नवनीत राणांची खासदारकी धोक्यात

नवनीत राणांची खासदारकी धोक्यात

अमरावती येथील अपक्ष खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द ठरविले आहे. हा घटनात्मक घोटाळा असल्याचे नमूद करून राणा यांना २ लाख रुपयांचा दंड केला आहे. या निर्णयामुळे राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे.

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या अमरावती मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. या निवडणुकीत त्यांनी शिवसेना नेते आनंद अडसूळ यांचा पराभव केला होता. या निवडणूक निकालानंतर माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर न्यायालयाने आज निकाल दिला. न्यायालयाने हा घटनात्मक घोटाळा आहे, असे सांगत जात प्रमाणपत्र रद्द करुन राणा यांना दोन लाखाचा दंड केला. तसेच खोटे जात प्रमाणपत्र सहा आठवड्याच्या आत शासनाकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. आनंदराव अडसुळ यांच्या वतीने अॅड. सी. एम. कोरडे, अॅड. प्रमोद पाटील व अॅड. सचिन थोरात यांनी बाजू मांडली.

या प्रकरणात राणा यांनी जात पडताळणी समितीसमोर दाखल केलेली मूळ कागदपत्रे सादर करण्याची मागणी यचिकाकर्त्यांनी केली होती. याचिकाकर्त्यांनी केलेली विनंती उच्च न्यायालयाकडूनही मान्य करण्यात आली होती. मूळ कागदपत्रे पुढील सुनावणीपर्यंत सादर करण्याचा आदेश न्यायालयाने राणा यांना दिला होता. या प्रकरणी आज पुढील सुनावणी झाली.

उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द केल्याने त्यांची खासदारी धोक्यात आली आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेले प्रमाणपत्र खोटे ठरले, तर संबंधित सदस्याचे पद रद्द होते.

निकालानंतर नवनीत राणा म्हणाल्या, “मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आदेश मी अद्याप वाचलेला नाही. गेल्या आठ वर्षापासून या प्रकरणात आम्ही भांडत आहोत. २०१२ पासून विरोधक माझ्या जात प्रमाणपत्राच्या मागे होते. त्यांना कागदपत्रे दिल्यानंतरसुद्धा त्यांनी हायकोर्टात याचिका केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांनी समिती बसवली. समितीने जात प्रमाणपत्र दिले. त्यानंतर मी निवडणूक लढले. त्यानंतर ते पुन्हा उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाच्या या निर्णयानंतर न्याय मागण्यासाठी मी सर्वोच्च न्यायालयात देखील जाईन. मला न्यायावर विश्वास आहे”

“या प्रकरणात कोणी राजकारण केलं हे मला सांगण्याची गरज नाही. पण माझी आणि शिवसेनेची लढाई सर्वांना माहिती आहे. गेले ८ ते ९ वर्ष मी हा लढा लढत आहे. अचानक न्यायालयाचा असा निर्णय येणे म्हणजे यामध्ये पॉलिटिकल खिचडी शिजली आहे” असा आरोप नवनीत राणा यांनी केला.

राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या, “अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. पण नवनीत राणा यांनी खोटे जातीचे प्रमाणपत्र सादर करून खासदारकी जिंकली. आज उच्च न्यायालयाने यावर जातीचे प्रमाणपत्र खोटे असल्याचा निकाल दिला आहे. नवनीत राणा यांना खरतर रिल लाईफ आणि रिअल लाईफमधील फरक माहित नाही. अभिनय क्षेत्रात तुम्हाला एखादा सीन रिटेक करता येईल. पण अमरावतीची जनता पुन्हा तुम्हाला रिटेकची संधी देणार नाही. कारण आपण अमरावतीच्या लाखो मतदारांचा अपमान केला आहे. तसेच राज्यघटनेचा देखील अपमान केला आहे. त्यामुळे थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर आपण आता खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पहावे.”

COMMENTS