विवेकवादी चळवळीचे होकायंत्र : ‘फसवे विज्ञान : नवी बुवाबाजी’

विवेकवादी चळवळीचे होकायंत्र : ‘फसवे विज्ञान : नवी बुवाबाजी’

छद्मविज्ञानाची चिकित्सा करणारे, 'फसवे विज्ञान : नवी बुवाबाजी' हे प्रा. प.रा. आर्डे यांचे पुस्तक अलीकडेच ज्येष्ठ वैज्ञानिक व विज्ञान लेखक डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या हस्ते प्रकाशित झाले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या ७५ व्या जन्मदिनी, १ नोव्हेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात झालेल्या या प्रकाशनाच्या वेळी “विज्ञानाचे नाव घेऊन चाललेल्या दिशाभूलीपासुन सावध रहा”, असे आवाहन विज्ञान संशोधकांनी, लेखकांनी आणि कार्यकर्त्यांनी केले.

डॉ. दाभोलकर हत्या : पिस्तुल सापडले
‘पानसरे हत्या तपास एटीएसकडे देण्याबाबत सरकारने निर्णय घ्यावा’
दाभोलकरांचे मारेकरी साक्षीदाराने ओळखले

छद्मविज्ञानाची चिकित्सा करणारे, ‘फसवे विज्ञान : नवी बुवाबाजी’ हे प्रा. प.रा. आर्डे यांचे पुस्तक अलीकडेच ज्येष्ठ वैज्ञानिक व विज्ञान लेखक डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या हस्ते प्रकाशित झाले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या ७५ व्या जन्मदिनी, १ नोव्हेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात झालेल्या या प्रकाशनाच्या वेळी “विज्ञानाचे नाव घेऊन चाललेल्या दिशाभूलीपासुन सावध रहा”, असे आवाहन विज्ञान संशोधकांनी, लेखकांनी आणि कार्यकर्त्यांनी केले. या पुस्तकात फक्त भारतातीलच नव्हे तर परदेशातीलही फसव्या विज्ञानाचा इतिहास आणि भांडाफोडीचा धांडोळा घेतला आहे. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन (अंनिस) चळवळीने केलेले संघर्षही मांडण्यात आले आहेत. या निमित्ताने या पुस्तकाबद्दल जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते मिलिंद जोशी यांनी या पुस्तकात “हे पुस्तक कशासाठी” या निवेदनात सोप्या भाषेत याचे महत्त्व सांगितले आहे. ते एके ठिकाणी म्हणतात, “विज्ञानाचा महत्वाचा भाग म्हणजे ‘चिकित्सा’. त्याला मात्र छद्मविज्ञानात सोडचिठ्ठी दिलेली असते. तुमच्याकडे बैलगाडी आणि घोडागाडीनंतर थेट पुष्पक विमान कसे? तत्कालीन समाजात त्या वैज्ञानिक प्रगतीच्या, तंत्रज्ञानाच्या इतर काहीतरी खुणा दिसायला हव्यात. विजेचा शोध, त्वरीत ज्वलनशील इंधनाचा शोध डावलून, एरोडायनॅमिक्सला फाटा देऊन थेट विमान कसे उडेल? असा प्रश्न या आत्मवंचितांना पडत नाही. वैज्ञानिक पद्धती सोडाच, साधी तर्कबुद्धीही वापरली जात नाही. असा भ्रामक गोष्टींमध्ये रमणारा आत्मवंचनाग्रस्त समाज देशाला कसा काय पुढं घेऊन जाणार?” औद्योगिक-आर्थिक भांडवल, धार्मिक-भाषिक-जातीय द्वेष आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे जागतिकीकरण होत असताना अंधश्रद्धेचे सुद्धा कसे जागतिकीकरण झाले आहे हे या पुस्तकातून पुढे येते. “जागतिकीकरणाच्या नावाखाली आलेल्या भांडवलशाही नवसाम्राज्यवादाने जगात विषमता मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. आयुष्यातील अनिश्चितता आणि चिंता वाढत्या असतील तर दैववाद आणि अंधश्रद्धा वाढायला सुपीक जमीन तयार होते. भारतात ती तशीही आधीपासून आहेच, त्यात आता अजून भर पडते आहे. आपल्या देशातल्या अंधश्रद्धा कमी पडतात म्हणून की काय, बाहेरून रेकी, फेंगशुई, न्यूमरॉलॉजी, टेरो आणि अशाच बऱ्याचशा अंधश्रद्धा इम्पोर्ट केल्या जातात. यामधून एक मोठं फसवणुकीचं मायाजाल तयार होतं. आधुनिक स्वरूपाची बुवाबाजी यातून आकार घेते”, अशी नोंद सुद्धा जोशी या पुस्तकाच्या निमित्ताने करतात.

