अस्वस्थ करणारी कोरोनाकथा

अस्वस्थ करणारी कोरोनाकथा

लॉकडाऊनच्या संपूर्ण काळाचा अनेक पातळ्यांवर आढावा घेतानाच टोकदार प्रश्न विचारणारं गौरी कानेटकरांचं पुस्तक- ‘जग थांबतं तेव्हा.. लॉकडाऊन काळातील नोंदी’ म्हणजे लॉकडाऊनच्या चार महिन्यातल्या नोंदी आहेत. याचं स्वरूप रोजनिशीसारखं आहे. मात्र पुस्तक वाचताना उलगडत जातं ,की या नोंदी नेहमीच्या रोजनिशीसारख्या नाहीत.

ओबामा यांचं आत्मचरित्र ‘ए प्रॉमिस्ड लँड’
गोव्याचा चित्तथरारक वाङ्मयीन इतिहास
आशांसाठी दाही दिशा…

कोरोना नावाच्या शब्दाने, दहशतीने आणि अनिश्चिततेने आपली शारीरिक, मानसिक, आर्थिक, भावनिक विश्वं पूर्णपणे ताब्यात घेतल्याला आता ७ महिने झालेत. आपल्या आजूबाजूचे व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलेत, लोकं बाहेर पडू लागलीयेत. मात्र, ठेविले अनंतेच्या चालीवर परिस्थितीचा स्वीकार करून ‘न्यू नॉर्मल’ जगायला लागण्याच्या आधीचा हा काळ अतिशय महत्वाचा आहे. लॉकडाऊनच्या या काळाचा आणि या काळात अधिकारस्थानावरील व्यक्तींनी घेतलेल्या किंवा न घेतलेल्या निर्णयांचा, त्यांच्या झालेल्या परिणामांचा आणि भविष्याचा विचार करण्याची, ‘लॉकडाऊनने काय कमावलं, काय गमावलं?’ याचा तक्ता मागण्याची आणि मांडण्याची आणि मुख्य म्हणजे ज्या अनेक गोष्टी ऐकून, पाहून, अनुभवूनही ज्यांना प्रश्न विचारण्याची मानसिकता तेव्हा कदाचित नव्हती ती मिळवून ते प्रश्न, कितीही अस्वस्थ करणारे असले तरीही, विचारण्याची ही वेळ आहे. आणि लॉकडाऊनच्या संपूर्ण काळाचा अनेक पातळ्यांवर आढावा घेतानाच हे टोकदार प्रश्न विचारणारं गौरी कानेटकरांचं,  ‘जग थांबतं तेव्हा.. लॉकडाऊन काळातील नोंदी’, हे पुस्तक आलं आहे.

हे पुस्तक पहिल्यांदा हातात पडलं, तेव्हा पहिली प्रतिक्रिया होती ती मुखपृष्ठाबद्दल. अन्वर हुसेन यांचं हे मुखपृष्ठ अत्यंत बोलकं आहे. पांढराशुभ्र रंग, त्यावर काळ्या रेघोट्यांनी चितारलेली, हातपाय आक्रसून, दुमडून घेऊन बसलेली एक मानवाकृती आणि तिच्या शरीरावरून एका रेषेत चाललेल्या मुंग्या, पार तिच्या मेंदूतही घुसलेल्या. एरवी कुठल्या ना कुठल्या निमित्ताने घराबाहेर पडून मनाजोगतं वावरण्याची सवय असणाऱ्या शंभर कोटीहून अधिक लोकांना घराच्या चार भिंतींमध्येच कोंडून ठेवल्यावर येणारा शारीरिक-भावनिक ताण या चित्रातून पुरेपूर प्रतिबिंबित होतो.

