भाजपच्या एकाच म्यानात दोन तलवारी

भाजपच्या एकाच म्यानात दोन तलवारी

भाजपला राज्यात आणखी प्रबळ व्हायचे असेल तर ब्राह्मणी चेहरा असा ठपका पुसून काढून बहुजन समाज अथवा मोठा वर्ग असलेल्या मराठा समाजाच्या नेत्याकडे सूत्रे देणे गरजेचे आहे.

भाजप नेते चिन्मयानंद यांना अटक
निलंबित खासदारांच्या मुद्द्यावरून विरोधक रस्त्यावर
हलाल मांसावर बंदी हवीः भाजप आमदाराची मागणी

राजकारणात कोणी कोणाचा कायमस्वरूपी मित्र अथवा शत्रू अथवा सखा असूच शकत नाही. घटकेत आणि सोयीनुसार मित्र असणारे अचानक शत्रू होऊन आपल्या मित्रावर तुटून पडतात. मग तो मित्र ही सोयीस्कर शत्रूत्व ठेवत शत्रूमधील मित्राला बळ देण्याचे काम करतो. हा अंक सध्या महाराष्ट्रातील राजकारणात सुरू आहे. भाजपमध्ये भविष्यकालीन राज्य नेतृत्व कोणाकडे जाणार याचा फैसला जणू या महानाट्याची नांदी ठरणारा आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रति झालेले बेताल वक्तव्य आणि त्यातून झालेल्या अटक नाट्य आणि राडा तसेच शिवसेना आणि भाजप यामध्ये झालेल्या तीव्र संघर्षात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा कंपू हा फारसा आक्रमक राहिला नाही. तर त्याच वेळी आशिष शेलार, विनोद तावडे, मुनगंटीवार यांनी मात्र राणे यांची तळी जोरदारपणे उचलून धरली होती. विशेष म्हणजे एकेकाळी फडणवीस यांच्या खास गोटामधील समजले जाणाऱ्या प्रसाद लाड यांची राणे प्रति अचानक उफाळून आलेली निष्ठा ही अचंबित करणारी होती. शेलार, मुंडे, तावडे, मुनगंटीवार ही मंडळी फडणवीस विरोधी गटातील मानली जातात. पक्षांतर्गत गटबाजीमध्ये फडणवीस यांनी आपला खुंटा भक्कम करताना पक्षांतर्गत अनेक प्रबळ नेत्यांना अस्तित्वहीन केले आहे. आपला गट अढळ आणि ताकदवान होण्यासाठी जे जे शक्य ते करण्यात फडणवीस मागे राहिलेले नाहीत. राज्यात पक्षाचा एकमेव बाहुबली नेता आहे हे सिद्ध करण्यात ते यशस्वी झाले.

राजकारणातही अनेक लाटा येतात आणि जातात. माजी मुख्यमंत्री आणि आक्रमक स्वभाव अशी ओळख असलेल्या नारायण राणे यांचा भाजप मधील पक्षप्रवेश हा फडणवीस यांच्यासाठी धोक्याचाच होता. त्यामुळे राणे यांचा पक्षप्रवेश होऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पण दिल्लीतील पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांच्या आदेशापुढे काहीही न चालल्याने फडणवीस यांना एक पाऊल मागे घ्यावे लागले. एकेकाळी भर विधान सभेत राणे यांच्या कारनाम्याची लक्तरे फाडूनही राणे यांना सन्मानाने दिल्लीला घेऊन जाण्याची वेळ फडणवीस यांच्यावर आली होती.

राणे यांचा पूर्व इतिहास पाहिला तर उत्तम प्रशासक म्हणून मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांच्याकडे पाहिले गेले आहे. आक्रमक भाषा आणि स्वभाव असला तरी राज्यातील सर्व प्रश्ने आणि समस्या याची अचूक जाण त्यांना आहे. मूळचा शिवसैनिक म्हणून असलेला पिंड अद्यापही कायम आहे. त्यातच मराठा समाजातील कोकण विभागातून आलेला एक मोठा आणि शक्तिशाली नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले आहे. त्यामुळेच मराठा आरक्षणासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून अहवाल तयार करण्यात आला होता. काँग्रेसमध्ये अनेक वर्षे मुख्यमंत्रीपदाच्या आश्वासनावर झुलत ठेवल्याने राणे यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. वास्तविक राणे यांच्या भाजप प्रवेशाकडे अनेक बाजूंनी पाहिले असता एक लक्षात येते की फडणवीस यांना पक्षांतर्गत टक्कर देण्याची सोय तर वरिष्ठ नेत्यांनी राणे यांच्या रूपाने केली आहे का असा प्रश्न निर्माण होतो.

भाजपला राज्यात आणखी प्रबळ व्हायचे असेल तर ब्राह्मणी चेहरा असा ठपका पुसून काढून बहुजन समाज अथवा मोठा वर्ग असलेल्या मराठा समाजाच्या नेत्याकडे सूत्रे देणे गरजेचे आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणामुळे सध्या मोठ्या प्रमाणात राजकीय ध्रुवीकरण सुरू आहे. भाजपमध्ये असलेल्या ओबीसी तसेच मराठा समाजातील जुन्या नेत्यांचे सद्यस्थितीत राजकीय वजन फारसे नाही अथवा राज्य चालविण्याची धमकही त्यांच्याकडे नाही. त्यामुळे आयात झालेल्या राणे यांच्या सारख्या प्रबळ नेत्याकडे भविष्यात राज्याची धुरा देण्यात येऊ शकते. सध्या राणे हे केंद्रात मंत्री असले तरी त्यांचा जीव मात्र राज्यात अडकलेला आहे. हे त्यांच्या प्रत्येक कृती आणि विधानातून जाणवते. अर्थात राज्याचे नेतृत्व करण्याची इच्छा सर्वांनाच असते. त्याला राणे अपवाद ठरत नाहीत.

केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेऊन दिल्लीमध्ये काम करत असताना राणे यांनी राज्याकडे मला एक जबाबदार नेता म्हणून पाहावेच लागेल असे वक्तव्य केले होते. याचा सरळ अर्थ असा की, भविष्यात मुख्यमंत्री म्हणून काम करायला जास्त आवडेल असा होतो का या प्रश्नाला राणे यांनी उत्तर देताना केवळ स्मित हास्य केले होते. राणे यांची महत्त्वाकांक्षा आणि एकूणच राजकीय अनुभव हा फडणवीस यांच्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळेच फडणवीस आणि त्यांच्या गोटातील खास लोक हे गेल्या काही दिवसांपासून राणे अटकप्रकरणी फारसे सक्रिय दिसले नाहीत. विधान परिषद विरोधी पक्षनेते आणि फडणवीस यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेल्या प्रवीण दरेकर यांनीही यावेळी फारसा आक्रस्ताळेपणा केला नाही. गिरीश महाजन हेही तसे शांतच राहिले तर प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रकात पाटील यांनी राणे यांना पाठबळ देताना अप्रत्यक्ष फडणवीस यांना चेक मेट करण्याचा प्रयत्न केला. यातील गंमतीचा भाग म्हणजे उठसूट राजभवनची पायधूळ झाडण्याऱ्या फडणवीस यांनी यावेळी कोश्यारी यांची भेट घेण्याचे टाळले. यावेळी आशिष शेलार आणि मंडळींनी हे काम केले.

ओबीसी आरक्षणप्रश्नी सर्व पक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एकांतात १० ते १५ मिनिटे गुफ्तगू झाले. याबाबत खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये राणे नावाची लाट कशी थोपवायची याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. फडणवीस यांना कोणत्याही स्थितीत पक्षांतर्गत प्रबळ दावेदार नको असून दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना राणे ही ब्याद अजिबात नको आहे. मुंबई महापालिका हे या दोघांसाठी जरी प्रतिष्ठेचे असले तरी फडणवीस यांना त्यामध्ये नारायण राणे यांचा हस्तक्षेप अजिबात नको आहे. कारण राणे हे तिकीट वाटपात त्यांच्या लोकांना प्राधान्य देण्याचा मोठा धोका आहे. काँग्रेसमध्ये असताना राणे यांनी महापालिका निवडणुकीत आपल्या जवळच्या व्यक्तींना उमेदवारी दिली होती हा इतिहास आहे. त्यामुळेच दोघांचा ‘कॉमन’ शत्रू नेस्तनाबूत करण्यासाठी हे एकेकाळचे सख्खे मित्र एकत्र आले आहेत असा होरा राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. राणे यांनी अटक प्रकरणानंतर पुन्हा जन आशीर्वाद यात्रा सुरू केली असली तरी तिकडे जाण्याचे फडणवीस यांनी टाळले आहे. एरव्ही कुठेही जाण्यात अग्रेसर असलेले प्रवीण दरेकर हेही शांत बसून आहेत.

राणे अटक प्रकरणानंतर राज्यात एक ते दोन दिवस सेना आणि भाजप मध्ये मोठा राडा झाला. पण या राड्यात भाजपचे जुने जाणते कार्यकर्ते अपवादाने दिसले. शिवसेनेशी भिडण्यासाठी जी मंडळी होती ती राणे यांना मानणारी आणि स्वाभिमानी आघाडीचे कार्यकर्ते होते. मूळ आणि कट्टर भाजप कार्यकर्ता या पासून दूरच होता.

भाजपच्या राज्य नेतृत्वाच्या म्यानात फडणवीस आणि राणे या दोन धारदार तलवारी एकाच वेळी राहू शकणार का याचे उत्तर लवकरच दिसेल.

अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: