बॉलिवुड आणि राजकारण : मोदींच्या आंबाप्रेमाच्या पलिकडे

बॉलिवुड आणि राजकारण : मोदींच्या आंबाप्रेमाच्या पलिकडे

लोकप्रिय अभिनेत्यांचा विशेषतः भारतामध्ये जनसामान्यांवर असलेला प्रभाव पाहता, देशात आणि जगभरात चाललेल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींबद्दल त्यांनी अशी तटस्थ भूमिका घेणे आपल्याला किती काळ परवडणार आहे?

अलिकडेच लॉस एंजेलिस येथे आयेषा मलिक नावाच्या एका पाकिस्तानी-अमेरिकन पत्रकाराने २०१६ पासून यूएन सदिच्छा राजदूत असूनही फेब्रुवारीतील पुलवामा हल्ल्याच्यासंबंधी भारतीय लष्कराच्या बाजूने ट्वीट केल्याबद्दल प्रियांका चोप्रा यांच्यावर टीका केली.

त्यानंतर भारतीय माध्यमांनी लगेचच “प्रियांकाने पाकिस्तानी ट्रोल्सना गप्प केल्या”बद्दलचीब्रेकिंग न्यूज द्यायला सुरुवात केली. मात्र अनेक चाहत्यांना मात्र तिने दिलेले उत्तर तिच्या आजवरच्या समावेशक भूमिकेशी सुसंगत नाही असे वाटले. आणि खरेच, आदरपूर्वक असहमती दर्शवून प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी तिने प्रश्नकर्तीला अपमानजनक वाटतील अशी विधाने केली.

प्रियांकाने आंतरराष्ट्रीय मानवतावादी होण्यापेक्षा राष्ट्रभक्त होण्याला जास्त महत्त्व देणे योग्य आहे की नाही याबद्दल हा लेख नाही. “जय हिंद म्हणण्याने युद्धाला कसे प्रोत्साहन मिळते” अशा वादग्रस्त प्रश्नांमध्ये शिरण्याचाही हा प्रयत्न नाही.

हा लेख अधिक खोलवर जाण्याचा, बॉलिवुडची दुहेरी नैतिकता, ‘प्रेमच सर्व काही’ आणि ‘युद्ध नको’ अशा गप्पा करणारे बॉलिवुडचे सुप्रसिद्ध चेहरे वेळ येताच कसे पलटतात हे दाखवण्याचा प्रयत्न करतो.

एक अलिखित नियम

अनेक दशके, भारतीय तारेतारकांनी राजकारणावर टीका करायची नाही आणि सरकारविरोधी बोलायचे नाही हा अलिखित नियम पाळलेला दिसतो. अगदी देशातल्या आजच्या संकटाच्या वेळीही ते प्रेमसंबंधांच्या अफवा आणि इतर गॉसिपच्या पलिकडे कशाची चर्चा करताना दिसत नाहीत. मात्र, खरे तर यूएन सदिच्छा राजदूत म्हणून ज्या मुद्द्याची चर्चा केली पाहिजे अशा विषयावर, आंतरराष्ट्रीय पातळीवरही प्रियांका चोप्राने तेच करणे हे निंदनीय आहे. योग्य प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीलाही त्रास देणारा, ट्रोल असे म्हणून झटकून टाकायचे हे निश्चितच चुकीचे आहे.

भारतीय अभिनेत्यांचा राजकीय सहभाग पंतप्रधानांना आंबे आवडतात का हे विचारण्यापुरता आणि निवडणुकांच्या दिवशी बोटावरची शाई दाखवणारी छायाचित्रे इन्स्टाग्रामवर टाकण्यापुरताच मर्यादित आहे ही खरेच दुःखाची बाब आहे. पण मलिक यांना केवळ द्वेष करणारी व्यक्ती म्हणून तुच्छतेने झटकून टाकून आणि अतिशय महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय समस्येबाबतच्या प्रश्नाकडे केवळ फालतू बडबड म्हणून दुर्लक्ष करून प्रियांका चोप्राने हा अडाणीपणा फारच स्पष्ट प्रकट केला आहे.

अनेकदा एखाद्या मुद्द्यावर बाजू घेण्याची वेळ येते तेव्हा हे सर्व तारे “याची चर्चा करण्याची ही वेळ किंवा जागा नव्हे” किंवा “मला या प्रश्नाबद्दल फारशी माहिती नाही” असे म्हणून ते करण्याचे टाळतात. पण मग तुम्ही देशात जे काही चालले आहे त्याबद्दल बोलणार तरी कधी? काश्मीरबाबत सध्या जे कठोर धोरण अवलंबले जात आहे त्याबद्दल? आणि भारतीय संसदेने पाहिलेल्या सर्वात भयंकर सत्राबद्दल?

पंतप्रधानांबरोबर उगीचच सेल्फी काढून पोस्ट करणारे हे लोक उघडपणे बाजूने किंवा विरोधात, काही बोलू का शकत नाहीत?

अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत कलम ३७० रद्द केल्याबद्दल सोनम कपूरला प्रश्न विचारला गेला तेव्हा तिने “मला पूर्ण माहिती मिळेल तेव्हा मी माझे मत व्यक्त करेन,” आणि “इतके काही चालू आहे की सत्य काय ते समजणेच अवघड झाले आहे,” अशी भूमिका घेतली.

प्रियांका चोप्राच्या पावलावर पाऊल टाकून तिने आपले दोन अतिशय चांगले मित्र पाकिस्तानी असल्याचे सांगून आपल्या विधानांचा खरेपणा दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

अर्थात जेव्हा तिच्या ‘नीरजा’ या चित्रपटावर पाकिस्तानात बंदी आली होती तेव्हा तिने तिचे दुःख व्यक्त करण्यासाठी वेळ काढला होता.

त्या प्रसंगानंतर सोनम कपूरने ट्वीट केले होते:

बॉलिवुडकरिता शांतता, मानवता, सामंजस्य यासारखे शब्दच पुरेसे असतात. हॉलिवुडमध्ये मात्र मेरिल स्ट्रीपने गोल्डन ग्लोब्जच्या कार्यक्रमात ट्रम्पविरोधी भाषण केले होते.

अर्थात आपल्याकडेही उघड भूमिका घेणारे काहीजण आहेत. जसे स्वरा भास्कर मोदी सरकारच्या विरोधात ठामपणे भूमिका घेते, त्याकरिता तिला प्रचंड ट्रोलिंगलाही तोंड द्यावे लागते. तसेच अनुपम खेर, कंगना राणावत आणि सलमान खान यांनी सध्याच्या राजवटीबद्दल  त्यांना वाटणारे समाधान वेळोवेळी व्यक्त केले आहे.

आणि अलिकडेच आधी अनुराग कश्यप व अपर्णा सेन यांच्यासह ४९ सेलिब्रिटींनी लिहिलेले ‘जय श्रीराम’ ही कशी युद्धखोर घोषणा बनली आहे याबद्दल पंतप्रधानांना लिहिलेले पत्र, आणि त्यानंतर कंगना राणावत, प्रसून जोशी, सोनल मानसिंग, मधुर भांडारकर आणि विवेक अग्निहोत्री इत्यादि ६१ सेलिब्रिटींनी त्यांच्या ‘ठराविकच गोष्टींबद्दल राग व्यक्त करण्याच्या’ वृत्तीबद्दल आणि खोट्या विधानांबद्दल त्यांना दिलेले उत्तर हे नाट्यही विसरून चालणार नाही.

वादविवादाची शक्ती

लोकप्रिय अभिनेत्यांचा विशेषतः भारतामध्ये जनसामान्यांवर असलेला प्रभाव पाहता, देशात आणि जगभरात चाललेल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींबद्दल त्यांनी अशी तटस्थ भूमिका घेणे आपल्याला किती काळ परवडणार आहे?

इतके सगळे लोक एखाद्याचे ऐकत असतील तर हे जग अधिक चांगले बनवण्याची त्या व्यक्तीची काही जबाबदारी आहे की नाही?समाजाची परिस्थिती बदलणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, आणि सेलिब्रिटींकडे ते करण्याची ताकदही आहे.

विरोध म्हणजे द्वेष नव्हे. जेव्हा केवळ ‘बाजूने बोलणारेच प्रिय’ अशी भूमिका घेतली जात असेल तेव्हा “जगावर प्रेम करा” असे म्हणत राहणे पुरेसे नाही. आजच्या युगात आपल्या सर्वांना विरोधी आवाज उठवण्याचा आणि आपली मते ऐकवण्याचा अधिकार आहे.

आभा दीक्षित, या रायपूर येथील हिदायतुल्ला नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थिनी आहेत.

COMMENTS