बॉलीवूडमध्ये दिसणारे छोट्या शहरातील नायक नेहमी उच्च-वर्णीयच का असतात?

बॉलीवूडमध्ये दिसणारे छोट्या शहरातील नायक नेहमी उच्च-वर्णीयच का असतात?

शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेला ‘झिरो’ हा काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला चित्रपट असून स्वतःची उच्च वर्णीय ओळख मिरवणारा नायक हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे .

‘टाइम्स नाऊ’, ‘रिपब्लिक’च्या विरोधात उतरले बॉलीवूड
बॉलिवुडच्या नजरेतून काश्मीर
आज बौद्धिक सहिष्णुतेची गरज आहे

मुख्य पात्र उच्च-वर्णीय/ सवर्ण असणे हा बॉलीवूडमधील चित्रपटांचा जणू अलिखित नियमच झाला आहे. परदेशात राहणारे अनिवासी भारतीय असोत, भारतातील महानगरातील एखादे मध्यम वर्गीय कुटुंब असो किंवा हृषीकेश मुखर्जींचे ‘पर्यायी’ म्हणवले जाणारे चित्रपट असोत, बॉलीवूडमध्ये आजवर प्रामुख्याने सवर्णांच्याच कथांचे चित्रण झालेले आढळते. उत्तर भारतातील छोट्या शहरांची पार्श्वभूमी असलेल्या कथा हे बॉलीवूडला गवसलेले नवे प्रेम. मात्र इथेही तोच ‘अलिखित नियमाचा’ प्रभाव दिसतो.

काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘झिरोमध्ये शाहरुख खानने बऊवा या ठेंगण्या व्यक्तीचे पात्र रंगवले आहे. उंचीसोबतच या बऊवाचे आणखी एक गुणवैशिष्ट्य म्हणजे त्याची उत्तर प्रदेशातील मीरतमधील एका उच्च वर्णीय कुटुंबाची असलेली पार्श्वभूमी.

दिग्दर्शक आनंद एल. राय यांनीही चित्रपटातील नायकाचेजानवे दाखवत त्याच्या जातीय पार्श्वभूमीवर जोर दिला आहे.

राय यांच्या आजवरच्या चित्रपटांतील मुख्य पात्रे प्रामुख्याने सवर्णच राहिली आहेत.रांझनामध्ये धनुषने कुंदन शंकर या वाराणसीतील तमिळ ब्राह्मणाचे पात्र रंगवले आहे.तनु वेड्स मनूया चित्रपटाच्या दोन्ही भागांमध्ये प्रमुख कलाकार माधवन व  कंगना यांनी अनुक्रमे मनू शर्मा आणि तनु त्रिवेदी या जातीने ब्राह्मण असणाऱ्या व्यक्तींच्या भूमिका केल्या आहेत. ‘झिरो’ मधील मुख्य पात्र सवर्णच असावे ही कथानकाची तशी गरज नव्हती. मात्र दिग्दर्शक राय यांनी किमान ७ ते ८ वेळा बऊवाचे ‘जानवे’ दाखवत चित्रपटाचा झोत सुरुवातीपासून शेवटपर्यंत ‘पवित्र धाग्या’वरच राहील यावर ‘जातीने’ लक्ष दिले आहे.

एक बॉलीवूडी समस्या

यासाठी एकट्या राय यांना दोष देणे योग्य नाही. उच्च- वर्णीय भारतीयांच्या कथा मांडणारी बॉलीवूड चित्रपटांची ही अजब सामाजिक व्याख्या ‘झिरो’च्या निमित्ताने अधोरेखित झाली. छोट्या शहराची पार्श्वभूमी असणाऱ्या बॉलीवूड चित्रपटांचा समवेश करून भारतीय चित्रपटांचे काळजीपूर्वक विश्लेषण केले असता लक्षात येते किझिरोहा सिनेमा कुठल्याच अंगाने अपवादात्मक नाही. उलट त्याला (बॉलीवूडच्या) रूढ सामाजिक व्याख्येचे सर्वात अलीकडचे उदाहरण म्हणता येऊ शकेल.

द हिंदूमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासामध्ये २०१३ आणि २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या बॉलीवूड चित्रपटांमध्ये उच्च जातीची मुख्य पात्रे असणाऱ्या चित्रपटांची संख्या ‘लक्षणीय’ असल्याचा निष्कर्ष मांडण्यात आला. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या केवळ दोन चित्रपटांमधील मुख्य पात्रे मागास जातीची होती.

देशात ओबीसी आणि दलित या दोन समाजांच्या एकत्रित लोकसंख्येचे प्रमाण सवर्ण हिंदू लोकसंख्येच्या चौपट (४:१) आहे. त्यामुळे  किमान छोट्या शहरांची पार्श्वभूमी असणाऱ्या चित्रपटांमध्ये तरी या दोन्ही समजांची पार्श्वभूमी असलेली पात्रे अधिक प्रमाणात दाखवायला हवी होती असेही एखाद्याला वाटू शकेल. पण (दुर्दैवाने) चित्र तसे नाही. यादव, पासवान, जटाव, कुशवाहा, मौर्य किंवा राजभर अशी आडनावे असणारी प्रमुख पात्रे चित्रपटात अभावानेच आढळतात. त्याउलट नायकांचे आडनाव सर्रास शर्मा, त्रिवेदी, शुक्ला, दुबे किंवा पांडे असल्याचे दिसते.

आता २०१७ आणि २०१८ मध्ये प्रदर्शित झालेले काही चित्रपट आणि त्यातील मुख्य पात्रांच्या जातीय पार्श्वभूमीचा आढावा घेऊयात!

१.         बरेली की बर्फी: आयुष्यमान खुराना याने चिराग दुबेची आणि कीर्ती सेनन हिने बिट्टी मिश्रा हिची भूमिका         साकारली.दोन्ही ब्राह्मण.

२.         बधाई हो:  आयुष्यमान खुरानाने नकुल कौशिकची (ब्राह्मण) या तरुणाची भूमिका केली.

३.         बहन होगी तेरी : राजकुमार राव याने शिव नौटियालची (ब्राह्मण) भूमिका साकारली.

४.         भैयाजी सुपरहिट : सनी देओलने लाल भाईसाहब दुबे  (ब्राह्मण) या डॉनचे पात्र रंगवले.

५.         जॉली एलएलबी २ : अक्षय कुमारने जॉली मिश्रा (ब्राह्मण) या वकिलाची भूमिका साकारली.

६.         बत्ती गुल मीटर चालू :शाहीद कपूरने सुशील कुमार पंतची (ब्राह्मण) भूमिका केली.

७.         मोहल्ला अस्सी: सनी देओल याने एका ब्राह्मण पुरोहिताची भूमिका साकारली.

८.         पॅडमॅन : अक्षय कुमारने लक्ष्मी चौहानचे (सवर्ण) पात्र रंगवले.

९.         शादी में जरूर आना : राजकुमार राव याने सत्येंद्र मिश्रा (ब्राह्मण) या आयएएस अधिकाऱ्याची भूमिका केली.

१०.      टॉयलेटएक प्रेम कथा : अक्षय कुमारने केशव शर्माची (ब्राह्मण) भूमिका साकारली.

११.      बद्रीनाथ कि दुल्हनिया : वरुण धवनने ‘बद्री’ बंसाची तर आलीया भट हिने वैदेही त्रिवेदीची भूमिका केली॰        (दोन्ही ब्राह्मण)   

विविधतेकडे दृष्टीक्षेप टाकताना

आपण केवळ पात्रांच्या नावांच्या आधारे वैविध्याचा शोध घेतोय. कलाकार वा चित्रपट निर्मात्यांच्या आधारे नव्हे. दलित किंवा ओबीसी पार्श्वभूमी असलेल्या कलाकार, लेखक आणि दिग्दर्शकांचा बॉलीवूडमध्ये वानवा आहे. ‘द हिंदू’ मधील अहवालानुसार ५ पेक्षा अधिक भूमिका केलेल्या जवळपास ७५० कलाकारांमध्ये सर्वाधिक संख्या उच्च-वर्णीय हिंदूंची आहे. त्यानंतर क्रमांक लागतो तो मुस्लिमांचा!

हा असमतोल भरून काढण्यासाठी बॉलीवूडने प्रातिनिधिक का होईना, ओबीसी आणि दलितांच्या कथांनाही कथानकात स्थान द्यायला हवे होते. मात्र मुख्यतः उच्च-वर्णीय पार्श्वभूमी असणाऱ्या लेखक, दिग्दर्शक व निर्माते स्वजातीय नावांनाच प्राधान्य दिल्याचे आढळते.

दिग्दर्शक आनंद राय यांनी काही गोष्टींची नोंद घेतली नसल्याचे वाटते. मेरठ शहरातील एकूण  लोकसंख्येत १७% दलित आहेत. (या शहराच्या महापौर सुनिता वर्मा या सुद्धा दलित आहेत.) येथील मागासवर्गीय समाजाची लोकसंख्याही उच्च-वर्णीय हिंदुंपेक्षा अधिक आहे. साहजिकच मेरठमध्ये एका दलित किंवा ओबिसी एवजी कोणी सवर्ण बऊवा सापडण्याची शक्यता कमी आहे.

न्यूटन मधील न्यूटन कुमार असो, मांझी : द माउंटटनमॅन मधील मांझी असो किंवा मसान मधील दीपक कुमार, जेव्हा कधी आपल्याला दलित किंवा ओबीसी पात्र पडद्यावर दिसतात, तेव्हा शक्यतो त्याला अंतर-धर्मीय संघर्षाची पार्श्वभूमी असते. सर्वसामान्य कुटुंबांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांचे लेखन करताना मात्र सर्रास उच्च –वर्णीय जातींचा विचार केला जातो.

आजवरचे चित्र पाहता, चित्रपट रसिक मोठ्या पडद्यावर केवळ उच्च-वर्णीय पात्रांनाच पाहणे पसंद करतात असा बॉलीवूड निर्माते आणि दिग्दर्शकांचा कदाचित समज झाला असावा. हा समज साफ चुकीचा आहे. मोठ्या कलाकारांच्या मागे वेडा झालेल्या चाहत्यांच्या वर्गाचा अपवाद वगळता बॉलीवूडला आजही एका मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचण्यात आलेल्या अपयशामागे हा चुकीचा समज एक महत्वाचे कारण आहे.

चित्रपटांचा विचार करत असताना कलाकार आणि कथानक यात वैविध्य आणल्याशिवाय चित्रपट अधिक दर्जेदार होणार नाहीत व नवीन प्रेक्षक त्याकडे आकर्षितही होणार नाहीत. बॉलीवूडने यासाठी तमिळ चित्रपटांचा आदर्श घेण्यास हरकत नाही. कथेतील पात्रांच्या निवडीमध्ये तेथे प्रचंड विविधता पहावयास मिळते.

हिंदी चित्रपट उद्योगाने कथा लेखन करताना सवर्ण केंद्रित चकचकीत कथानकांची पुनरावृत्ती करण्याएवजी भारताच्या सामाजिक व सांकृतिक विविधतेला साजेसे काम करण्याची आज गरज आहे.

रविकिरण शिंदे हे सामाजिक व राजकीय घडामोडींवर भाष्य करणारे स्वतंत्र लेखक आहेत.

(अनुवाद: समीर दि. शेख)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: