मपिल्लाः आठवणीतले नायक

मपिल्लाः आठवणीतले नायक

गेल्या ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्यपूर्व काळात घडलेल्या मोपल्यांच्या बंडाचा इतिहास हवा तसा उकरून काढत त्याला केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या वतीने जातीय वळण दिले गेले. ते मोपल्याचे बंड नव्हते, तर हिंदूंचे शिरकाण होते, अशी आवई उठवली गेली. हे ऐतिहासिक सत्य होते की, मोपलांनी त्यांच्या उदरनिर्वाहावर गदा आणणारे ब्रिटिश आणि त्याकाळच्या जमीनदारांविरोधात उठाव केला होता. त्यातले बहुसंख्य जमीनदार हिंदू होते आणि खिलाफत चळवळीला काही काळ मिळालेल्या धगीमुळे त्यावेळी तुरळक घटनांत हिंदूही लक्ष्य झाले होते, परंतु सत्ताधारी म्हणतात, तसा मुस्लिमांनी हिंदूंवर केलेला तो अत्याचार नव्हता. ते होते, प्रस्थापितविरोधातले बंड. त्या १९२१ मधल्या बंडाच्या आठवणींना व्यक्तिगत स्मृतींच्या आधारे देण्यात आलेला हा उजाळा...

‘अर्थव्यवस्थेतील समस्या दूर करण्याआधी त्यांची माहिती हवी’
गुजरातमध्ये संपादकावर देशद्रोहाचा गुन्हा
वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘पदव्युत्तर’साठी ३० टक्के राखीव जागा

मल्याळम भाषेत ‘मप्पिला लाहाला’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि ब्रिटिश वसाहतींच्या दस्तावेजांमध्ये ‘मोपला बंड’ किंवा ‘रिबेलियन’ म्हणून नोंद असलेल्या घटनांच्या मालिकेला सरत्या ऑगस्टमध्ये १०० वर्षे पूर्ण झाली. १९२१ मध्ये मलबारमध्ये हा उठाव झाला होता. त्यानंतरच्या काळात जे लोक जिवंत होते, त्यांच्या मनात मोपला उठावाच्या आठवणी कायम जिवंत होत्या. आजघडीला या घटनांचा शैक्षणिक स्वरूपाचा इतिहास उपलब्ध आहे, पण व्यक्तिगत आठवणी मात्र तुलनेने खूपच कमी शिल्लक आहेत. या घटनांच्या शक्य तेवढ्या समीप जाण्याचा प्रयत्न म्हणून मी ९२ वर्षांच्या एका वृद्धेशी बोललो. मोपला चळवळीच्या वेळी त्यांचा अर्थातच जन्म झालेला नव्हता. त्यांच्याजवळ जी काही माहिती आहे, ती लहान असताना त्यांच्या घरातल्या मोठ्यांकडून मिळालेली आहे. त्यांच्याकडून मी जे काही ऐकले ते असे.

आठवण सांगणाऱ्या वृद्ध स्त्रीचे कुटुंब विस्तारित मद्रास प्रेसिडेन्सीतील भल्यामोठ्या मलबार जिल्ह्यामध्ये एर्नाड भागात राहत होते. त्यांच्या गावाचे नाव वालाकुलम. त्यांच्या कुटुंबाच्या जमिनी होत्या. त्यातील बहुतेक जमिनी मुस्लिमांना कुळाने दिलेल्या होत्या. या मुस्लिमांना स्थानिक भाषेत मप्पिला असे म्हटले जात असे. आठवण सांगणाऱ्या स्त्रीचे वडील त्यांच्या खेड्यातील अधिकारी होते. ब्रिटिश प्रशासनाने त्यांना शेतसारा गोळा करण्याचे हक्क दिले होते. शेतसारा म्हणजे भारतीय शेतकऱ्यांच्या दृष्टीने परकियांनी जबरदस्तीने लादलेला आणि नकोसा कर. त्या वेळी गावकऱ्यांमधील किरकोळ वाद सोडवण्याची जबाबदारीही अधिकाऱ्यांवर टाकलेली असायची. याचा अर्थ, त्या अधिकाऱ्यांचा सामान्य लोकांशी नियमित व जवळून संपर्क असायचा.

आठवणीतले बंड

या वयोवृद्ध स्त्रीने सांगितलेली आठवण अशी- मोपलांचा उठाव सुरू झाला, तेव्हा गावातील काही मप्पिलांचा गट त्यांच्या कुटुंबाच्या वडिलोपार्जित घरी रात्री उशिरा आला आणि अधिकाऱ्यास भेटायचे आहे असे म्हणू लागला. अधिकारी म्हणजे, या स्त्रीचे वडील. ते तेव्हा फक्त २५ वर्षांचे होते, पण त्यावेळी ते कारानवम अर्थात घरातील कर्ते पुरुष होते. त्यांच्या ‘थाइवली’तील ते वयाने सर्वांत मोठे पुरुष होते. थाइवली ही मातृसत्ताक पद्धतीतील वंशपरंपरा आहे. घरातील स्त्रियांनी त्यांना बाहेर आलेल्या लोकांपुढे जाऊ नका, अशी विनवणी केली पण ते लोकांना भेटण्यासाठी गेले. त्यांनी हे एक अधिकारी म्हणून असलेल्या जबाबदारीची जाणीव म्हणून केले असावे की आपले कुटुंब सुरक्षित राहावे म्हणून केले असावे? कारण काहीही असो, पण या मप्पिलांच्या गटाशी झालेली भेट त्यांच्यासाठी सुखद आश्चर्याची ठरली.

सुरक्षित स्थलांतर

मप्पिला लोक त्यांना अच्चा अर्थात वडील म्हणून हाक मारत होते. तुमच्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी आम्ही आलो आहोत, असे या लोकांनी त्यांना सांगितले. फक्त त्यांच्याकडील रायफल आपल्याकडे देऊन टाकण्याची मागणी मप्पिलांनी केली. अधिकाऱ्याला नि:शस्त्र करण्यासाठी मप्पिलांनी असे केले की स्वत:च्या संरक्षणासाठी केले, हे सांगता येत नाही. मात्र, पुढील काही दिवस ते अधिकाऱ्याच्या घरापुढे बसून राहत होते. मग एक दिवस ते पुन्हा कुटुंबाशी बोलायला आले. दुसऱ्या भागात राहणाऱ्या विरोधी गटातील मप्पिलांचा एक जमाव तिथे येत आहे, अशी माहिती त्यांना मिळाली होती. आता सर्वांनी येथून पळून गेले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

या जमीन कसणाऱ्या शेतमजूर मप्पिलांनी संपूर्ण कुटुंबाला कोट्टकल कोविलकाम या राजवाड्यापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवले. मलबारचे तत्कालीन राज्यकर्ते सामूथिरींचे हे पूर्वेकडील ठाणे होते. मप्पिलांना मिळालेली माहिती खरी होती. कारण, त्या भागात शांतता प्रस्थापित झाल्यानंतर हे कुटुंब आपल्या घरी परत आले, तेव्हा तेथेच राहून गेलेल्या एका शेतमजुराचा हात छाटला गेलेला त्यांनी पाहिला.

ही आठवण सांगणाऱ्या स्त्रीचे लग्न नंतर ज्या कुटुंबात झाले, त्यांच्याशी संबंधितही एक आठवण आहे. हे कुटुंब पराप्पानांगडीमध्ये राहत होते. अनुभव सांगणाऱ्या स्त्रीचे सासरे मुन्सफ कोर्टात वकील होते. त्यामुळे त्यांच्या स्वत:च्या कुटुंबाला स्थानिक लोकांचा जसा पाठिंबा होता, तसा या कुटुंबाला असण्याची शक्यता कमीच आहे. मात्र, या कुटुंबानेही कोट्टाक्कल कोविलाकम राजवाड्यातच आश्रय घेतला होता. हा राजवाडा त्यांच्या घरापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर होता. ते घरापासून राजवाड्यापर्यंत कसे पोहोचले, याची मात्र आठवण सांगणाऱ्या स्त्रीला कल्पना नाही. अर्थात, या प्रवासात कुटुंबाला तिरुरंगादी गावातून जावे लागले असणार. उठावाची पहिली ठिणगी या गावातच पडली होती. बैलगाड्यांमध्ये बसून संथ गतीने अशा भागातून प्रवास करणे धोक्याचेच होते. ते हल्लेखोरांच्या हातात पडण्याची शक्यता दाट होती. तरीही ते कुटुंब वाचले. घरी परतल्यानंतरच्या काळात त्यांची भरभराटही झाली. त्यांच्या या प्रवासातही मप्पिलांनीच मदत केली असावी, अशी शक्यता आहे. कारण, हे सांगणाऱ्या स्त्रीचे सासरे नंतर कोर्टात मप्पिलांची बाजू मांडण्यासाठी मद्रासला गेले होते, असे त्यांनी सांगितले. ब्रिटिश वसाहतवादी सरकारने त्यांच्यावर लावलेल्या देशद्रोहाच्या आरोपासंदर्भात त्यांचा खटला लढण्यासाठी ते गेले होते. उठावाच्या काळात आपल्या कुटुंबाला वाचवून मप्पिलांनी केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून ते हा खटला लढले असावेत.

अखेरीस, या आठवणी सांगणाऱ्या व्यक्तीच्या आईच्या आजीबाबत, अर्थात पणजीबाबत, एक गोष्ट सांगितली जाते. ही पणजी कोटक्कलजवळील खेड्यामध्ये एका पवित्र ठिकाणी एकांतात राहत होती. तिच्या सोबतीला अगदीच थोडे लोक होते. वातावरणात तणाव निर्माण झाला, तेव्हा स्थानिक मप्पिला तिच्या संरक्षणासाठी धावून गेले. या वृद्ध स्त्रीला परिस्थितीच्या गांभीर्याची जाणीव नसावी. ती सहजच बरोबरच्यांना म्हणाली की, मला फक्त माझा मुलगा गोपालनकडे घेऊन चला. तिला नेमके कुठे नेण्यात आले हे कोणालाच माहीत नाही, पण आठवण सांगणाऱ्या स्त्रीच्या मते, त्यांच्या पणजीला नक्कीच पालखीतून नेले! हा अनुभव सांगण्यासाठी पणजी जिवंत राहिली होती, हेही नक्की. मोपला उठावाच्या अगदी केंद्रस्थानात राहणाऱ्या एका भल्यामोठ्या कुटुंबातील इकडेतिकडे विखुरलेले सगळे लोक उठावाच्या काळात जिवंत राहिले. त्यांच्या मप्पिला शेतमजुरांनी दाखवलेल्या असामान्य सहानुभूतीमुळेच हे सगळे सुरक्षित राहिले.

द्वेषाची भावना नाही

हे अनुभव सांगणारी स्त्री म्हणजे खुद्द माझी आई, हे सांगणे फारसे महत्त्वाचे नाही, पण तरी आता मला ते सांगितलेच पाहिजे. १९२१ सालच्या आपत्कालीन घटनाक्रमात आईच्या नातेवाईकांना आलेले अनुभव ऐकून मी चकीत झालो. ही माणुसकीची गोष्ट त्यांनी आईला सांगितली.  आपले प्राण धोक्यात घालून त्यांना वाचवणारे मप्पिला शेतमजूर या गोष्टीचे नायक होते. त्यांच्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाने दाखवलेल्या धैर्याचा अभिमानही त्यात होता. मात्र त्यांच्या कथनामध्ये कोणत्याही प्रकारचा द्वेष नव्हता, वैरभाव नव्हता किंवा त्या काळातील जुलमी जमीनदारीची प्रतिमा स्वच्छ करण्याचा खटाटोपही नव्हता.

दुसऱ्या बाजूला, या उठावामुळे झालेली उलथापालथ त्यांच्या भागातील सगळ्यांसाठीच कशी दु:खद ठरली, याची जाणीव माझ्या आईवडिलांच्या घरांतल्या थोरल्या मंडळींना होती. शेतीच्या जुलमी पद्धतीविरोधात बंड करून उठलेल्या, आपली ओबडधोबड शस्त्रे उचलून एका बलाढ्य साम्राज्याविरोधात शौर्याने लढणाऱ्या आणि अखेरीस चिरडल्या गेलेल्या मप्पिलांसाठीही ही शोकांतिकाच ठरली होती. ब्रिटिशांनी पराभूत मप्पिलांना रेल्वेच्या मालगाड्यांमध्ये भरून मलबारबाहेर नेले. यात कोंडून अनेकांचा मृत्यू झाला. मप्पिलांवर ब्रिटिशांप्रमाणेच हिंदू जमीनदारांनी अन्याय-अत्याचार केले हे खरेच होते. परंतु या सरंजामशाही व्यवस्थेशी काहीच देणेघेणे नसलेल्या अनेक हिंदूंवरही परधर्म लादला गेला. आणि या भीषण स्थितीतून निसटलेल्यांनाही त्यांची प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त झालेली बघावी लागली. १९९२ मध्ये भारतीय मुस्लिमांना बाबरी मशीद जमावाने उद्ध्वस्त केल्याचे बघावे लागले होते. हा अनुभव १९२१ मधील मोपला उठावानंतरही अनेकांना आला होता. काळ बदलला होता. परिस्थितीचे बळी बदलले होते.

माणुसकीच्या गोष्टी

मलबारमध्ये १९२१ साली झालेल्या घटनांच्या ज्या आठवणी माझ्या आईवडिलांनी मला सांगितल्या, त्या माणुसकीने भरलेल्या आणि सुखांत होत्या. अर्थात सगळ्याच आठवणी असा सुखांत नसतील, पण तरीही त्या आपण स्वीकारल्या पाहिजेत. त्यातील काही आपल्यासाठी गैरसोयीच्या असल्या, तरीही आपण त्या स्वीकारल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या एकसामाईक भूतकाळाची आठवण करून देतात आणि सामाईक भविष्यकाळासाठी अधिक चांगल्या प्रकारे सावध आणि सज्जही करतात.

अनुवादः सायली परांजपे

पी. बालकृष्णन, हरियाणा- सोनिपत येथील अशोका विद्यापीठात अध्यापन करतात.

(‘मुक्त संवाद’ १५ सप्टेंबरच्या अंकातून साभार)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: