बॉलिवुडमधील उदयोन्मुख तारा – नरेंद्र मोदी

बॉलिवुडमधील उदयोन्मुख तारा – नरेंद्र मोदी

मोदी आणि त्यांच्या राष्ट्रवादाचा ब्रँड यांच्यावर आधारित चित्रपट लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच प्रदर्शित होत आहेत हा काही योगायोग नाही.

हॉलीवूडचे अंधानुकरण
मराठी कलाकारांसाठी विषय खोल आहे!
झायराची एक्झिट

मुंबई चित्रपटसृष्टी, मोठे स्टार असणारे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट आणि वेगळ्या धाटणीचे स्वतंत्र चित्रपट या दोन्हींसह २०१९ चे स्वागत करण्यासाठी तयार होत असताना, एक चेहरा सर्वात जास्त नजरेसमोर राहणार आहे – नरेंद्र मोदींचा! सर्व खान, कपूर, कुमार आणि अगदी खुराणा यांच्यापेक्षाही मोदीच सर्वाधिक चित्रपटांमधून दिसतील – त्यापैकी तीन चित्रपट तर आधीच सर्वांना माहीत आहेत आणि आणखी एकाची घोषणा झाली आहे.

देशप्रेमाने ठासून भरलेला सर्जिकल स्ट्राईक्सबद्दलचा ‘उरी’ हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. लष्कराबद्दलचाच बटालियन ९०९ हाही एक चित्रपट आहे. या दोन्हींमध्ये मोदींचा चेहरा आहे. उरी चित्रपटात त्यांचे काम करणारे रजित कपूर यांनी असे म्हटले आहे की या चित्रपटामध्ये पंतप्रधानांचे चित्र ‘एक नियोजक आणि विचारवंत’ असे रंगवले जाईल; ते म्हणतात,“त्यांचं धीरगंभीर व्यक्तिमत्त्व यात दिसून येईल”.

बटालियन ९०९ मध्ये अभिनय करणारे के. के. शुक्ला सांगतात की ते मोदींचे चाहते आहेत. नमो सौने गमो (२०१४) या गुजराती चित्रपटामध्ये मोदींची भूमिका करणारे ललित देवरियासुद्धा तेच सांगतात.

जरासुद्धा पंतप्रधानांसारखा न दिसणारा अभिनेता विवेक ओबेरॉय याने पीएम मोदी नावाच्या स्वत:च्या  चित्रपटाची घोषणा केली आहे. मोदींची भूमिका करण्यासाठी मीच सर्वात योग्य आहे असे म्हणणारे भाजपचे खासदार परेश रावल  हे सुद्धा पटकथेवर काम करत आहेत.

बॉलिवुडमध्ये नरेंद्र मोदींचे अनेक बोलके प्रशंसक आहेत हे काही गुपित नाही. मोदींनासुद्धा बॉलिवुडबद्दल प्रेम आहे. ते नियमितपणे चित्रपटसृष्टीतील लोकांना भेटतात आणि अलिकडेच ते प्रियांका चोप्राच्या विवाहाच्या स्वागत समारंभालाही उपस्थित राहिले.

https://www.instagram.com/p/BrAEKx1Hh6t

रावल आणि किरण खेर या खासदारांव्यतिरिक्त, खेर यांचे पती अनुपम खेर आणि चित्रपट प्रमाणपत्र मंडळाचे माजी प्रमुख पहलाज निहलानी हे उघडपणे त्यांचे चाहते असल्याचे नेहमीच बोलत आले आहेत.

निहलानींनी तर ‘हर हर मोदी’ नावाचा एक लघुचित्रपटही तयार केला होता जो प्रक्षोभक अशा देशभक्तीपर प्रतिमांनी भरलेला आहे. निहलानी यांच्या सेन्सॉर बोर्डमधील कालावधी दरम्यान मोदींचे चित्रण करणाऱ्या दोन चित्रपटांना प्रमाणपत्र नाकारण्यात आले होते. त्यांनी याबाबत सांगितले की निर्मात्यांना पीएमओकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यास सांगण्यात आले होते. सध्याचे बोर्डचे प्रमुख – बॉलिवुडमधलेच गीतकार प्रसून जोशी – यांनीही ही अट घातली आहे का ते माहीत नाही.

सत्तेत असणाऱ्यांशी जुळवून घेणे हे काही चित्रपट उद्योगाकरिता नवे नाही; तत्कालीन राजकारण दाखवणारे चित्रपट बनवणे हेही नवे नाही. जवाहरलाल नेहरूंच्या काळात अनेक व्यावसायिक चित्रपटांमध्ये धरणांचे बांधकाम आणि इतर औद्योगिक प्रकल्प ठळकपणे दाखवले जात.

