पक्ष्यांच्या प्रजाती लुप्त होण्याचा दर पूर्वीपेक्षा शंभर पट

पक्ष्यांच्या प्रजाती लुप्त होण्याचा दर पूर्वीपेक्षा शंभर पट

स्पिक्स मकावची वन्य प्रजाती नष्ट झाली आहे. ब्राझिलमधल्या संवर्धन कार्यक्रमात त्या प्रजातीचे शेवटचे ७० वगैरे पक्षी शिल्लक आहेत.

प्रांजलीचा मित्र वुटवुट
चांदवा
गुपित महाधनेशाचे

संपूर्ण प्रजाती नष्ट होणे हे तसे सामान्य आहे. पृथ्वीवर जीवन अवतरल्यापासून आजवर अनेक प्रजाती निर्माण झाल्या, टिकल्या, आणि नष्ट झाल्या. मात्र, नष्ट होणाऱ्या प्रजातींची संख्या आणि त्या नष्ट होण्याचा दर खूप वेगाने वाढत चालला आहे.

आमच्या अलिकडच्या कामातून दिसून आले आहे, की प्रजाती नष्ट होण्याचा दर पूर्वी अंदाज केला होता त्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे – किमान पक्ष्यांमध्ये तरी. त्यातल्या त्यात समाधानाची बाब ही, की अलिकडच्या संवर्धन कार्यक्रमांमुळे हा दर बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे.

जुने दर

अनेक दशके, एखादी प्रजाती पृथ्वीवर किती काळ होती हे समजून घेण्यासाठी तज्ञ जीवाश्मांचा वापर करत आले आहेत. एखाद्या नवीन प्रजातीचे जीवाश्म सापडल्यानंतर ती प्रजाती कधी उत्क्रांत झाली असू शकेल याचा किमान अंदाज वर्तवता येतो. त्यानंतरच्या काळातले असे जीवाश्म मिळत नसेल, तर नामशेष होण्याचा संभाव्य काळही सांगता येतो.

जरी या पद्धती तितक्याशा अचूक नसल्या तरी संशोधकांनी असा अंदाज वर्तवला आहे की पृष्ठवंशीय प्रजातींचा सरासरी जीवनकाल एक ते तीन दशलक्ष वर्षे असतो. अनेक प्रजाती या श्रेणीच्या खालच्या टोकाला असतात तर काही प्रजाती अनेक दशलक्ष वर्षे अधिक टिकतात. तुलना करायची, तर आपली प्रजाती, होमो सेपियन्स, ५००,००० वर्षांपेक्षा कमी काळ पृथ्वीवर आहे.

अशा अंदाजांची तुलना सध्या जे काही होत आहे त्याच्याशी करता येते. संवर्धन जीवशास्त्रज्ञ नामशेष होण्याच्या ऐतिहासिक, दस्तावेजित प्रक्रियेवरून सध्याच्या नामशेष होण्याच्या दराचा अंदाज वर्तवतात. उदा. १५०० सालापासून – म्हणजे कोलंबस अमेरिकेत आला त्या काळापासून जगभरातील १०,००० पक्ष्यांच्या प्रजातींपैकी साधारण १८७ प्रजाती नामशेष झाल्या आहेत.

जीवाश्म प्रजातीच्या सरासरी कालावधीच्या आधारे काही सोपे गणित केले असता असे दिसते की १५०० सालापासून केवळ दोन ते पाच पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट व्हायला हव्या होत्या. जर एखाद्या पक्ष्याची प्रजाती नामशेष होण्यापूर्वी तीन दशलक्ष वर्षे टिकेल असे जीवाश्म डेटावरून दिसत असेल, तर १५०० सालात अजूनही जिवंत असणारी प्रजाती किमान ३०,००० वर्षे तरी टिकायला हवी.

अशा काही गणितांवरून या विधानाची पुष्टी होते की आपण “सहाव्या मोठ्या नामशेषीकरणाकडे” चाललो आहेत. दीर्घकालच्या सरासरीपेक्षा नामशेषीकरणाचा दर मोठ्या प्रमाणात जास्त असतो अशा वेळा भूतकाळात येऊन गेल्या आहेत.

मात्र, मागच्या काही शतकांमधील डेटाच्या आधारे उच्च ऐतिहासिक नामशेषीकरण दराचा अंदाज वर्तवणे उपयुक्त ठरणार नाही. सध्याच्या दराचा अंदाज वर्तवण्यासाठी जुन्या ऐतिहासिक दरांचा आधार घेणे हे १९२० च्या मॉडेल टी फोर्ड्सच्या कार अपघातांच्या डेटाच्या आधारे २०२० च्या कार अपघातांचा अंदाज करण्यासारखे होईल. १०० वर्षांपूर्वीपेक्षा आज कितीतरी जास्त संख्येने आणि कितीतरी जास्त वेगाने कार रस्त्यावरून फिरत असतात. मात्र १९२० च्या तुलनेत आज कारमध्ये एअरबॅग आणि इतर सुरक्षा वैशिष्ट्येही जास्त असतात.

