एसआयटी त्यांच्या विरोधातील बलात्काराच्या गुन्ह्याचा नव्हे तर अपहरण आणि खंडणीच्या गुन्ह्यांचा तपास करत आहे.
नवी दिल्ली: विशेष तपास पथकाने माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते चिन्मयानंद यांना त्यांच्यावरील अपहरणाच्या आरोपांचा तपास करण्यासाठी त्यांना अटक केली आहे. शहाजहानपूर येथील, ते संचालक असलेल्या एका विद्यापीठातील २३ वर्षीय तरुणीने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेला असला तरीही अजून त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
बुधवारी एसआयटीने म्हटले होते, की ‘ठोस पुरावा’ हाती लागल्यानंतरच अटक केली जाईल. “प्रकरणाचा तपास चालू आहे आणि ठोस पुराव्याच्या आधारावरच अटक केली जाईल,” असे पोलिस महानिरीक्षक नवीन अरोरा यांनी म्हटल्याचे हिंदुस्तान टाईम्सने उद्धृत केले आहे.
आत्तापर्यंत ३० पेक्षा अधिक लोकांची एसआयटीने चौकशी केली आहे, ज्यामध्ये महिलेचे सहाध्यायी आणि तिच्या वडिलांचा समावेश आहे. चिन्मयानंद यांची १२ सप्टेंबर रोजी आठ तास चौकशी करण्यात आली.
चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल न झाल्याबद्दल त्यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने चीड व्यक्त केली होती. ही महिला कायद्याची विद्यार्थिनी असून, तिची साक्ष विचारात न घेतल्यास ती स्वतःला जाळून घेईल असेही ती म्हणाली होती.
एसआयटी दोन प्रकरणांची चौकशी करत आहे – एकामध्ये महिलेच्या वडिलांनी, तिच्या अपहरणाचा गुन्हा चिन्मयानंद यांच्यावर दाखल केला आहे. दुसरा गुन्हा चिन्मयानंद यांना धमकी दिल्याचा आणि त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल एका अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेने सोमवारी मॅजिस्ट्रेटच्या समोर तिचे निवेदन दिले. निवेदन रेकॉर्ड केल्यानंतर ती म्हणाली, “मी मॅजिस्ट्रेटना मी नवी दिल्ली येथे दिलेल्या बलात्काराच्या तक्रारीबद्दल, माझा होस्टेल रूममधून हरवलेला चष्मा आणि चिपबद्दल सांगितले आहे. चिन्मयानंदच्या खोलीतून हटवलेले अंथरूण आणि दारूच्या बाटल्या यांच्याबद्दलही माहिती दिली आहे.”
तिच्या आरोपांचे समर्थन करणारे ४३ व्हिडिओ तिने एसआयटीला दिले आहेत असेही समजते.
ऑगस्टमध्ये महिलेने एक व्हिडिओ प्रसारित केला ज्यामध्ये तिने चिन्मयानंदवर बलात्काराचा आरोप केला होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना तिला मदत करण्याचे आवाहन केले होते. चिन्मयानंद तिला मारण्याची धमकी देत असल्याचेही तिने सांगितले होते.
“संत समाजातला मोठा नेता असलेल्या या माणसाने अनेक मुलींची आयुष्ये बरबाद केली आहेत आणि तो मला मारण्याची धमकी देत आहे. मी मोदीजी आणि योगीजींना आवाहन करत आहे, कृपया मला मदत करा. त्याने माझ्या कुटुंबालाही मारण्याची धमकी दिली आहे. मी काय प्रसंगातून जात आहे ते केवळ मलाच माहित आहे…मोदीजी कृपया मला मदत करा, तो संन्यासी आहे आणि तो धमकी देत आहे की पोलिस, डीएम आणि बाकी सगळे त्याच्या बाजूने आहेत, आणि कोणीही त्याचे काही नुकसान करू शकत नाही. मी तुम्हा सर्वांकडे न्याय मागत आहे,” असे तिने व्हिडिओमध्ये म्हटले होते.
COMMENTS