भाजप हा संपूर्ण भारताचा पक्ष नाही

भाजप हा संपूर्ण भारताचा पक्ष नाही

भाजप हा राष्ट्रीय पक्ष नसून केवळ हिंदूंचा पक्ष आहे. मोदी लाट ही राष्ट्रीय लाट नव्हती तर केवळ एका प्रामुख्याने हिंदूंची संख्या जास्त असणार्‍या भौगोलिक प्रदेशातील, महाराष्ट्र आणि गुजरातेतील होती. केरळ, तमिळनाडू, आंध्र, तेलंगणा, ओरिसा, पश्‍चिम बंगाल (१६४ जागांपेकी केवळ ६ जागा) आणि आसाम सोडल्यास ईशान्य भागात भाजपचे अजिबातच कुठलेही अस्तित्व नाही.

सर्व मुस्लिमांचे स्वागत करू, असे म्हणून दाखवा : अमित शाह
काश्मीर दडपशाही : आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा
जनमताची भाषा (लेखमालेतील भाग १)

पंतप्रधान मोदींनी १ एप्रिलच्या प्रचारात विधान केले, ‘काँग्रेस हिंदूंचा अपमान करत आहे, काँग्रेसनेते बहुसंख्यांक असणार्‍या (हिंदू) मतदारसंघापासून दूर जात आहेत आणि अल्पसंख्यांक मतदारसंघाकडे मोर्चा वळवत आहेत. आणि अगदी काँग्रेसचा स्वतःचा जातीय भाषणे अगर वक्तव्ये करण्याचा इतिहास विचारात घेतला तरीही त्यांनी असे म्हणणे फारच धक्कादायक आहे.’
आत्तापर्यंतच्या कुठल्याच पंतप्रधानांनी अशा रितीने बहुसंख्यांक धार्मिक समाजाला अल्पसंख्यांक धर्माच्याविरूद्ध उभे करणारी आणि राष्ट्राचे विभाजन करणारी वक्तव्ये केलेली नाहीत.
इतके असतानाही सत्ताधारी भारतीय जनता पक्ष नेहमीच राष्ट्रवादाचे उदात्तीकरण  करत आला आहे आणि ज्यांनी कुणी त्यांना विरोध केला त्यांना राष्ट्रदोही घोषित करण्यास किंवा पाकिस्तानात निघून जा सांगण्यास हे कथित राष्ट्रवादी मागेपुढे पाहत नाहीत.
मुख्य म्हणजे भाजपला जन्माला घालणाऱ्या हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनांनी चालवलेल्या हिंदुत्वाच्या चळवळीचा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात कुठलाच सहभाग नव्हता हे लक्षात घेतले तर हा प्रचंड विरोधाभास असल्याचे लक्षात येते. त्याहून प्रचंड विरोधाभास असा की काटेकोरपणे पाहिल्यास सध्याच्या काळात भाजप ना राष्ट्रीय पक्ष आहे ना राष्ट्रवादी – भारताच्या सर्व लोकसंख्येचे प्रतिनिधित्व भाजप करतच नाही!
भाजपची विचारधारा भारताच्या संविधानाच्या विरोधात का आहे याचे कारण म्हणजे भारत हा धर्मावर आधारित देश नाही. मात्र भाजपची विचारधारा धर्मावर आधारित आहे. त्यामुळेच भाजपमध्ये हिंदूंव्यतिरिक्त अन्य कोणालाही पक्षाचे नेतृत्व करता येत नाही किंवा त्या पक्षाच्यावतीने पंतप्रधान बनण्यास वाव नाही. मुस्लिम, शीख किंवा ख्रिश्‍चन कधीच त्या पक्षाचे भाग असू शकत नाहीत. त्यामुळेच भाजपचे सर्व पंतप्रधान आणि मुख्यमंत्री (काही महत्त्वाच्या राज्यांचे) हे हिंदूच आहेत. केवळ एक आरेएसेस प्रचारक जैन आहे, पण तसे पाहिले तर जैन धर्म हा बऱ्याच अंशी हिंदू परंपरेशीच जोडलेला आहे.
मात्र सत्तेच्या स्पर्धेत असणार्‍या दुसऱ्या राष्ट्रीय पक्षाबाबत – काँग्रेस बाबत – तसे नाही. १९८४ मध्ये शिखांच्या धडकी भरवणार्‍या हत्याकांडानंतरही काँग्रेसने शीख पंतप्रधान दिला आहे. लोकसंख्येत २ टक्क्यांहून कमी असणार्‍या समुदायातील व्यक्तीसत्तेच्या शीर्षस्थानी असणे ही जगाभरातील लोकशाहींमध्ये अत्यंत दुर्मिळ घटना आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसने मुस्लिम मुख्यमंत्रीही दिले आहेत. (जरी मुस्लिम लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून मुस्लिम खासदार, आमदारांची संख्या कमी असली तरी !)
अर्थातच काँग्रेसमध्येघराणेशाही आहे हे भाजपचे म्हणणे देखील खरे आहे. (खरे तर, मोदी सरकारमध्येही २४% घराणेशाहीदिसून येते) आणि एखाद्या पक्षाची वरिष्ठ पदे ही विशिष्ट घराण्यासाठी राखीव ठेवणे हे जर लोकशाहीविरोधी असेल तर एखाद्या पक्षाची वरिष्ठ पदे हिंदूंसाठी राखीव ठेवणेसुद्धा लोकशाहीविरोधीच नाही का? तुम्ही जर संपूर्ण राष्ट्राचे प्रतिनिधित्व करता तर भाजपाचे पंतप्रधान मुस्लिमांचे, शीखांचे किंवा इतर कुठल्या धर्माचे का असू शकत नाहीत?
केवळ हिंदुंचा पक्ष
वास्तविक पाहता भाजप हा मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करणारा मुस्लिम लीग किंवा शिखांचे प्रतिनिधित्व करणारा अकाली दल या पक्षांपेक्षा वेगळ नाही. या पक्षांमध्ये मुस्लिम किंवा शिखांव्यतिरिक्त अन्य कोणी प्रमुख बनू शकत नाहीत. मात्र भाजप, मुस्लिम लीग आणि अकाली दल यांच्यात एक फार महत्त्वाचा फरक आहे ते म्हणजे भाजप केवळ हिंदूंचा पक्ष असला तरीही तो स्वत:ला राष्ट्रीय पक्ष म्हणवून घेतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रेय- पीटीआय

पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रेय- पीटीआय

२०१४च्या लोकसभेच्या निवडणूकीत कुठलीही मुस्लिम व्यक्ती भाजपच्या तिकीटावर जिंकून आली नाही किंवा नुकत्याच झालेल्या उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत कुठल्याच मुस्लिम कार्यकर्त्याला भाजपचे तिकीट मिळाले नाही. गुजरातच्या मागील तीन विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र राहिले आहे.अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे अशा प्रकारे निवडणुकांमध्ये हिंदू सोडून इतरांवर बहिष्कार घातलेला दिसेल.
भाजपच्या मंत्र्यांपासून ते अगदी भाजपने नियुक्त केलेल्या राज्यपालांपर्यंत सर्वांनी सतत मुस्लिम हे नकोसे परके लोक आहेत अशी वक्तव्ये करत राहणे ही अगदी स्पष्टपणे घातक गोष्ट आहे. या सगळ्यांवर कडी म्हणजे एका केंद्रीय मंत्र्यांने राहुल गांधी हे मुस्लिम असल्याचे म्हटले आहे.
या सर्वांप्रमाणे मोंदींनीही हिंदूंचा पाठिंबा मिळवण्यासाठी काँग्रेस आणि राहुल गांधी हे अल्पसंख्यांकाचे कैवारी असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला आहे. मोदींचे भाषण देखील इतर मंत्र्यांच्या चालीवरच झाले आहे. (आणि योगायोगाने, मोदींच्या या प्रचाराच्या भाषणामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचा तसेच आचारसंहितेचा भंग झाला आहे. इतिहासात अशा प्रकारे ज्यांनी धर्मांच्या मुद्दयावरुन मत मिळवण्याचा प्रयत्न केला अशा अनेकांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आल्याची उदाहरणे आहेत.)
मुळात, भाजपने स्वत:ला सर्व हिंदूंचा पक्ष म्हणवून घेणे हे देखील एक कारस्थानच आहे. पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी (ओबीसी समाजातले) आणि राष्ट्रपतीपदी रामनाथ कोविंद यांच्यामुळे एक वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असला तरीही पूर्वी हा पक्ष जसा ब्राह्मण बनियांचा पक्ष म्हणून ओळखला जात होता, तेच चित्र आजही कायम आहे.
द प्रिंटच्या एका अभ्यासानुसार, भाजपमधील बहुतांश सदस्य उच्चजातीय आहेत. या अभ्यासानुसार, भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरच्या कार्यालयातील  ७५ टक्के पदाधिकारी, ६० टक्के राष्ट्रीय स्तरावरील कर्मचारी आणि राज्यस्तरीय संघटना सदस्य आणि जिल्हास्तरीय अध्यक्ष यांच्यापैकी ६५ टक्के हे सर्व जण उच्च जातीय आहेत. उत्तरप्रदेशच्या मंत्रालयातही ह्याच उच्च जातीयांचे वर्चस्व दिसते.
मोदी लाटे’चा खोटेपणा उघडकीस