लेखिकेने अतिशय अनौपचारिक शैलीत लिहिलेल्या मनोगतात म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक म्हणजे लॉकडाऊनच्या चार महिन्यातल्या नोंदी आहेत. याचं स्वरूप रोजनिशीसारखं आहे. मात्र पुस्तक वाचताना उलगडत जातं ,की या नोंदी नेहमीच्या रोजनिशीसारख्या नाहीत. या असामान्य परिस्थितीत त्याला अनेक आयाम मिळालेले आहेत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत केलेल्या कामांचा किंवा मनात येणाऱ्या नेहमीच्या विचारांचा हा आढावा नाहीये, तर या कठीण परिस्थितीत घडणाऱ्या, पोहोचणाऱ्या आणि जाणवणाऱ्या गोष्टींचा परिपाक आहे. लेखिका या माध्यमक्षेत्राशी संबंधित असल्यामुळे त्यांना सातत्याने पडणारे प्रश्न त्यात आहेत, त्यांची उत्तरं मिळत नाहीत याबद्दल एक उद्विग्नता आहे आणि इतक्या भयानक परिस्थितीतही आपण काहीच करू शकत नाही याबद्दल एक चमत्कारिक हतबलताही.

या नोंदींना वैयक्तिक मतं आणि विचारांच्या पलीकडे जाऊन एक व्यापक आयाम देण्याचं काम केलंय ते पुस्तकाच्या प्रस्तावनेने. काहीशा अनौपचारिक आणि सहजसुंदर मांडणी असलेल्या या पुस्तकाला सुहास पळशीकर यांची प्रस्तावना एक विश्लेषणात्मक चौकट घालून देते. ते म्हणतात की या पुस्तकातल्या नोंदी वाचून फक्त त्या काळात पुन्हा जाणं आणि त्याचा पुनःप्रत्यय घेणं पुरेसं नाही, तर या अनुभवांकडे डोळसपणे पाहणं गरजेचं आहे. लॉकडाऊन लागू करण्याच्या निर्णयापासून ते या काळात झालेल्या ‘नाही रे’ वर्गातील लोकांच्या ससेहोलपटीपर्यंत अनेक प्रश्न ते उपस्थित करतात. या पुस्तकाच्या आणि लेखिकेच्याही जगाचा मोठाच भाग असणाऱ्या मध्यमवर्गीयांच्या मानसिकतेचा एक मोठा मुद्दा ते मांडतात- सरकार आणि माध्यमं, ज्यांनी या काळात अतिशय महत्वाची भूमिका बजावली त्यांनी मध्यमवर्गीयांनाच पचेल आणि रुचेल अशा घेतलेल्या निर्णयांचा आणि दाखवलेल्या आशयाचा. यामुळे भारताच्या लोकसंख्येचा एक मोठा आणि सगळ्यात सक्रीय, प्रश्न विचारू शकणारा वर्ग संतुष्ट झाला आणि आधी चीनवर, नंतर तबलिघींवर टीका करण्यात, फॅमिली टाईम एंजॉय करण्यात आणि सोशल मीडियावर पोस्टी टाकण्यात मग्न राहिला.

प्रस्तावनेच्या शेवटी लॉकडाऊनने दिलेले तीन मोठे धडे ते मांडतात- दमनकारी राज्याची दमदार पावलं, संशयी समाजाच्या निर्मितीला हातभार आणि गरिबांच्या हद्दपारीवर झालेलं शिक्कामोर्तब. ही सखोल प्रस्तावना डोक्यात ठेऊन पुस्तक वाचायला सुरुवात केल्यावर पदोपदी लक्षात येत राहतं की लेखिकेची शैली आणि भाषा वेगळी असली तरी लिखाणातून हेच तीन मुद्दे पुन्हापुन्हा अधोरेखित होत राहतात.

पुस्तकाची सुरुवात होते ती कोरोना नावाच्या संकटाच्या आंतरराष्ट्रीय आणि नंतर राष्ट्रीय पार्श्वभूमीसह. नंतर हे पुस्तक सहा भागात वाटलं जातं, लॉकडाऊनच्या क्रमवारीप्रमाणे. सुरुवातीला लॉकडाऊन होण्याच्या आधीच्या आणि त्यानंतरच्या काही भागात कोरोनाच्या वातावरणामुळे आपणा सगळ्यांनाच सतत भेडसावणारी अज्ञाताची भीती, अनिश्चितता आणि भविष्याची काळजी साहजिकच प्रतिबिंबित होते. हा प्रश्न फक्त काहीच दिवसांचा आहे आणि लवकरच सगळ्या गोष्टी पूर्वपदावर येतील अशी भाबडी आशाही दिसते. कदाचित यामुळेच सुरुवातीच्या पानांचा एकंदर रागरंग तुलनेने हलका, मिश्किल वाटतो. काही दिवसांच्या नोंदींचा तर शेवटही त्यादिवशी गाजलेल्या फॉरवर्डेड विनोदांनी केलेला दिसतो. मात्र जसजसा ‘लॉकडाऊन’ या शब्दाच्या पुढचा आकडा वर वर चढत जातो तशी ही आशा मावळते आणि ती जागा आजूबाजूच्या, दिवसेंदिवस आणखी-आणखी भयंकर होत चाललेल्या परिस्थितीबद्दलची अस्वस्थता व्यापून टाकते. माणसांचं जग अचानक बंद पडल्याने नद्या, पक्षी, निसर्ग पुन्हा श्वास घेतोय वगैरे आशयाच्या फोटो आणि पोस्टवरही लेखिका हाच अतिशय गरजेचा मुद्दा उपस्थित करते की हा बदल निश्चितच उत्तम आहे, मात्र जेव्हा पुन्हा सगळं पूर्वपदावर येईल तेव्हा हे सगळं पूर्वीसारखंच होणार नाही कशावरून? आणि ते होऊ नये असं वाटत असेल तर त्यासाठी आपल्याकडे कोणत्या दूरगामी योजना आहेत?

कोरोनाच्या या काळात तीन वर्गांची भूमिका ही अतिशय महत्वपूर्ण होती- सरकार, माध्यमं आणि विरोधक. हे विरोधक म्हणजे फक्त राजकीय विरोधक नव्हेत, तर सरकारच्या या काळातील धोरणांचा विरोध करणारे बाबा आढाव, मेधा पाटकर यांच्यासारखे सामाजिक क्षेत्रातले दिग्गजही, ज्यांचा उल्लेख लेखिकेने जागोजागी केलेला आहे. खरंतर अशा परिस्थितीत सामान्य माणसाला, त्याच्या मतांना, मागण्यांना अभूतपूर्व महत्व येतं, पण यावेळी मात्र हा सामान्य माणून घराच्या चार भिंतीत कोंडलेला होता, त्यामुळे हा आवाज बऱ्याच अंशी दाबलेला होता असंच म्हणायला हवं. या सामान्य माणसाची घुसमटही या पुस्तकातून उमटते आणि त्याचबरोबर एक टोचणीही सतत दिसत राहते की रोज दोनवेळा खायला-प्यायला मिळतंय म्हणून आपण हे बोलू तरी शकतोय, पण ज्यांना तेही मिळत नाही, त्यांचं काय होत असेल? आणि अशा परिस्थितीत आपण असं जगत राहणं चुकीचं नाही का? मात्र याला पर्याय नाही याची ही टोचणी आहे.

अशा वेळी इतर दोन वर्ग- सरकार आणि माध्यमं यांचं महत्व अनन्यसाधारण होतं. लेखिकेने एकदोनदा नव्हे, तर पुन्हापुन्हा उल्लेख केल्याप्रमाणे सरकारच्या प्रमुखांनी, संबंधित मंत्र्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने काय धोरणं आखलेली आहेत, पुढच्या योजना काय आहेत, पुढे काय होणार आहे याची तपशीलवार माहिती जनसामान्यांना देणं अतिशय गरजेचं होतं. आपल्या पंतप्रधानांनी मात्र सर्वांच्या हातात कधी थाळ्या आणि घंटा दिल्या, तर कधी दिवे! आणि लेखिकेने या शोबाजीवर कोरडे ओढतानाच या गोष्टीचाही ऊहापोह केलेला आहे की कोट्यवधी लोकांनी या गोष्टी पाळल्या त्या पाळल्या, वर त्यावरची भंपक शास्त्रीय विश्लेषणंही दिली आणि जे या गोष्टी करणार नाहीत त्यांचा छळही काही ठिकाणी झाला. लेखिकेने अनेक ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेळोवेळी लोकांसमोर येऊन केलेल्या फापटपसारा भाषणांवर टीका केली आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणांमधल्या चांगल्या-वाईट गोष्टीही अधोरेखित केल्या आहेत आणि आरोग्य मंत्रालयाच्या अचानक थांबलेल्या पत्रकारपरिषदांचाही उल्लेख केलेला आहे. या काळात सरकारच्या बाजूने चालू असलेला संपूर्ण संवाद हा किती एकतर्फी होता ही गोष्ट अनेकदा अधोरेखित केलेली आहे.

कोरोनाने भारतासारख्या महाकाय लोकसंख्येच्या देशाच्या एका व्यवस्थेचं सर्वाधिक पितळ उघडं पाडलं असेल तर ते आरोग्यव्यवस्थेचं. रुग्णालयांची कमतरता ते व्हेंटिलेटर्सचा तुटवडा, चाचण्यांचा अभाव ते रुग्णालयांमधली अवस्था इथपर्यंत सगळ्या पातळ्यांवर ही दुरवस्था कोरोनाने समोर आणली. यावरही लेखिकेने ताशेरे ओढलेले आहेत, मात्र निव्वळ कडवट टीका न करण्याचं भानही राखलेलं आहे. कोरोनाच्या काळात स्थलांतरित मजुरांचा प्रश्नही प्रचंड गाजला. बांद्रा रेल्वे स्थानकावर अचानक जमलेली गर्दी आणि त्यात एबीपी माझाच्या पत्रकाराची कथित भूमिकाही गाजली. यावरही लेखिकेच्या टिप्पण्या मोठ्या बोलक्या आणि चपखल आहेत.

यात फक्त दुःखाच्या कहाण्या नाहीत, तर आशेचा किरण दाखवणाऱ्याही आहेत. ‘आहे रे’ वर्गातले, लॉकडाऊनकडे सक्तीची सुट्टी म्हणून पाहात मजा घेणारे लोक या मजुरांच्या ससेहोलपटीकडे पाहताना किती संवेदनाहीन असू शकतात हे आपण पाहात होतोच, ते रेल्वेखाली चिरडल्या गेलेल्या मजुरांबद्दल लिहिताना लेखिकेच्या शब्दांतून पुन्हा उभं राहातं.

तिसरा म्हणजे माध्यमवर्ग. लेखिका स्वतःच या क्षेत्रातल्या असल्यामुळे त्यांचा या क्षेत्राच्या कामाकडे विशेष भर दिसतो. कोरोनाच्या वार्तांकनापासून ते या प्रकरणातल्या विविध आणि कानामागे टाकल्या गेलेल्या गोष्टींचे वार्तांकन करणारी इंडियन एक्सप्रेस आणि एनडीटीव्हीसारखी माध्यमं, वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून येणारे अनेक क्षेत्रांमधल्या तज्ञांचे, विश्लेषकांचे लेख आणि त्याचवेळी तबलिघी असोत किंवा कोरोना, त्यांच्यात काही ना काही सनसनाटी शोधून तोंडाचे कर्णे वाजवणारी तथाकथित लोकप्रिय माध्यमं यातला फरक लेखिका सतत अधोरेखित करते. काही लेखांमध्ये मांडलेल्या मुद्द्यांचा उल्लेख करते आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर देशात चाललेल्या गोष्टींकडे पाहण्याचा आणि यातला विरोधाभास समजून घेण्याचा प्रयत्न करते.

कडक लॉकडाऊन ते हळूहळू अनलॉकिंग असा प्रवास चालू झाल्यावर भविष्य पुन्हा एकदा रुळावर आणण्याचा आशावाद देऊन पुस्तक संपतं, मात्र या पुस्तकाने उपस्थित केलेले प्रश्न मनात रुतून बसतात, टोचतात. सुहास पळशीकरांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे पुस्तक वाचताना अनेकदा “अरे! हे अगदी असंच आलं होतं माझ्या डोक्यात त्यावेळी.” किंवा “अरे हो ना, किती बकवास होतं हे!” असं अनेकदा होतं. आता काहीशा मागे पडलेल्या त्या काळाचा पुनःप्रत्यय तर येतोच येतो, मात्र त्याहीपेक्षा जास्त तीव्रतेने एक जाणीव होते की जे प्रश्न लेखिकेने या पुस्तकभर विचारलेत, ते आपल्याला जवळपास पडलेच नव्हते त्या काळात. आपल्या भावनिक गुंतागुंतीत आपण इतके अडकलेलो होतो की ज्यांच्याकडे पुढच्या जेवणाचेही पैसे नाहीयेत, त्यांचं काय होत असेल हा प्रश्न स्वतःला विचारून आपल्याला स्वतःला आणखी त्रास द्यायचा नव्हता का? का सुहास पळशीकर म्हणतात तसं, ज्यांना स्वतःसाठी बोलण्याचा अवकाशही आपण दिला नाही त्यांना आपणही आपल्या आयुष्यातून हद्दपार केलंय? माध्यमांच्या विषारी प्रचारावर तरी आपण आक्षेप घेतला का, मग भले तो वैयक्तिक पातळीवर का असेना? सरकारने जेव्हा आपल्याला कोरोनाविरुद्धच्या लढ्याच्या देशाच्या तयारीचे तपशील द्यायला हवे तेव्हा टाळ्या वाजवून, ताटं-वाट्या वाजवून आणि घंटानाद करून सगळ्याचाच ‘इव्हेंट’ करण्याला आपण विरोध केला का? मुळात म्हणजे हे प्रश्न विचारण्याची आपली इच्छा होती का? आणि नव्हती तर ती का नव्हती आणि कधी निर्माण होणार?

लेखिकेने जरी या अनुभवांना वैयक्तिक नोंदी म्हटले असले तरी यात वैयक्तिक भाग अगदीच मोजका आहे. व्यापक समाजाचे प्रश्नच यात वेळोवेळी आणि वेगवेगळ्या रुपांमध्ये मांडलेले दिसतात. भविष्यात जेव्हा लोक कोरोनाच्या काळाचा अभ्यास करू पाहतील, तेव्हा भारतासारखा प्रचंड लोकसंख्येचा देश एका दिवसात पूर्णपणे बंद कसा झाला, त्यातल्या हजारो-लाखो लोकांनी या परिस्थितीचा सामना कसा केला आणि देशातल्या गरिबांची हद्दपारी करण्यात आपली व्यवस्था कशी बऱ्याच अंशी यशस्वी झाली याचा उत्तम लेखाजोखा हे पुस्तक त्यांच्यासमोर मांडेल. आज, वर्तमानात जेव्हा सर्व काही पूर्वस्थितीला येण्याच्या मार्गावर आहे तेव्हा आपल्यासारख्या सामान्य नागरिकांना प्रश्न विचारायला प्रवृत्त करेल. कोरोनाकाळ आणि लॉकडाऊनच्या हाताळणीवर आणि अंमलबजावणीचा, त्यातून कमावलेल्या आणि गमावलेल्या गोष्टींचा हिशोब मांडायला जेव्हा आपण बसू, अर्थात जर आपल्या मध्यमवर्गीय कोशातून बाहेर पडायची आणि अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांना तोंड देण्याची आपल्या मनाची तयारी झाली, तर तेव्हा आपल्या खात्यात बऱ्याच प्रश्नांचे बाण देईल. मात्र यातला सर्वात मोठा प्रश्न हाच असेल की लॉकडाऊनची खरंच गरज होती का? लॉकडाऊनचा खरोखरच उपयोग झाला का?

लॉकडाऊन जरी संपत आलेला असला तरी या काळात देश, समाज आणि आपण सर्वजण ज्या अभूतपूर्व स्थित्यंतरातून गेलो त्या काळाची जखम निदान काही काळ तरी भळभळती ठेवण्याचं आणि त्यातून जे विचारणं अत्यंत गरजेचं आहे ते विचारण्याचं काम हे पुस्तक चोख करतं. आणि सुहास पळशीकरांच्याच शब्दांत, ‘लॉकडाऊनची आठवण का जागवायची याचाही उलगडा’ होतो.

जग थांबतं तेव्हा.. लॉकडाऊन काळातील नोंदी
गौरी कानेटकर
समकालीन प्रकाशन
किंमत – २०० रु. 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: