केंद्र सरकार प्रचारात मग्नः राकेशसिंह

केंद्र सरकार प्रचारात मग्नः राकेशसिंह

जाचक शेतकरी कायदे रद्द करण्यात यावेत या मागणीसाठी राजधानी नवी दिल्लीच्या सीमेवर थंडी, वारा ऊन आणि पाऊस यामध्येही आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला १०० दिवस पूर्ण झाले. त्यानिमित्ताने भारतीय किसान मोर्चाचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेशसिंह टिकैत यांच्याशी केलेली खास बातचीत...

शेतकऱ्यांची आंदोलनाची मोठी तयारी
नेटीझन्सच्या दबावापुढे झुकरबर्गही झुकला
तटबंद्यांना लोकशाहीत जागा नाही!

शेतकरी आंदोलनाला काल १०० दिवस पूर्ण झाले पण असंवेदनशील आणि निगरगट्ट केंद्र सरकारला या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला वेळ नाही. हे राज्यकर्ते निवडणूक आणि प्रचार यालाच महत्त्व देत असल्याची टीका भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश सिंह टिकैत यांनी केली. जाचक कृषी कायदे त्वरित रद्द करावेत या मागणीसाठी नवी दिल्लीच्या सीमेवर गेली १०० दिवस लाखो शेतकरी तळ ठोकून आहेत. १९ नोव्हेंबरपासून हे आंदोलन सुरू झाले त्याला काल १०० दिवस पूर्ण झाले. त्या निमित्ताने राकेशसिंह यांच्याशी  खास बातचीत करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नी केंद्र सरकार खरोखरच गंभीर नाही का? या प्रश्नाला उत्तर देताना राकेशसिंह म्हणाले की, वास्तविक बळीराजा हा या देशाचा अन्नदाता आहे. त्याला वाऱ्यावर सोडून केवळ सत्ता उपभोगणे आणि राजकारण करणे हेच काम विद्यमान सरकार करत असून ते दुर्देवी आहे. शेतकऱ्यांची ताकद काय असते याची माहिती बहुदा या सरकारला नसावी त्यामुळे ते बेफिकीर आहेत असेही ते म्हणाले. हे सरकार केवळ निवडणूक आणि प्रचार यामध्येच मश्गूल आहे. त्यामुळे जिथे जिथे निवडणूक होत आहे तेथे त्यांच्या विरोधात मतदान करून मस्ती उतरवली जाईल असेही ते म्हणाले.

कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी आग्रही आहेत. त्यासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या पण काहीही निर्णय झाला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपणाला फक्त एका कॉलवर मी भेटेन असे सांगूनही हा प्रश्न चिघळत का चालला आहे? यावर उत्तर देताना राकेशसिंह म्हणाले की, पंतप्रधानांनी एका कॉल वर उपलब्ध असेन असे सांगितले असले तरी तो कॉल कोणत्या नंबर वर करायचा हे सांगितलेले नाही.त्यामुळे केवळ राजकीय सहानभूती मिळविण्यासाठी हा खटाटोप ते करत असल्याचा आरोप राकेशसिंह यांनी केला.

केंद्रीय कृषीमंत्री तोमर यांच्याशो आपण इतक्या वेळी चर्चा करूनही काही ठोस निर्णय का होत नाही, असे विचारताच टिकैत म्हणाले की, कृषिमंत्री कितीही वेळा चर्चेला आले तरी आमची मुख्य मागणी कृषी कायदे रद्द करण्याची आहे यावर त्यांना निर्णय घ्यावा लागेल. आम्हाला केवळ आश्वासन नको तर कायदे रद्द करत असल्याचे लेखी पत्र हवे आहे.

काही दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलन बदनाम करून ते मोडीत काढण्याचा विखारी प्रयोग  झाला पण आमच्यातील एकी कधीही सुटणार नाही असे स्पष्ट करून राकेशसिंह म्हणाले की, या सरकारने साम, दाम दंड आणि भेद करण्याचा कितीही प्रयत्न यापूर्वी आणि भविष्यात केला तरी ते त्यामध्ये यशस्वी होणार नाहीत. आम्ही किमान सप्टेंबर ते ऑक्टोबरपर्यंत या सीमेवर राहून शांततेच्या मार्गाने आमच्या मागण्या मान्य करण्यास सरकारला भाग पाडू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आंदोलनाचे १०० दिवस पूर्ण झाले असून त्यानिमित्ताने शनिवारी म्हणजे ६ मार्च रोजी देशभरातील सर्व शेतकरी हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करतील. सर्व शेतकरी एक दिवस घरावर काळा झेंडा , काळी फित अथवा त्यांच्या वाहनांवर काळा झेंडा लावून निषेध व्यक्त करतील असेही राकेशसिंह म्हणाले.

दरम्यान महाराष्ट्रात सर्व शेतकरी आज आपल्या घरावर काळा झेंडा लावून केंद्र सरकारचा निषेध करतील अशी माहिती संयुक्त किसान मोर्चाचे महाराष्ट्राचे सदस्य संदीप गिड्डे – पाटील यांनी दिली.

आज संयुक्त किसान मोर्चा तर्फे सर्वत्र धरणे आंदोलन महिलातर्फे करण्यात येईल तसेच या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी डोळ्यावर काळी पट्टी बांधण्यात येईल अशी माहिती संयुक्त किसान मोर्चाचे प्रवक्ते डॉ दर्शन पाल यांनी दिली. नवी दिल्लीच्या सर्व सीमेवर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल तसेच किमान आधारभूत किंमत (एमएसपी) चळवळ दक्षिण भारतातील कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा येथून सुरू करण्यात येईल असेही पाल यांनी सांगितले.

अतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0