बिहार: शिक्षणमंत्र्याचा ३ दिवसात राजीनामा

बिहार: शिक्षणमंत्र्याचा ३ दिवसात राजीनामा

पटनाः केवळ तीन दिवसांपूर्वी राज्याच्या शिक्षणमंत्री पदाची शपथ घेतलेले जेडीयूचे आमदार डॉ. मेवालाल चौधरी यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी गुरुवारी राजीनामा द्यावा लागला. त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे सोपवला आहे.

मेवालाल चौधरी यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच विरोधी पक्ष आरजेडीने नितीश कुमार यांना चांगलेच फैलावर घेतले व भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या चौधरी यांचा राजीनामा घ्यावा म्हणून दबाव आणला.

२०१७मध्ये एका भ्रष्टाचार प्रकरणी मेवालाल चौधरी यांना जेडीयू पक्षाने निलंबित केले होते.

सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीमध्ये मेवालाल चौधरी यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोपी असून अशा आरोपीलाच राज्याचा शिक्षणमंत्री केल्यावर तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्ला केला होता. केवळ खुर्चीसाठी गुन्हेगारी, भ्रष्टाचार व धार्मिक एकोप्यावर मुख्यमंत्री आपले प्रवचन देत राहतील पण मंत्रिमंडळात अशाच भ्रष्टाचार्यांना स्थान देतील असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला होता.

मेवालाल चौधरी हे मुंगेर जिल्ह्यातील तारापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले असून ते पहिल्यांदाच नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले होते.

राजकारणात येण्याअगोदर चौधरी हे भागलपूर येथील बिहार कृषी विद्यापीठाचे कुलपती होते. त्यांच्या कार्यकाळात १६७ साहाय्यक व कनिष्ठ शास्त्रज्ञांच्या भरतीचा घोटाळा झाला होता. या प्रकरणात त्यांच्यासमवेत अन्य ५० जणांवर आरोप दाखल दाखल झाले होते.

मूळ बातमी

COMMENTS