‘बिहार मे भाजपा बा…’

‘बिहार मे भाजपा बा…’

बिहारमध्ये राजकीय शक्ती कमी होऊनही बिहारच्या मुख्यमंत्रीपदी बसवल्याने नितीश कुमार यांची अवस्था बळेबळेच घोड्यावर बसवलेल्या नवर देवासारखी झाली आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना सुद्धा नितीश कुमार यांचा निरुत्साही चेहरा, करवादलेली स्थिती सर्व काही सांगून जात होती.

अखेर नाईलाजाने बळेबळे हा बिहारी बा मुख्यमंत्रीपदी आरूढ झाला असला तरी हा राजा आता थकलेला, दमलेला असाच आहे. ‘बिहार मे बहार बा… नितीशकुमार बा..’ ही एकेकाळी सर्वांच्या मुखात असलेली घोषणा लुप्त झाली असली तरी एकूणच हा बिहारी बाबू आता अबहार झाला आहे. याची सुरुवातच नितीश कुमार सरकारच्या कॅबिनेट शपथविधीनंतर पहिल्या तीन दिवसात शिक्षणमंत्र्यांच्या राजीनामा अंकाने झाली. शपथ घेऊन सचिवालयात जाऊन काम सुरू करणार तो पर्यंतच शिक्षणमंत्री मेवालाल चौधरी यांना राजीनामा द्यावा लागला. चौधरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यामुळे अशा वादग्रस्त व्यक्तीला शिक्षणमंत्री केल्याने एकच टीकेची झोड उठली होती. मेवालाल यांच्या प्रमाणे मंत्रिमंडळ मधील अनेक नवनियुक्त मंत्री हे वादग्रस्त आहेत. आणि त्यामधील बहुतेक भाजपचे असल्याने नितीश कुमार यांच्यासाठी ही मोठी डोकेदुखी ठरणार आहे.

दुसरीकडे महाआघाडीमधील काँग्रेसच्या यशाबाबत उलटसुलट चर्चा होत असली तरी २०१५च्या तुलनेत काँग्रेसचे फारसे नुकसान झाले नाही. निवडून येणाऱ्या आमदारांची संख्या कमी झाली असली तरी एकूण मतांची टक्केवारी ही स्थिर आहे. काँग्रेसचे जवळपास सर्वच उमेदवार हे एनडीएच्या बालेकिल्ल्यात तगड्या उमेदवार विरुद्ध लढत देत होते. ते पाहता तेथे मिळालेल्या मतांची आकडेवारी ही २०१५ पेक्षा जास्त आहे. राजदला काँग्रेसमुळे बहुमत गाठता आले नाही असे म्हणणे त्यामुळे निराधार आहे. ७२ पैकी ४० हून अधिक ठिकाणी काँग्रेस उमेदवारानी एनडीएच्या प्रबळ बालेकिल्यात टक्कर दिली आहे हे इथे दुर्लक्षित करून चालणार नाही. यातील अनेक उमेदवार हे केवळ ५०० ते १००० मताच्या फरकाने पडले आहेत. याचा एक सरळ सरळ अर्थ असा की काँग्रेसचा जो पारंपरिक मतदार आहे तो आजही बिहारमध्ये कायम आहे. भविष्यात आणखी त्यात वाढ होऊ शकते.

निकाल जाहीर झाल्यानंतर व जेडीयूला कमी जागा मिळाल्यानंतर मला मुख्यमंत्री होण्याची आता इच्छा नाही भाजपमधीलच कोणी तरी मुख्यमंत्री करा असा खासगीत सूर काढणारे नितीश कुमार यांची अवस्था बळेबळेच घोड्यावर बसवलेल्या नवर देवासारखी झाली होती. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना सुद्धा नितीश कुमार यांचा निरुत्साही चेहरा, करवादलेली स्थिती सर्व काही सांगून जात होती.

नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाची ७ व्यांदा सूत्रे हाती घेतली असली तरी त्या मध्ये ना जोश ना उत्साह. कारण सध्या अस्तित्वात आलेल्या मंत्रिमंडळात दोन उप मुख्यमंत्रीसह भाजपचे ७ जण असून जनता दलाला केवळ ५ मंत्री पदे मिळाली आहेत. आणि त्यातच आता महत्त्वाची आणि मलाईदार खाती ही आपसूकच भाजपच्या पारड्यात गेली आहेत अपवाद केवळ गृहखाते. याचा सरळ सरळ अर्थ असा की नितीश कुमार हे फक्त मुख्यमंत्रीपदी राहणार असून सर्व कारभार हा भाजपचे मंत्रीच चालवणार. आणि यातच खरी गोम आहे. कारण अशी कोंडी नितीश कुमार किती काळ सहन करणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. राजकीय विश्लेषक आताच सांगू लागले आहेत की, पश्चिम बंगाल आणि अन्य राज्यांच्या निवडणूक होईपर्यंत नितिश बाबू यांच्या कारभारात अडचणी न आणण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. पण त्यानंतर काहीही वेगळे घडू शकते. राजदचे अनेक आमदार हे आजही जनता दलाच्या आमदारांच्या संपर्कात असून भविष्यात वेगळी खिचडी तयार झाली तरी त्यात आश्चर्य वाटणार नाही.