नेहरूंच्या निधनानंतर, कैफी आझमी यांनी ‘नौनिहाल’ या चित्रपटासाठी ‘मेरी आवाज सुनो’ हे हृदयद्रावक गीत लिहिले, जे चित्रपटामध्ये नेहरूंच्या अंत्ययात्रेच्या दृश्याबरोबर ऐकवण्यात आले. तसेच ‘प्यासा’ आणि ‘फिर सुबह होगी’ यासारखे काही चित्रपट होते, ज्यामध्ये स्वातंत्र्यानंतर भारत ज्या दिशेने पुढे जात होता त्याबाबतचा भ्रमनिरास व्यक्त करण्यात आला होता. लाल बहाद्दुर शास्त्रींची ‘जय जवान जय किसान’ ही घोषणा मनोज कुमारच्या ‘उपकार’मध्ये समोर आली. इंदिरा गांधींच्या वाट्याला मात्र प्रशंसेपेक्षा टीका जास्त आली. आणीबाणीच्या काळातील ‘किस्सा कुर्सी का’ आणि नंतर जबरदस्तीने होणाऱ्या निर्बिजीकरणाबद्दल बोलणारा ‘नसबंदी’ या चित्रपटांमधून ही टीका करण्यात आली होती. गुलजारच्या ‘आँधी’ मध्ये इंदिरा गांधींशी साधर्म्य असणारे राजकारणी व्यक्तिमत्त्व चितारले होते, मात्र गुलजार यांनी  असे साधर्म्य असल्याचे नाकारले. या चित्रपटांनी त्यावेळच्या सरकारचा रोष ओढवून घेतला आणि ‘किस्सा कुर्सी का’ या चित्रपटाची प्रिंट गायब केली गेली. १९७० च्या दशकात, एस. कृष्णास्वामी यांचा माहितीपट ‘फ्रॉम इंडस व्हॅली टू इंदिरा गांधी’ हा भारताच्या इतिहासाबद्दल होता असे सांगितले गेले होते. परंतु तोही दाबला गेला आणि नंतर विस्मृतीत गेला.

तरीही आजचे चित्रपट अनन्यसाधारण आहेत कारण त्यामध्ये कुणा काल्पनिक पंतप्रधानांचे नव्हे तर सध्याच्या पंतप्रधानांचे ओळखू येणारे चित्रण आहे.

देशभक्तीपर चित्रपट बनवण्याचा सध्याचा उत्साह – ज्यामध्ये लष्कराचे आणि ऐतिहासिक व्यक्तींचे गौरवीकरण केलेले असते – भाजप आणि संघ परिवाराच्या कार्यक्रमामध्ये चपखल बसणारा आणि त्यांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असाच आहे. आणि अगदी मोदी जरी चित्रपटात नसतील, तरीही त्यातला संदेश स्पष्ट असतो, मग तो चित्रपट स्वच्छ भारत बद्दल असो (टॉयलेट, राकेश ओमप्रकाश मेहरांचा पुढचा चित्रपट) किंवा मुस्लिम आक्रमकांच्या विरोधात लढणाऱ्या हिंदू राजांबद्दलचा असो (पद्मावतमधील भगवे झेंडे आणि चंद्रकोर असणारे हिरवे झेंडे) किंवा देशावर राज्य नव्हे तर देशाची सेवा करण्याबाबतचे शब्दबंबाळ संवाद  आणि त्यासोबत ‘आजादी’ आणि ‘हर हर महादेव’ च्या गर्जना (मणिकर्णिका) असोत. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या कालावधीबद्दलच्या द ऍक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर बद्दल बोलायचे तर, हा चित्रपट, ज्यांची सर्वाधिक बदनामी केली जाते असे मनमोहन सिंग गांधी कुटुंबाच्या हातातले बाहुलेच होते याबाबत कोणतीही शंका बाकी ठेवत नाही.

हे चित्रपट लोकसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना प्रदर्शित होत आहेत हा योगायोग नाही. बीजेपीच्या अधिकृत ट्विटर हँडलने द ऍक्सिडेंटल प्राइम मिनिस्टरचे ट्रेलर ट्वीट केले होते. उरी चित्रपट २०१६चा सर्जिकल स्ट्राईक ठळकपणे दाखवतो, जो अगदी अचूक वेळ साधून सरकारच्या दहशतवादविरोधी कठोर भूमिकेच्या ‘यशाचे’ स्मरण करून देतो.

परंतु हा ट्रेंड जरी मोदींबाबतचे व्यक्तिगत प्रेम आणि प्रशंसा यांच्यामुळे असला तरी तो प्रेक्षकांच्या पसंतीवरही डोळा ठेवून आहे. चित्रकर्ते प्रेक्षकांना काय हवे त्यानुसार काम करतात. एक साधारण विचारप्रवाह असा आहे की भूतकाळाबद्दलच्या एका ठराविक धारणेशी जुळणारे, सशस्त्र दले आणि नवा-जुना भारतीय इतिहास यांच्याबद्दलचे चित्रपट पाहू इच्छिणारा पुरेसा प्रेक्षकवर्ग आहे. भूतकाळाचे अद्भुतरम्य किंवा सुधारणावादी चित्रण करणारे चित्रपट चित्रकर्त्यांमध्ये लोकप्रिय आहेत. परंतु एके काळी ते धर्मनिरपेक्ष देशाच्या कल्पनेचा पुरस्कार करत होते – मुघले आझम हे चांगले उदाहरण आहे – आज ते अतिरेकी-राष्ट्रवादी आणि हिंदुत्वाच्या कल्पनेकडे झुकलेले असतात. सर्वसाधारण मान्यता असलेला इतिहास सुद्धा त्यांच्या कथनाला जुळेल असा मोडतोड करून घेतला जातो.

बॉक्स ऑफिस देवतेला संतुष्ट करण्याचे कोणतेही रामबाण उपाय नसतात. जर काही देशभक्तीपर चित्रपट अपयशी झाले तर चित्रपटसृष्टी अन्य विषयांकडे वळेल. जर अगदी नरेंद्र मोदीसुद्धा प्रेक्षक खेचून आणू शकत नसतील तर पटकथेत त्यांचा समावेश करणारे चित्रपट गायब होतील. बॉलिवुडला नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दृष्टिकोनाबद्दल प्रेम असेलही, परंतु शेवटी (प्रोड्युसर्सचे) प्रेम चित्रपटातून मिळणाऱ्या नफ्यावरच असते आणि या नफ्याकडे बघूनच बॉलिवुड विषयांची निवड करत असते.

सदर लेख मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे.
अनुवाद – अनघा लेले

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0