तणावांचा विसर पाडणारा छंदः पक्षीनिरीक्षण

तणावांचा विसर पाडणारा छंदः पक्षीनिरीक्षण

कोविड-१९चा विळखा माणसांच्या जगाभोवती घट्ट व्हायला सुरूवात झालेली असताना सगळीकडे असलेल्या अनिश्चिततेच्या, धास्तीच्या वातावरणात एका घरट्यातल्या पिल्लाची ही प्रगती पाहणं, ते उडायला लागताना पाहायला मिळणं हे नुसतं आनंददायीच नाही, तर आशादायीही होतं.

नायगाव बीडीडी चाळ लाभार्थींना ५०० चौ. फुटांचे घर
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित
अब्रूनुकसानीच्या खटल्यातून प्रिया रामानी निर्दोष मुक्त

१५ एप्रिल २०२०. सकाळी उठल्यावर घरातली नेहमीची कामं आवरताना सवयीने गॅलरीबाहेर दिसणार्‍या नारळाच्या झाडांवर नजर जात होती. पलीकडच्या झाडावर बसलेली घार अंमळ जास्तच वेळ तिथे बसून आहे आणि थोडी लहानही दिसतेय असा विचार मनात येताच चमकून मी अलीकडच्या झाडावरच्या घारीच्या घरट्याकडे निरखून पाहिलं. दुर्बिणीतून पाहताच खात्री झाली की घरटं रिकामं आहे आणि पलीकडच्या झाडावर बसलंय ते घारीचं पिल्लू आहे! अखेर त्या सुप्रभाती पिल्लाने घरटं सोडून उडण्याचं धाडस केलं होतं तर! मनातल्या मनात मी एक उडीच मारली. ते पिल्लू जन्माला आल्या दिवसापासून गेला दीड महिना त्याची प्रगती मी निरखत होते. गॅलरीसमोरून जाता-येता सतत मी त्या घरट्याकडे नजर टाकत असायचे, काही हालचाल दिसली की, लगेच दुर्बीण घेऊन पहायचे, कॅमेरा घेऊन फोटो किंवा व्हिडिओ घ्यायचे. आकाशात तशा बर्‍याच घारी उडताना दिसतात. पण या जोडीतल्या घारींना मी आता इतर घारींहून वेगळं ओळखू लागले होते. घरट्यातल्या पिल्लासाठी खाणं शोधून आणणं आणि पिल्लाला ते भरवणं यात त्या आईबाबांचा पूर्ण दिवस खर्च होत असे. एक शिक्रा या काळात जवळजवळ रोज जवळच्या एखाद्या झाडावर बसून ओरडत बसायचा. कदाचित आपल्या ‘हद्दीत’ घारीने घरटं बांधल्याचा निषेध तो व्यक्त करत असावा.  पिल्लू अगदी लहान होतं तेव्हा खाण्यासाठी उठण्याव्यतिरिक्त फारशी हालचाल करत नसे. जसजसं ते मोठं होऊ लागलं तसतशा त्याच्या घरट्यातल्या हालचाली वाढू लागल्या. नंतर नंतर ते ऊन खायला घरट्याच्या टोकावर येऊन बसू लागलं. एकदा संध्याकाळी ते पंख पसरून, मान टाकून घरट्याच्या टोकाशी निपचित पडलेलं दिसलं आणि मला काळजी वाटायला लागली. पण बहुतेक पंखांना सगळीकडे नीट ऊन लागण्यासाठी ते तसं बसलं असणार. अर्ध्यापाऊण तासानंतर ते उठून नेहमीसारखं बसलं आणि मला हायसं वाटलं. काही दिवसांनी ते घरट्याबाहेर येऊन दुसर्‍या फांदीवरही जाऊन बसू लागलं. आकाराने ते आता चांगल्यापैकी मोठं दिसू लागलं होतं. कधी एकदा ते उडायला लागतं याची अधीरतेने मी वाट पहात होते. आज अखेर ती प्रतीक्षा संपली होती! कोविड-१९चा विळखा माणसांच्या जगाभोवती घट्ट व्हायला सुरूवात झालेली असताना सगळीकडे असलेल्या अनिश्चिततेच्या, धास्तीच्या वातावरणात एका घरट्यातल्या पिल्लाची ही प्रगती पाहणं, ते उडायला लागताना पाहायला मिळणं हे नुसतं आनंददायीच नाही, तर आशादायीही होतं.

आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात ताणतणावाचे कमीअधिक प्रसंग येतच असतात. पण ते सामान्यतः वैयक्तिक असतात. घरातलं एखादं आजारपण, आर्थिक अडचण, कामासंबंधित अडचणी, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू अशा कारणांमुळे आपण तणावाखाली असलो, तर जवळच्या मित्रमैत्रिणींशी, नातेवाईकांशी बोलून ताण कमी करता येतो, कधी त्यामुळे अडचणींमधून मार्गही निघतो. पण कोविडमुळे निर्माण झालेली परिस्थिती मात्र अभूतपूर्व होती आणि आहे. सुरुवातीला या आजाराबद्दल असणारी अपुरी माहिती आणि त्यामुळे निर्माण झालेली भीती, तज्ज्ञांकडून व्यक्त होणारी मतमतांतरं या सगळ्यामुळे एक अनिश्चितता आपण अनुभवली. माहितीचा महापूर आलेला असला तरी त्यातलं चूक काय आणि बरोबर काय हेही कळेनासं झालं होतं. टाळेबंदीमुळे ज्यांचे रोजगार धोक्यात आले त्यांच्याबद्दल, शेकडो-‍हजारो किलोमीटर अंतर चालत पार करायला निघालेल्या स्थलांतरित कष्टकर्‍यांबद्दल कितीही सहानुभूती वाटली, तरी आर्थिक मदत करण्यापलीकडे आपण त्यांच्यासाठी फारसं काही करू शकत नाही या जाणिवेमुळे एक अगतिकताही वाटत होती. हे सगळं कधी संपणार हा प्रश्न तेव्हाच पडला खरा, पण त्या प्रश्नाचं नेमकं उत्तर मात्र अजूनही सांगता येत नाही. कोविडच्या दुस‍र्‍या लाटेमुळे तर आपल्यापैकी प्रत्येकाने कुणी ना कुणी ओळखीचं, नात्यातलं माणूस गमावलं आहे. या परिस्थितीत कुणाशी तरी बोलून स्वतःचा ताण कमी करणं शक्य होतंच असं नाही, कारण हा तणाव सार्वत्रिक असतो. सतत त्याच त्याच विषयावर बोलून ताण कमी होण्यापेक्षा वाढल्याचाही अनुभव येतो.

अशा वेळी मनाला मोठा आधार मिळतो तो छंदांचा. छंदांमध्ये मन छान रमतं. काळज्या, ताणतणाव यांचा काही काळापुरता विसर तर पडतोच, पण निसर्गनिरीक्षण, पक्षीनिरीक्षण करताना एका पूर्ण वेगळ्याच जगात गेल्यासारखं वाटतं. कधी साळुंक्यांचा आणि बुलबुलांचा कलकलाट अचानक कानांवर येतो आणि नीट शोधलं तर एखाद्या फांदीवर बसलेला शिक्रा दिसतो आणि कलकलाटाचं कारण कळतं. घोळक्याने विजेच्या तारांवर बसून एकमेकींशी लगट करणार्‍या मुनिया पावसाळा सुरू झाल्यावर घरटं बांधण्यासाठी चोचीत गवताची लांब पाती घेऊन उडताना दिसायला लागल्या की त्यांचा गृहस्थाश्रम सुरू झाल्याची जाणीव होते. कधी शिक्र्याचा, घारीचा पाठलाग करून त्यांना हुसकावून लावणारा हिकमती कोतवाल पक्षी दिसतो आणि त्याच्या धिटाईचं कौतुक वाटल्याशिवाय राहात नाही. फांदीवर शेजारी एखादा मेलेला उंदीर ठेवून साद घालणारी घार पाहिली की लक्षात येतं, हा चविष्ट नजराणा संभाव्य जोडीदाराला खूष करण्यासाठी असणार! तारेवर बसलेला वेडा राघू अचानक हवेत झेप घेतो आणि वेगाने गिरकी घेत परत तारेवर येऊन बसतो. निरखून पाहिलं की त्याची कमाई दिसते, म्हणजे चोचीत धरलेला एखादा किडा!

गेली काही वर्षं मला हा पक्षीनिरीक्षणाचा छंद लागला आहे. खास पक्षी पाहण्यासाठी म्हणून छोट्यामोठ्या सहलींना मी जातेच, पण शहरात राहूनसुद्धा अवतीभवती दिसणारे पक्षी शोधण्याची सवय लागली आहे. आमचं बंगळूर हे उद्यानांचं आणि तळ्यांचं शहर. आमच्या घराच्याही आसपास तीनचार बागा आणि तलाव आहेत. तिथे गेल्यावर फुलटोच्या, सूर्यपक्षी, वल्गुली, राखी वटवट्या, खंड्या, शराटी, चित्रबलाक, विविध बगळे, पेलिकन, तांबट, हळद्या, दयाळ असे कितीतरी पक्षी दिसतात. कोविडमुळे आणि टाळेबंदीमुळे माझं बाहेर फिरायला जाणं जवळजवळ बंद झालं आणि या मोठ्या आनंदाला आपण मुकणार की काय असा विचार करून मन खट्टूही झालं. पण त्याच वेळी लक्षात आलं की अगदी आपल्या गच्चीवरूनही बरेच पक्षी दिसतात की ! गच्चीवरून झाडांचे शेंडेही दिसत असल्यामुळे एरवी झाडासमोर उभं राहून जे पक्षी सहजासहजी दिसत नाहीत, तेही गच्चीवरून दिसतात. आमच्या सोसायटीच्या समोरच्या बाजूला टॅबेबुइया, गुलमोहोर, तामण, सिंगापूर चेरी अशी झाडं आहेत आणि मागच्या बाजूला झुडपं, गवताळ मैदान आहे. तिथेच शेजारी थोडा पाणथळ भागही आहे. त्यामुळे तिथे खंड्या, शराटी, भुरे बगळे, कधी लाजरी पाणकोंबडी असे पक्षी दर्शन देतात, तर टॅबेबुइयाच्या झाडावर तांबट आणि सूर्यपक्षी, सिंगापूर चेरीच्या झाडावर फुलटोच्या हे पक्षी हमखास दिसतात. अर्थात हे सगळे पक्षी वर्षभर नाही दिसत. विणीच्या हंगामात, प्रियाराधनाच्या काळात संभाव्य जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी सुरेल आवाजात साद घालण्यामुळे, आकर्षक रंगाची पिसं फुटल्यामुळे काही पक्षी सहज नजरेत भरतात. हंगामानुसार पक्ष्यांचं वर्तनही वेगवेगळं असतं. घरटं बांधून पिल्लू जन्माला येऊन ते उडायला लागेपर्यंत घारी आक्रमक असतात. ज्या झाडावर घरटं आहे, त्या झाडावर दुसर्‍या कुठल्याही पक्ष्याला बसू देत नाहीत. इतकंच नाही, तर एकदा मी गच्चीवर जाऊन घारीचे आणि शिक्र्याचे फोटो घेण्याचा प्रयत्न करत असताना जोडीतली दुसरी घार माझ्या नकळत माझ्या मागून अगदी खाली उडत आली आणि माझ्या डोक्यावर पंजा घासत पुढे उडत निघून गेली. घ्यायचा तो धडा मी घेतला आणि घरातून जमेल तेवढंच निरीक्षण करायचं ठरवलं! एकदा पिल्लू उडायला लागल्यावर मात्र या घारी स्वभावाने परत सौम्य होतात.

पक्षी बघताना मिळणार्‍या निखळ आनंदामुळे हा छंद मला लागला खरा, पण कोविड साथीच्या काळात मन तणावमुक्त ठेवायलाही मला या छंदाने खूप मदत केली. या काळात चक्रीवादळं, पूर अशी मोठी संकटंही आमच्या कोकणावर आली. अशा वेळी आप्तजनांच्या काळजीने, एक प्रकारच्या हतबलतेने मन उदास झालेलं असताना थोडा वेळ पक्ष्यांच्या जगात जाऊन आल्यावर नव्या दिवसाची नवी आशा दिसते. कविवर्य बा. सी. मर्ढेकरांच्या शब्दांत सांगायचं तर

‘अजून येतो वास फुलांना, अजून माती लाल चमकते’ असा एक दिलासा मिळतो!

विशाखा पेंडसे-पंढरपुरे, इंजिनिअर असून पक्षीनिरीक्षण हा त्यांचा छंद आहे.

Naturenotes

ही मालिका ‘नेचर कजर्वेशन फाउंडेशन‘ द्वारे राबवलेल्या ‘नेचर कम्युनिकेशन्स‘ या कार्यक्रमाचा भाग आहे. सर्व भारतीय भाषांतून निसर्गविषयक लेखनास प्रोत्साहन मिळावे हा या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. पक्षी आणि निसर्गाविषयी लिहण्याची तुमची इच्छा असल्यास हा फॉर्म भरा.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0