इतिहासात पक्ष्यांचे जवळजवळ ८०% नामशेषीकरण हे हवाई, मादागास्कर, आणि न्यू झीलँड सारख्या सागरी बेटांवर झाले आहे, आणि अनेकदा ते आपण अविचारीपणे तिथे उंदीर आणि साप घेऊन गेल्यामुळे झाले आहे. आणि एअरबॅगसारखेच, आता आपण मोठ्या प्रमाणात सक्रियरित्या संवर्धनही करण्याचा प्रयत्न करत आहोत.

नवीन दर

पूर्वीचीच कारणमीमांसा वापरून आम्ही स्थितीमध्ये बदल होणाऱ्या अनेक प्रजातींचा अभ्यास केला. आम्ही इंटरनॅशनल युनियन फॉर द काँझर्वेशन ऑफ नेचर या संस्थेच्या रेड लिस्टचा वापर आमच्या अभ्यासासाठी केला. रेड लिस्टमध्ये धोक्याच्या संभाव्यतेच्या आधारे प्रजातींचे सहा वर्गांमध्ये वर्गीकरण केले आहे. सर्वात कमी धोका असलेल्या (२०१६ मध्ये ८७१४ प्रजाती) प्रजातींपासून ते आत्यंतिक धोका (२२२ प्रजाती) आणि वन्य स्वरूपातील प्रजाती नामशेष (पाच प्रजाती) अशी ती यादी आहे.

आमच्या अभ्यासानुसार प्रजातींची मोठी संख्या धोक्याच्या यादीत आणखी वर गेली आहे. म्हणजेच त्यांना पूर्वी नामशेष होण्याचा जितका धोका होता त्यापेक्षा आता जास्त धोका आहे. त्यामुळे नामशेषीकरणाचा सरासरी दर उच्च आहे. रेड लिस्ट संख्यांच्या आधारे, सध्या जिवंत असलेल्या प्रजातींचे जीवनमान केवळ ५,००० वर्षे आहे. हे ऐतिहासिक दराशी तुलना केली तर सहापट वाईट आहे, आणि जीवाश्मांवरून गणन केलेल्या सरासरी नामशेषीकरण दराचा विचार करता शेकडो पटीने वाईट आहे.

त्यातल्या त्यात समाधानाची बाब

गेल्या काही काळापासून संवर्धनाचे जे काही प्रयत्न चालू आहेत त्यांचा नामशेषीकरणाच्या दरावर सकारात्मक परिणाम होत असल्याचेही आम्हाला दिसून आले. संवर्धनाचे हे प्रयत्न होत नसते, तर जीवनमान ५००० वर्षांपेक्षाही कमी म्हणजे सुमारे ३,००० वर्षे इतके कमी झाले असते.

संवर्धनाच्या जोरदार प्रयत्नांमुळे आत्यंतिक धोक्यात आलेल्या प्रजातींची स्थिती सुधारण्याची शक्यता वन्य स्वरूपात नामशेष झालेल्या प्रजातींच्या तुलनेत दुप्पट आहे. म्हणजेच संवर्धनाच्या कामाचा उपयोग होत असल्याचाच हा पुरावा आहे.

नामशेषीकरण टाळण्यासाठीची किंमत

हे एक महत्त्वाचे आव्हान आहे. आपण नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींना तिथून परत आणू शकतो हे तर स्पष्ट आहे आणि अनेक देश अशा प्रकारचे अखेरचे प्रयत्न करत आहेत.

पण आपल्याला हेही माहीत आहे, की असे शेवटच्या क्षणी प्रयत्न करण्याची किंमत जास्त असते. उदा., ब्रिटिश कोलंबियामध्ये शेवटचे काही कारिबू वाचवण्यासाठी सरकारने जवळजवळ ३० दशलक्ष डॉलर तरतूद केली आहे. खरे तर असे शेवटच्या क्षणी प्रयत्न करण्याची वेळ येणे आवश्यक नाही. आपल्याला एखाद्या प्रजातीला वाचवायचे असेल तर आपण अगोदरच सुरुवात केली पाहिजे. म्हणजेच ज्या प्रजाती सध्या आत्यंतिक धोक्यात आलेल्या नाहीत त्यांच्याकडेही आपण अधिक लक्ष दिले पाहिजे.

आपण आपल्याला ज्या प्रजाती अजूनही फारशा धोक्यात आलेल्या नाहीत किंवा थोड्या धोक्यात आलेल्या आहेत त्यांच्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न करायला हवेत. लक्षात घ्या आधीच काळजी घेतली तर पुढचा धोका टळू शकतो.

अर्नी मूअर्स हे सायमन फ्रेझर विद्यापीठात बायोडायव्हर्सिटी, फिलोजेनी अँड ईव्होल्यूशनचे प्राध्यापक आहेत.

हा लेख क्रिएटिव्ह कॉमन्स लायसेन्सच्या अंतर्गत The Conversationमधून पुनर्प्रकाशित करण्यात आला. मूळ लेख येथे वाचा.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: