सोन्याचे मासे, चवऱ्या आणि सोन्याचा तराजू!

सोन्याचे मासे, चवऱ्या आणि सोन्याचा तराजू!

डॉ.श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेल्या ‘शिवचरित्र आणि विचारप्रवाह’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांनी केलेले भाषण.

छत्रपती संभाजींच्या बदनामीचे कारस्थान
छ. शिवाजी महाराजांची नरेंद्र मोदींशी तुलना; महाराष्ट्रात संताप
किल्ले भाड्याने देण्याच्या निर्णयावर सर्वथरातून संताप

सतराव्या शतकात होऊन गेलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी गेली चार शतकं माणसांना विचार करायला भाग पाडलं आहे. महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी त्यांच्या बाजूला सोन्याचे मासे, घोड्याच्या शेपटीसारख्या चवऱ्या आणि सोन्याचा तराजू ठेवलेला होता. ते पाहून हेन्री ऑक्झिंडेन विचारात पडला. त्याला नंतर दुभाषाकडून कळलं की मासे म्हणजे महाराजांचं समुद्रावरचं प्रभुत्व, घोड्याची शेपूट हे जमिनीवरचं प्रभुत्व आणि तराजू हे महाराजांच्या न्यायाचं प्रतीक आहे. सतराव्या शतकात ऑक्झिंडेनला महाराजांमुळे विचार करावा लागला. ‘मुद्रा भद्राय राजते’ हे महाराजांचं ब्रीद होतं. अमुक जातीच्या किंवा तमुक विचाराच्या लोकांसाठी हे राज्य आहे असं त्यांनी कधीही म्हटलं नाही. भद्राय म्हणजे भल्यासाठी, लोककल्याणासाठी महाराजांचं राज्य होतं.

ब्रिटिश संग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराजांचे पेंटिंग.

ब्रिटिश संग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराजांचे पेंटिंग.

अठराव्या शतकात अहिल्याबाई होळकरांनी महाराजांचा हाच जनकल्याणाचा विचार अनेक मार्गांनी पुढे नेला. भिल्ल जमातीच्या लोकांची जगण्याची पद्धत ही जंगलांवर अवलंबून होती. जंगल तोडून शेती करणाऱ्या समाजाबद्दल त्यांना संताप येणं साहजिक होतं. हा विचार करून अहिल्यादेवींनी भिल्ल लोकांसोबत संवाद साधून जमीन मशागतीसाठी प्रोत्साहन दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जनकल्याणाचा विचार अमलात आणला.

एकोणिसाव्या शतकात म्हणजे १८६९ मध्ये महात्मा जोतीराव फुले यांनी आधुनिक काळातलं पहिलं शिवचरित्र पोवाडा छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा या नावानं प्रकाशित केलं. राजा क्षेत्र्यांमध्ये पहिला| नाही दुसरा उपमेला||  असं सांगून जोतीराव म्हणतात “टळेना रयत सुखाला|  बनवी नव्या कायद्याला||  महाराजांनी अमलात आणलेल्या जनकल्याणाच्या धोरणाचा विचार महात्मा फुले जनतेसमोर मांडतात.

विसाव्या शतकात स्वातंत्र्य मिळालं ते फाळणी होऊनच. अशा वेळी महाराष्ट्र राज्याचे राज्यकर्ते यशवंतराव चव्हाण यांनी २६ जानेवारी १९६१ रोजी मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करताना महाराजांच्या कामाचं त्यांना जाणवलेलं महत्त्व मांडलेलं होतं. ते म्हणाले होते, ” त्या वेळच्या मोंगली सत्तेशी ते लढले, पण मुसलमानांशी त्यांचें वैर होतें असें नव्हें. सामान्य माणसांना बरोबर घेऊन एक नीतीचे नवे राज्य उभारावे” या हेतूने महाराजांनी राज्य उभारले होते.

अशा प्रकारे सतराव्या, अठराव्या, एकोणिसाव्या आणि विसाव्याही शतकात छत्रपती शिवाजी महाराजांमुळे माणसं वेगवेगळ्या दिशांनी जनकल्याणाचा विचार करत राहिली.

एकविसावं शतक थोडं वेगळं उगवलेलं आहे. आता विचार करण्याच्या मानवी बुद्धीला पर्याय म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता वापरता येते. पण चार शतकांपासून ज्यांनी आपल्याला विचार करायची सवय लावली, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची मांडणी समाजापुढे चिंताजनक पद्धतीनं होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जो रयतेच्या कल्याणाचा विचार होता, तो मांडण्याऐवजी भ्रम निर्माण करणारे कंठाळी आवाज वाढत चाललेले दिसतात. ज्यांच्या अभ्यासाकडे विश्वासानं पहावं असे अभ्यासकच महाराजांच्या विचाराचं विपरीत चित्रण करतात. ते महाराजांचं नाव घेत जाणूनबुजून द्वेषाणूचा फैलाव करतात. महाराजांच्या राजकीय, आर्थिक संघर्षाला धार्मिक द्वेषाचा रंग देऊ पाहतात. राजांना ठराविक धर्मात, जातीत बंदिस्त करू पाहतात. अशा भ्रामक, खोट्या इतिहासाला खोडण्याचे प्रयत्न सातत्यानं करत राहणं गरजेचं आहे.

डॉ.श्रीमंत कोकाटे यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं महाराजांच्या चरित्राकडे अभ्यासू पद्धतीनं पाहण्याचा एक प्रयत्न आपल्यासमोर येत आहे.  ‘शिवचरित्र आणि विचारप्रवाह’ या पुस्तकात निवडक अशा बारा शिवचरित्रांचं परीक्षण करून शिवचरित्रातील वेगवेगळ्या पैलूंबाबत या चरित्रांमध्ये काय मांडलं आहे याचा आढावा घेतला आहे. महाराजांचं धार्मिक धोरण, स्त्रीविषयक धोरण अशा विविध अंगांनी विचार करताना बारा वेगवेगळ्या चरित्रकारांचं म्हणणं पाहून त्यांच्या विचारांची साधकबाधक चर्चा या पुस्तकात केलेली आहे. अब्राह्मणी इतिहासलेखनाची सशक्त परंपरा अधोरेखित केलेली आहे. लेखकांचे जातीविषयक पूर्वग्रह त्यांच्या समतोल विचार करण्याच्या क्षमतेला कशी बाधा आणतात याचंही चिकित्सक मूल्यमापन या पुस्तकात केलेलं आहे. दरेक प्रकरणाला भरपूर संदर्भ टीपा दिलेल्या असल्यामुळे ‘नामूलं लिख्यते किंचित्’ ही साधार लिहिण्याची महाभारतकारांची प्रतिज्ञा त्यांनी प्रत्यक्षात आणलेली आहे.

मध्यंतरी एका वक्त्यांचं शिवचरित्रावर ऑनलाइन व्याख्यान झालं. श्रोत्यांनी पुरावे मागितल्यावर वक्ते बोलण्यापूर्वी संयोजकच म्हणाले, “ वक्त्यांनी सांगितलंय ना, म्हणजे ते सत्यच असणार. तुम्ही पाहिजे तर गूगलवर शोधा!”  ही अशी संशोधनाच्या पद्धतिशास्त्राला मारक भूमिका डॉ. कोकाटे यांनी या पुस्तकात घेतलेली नाही. सबळ पुराव्यांच्या आधारानं ते प्रत्येक वाक्य लिहितात. बारा चरित्रकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांची चरित्रं लिहिताना आपापल्या नजरेतून त्यांच्याकडे कसं पाहिलं, आणि त्यात कोणती बलस्थानं आहेत किंवा कोणत्या विसंगती आहेत हे या पुस्तकामुळे सहज लक्षात येईल. मराठीमध्ये अशा प्रकारचा हा प्रयत्न अभिनव आणि स्तुत्य आहे.

एकविसाव्या शतकामध्ये  छत्रपती शिवाजी महाराजांचं, फुले शाहू आंबेडकरांचं, सावित्रीबाई-मुक्ता साळवे यांचं चरित्र लोकांपुढे कशाला मांडायचं? तर त्यांचा विचार आपल्यामध्ये रुजावा, जगावा, तगावा यासाठी ही चरित्रं महत्त्वाची आहेत. ती खोडण्याचे, पुसण्याचे प्रयत्न केले जातात. गेल्या शतकात ‘मांग महारांच्या दु:खाविषयी निबंध’ लिहिणाऱ्या मुक्ता साळवे, सावित्रीबाईंच्या भरवशाच्या सहकारी फातिमाबी शेख या नावाच्या कुणी व्यक्ती नव्हत्याच, असा अपप्रचार केला जातो. इतकंच काय छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाने लावलेल्या जझिया कराबद्दल त्याची कानउघाडणी करणारं पत्रही अस्सल नाही असे दावे केले जातात. आपल्या आजच्या राजकीय भूमिकांना जे सोयीचे नाहीत, अशा पुराव्यांना खोटं ठरवण्याचे प्रयत्न होतात.  एकूणच इतिहासाचा वापर गैरसमज खोल करण्यासाठी केला जातोय. पण दुसऱ्यांबाबत गैरसमज बाळगण्यापेक्षा त्यांना समजून घ्यायला इतिहास उपयोगी ठरतो.  परकायाप्रवेशासारखा दुसऱ्या स्थलकालात प्रवेश करण्याचा मार्ग आपल्याला इतिहास दाखवत असतो. मात्र आपण ती स्वप्नलोकात नेणारी पळवाट म्हणून नव्हे, तर समाजाचं भलं करण्याच्या  दिशेनं नेणारी वाट म्हणून त्याकडे पहायला  हवं.

त्यामुळे ‘शिवचरित्र आणि विचारप्रवाह’ या सारखी पुस्तकं लिहिली आणि वाचली गेली पाहिजेत. त्यात उल्लेख केलेल्या काळे, पुरंदरे, बेडेकरांसारख्या लेखकांची मांडणी अनेक जागी सत्याचा अपलाप करते. पण आपण त्याची पुराव्यानिशी चिकित्सा करणं, त्यांच्या विचाराला विचारानंच उत्तर देणं हाच योग्य मार्ग आहे. तथ्यनिष्ठ, अभिनिवेशरहित आणि समाजाच्या भल्याचा विचार मांडणाऱ्या इतिहासलेखनाचे प्रयत्न करत राहण्याची आवश्यकता या निमित्तानं अधोरेखित होत आहे.

श्रद्धा कुंभोजकर, या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभाग प्रमुख आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0