भाजपची सर्व राज्यात विस्तारवादाची भूमिका पाहता काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत त्यांना एकच झेंडा आणि एकपक्षी सत्ता अपेक्षित आहे. आणि त्या दृष्टीने पावले टाकत रणनीती आखण्यात येत आहे. सुरुवातीला त्या राज्यातील प्रादेशिक पक्षाबरोबर ‘हनिमून’ साजरा करत करत नंतर पद्धतशीरपणे मग ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये नाते परावर्तित करताना सुरुवातीला सत्तेत समान आणि नंतर सर्वात जास्त वाटा घेत शक्तिशाली होण्याचे धोरण अवलंबले जाते. हाच प्रयोग बिहारमध्ये राबविण्यात आला आहे.

समाजवादी विचारसरणीचा वसा घेतलेल्या जयप्रकाश नारायण यांच्या साखळीतील एक नाव म्हणजे नितीश कुमार. ‘बिहारमे बा नितीश बा..’ या एकाच घोषणेखाली नितीश कुमार नेहमी सत्तेत राहिले. लालू प्रसाद यादव यांनी दलित आणि मुस्लिम मतदारांची गोळाबेरीज करण्यात कायम पुढाकार घेतला तर नितीश कुमार यांनी दलित वगळता अन्य समाज तसेच कुर्मी आणि यादवोतर समाजाला आपलेसे केले. त्यामुळे बिहारचे राजकारण नेहमी या भोवती फिरत राहिले.

गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ राष्ट्रीय पक्ष असलेला काँग्रेस बिहारच्या सत्तेतून बाहेर झाला आणि सत्तेचा लोलक कधी राष्ट्रीय जनता दल अथवा संयुक्त जनता दलाकडे झुकू लागला. आणि यातच काश्मीर ते कन्याकुमारी सबकुछ हम या ध्येयाने उतरलेल्या भाजपने नितीश कुमार यांची कास धरली. आणि नेहमीच धरसोड वृत्ती असलेल्या नितीश यांनीही हे नाते स्वीकारून भाजपला आपल्या घरात घेतले. आणि येथे मोठा घात झाला.

प्रादेशिक पक्षाचे पद्धतशीरपणे खच्चीकरण करण्याचे महानाट्य या धरतीवरही घडले. आणि यासाठी चिराग पासवान याच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यात आली. अपेक्षेप्रमाणे या बंदुकीतून सुटलेल्या गोळ्यांनी नितीश कुमार यांचे अनेक मोहरे आपसूक टिपले गेले. याचवेळी भाजपने आपल्या जागांमध्ये कमालीची वाढ केली. निवडणूक प्रचारात एनडीएचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून नितीश कुमार यांचे नाव घेतले होते. त्यामुळे जास्त जागा जिंकून सुद्धा भाजपने आपण वचन पाळले हे दाखविण्यासाठी नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले असले तरी त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी दोन उपमुख्यमंत्री नियुक्त केले आहेत. तसेच मंत्रिमंडळात सुद्धा संख्येने जास्त मंत्री हे भाजपचे असल्याने संपूर्ण रिमोट हा भाजपच्या हातात आहे हे निश्चित. त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मुख्यमंत्री होण्यास टाळाटाळ करणाऱ्या नितीश कुमार यांना अगदी बळेबळे पदावर बसविण्यात आले.

आपल्या कमी आमदाराच्या भरवशावर भाजपबरोबर पुढील ५ वर्षे संसार करण्याचे महाकठीण काम नितिश बाबू यांच्यासमोर आहे. ही माझी शेवटची निवडणूक अशी साद घालणारे नितीश सध्या चक्रव्यूहात अडकले आहेत. राज्याचा प्रमुख असूनही त्यांना कोणते अधिकार असतील? की दोन उपमुख्यमंत्री आणि भाजपच्या आमदार यांना सांभाळणे एवढेच काम त्यांच्याकडे राहू शकते. सर्वात महत्वाचे म्हणजे नितीश बाबू हे किती काळ सहन करणार? की सवयीप्रमाणे पलटी मारणार हे कोणी सांगू शकत नाही. पण तो पर्यंत बिहारमध्ये यापुढे ‘बिहार मे बहार बा.. भाजपा बा’ हे ऐकावयास मिळणार.

अतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.

COMMENTS