मोदींच्या वाढदिवसाला बिहार सरकारचा डेटामध्ये फेरफार

मोदींच्या वाढदिवसाला बिहार सरकारचा डेटामध्ये फेरफार

‘स्क्रोल’च्या अहवालानुसार, बिहार सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर रोजी अधिक कोविड लसीकरण दाखवण्यासाठी १५ आणि १६ सप्टेंबरचा दैनंदिन लसीकरणाचा डेटा कोविन पोर्टलवर अपलोड केला नाही. तो १७ सप्टेंबरच्या डेटाबरोबर जोडला.

बिहारच्या विकासासाठी प्रशांत किशोर यांचे व्यासपीठ
नाराज नीतीश कुमार
महाराष्ट्रापेक्षा बिहारमध्ये दारुची विक्री अधिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी (१७ सप्टेंबर) बिहारमध्ये अधिक लसीकरण दाखविण्याच्या उद्योगात डेटामध्ये फेरफार केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

१७ सप्टेंबर रोजी भारतात सर्वाधिक २, ५ कोटी लोकांना लस दिली गेली. सरकारचे हे मोठे यश असल्याचे सांगत भाजपने म्हटले, की पंतप्रधान मोदींसाठी ही वाढदिवसाची ‘भेट’ आहे.

सरकारी नोंदींनुसार, त्या दिवशी बिहारमध्ये ३९.९८ लाख डोस दिले गेले, जे देशात त्यादिवशी लस देण्यात आलेल्या एकूण संख्येच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त होते.

तथापि, ‘स्क्रोल’च्या अहवालानुसार, यापैकी बऱ्याच ‘ऑफलाइन लसी’ होत्या, म्हणजे यातील काही लसी एक दिवसापूर्वी दिलया गेल्या होत्या. परंतु त्या १७ सप्टेंबर रोजी कोविन पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या. ज्यामुळे आपोआप लसींची संख्या वाढली.

अनेक जिल्ह्यांतील आरोग्य केंद्राचे अधिकारी आणि डेटा एंट्री ऑपरेटर यांनी सांगितले, की मोदींच्या वाढदिवसाला नेहमीपेक्षा जास्त लसींचे डोस देण्यात आले. मात्र त्यांना असे निर्देश देण्यात आले होते की १५ आणि १५ सप्टेंबर रोजी देण्यात आलेल्या लसींचा डेटा १७ सप्टेंबर रोजी अपलोड करावा.

लसीच्या डोसचा वापर आणि पुरवठा साखळीची स्थिती दर्शविणारे पोर्टल ‘इलेक्ट्रॉनिक लस इंटेलिजन्स नेटवर्क’च्या एका अधिकाऱ्याने ‘स्क्रोल.इन’ला सांगितले, की १६ सप्टेंबर रोजी बिहारमध्ये लसींचा नगण्य वापर दिसून आला.

जेव्हा त्यांनी संबंधित जिल्हातील अधिकाऱ्यांना याविषयी फोन केला तेव्हा, त्यांना सांगण्यात आले, की ‘लसीकरण ऑफलाईन केले जात आहे आणि त्यांचा डेटा १७ सप्टेंबर रोजी अपलोड करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत’.

आकडेवारीनेही याची पुष्टी केली आहे. उदाहरणार्थ, कोविन पोर्टलनुसार, १५ सप्टेंबरला बिहारमध्ये १, ४५, ५९३ डोस दिले गेले आणि १६ सप्टेंबरला फक्त ८६, २५३ डोस दिले गेले. हे मागील एका आठवड्याच्या सरासरीपेक्षा खूप कमी होते. जेंव्हा दररोज सरासरी ५.५ लाख डोस दिले जात होते.

त्याचप्रमाणे १७ सप्टेंबरनंतरही राज्याच्या लसीकरणात लक्षणीय घट पहायला मिळते. सोमवारी, राज्यात १० लाख डोस दिले गेले, जे आठवड्याच्या सुटीनंतरच्या लसीकरणाच्या प्रवृत्तीनुसार आहेत. मंगळवारी आणि बुधवारी बिहारमध्ये अनुक्रमे ५.२६ लाख आणि २.३६ लाख डोस देण्यात आले.

असे प्रकरण समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही असे पाहिले गेले आहे, की जर एका दिवशी भरपूर लसीकरण होत असेल, तर त्यापूर्वी आणि नंतर खूप कमी लसीकरण झालेले आहे.

याआधी २१ जून रोजी एका दिवशी ८६ लाख डोस देण्याचा विक्रम करण्यात आला होता. मात्र, नंतर पुढे आले, की भाजप शासित राज्यांनी या तारखेच्या काही दिवस आधीपर्यंत राज्यात लसीकरणाची गती मंद केली होती. जेणेकरून त्या विशिष्ट दिवशी, म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या दिवशी अधिक लसीकरण झाल्याचे दाखवण्यात आले.

‘स्क्रोल’ने दिलेल्या वृत्तानुसार, दरभंगा आणि सहरसा जिल्ह्यातील स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी असे सांगितले, की जिल्हा अधिकाऱ्यांनी १६ सप्टेंबर रोजी कोविन पोर्टलवर ‘संपूर्ण लसीकरण डेटा’ अपलोड न करण्याचे निर्देश दिले होते.

एका वैद्यकीय अधिकाऱ्याने पोर्टलला सांगितले, “आम्हाला लसीकरण ऑफलाईन करण्यास सांगण्यात आले होते.”

डेटा एंट्री ऑपरेटरचे म्हणणे आहे, की पुष्कळ वेळा असे घडले आहे, की मागील दिवसाचा डेटा दुसऱ्या दिवशी अपलोड केला जातो. मात्र असे दिसते की १७ सप्टेंबर रोजी बिहार सरकारने मागील दिवसाचा डेटा त्याच दिवशी अपलोड केला जावा याची खात्री करण्यासाठी सर्व शक्य पावले उचलली होती.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0