तर्कनिष्ठ लेखक आणि नियतकालिक ‘थॉट्स अँड ऍक्शन’चे संपादक प्रभाकर नानावटी यांची या पुस्तकाला प्रस्तावना आहे. त्यात एके ठिकाणी ते म्हणतात, “छद्मविज्ञानाची व्याप्ती, त्यातील वैविध्यता, त्याची जगभरातील व्याप्ती याबद्दल लेखकांनी केलेले वर्णन वाचत असताना आपण थक्क होऊन जातो. जगबुडीचे अफाट दावे, पुरातन काळातही अत्याधुनिक सोयी-सुविधा होत्या, ही समजूत, परग्रहातील रहिवाशांच्या आक्रमणाची साक्ष, फलज्योतिष व फलज्योतिषातील मंगळ, राहू, केतू इत्यादी ग्रहांची भीती घालून होत असलेली लुबाडणूक, चंद्राच्या चांदण्याचे मनावर होणारे दुष्परिणाम, सौरमालेत पृथ्वी केंद्रस्थानी आहे यावरील श्रद्धा, पृथ्वी गोल नसून सपाटच आहे, ही समजूत, चंद्रावर अंतराळवीर गेलेच नसून ते सर्व हॉलिवूडमधील शूटिंग आहे असे दावे करणे, पुरातनकाळातही वैमानिकशास्त्र होते, यासंबंधीचे खोटे दावे सादर करण्याचा प्रयत्न, अंतराळात ग्रहांची टक्कर होणार असे छातीठोकपणे सांगण्याचा प्रयत्न, ‘बर्म्युडा त्रिकोण’, हवामान-बदलाला नकार, अशा अनेक सुरस, चमत्कारिक व बाजार काबीज करत असलेल्या छद्मविज्ञानाच्या प्रकाराबद्दल सविस्तरपणे लिहून लेखक वाचकांना धोक्याची सूचना देत आहेत.” नानावटी पुढे म्हणतात, “फसव्या विज्ञानप्रसारकांना एवढी प्रसिद्धी का मिळते वा फसव्या विज्ञानाला शहाणी-सुरती माणसंसुद्धा बळी का पडतात, याचे लेखकाने केलेले विश्लेषण उद्बोधक असून ते मुळातूनच वाचायला हवे. त्याचप्रमाणे लेखकाने विज्ञान व समाज यातील संबंधाविषयीचे विचार अत्यंत चिंतनीय आहेत.”

पुस्तकाचे लेखक प्रा. प. रा. आर्डे हे सांगली येथील हे भौतिकशास्त्राचे सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे ते सल्लागार संपादक आहेत. १९८९ साली प्रसिद्ध झालेल्या “अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम” या पुस्तकाचे डॉ. नरेंद्र दाभोलकरांबरोबर ते सहलेखक आहेत. प्रा.आर्डे यांनी पुस्तकातील मनोगतामध्ये या विषयावर महाराष्ट्रात झालेल्या अलीकडच्या काळातील सामाजिक चळवळींचा उल्लेख केला आहे. ते म्हणतात, “डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी ज्योतिष, वास्तुशास्त्र आणि तत्सम छद्मविज्ञानाविरुद्ध मोहीम सुरु केली होती. त्यांच्या नंतर ही मोहीम ‘महाराष्ट्र अंनिस’ने गतिमान केली आहे. छद्मविज्ञानाचे खरे स्वरूप लोकांसमोर मांडण्यासाठी महाराष्ट्र अंनिसचे मुखपत्र ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ यामध्ये छद्मविज्ञानाची विविध अंगाने चिकित्सा सुरु झाली. केवळ चिकित्साच नाही, तर छद्मविज्ञानाद्वारे होणाऱ्या शोषणाविरोधात ‘महाराष्ट्र अंनिस’ने संघर्ष केला. अध्यात्माच्या क्षेत्रात अशी बुवाबाजी, तशीच विज्ञानाच्या क्षेत्रात छद्मविज्ञान ही बुवाबाजीच होय. विज्ञानाचा प्रभाव आणि दबदबा समाजावर आहे, हे हेरून त्याचे नकली स्वरूप छद्मवैज्ञानिक नावाच्या नव्या बुवा-बाबानी पसरावयाला सुरुवात केली आहे. हा दिशाभुलीचा नवा मार्ग बुवाबाजीचा होय.”

पुस्तकाच्या समारोपात प्रा. आर्डे हे कार्ल सेगन या विज्ञान संवादकाच्या चिंतनशील विचाराच्या साहाय्याने हा विषय समाजासाठी का कळीचा मुद्दा आहे, यावर भाष्य करतात. सेगनचा तो विचार असा आहे, “पुराव्यावरील आधारित संशयवादाचे महत्त्व वादातील आहे; पण संशयवादाची साधने सर्वसामान्य लोकांना सहसा उपलब्ध नसतात. दैनंदिन जीवनात निराशेपोटी लोक नकली विज्ञानाकडे आकर्षित होतात; तरीसुद्धा शिक्षणात, विशेषतः विज्ञानशिक्षणात संशयवादाचा संदर्भ घेतला जात नाही. राजकारण, अर्थव्यवस्था, जाहिरातबाजी आणि धर्मक्षेत्रे भोळसटपानाने व्यापलेली आढळतात. ज्यांना काहीतरी लोकांच्या माथी मारायचे आहे, ज्यांना जन्मतावर प्रभाव गाजवायचा आहे, जे सत्तेवर आहेत, त्या सर्वांचा स्वार्थापोटी संशयवादाला विरोध असतो.”  मानवी इतिहासात “शंका घेण्याच्या पायरीपासूनच ज्ञान-निर्मितीची सुरुवात होते”, या ऍरिस्टोटलच्या वाक्याचा सुद्धा प्रा. आर्डे उल्लेख करतात. हे सगळे करण्यासाठी विधायक पद्धतीने संशयवाद कसा वापरता येईल त्याकडे प्रा. आर्डे आपले लक्ष वेधतात. हे समजावून सांगताना ते म्हणतात, “टोकाचा संशयवाद किंवा टोकाची श्रद्धा यापेक्षा ज्ञानासाठी व सत्यासाठी प्रामाणिक शंकेतून शोध घेण्यासाठी बुद्धीचा वापर म्हणजे नवसंशयवाद. यालाच ‘न्यू स्केप्टीसिझम’ असे नाव आहे. जीवनात विविध क्षेत्रातील सत्यशोधनासाठी; आणि विशेषतः विज्ञानात नवसंशयवाद अमुल्य आहे. नवसंशयवाद हा विधायक आणि सकारात्मक विचार आहे.”

पुस्तकात चार विभाग आहेत. पहिल्या भागात विज्ञान आणि समाज यांच्यातील संबंधांबद्दल आहे. यामध्ये युरोपमधील १७व्या शतकातील वैज्ञानिक क्रांतीपासून पुढे १८ व्या-१९ व्या शतकातील औद्योगिक क्रांती आणि पुढे २०व्या व २१व्या शतकामध्ये आपल्यापर्यंत जागतिकीकरणाच्या माध्यमातून पोचलेला चंगळवाद अशी आपली वाटचाल कशी झाली याबद्दल मांडणी केली आहे. दुसऱ्या विभागात छद्मविज्ञानाचा विचार अधिक खोलात जाऊन मांडला आहे. छद्मविज्ञान अनर्थकारी कसे, छद्मविज्ञानाचा पसारा, छद्मविज्ञान ओळखायचं कसं आणि छद्मविज्ञानाचे मानसशास्त्र याची सखोल मांडणी या विभागात केली आहे. तिसऱ्या विभागात छद्मविज्ञानाच्या विविध प्रकारांबाबत चिकित्सक मांडणी करणाऱ्या केस स्टडीज दिल्या आहेत. आपल्याकडे ज्यांचा खूप मोठा प्रचार आहे अशा ‘मॅग्नेट  फॅड, ऍक्युपंक्चर, पॅरासायकॉलॉजी, संमोहन, रेकी, तेजोवलय, ज्योतिष, अंकज्योतिष, फेंगशुई, वास्तुशास्त्र, फोबिया, ग्रहण, गर्भसंस्कार, वरुणास्त्र, अग्निहोत्र, क्रॉप सर्कल्स, हिमालयीन यती आणि इतर काही अशा जनमानसावर मजबूत पकड असलेल्या प्रभावी छद्मविज्ञानाची ओळख या विभागात केली आहे. मानसिक आरोग्यापासून ते सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील गुंतागुंतीच्या प्रश्नांचा या सर्व प्रकारांचा संबंध आहे. शेवटच्या चौथ्या विभागात महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी आणि जागतिक पातळीवरील काही विचारवंतानी केलेल्या संघर्षाचा वृत्तांत दिला आहे.

विवेकवादी चळवळीमध्ये एकाच वेळी भारतीय संविधानाने वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसाराचे कर्तव्य आणि शोषणमुक्त अंधश्रद्धांचा सामना करण्याचे काम अनेक कार्यकर्ते गेल्या काही दशकांपासून महाराष्ट्रात, देशात, जगात कार्यरत आहेत. प्रा. आर्डे यांनीसुद्धा हे पुस्तक ऑक्टोबर २०२० मध्ये निधन झालेले चमत्कार भंजक जेम्स रँडी, ‘द गॉड डिल्युजन’ या पुस्तकाचे लेखक रिचर्ड डॉकिन्स आणि महाराष्ट्र अंनिसचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांना अर्पण केले आहे.

आगामी काळात आपल्या आयुष्यात जे काही अभूतपूर्व बदल होणार आहेत, त्या सर्व आव्हानांना आणि स्थित्यंतरांना तोंड कसे द्यायचे यासाठी एका वैज्ञानिक दृष्टीकोनाने युक्त अशा मानवी विवेकाचे संगोपन प्रत्येकाने आपल्यामध्ये का करणे आवश्यक आहे याबद्दल हे पुस्तक अतिशय खोलात जाऊन मांडणी करते. काही महत्त्वाची कारणे स्वतः प्रा. आर्डे सर समारोपात सांगतात आणि आपल्या सर्वांना यावर विचारमंथन करण्याचे आवाहन करतात : १) अर्धवट ज्ञानापेक्षा आणि अज्ञानमूलक गोष्टींपेक्षा वास्तव सत्य समजून घेणे व त्यासाठी विज्ञानाचे सिद्धांत आणि विज्ञानाची परिभाषा समजून घेणे; २) छद्मविज्ञानाचा मानसिक उगम नीट समजून घेणे; ३) नकली विज्ञान आणि अंधविश्वास यांना पोषक ठरणाऱ्या इतर चळवळीशी विज्ञानवादी चळवळीनी जोडुन घेणे आणि ४) भविष्यात अंधविश्वासाची जागा आधुनिक अंधविश्वास घेईल. हा आधुनिक अंधविश्वास म्हणजे नकली विज्ञान याचे भान ठेवणे.

विज्ञान आणि समाज यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा हा विवेकाचा आहे आणि यावर प्रा. आर्डे संपूर्ण पुस्तकात भर देतात. ‘विज्ञान आणि समाज’ याबद्दलच्या भागात ते म्हणतात, “चंगळवाद आणि पूर्वापारची दैववादी मनोवृत्ती यातून समाजाला मुक्त करायचे असेल, तर विवेकवादाशिवाय पर्याय नाही. विवेक म्हणजे शहाणपण हे दोन प्रकारचे आहे—एक भौतिक जगातील सत्य सांगणारे विज्ञानाचे नियम. भौतिक जगातील व्यवहार विविध देवदेवता, भूतपिशाच, हडळ, मुंजा या तथाकथित अतींद्रिय शक्ती नियंत्रित करीर नाहीत; किंबहुना अशा शक्तींना पुरावाच नाही. प्रत्येक भौतिक घटनेचे योग्य कारण तपासणे, म्हणजेच कार्यकारणभाव समजून घेणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन. विवेकाचा दुसरा भाग म्हणजे नीतिविवेक. चांगलं काय, वाईट काय, म्हणजेच मूल्यविवेक. चंगळवाद आणि बुवाबाजी यांच्यावर मात करण्यासाठी विवेकाचा प्रभावी वापर हावा.” चंगळवाद व बुवाबाजीबरोबरच छद्मविज्ञानाच्या फसव्या आणि असत्य अशा दाव्यांना तोंड देण्यासाठी सुद्धा आपण विवेक आपल्या जीवनात कसा जोपासला पाहिजे याचे मार्गदर्शक म्हणजे हे पुस्तक.

मध्ययुगीन आणि आधुनिक युगातील विज्ञानाच्या इतिहासाच्या टप्प्यावरील महत्त्वाचे टप्पे व त्याबद्दलच्या गोष्टी, तत्त्वज्ञ तसेच वैज्ञानिक यांच्या जीवनातील उद्बोधक प्रसंग आणि त्यांचे या विषयावरील चिंतनात्मक विचार, विज्ञान विरुद्ध छद्मविज्ञान या दोन्ही पद्धतींमध्ये प्रयोग कसे केले जातात याबद्दल जेथे गरज असेल तेथे समर्पक तपशील व चित्रे, वैज्ञानिकांची छायाचित्रे, प्रत्येक लेखाआधी या विषयावरील लोकहिताचे मुद्दे कोणते आहेत यावर दिलेला विशेष भर अशी अनेक शक्तिस्थाने या पुस्तकाबद्दल सांगता येतील. सामाजिक-सांस्कृतिक-शैक्षणिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या आणि एकविसाव्या शतकामध्ये वैज्ञानिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम भारताचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचायला हवे.

पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम कोव्हीड-१९ महामारीमुळे नुकताच ऑनलाईन पार पडला. या कार्यक्रमाची लिंक :

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0