आयारामांमुळे बंगाल भाजपमध्ये नाराजी उसळली

आयारामांमुळे बंगाल भाजपमध्ये नाराजी उसळली

कोलकाताः विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर तृणमूल काँग्रेस, काँग्रेस, माकपमधून अनेक नेते व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यास सुरूवात केल्या

बंगालमध्ये भाजपच्या ५ रथयात्रा
अमर्त्य सेन विरुद्ध शांतिनिकेतन वाद चिघळला
ममता दिदींना विशेष पुरस्कार दिल्याने साहित्यिकांची पुरस्कार वापसी

कोलकाताः विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर तृणमूल काँग्रेस, काँग्रेस, माकपमधून अनेक नेते व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यास सुरूवात केल्याने मूळ भाजप कार्यकर्ते व नेते अस्वस्थ झाले आहेत. निवडणुका घोषित झाल्यानंतर अनेक पक्षांमधून भाजपकडे नेत्यांची, कार्यकर्त्यांची ओढ लागली आहे. या नेत्यांना तिकीट हवे असल्याने व आपल्या नेत्याला तिकीट मिळावे असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याने भाजपमध्ये अस्वस्थता व असंतोष पसरू लागला आहे.

सोमवारी व मंगळवारी ही अस्वस्थता दिसून आली. द. कोलकातास्थित हेस्टिंग येथील भाजपच्या कार्यालयात दिवसभर भाजपच्या नेत्यांनी निदर्शने केली. या कार्यकर्त्यांचा राग त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होता. तो इतका उफाळून आला की, पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय, राष्ट्रीय सरचिटणीस शिव प्रकाश व बराकपूरचे खासदार अर्जुन सिंह यांना कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाली. शेकडो कार्यकर्ते या आयाराम संस्कृतीच्या विरोधात निदर्शने करताना दिसत होते. या कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी नंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कोलकात्यात सोमवारी येणार होते पण त्यांचा अचानक दौरा बदल्याने ते आसाममध्ये गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी उत्पन्न झाली. अमित शहा येणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पक्षाने काही उमेदवारांच्या नावाची घोषणा केली त्यानंतर जुने भाजप कार्यकर्ते व पक्षात नव्याने सामील झालेले कार्यकर्ते यांच्यात वाद निर्माण झालेला दिसला. अनेक वर्षे पक्षात काम केलेल्यांना तिकिट मिळाल्याने नेते व कार्यकर्ते नाराज झाले होते. हा संताप राज्यात अनेक जिल्ह्यात दिसून आला. प्रत्येक जिल्ह्यातल्या भाजपच्या कार्यालयात संतप्त कार्यकर्त्यांनी तोडफोड सुरू केली. तृणमूलच्या अनेक नेत्यांना पक्षप्रवेश दिल्याने भाजपचे कार्यकर्ते प्रचंड नाराजी व्यक्त करत होते. ही नाराजी कोलकाता, हावडा, हुगळी, २४ परगणा जिल्ह्यात दिसून आली.

सिंगूर येथून चार वेळा विधानसभेवर निवडून गेलेले ८९ वर्षांचे तृणमूलचे आमदार रवींद्रनाथ भट्टाचार्य यांना पक्षाने तिकीट नाकारले. याचा राग येऊन भट्टाचार्य यांनी लगेच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाला दोन दिवस होतात तोच त्यांना भाजपने सिंगूर येथून तिकीट दिले. भाजपच्या या निर्णयावर स्थानिक कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले. पक्षाने आपलाच स्थानिक नेता भट्टाचार्य यांच्या ऐवजी उभा करावा अशी मागणी शेकडो कार्यकर्त्यांनी सुरू केली. कार्यकर्त्यांचा राग इतका वाढला होता की, मध्यप्रदेशचे शिक्षणमंत्री विश्वास सारंग व उ. प्रदेशमधून आलेले भाजपचे एक ज्येष्ठ नेते या दोघांना सिंगूर येथील अबुरबापूर येथील पक्ष कार्यालयात स्वतःला सुमारे ४ तास कोंडून घ्यावे लागले. भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी भट्टाचार्य यांच्या नावावर शिक्कामोर्तब असेल तर होणार्या परिणामाला पक्षाने सामोरे जावे अशीही धमकी दिली. पक्षाने ताबडतोब निर्णय बदलावा अशी त्यांची मागणी होती.

२०१९च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान तृणमूलचे एक ज्येष्ठ आमदार व कोलकाताचे महापौर सोवन चटर्जी यांनी भाजप प्रवेश केला होता. पण त्यांना यंदा तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. चटर्जी यांच्या जागी भाजपने चित्रपट अभिनेत्री पायल सरकार यांना तिकीट दिले होते. सरकार यांनी दोन दिवसांपूर्वीच भाजपप्रवेश केला होता. त्यांना लगेचच तिकीट दिल्याने दोन्ही बाजूचे कार्यकर्ते नाराज झाले. चटर्जी यांचे मित्र बैसाखी बंडोपाध्याय यांनीही दोन वर्षांपूर्वी भाजपप्रवेश केला होता. त्यांनाही भाजपने तिकीट नाकारले. त्यामुळे बंडोपाध्याय यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांना एक पत्र लिहून पक्षाच्या या निर्णयाने आपण अत्यंत दुखावले असून हा आपला अपमान असल्याची प्रतिक्रिया दिली.

भाजप कार्यकर्त्यांची नाराजी पंचला, उदयनारायणपूर व रायदिघी येथेही दिसून आली. येथे भाजपने तृणमूलच्या मोहित घाटी, शंतनू बापुनी यांना पक्ष प्रवेशानंतर लगेच तिकीट दिले.

बंगालच्या उत्तरेकडे अलिपूरदुआर येथेही भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. भाजपने केंद्रातले माजी आर्थिक सल्लागार अशोक लाहिरी यांना तिकीट दिले. या निर्णयावर भाजप कार्यकर्ते आश्चर्य व्यक्त करत होते. अलिपूरदुआरमध्ये लाहिरी यांना कोण ओळखतं असा सवाल कार्यकर्ते करत होते. हे कुठून उमेदवार आणले असा सवाल कार्यकर्ते करताना दिसत होते. भाजपने दोन दिवसांपूर्वी पक्षात सामील झालेले गोरखा मुक्ती मोर्चाचे बिशाल लामा यांनाही तिकीट दिले. यावरही भाजपचे कार्यकर्ते नाराज दिसून आले आहे. लामा यांच्याविरोधात भाजपने पूर्वी लढत दिली होती, त्यांना तिकीट दिले असते तर लामांचा पराभव शक्य होता, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. आता या निर्णयाची पर्वा आम्ही करणार नाही, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.

हुगळी येथील चिनसुरा मतदारसंघात वेगळेच चित्र दिसले. येथील सध्याच्या भाजपच्या लोकसभा खासदार लॉकेट चटर्जी यांना पक्षाने आमदारकी लढवावी असे निर्देश दिले. त्यावर स्थानिक कार्यकर्ते नाराज झाले. स्थानिक पातळीवर अन्य नेते असताना विद्यमान खासदाराला आमदारकी लढवायला सांगितल्याबद्दल पक्षातून नाराजी दिसून आली. लॉकेट चटर्जी यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार दाखल करण्यात येईल, अशीही धमकी भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिली.

भाजपने सर्वांना धक्का देत केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो, तीन वेळा लोकसभेवर निवडून गेलेल्या लॉकेट चटर्जी, निशिथ प्रामाणिक व राज्यसभेचे खासदार स्वपन दासगुप्ता यांना विधानसभा निवडणूक लढवण्यास सांगितले.

भाजपच्या या निर्णयावर पक्षातून नाराजी आहे पण तृणमूलकडूनही टीका होऊ लागली. तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी प. बंगालमध्ये भाजपकडून जो सोप ऑपेरा सुरू आहे त्याबद्दल आनंद व्यक्त केला. जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करणार्या भाजपकडे चेहरा व नेते नाहीत, आणि हा पक्ष बंगालमधल्या २९४ जागा सहज जिंकू असा दावा करत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0