जरी वरील तथ्यांनुसार भाजपचा राष्ट्रवाद आणि अगदी हिंदूंचा पक्ष ही ओळख यांना धक्का पोहोचत असला तरी या ठिकाणी आणखी एक बाब तितकीच विचारात घेण्यासारखी आहे, विशेषतः सध्याच्या नरेंद्र मोंदींच्या नेतृत्वाखाली असणार्‍या भाजपसरकारच्या अनुषंगाने! ती बाब म्हणजे, २०१४च्या भाजपच्या विजयाचा भौगोलिक परीघ, ज्याच्याकडे मोदींच्या लाटेमध्ये दुर्लक्ष झाले!
मोदी लाट ही राष्ट्रीय लाट नव्हती तर केवळ एका भौगोलिक प्रदेशातील लाट होती आणि ती ही प्रामुख्याने हिंदूंची संख्या जास्त असणार्‍या भागात आणि महाराष्ट्र व गुजरातेत. केरळ, तमिळनाडू, आंध्र, तेलंगणा, ओरिसा, पश्‍चिम बंगाल (१६४ जागांपेकी केवळ ६ जागा) आणि आसाम सोडल्यास ईशान्य  भागात भाजपचे अजिबातच कुठलेही अस्तित्व नाही. आणि हे सर्व भारताचे प्रमुख प्रदेश आहेत.
राजकीय अर्थशास्त्रज्ञ प्रविण चक्रवर्ती यांच्या विश्‍लेषणानुसार, गेल्या ४० वर्षांतील ११ लोकसभा निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या पक्षाने/युतीने हिंदी राज्यातील सरासरी ६० टक्के जागा जिंकल्या आणि इतर राज्यांतून ४० टक्के जागा जिंकल्या आहेत. २०१४ च्या निवडणुकीत भारताच्या इतिहासात पहिल्यांदा भाजप/एनडीएला हिंदी राज्यातून ८५ टक्के जागा मिळाल्या.
संसदेत, शासकीय कार्यवाहींमध्ये, शाळांमध्ये आणि युनायटेड नेशन्स मध्येहीहिंदीचा राष्ट्रीय भाषा म्हणून प्रचार करण्याच्या (खरे तर ती अनेक अधिकृत भाषांपैकी एक आहे) मोदी सरकारच्या प्रयत्नामुळे हे सरकार केवळ हिंदी भाषिक प्रदेश आणि हिंदूंसाठी आहे असा एक तार्किक अर्थ निघतो. त्यामुळेच मोदींचा भाजप जर दक्षिणेत, ओरिसा आणि पश्‍चिम बंगालमध्ये प्रभाव टाकू शकल तरच त्याला या निवडणुकीत भौगोलिक मर्यादा पार करता येतील.
केवळ धार्मिक बहुसंख्यांचे प्रतिनिधित्वकरणारा पक्ष कोणत्याही धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताकामध्ये असू शकत नाही. अर्थात, लोकशाहीमध्ये दबलेल्या जाती/धर्मांचे आणि अल्पसंख्यांकाचे गट असतात आणि त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी ते जाती-धर्माच्या आधारे राजकीय पक्ष तयार करतात. मात्र किमान भारतासारख्या देशात तरी बहुसंख्यांक धार्मिक समुदाय हा दबलेला गट नाही.
त्यामुळेच भाजपसारखा कुठला पक्ष एकाच धर्माचे प्रतिनिधित्व करत असेल तर तो हिंदूंचा पक्ष असू शकतो. मात्र तो राष्ट्रीय पक्ष असू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी  निस्संशयपणे पुन्हा तेच सिद्ध केले आहे.

निस्सीम मन्नाथुक्करन हे कॅनडा येथील डलहौसी विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विकास अभ्यास विभागाचे प्रमुख आहेत.

हा मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे.

अनुवाद : हिनाकौसर खान-पिंजार

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0