतो. म्हणून राजपूत जातीची मते पुन्हा मिळवण्याचा भाजपचा एक प्रयत्न आहे.

पण भाजपने केवळ राजपूत जातीलाच नव्हे तर बिहार अस्मितेच्या नावाखाली अन्य जातींमध्येही सुशांतचा मुद्दा रुजवला आहे, या जाती बिहार अस्मितेच्या नावाखाली आपल्याला मत देतील असा भाजपचा प्रयत्न आहे.

उमेश कुमार राय, लेखक मुक्त पत्रकार आहेत

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: