बिहार-उ. प्रदेश सीमेवर गंगेत ७१ मृतदेह आढळले

बिहार-उ. प्रदेश सीमेवर गंगेत ७१ मृतदेह आढळले

पटना: कोविड संक्रमित मृतदेह नदीत टाकणे अत्यंत धोक्याचे असून, यामुळे संसर्गाची शक्यता अधिक वाढते, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. बिहारच्या

पिगॅसस हेरगिरीची चौकशी हवीः नितीश कुमार
बिहारमध्ये नितीश विरोधासोबत बेरोजगारीची लाट
चारा घोटाळाः ५व्या खटल्यात लालूंना ५ वर्षांचा कारावास

पटना: कोविड संक्रमित मृतदेह नदीत टाकणे अत्यंत धोक्याचे असून, यामुळे संसर्गाची शक्यता अधिक वाढते, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. बिहारच्या उत्तर प्रदेशालगतच्या बक्सर जिल्ह्यातील चौसा येथील स्मशानाजवळ गंगा नदीच्या पात्रात ७१ मृतदेह तरंगताना दिसल्याने या भागात खळबळ उडाली.

या मृतदेहांचे नमुने शवविच्छेदन आणि डीएनए चाचण्यांसाठी घेऊन, जिल्हा प्रशासनाने सोमवारी त्यांचे दफन केले. मात्र, हे मृतदेह खूपच सडल्यामुळे शवविच्छेदनातून मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही, असे बक्सरचे सिव्हिल सर्जन डॉ. जीतेंद्र नाथ यांनी सांगितले.

एसडीओ केके उपाध्याय यांच्या मते हे मृतदेह उत्तर प्रदेशातून वाहत आले असावेत आणि ते चौसा येथे गंगेत तरंगताना दिसले त्याच्या तीन-चार दिवस आधीच ते फेकण्यात आले असावेत.

अर्थात, स्थानिकांच्या मते हे मृतदेह आसपासच्या गावातील लोकांनीच पाण्यात टाकले आहेत. दहनासाठी लाकडांचा तुटवडा भासत असल्याने  बाजारातील लाकडांचे दर खूपच वाढले आहेत. त्यामुळे केवळ मुखाग्नी देऊन मृतदेह पाण्यात टाकून देण्याचा मार्ग नातेवाईकांनी अमलात आणला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

गंगा नदी बक्सर जिल्ह्यामधून बंगालमध्ये प्रवेश करते. चरित्रवन हा बक्सरमधील सर्वांत मोठा स्मशानघाट असून, कोविड-१९ संक्रमित मृतदेहांंवर अंतिम संस्कार येथेच केले जातात. या घाटावर दररोज ४-५ मृतदेह दहनासाठी येत होते. मात्र, कोविडच्या साथीमुळे दररोज चार ते पाच पट अधिक मृतदेह येत आहेत, असे येथील डोम समाजाच्या लोकांनी सांगितले.

मृतदेहांचा स्रोत कोणताही असला तरी अशा पद्धतीने नदीत मृतदेह टाकले जाणे अत्यंत धोक्याचे आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. “कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या देहातून बाहेर पडणारे ड्रॉपलेट्स उन्हात पाच-सहा तास राहिल्यास सुकून जातात तसेच विषाणूही नष्ट होतात. मात्र, विषाणूला ओलसर ठिकाणी राहिला, तर तो मृतदेहामध्येही अनेक तास जिवंत राहू शकतो, असे राष्ट्रीय आरोग्य मिशनचे स्वायत्त पर्यवेक्षक तसेच बालरोगतज्ज्ञ डॉ. के. आर. अँटनी यांनी ‘द वायर’ला सांगितले. मुळात कोरोनाचे संक्रमण रुग्णाच्या श्वसनक्रियेमध्ये बाहेर पडणाऱ्या सुक्ष्म थेंबांमुळे  होते आणि मृत्यूनंतर श्वसन बंद झालेले असते. त्यामुळे मृतदेहापासून संक्रमणाचा धोका नाही असे वाटू शकते पण मृत व्यक्तीच्या उतींमध्ये हा विषाणू अनेक तास जिवंत राहू शकतो, असेही डॉ. अँटनी म्हणाले.

कोविड संक्रमित मृतदेह नदीत फेकले आणि नदीचे पाणी स्थिर असेल, तर या पाण्यात अंघोळ करणाऱ्यांना, ते पिणाऱ्यांना संसर्गाचा धोका नक्कीच आहे. पाणी वेगाने वाहणारे असेल तर संक्रमणाचा धोका फारसा राहणार नाही पण गंगेसारख्या विशाल नदीचे पाणी स्थिर असल्याने त्यातून संक्रमणाचा धोका अधिक आहे, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

कोविड साथीदरम्यान एकंदर मृत्यूचा दर निश्चितच वाढला आहे. ग्रामीण भागात अनेकदा लोक दुखणे अंगावर काढतात. त्यामुळे काहींचा घरातच मृत्यू होतो. त्यांना कोविड झाला होता की नव्हता स्पष्ट होऊ शकत नाही. अनेकदा छोट्या गावांमध्ये कोविड चाचणीच्या सुविधाही उपलब्ध नसतात. शहरांमध्येही कोविड साथीचा उद्रेक झालेला असल्याने चाचण्यांचे निकाल येण्यास वेळ लागत आहे. अशा परिस्थितीत रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याला कोविड झालेला होता की नव्हता हे स्पष्ट होऊ शकत नाही. स्मशानांवरील आणि दफनभूमींवरील वाढत्या गर्दीमुळे अंत्यसंस्कारांनाही खूप वेळ लागत आहे. त्याचप्रमाणे अंत्यसंस्कारांचा खर्चही खूप वाढला आहे. अशा परिस्थितीत मृतांचे नातेवाईक नदीत मृतदेह फेकण्यासारखे मार्ग अवलंबू लागले तर संक्रमणाचा धोका अधिक वाढेल. पाण्यातून संसर्ग होऊ लागला, तर तो आटोक्यात आणणे आणखी कठीण होऊन बसेल. त्यामुळे मृतदेहांच्या दहन-दफनाची सोय वाढवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. अंत्यविधींसाठी लागणाऱ्या सामुग्रीच्या दरांवरही नियंत्रण ठेवले जाणे या दृष्टीने आवश्यक आहे.

मूळ लेख

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0