बोचरा थट्टापट : बोराट

बोचरा थट्टापट : बोराट

चित्रपटाचं नाव आहे Borat Subsequent Moviefilm: Delivery of Prodigious Bribe to American Regime for Make Benefit Once Glorious Nation of Kazakhstan. चि

दी ट्रायल ऑफ शिकागो सेवन
आजी आणि नातवाचं खट्याळ गूळपीठ ‘मिनारी’
मँक

चित्रपटाचं नाव आहे Borat Subsequent Moviefilm: Delivery of Prodigious Bribe to American Regime for Make Benefit Once Glorious Nation of Kazakhstan. चित्रपटाच्या इतिहासात हे सर्वात दीर्घ शीर्षक आहे.

चित्रपटाच्या सुरवातीला एक ताकीद येते, हा चित्रपट तीन वर्षाखालील मुलांना दाखवू नये, त्यांच्यावर दुष्परिणाम होईल.

चित्रपटातले  संवाद हिब्रू, बल्गेरियन, रुमानियन या भाषांत आहेत. त्यात कझाक भाषा वापरलेली नाही. चित्रणही कझाकीस्तानात नाही.

बोराट या नावाच्या एका माणसाला कझाकीस्तान नावाच्या देशाचा पंतप्रधान अमेरिकेत पाठवतो. कझाकीस्तानचा पंतप्रधान सांगतो, ”बराक ओबामा इत्यादी नालायक लोकांनी जगाची आणि कझाकीस्तानची वाट लावली. ट्रंप निवडून आल्यामुळं आणि ट्रंपची किम जाँग, पुतीन इत्यादी धटिंगणांशी मैत्री असल्यानं आता ट्रंप आपलं भलं करेल. तेव्हां, जा, ट्रंपला लाच दे.”

बोराटची पंचाईत अशी असते की ट्रंपकडं जाऊ शकत नाही. कारण मागल्या खेपेला तो ट्रंपला भेटायला गेलेला असताना ट्रंपच्या घराच्या हिरवळीवर शी करून आलेला असतो.

लाच म्हणून जॉनी नावाचं अंगठ्याच्या आकाराचं माकड द्यायचं ठरतं.

चार माणसं राहू शकतील अशा खोक्यात ते माकड ठेवलं जातं. खोका अमेरिकेत पोचतो. खोक्यातलं  माकड मेलेलं असतं आणि त्या खोक्यात असते टुटार ही बोराटची मुलगी. तिला अमेरिकेत जायचं असतं म्हणून ती गुपचूप त्या खोक्यात गेलेली असते.

आता काय करायचं. ही मुलगीच का माईक पेन्सला भेट देऊ नये, असा विचार बोराट करतो.

पेन्स हा बाईलवेडा आणि सेक्सवेडा माणूस असतो. त्याच्या भावना टुटारनं चेतवल्या पाहिजेत म्हणून तिचं रूप बदलायचं ठरतं.

बोराट आणि त्याची मुलगी टुटार यांच्याकडं एक जुनाटजीर्ण पुस्तक असतं. ते पुस्तक कझाकीस्तानच्या शेती खात्यानं प्रसिद्ध केलेलं असतं. ते पुस्तक म्हणजे त्यांचे वेद असतात, जगातलं सर्व ज्ञान त्या पुस्तकात असतं.

पुस्तकात  लिहिलेलं असतं की स्त्रिया गाडी चालवत नाहीत, चालवू शकत नाहीत. स्त्रिया बिझनेस वगैरे करू शकत नाहीत.

टुटार बघते की अमेरिकेत बायका सर्रास गाड्या चालवत असतात. गाड्या त्यांच्या मालकीच्या असतात आणि अनेक बिझनेसेसच्या त्या मालक असतात.

टुटारला कळतं की आपलं पुस्तक फोल आहे.

टुटार धावत बापाकडं येते. सांगते की एक नवं पुस्तक तिच्या हाती पडलंय. त्यात जगाचं सर्व ज्ञान आहे. पुस्तकाचं नाव आहे फेसबुक.

ती सेलफोनवरचं फेसबुक पेज उघडून बोराटला दाखवते. सांगते- बघ हे पुस्तक काय सांगतंय. की हॉलोकॉस्ट, ज्यूंचा नरसंहार, झालेलाच नाहीये.

ती सांगते की आता ती येवढी ज्ञानी झालीय की पत्रकार होऊ शकते.

ती रुडी जुलियानीची मुलाखत घ्यायला सिद्ध होते. जुलियानी टुटारचं कौतुक करतो.

बोराट एका अमेरिकन घरात रहायला जातो. ते स्थानिक अमेरिकन सांगतात, “आम्ही पक्के रिपब्लिकन पार्टीचे आहेत. हिलरी क्लिंटन ही बाई ज्यू आहे आणि ती सिनेगॉगमधे जाऊन लहान मुलांचं रक्त पिते.”

बोराटचा ऐकाऐकी समज झालेला असतो, की अमेरिकेत लोकाना मोठे स्तन आवडतात. तो टुटारच्या स्तनामधे सलाईन इंप्लांट घालून ते मोठे करण्यासाठी एका दुकानात जातो. त्या सर्जरीला फार पैसे पडतात असं वाटल्यावरून तो सुचवतो की सलाईनच्या इंप्लांटच्या ऐवजी स्तनांत बटाटे का भरू नयेत.

(ट्रंप टीव्हीवर म्हणालेला असतो की कोविडचा उपचार म्हणून लोकांनी स्टरीलायझर प्यावं. )

टुटार तयार होत नाही.

बोराटचा प्लान कोसळतो. तो आत्महत्या करायचं ठरवतो. आत्महत्या करण्यासाठी लागणारी गन विकत घेण्याएवढे पैसे बोराटकडं नसतात.

बोराटनं बातम्यांत ऐकलेलं असतं की अमेरिकेत चर्च आणि सिनेगॉगमधे खुनी घुसतात आणि स्टेनगननं पाच पन्नास माणसं मारतात.  मोफत स्वतःला मारून घेण्यासाठी बोराट सिनेगॉगमधे जातो. आपल्याला  ज्यू समजून खुनी आपल्याला गोळी घालेल या विचारानं बोराट ज्यू दिसण्याची खटपट करतो. ज्यूंची नाकं फूटभर लांब असतात अशी बोराटची समजूत. तो फूटभर लांबीची नळी नाकाला लावतो.

अमेरिकेत कोविडचा हाहाकार माजलेला असतो. एक रॅली असते. तिथं रिपब्लिकन लोकं गाणी म्हणत असतात की कोविड वगैरे काहीही नाहिये, ती एक डेमॉक्रॅटिक लोकांनी पिकवलेली कंडी आहे. रॅलीनंतर बोराट त्या माणसांच्या घरी जातो. तर ती माणसं त्याला सांगतात की थाळी जोरजोरात वाजवली की कोविड पळून जातो. बोराट तसं करतो.

माणसं रॅलीत गन घेऊन फिरतात.

बोराट गळ्यात कांद्याची माळ घालून फिरतो.

बोराट कॅलक्युलेटरला अबॅकस म्हणतो.

फाऊची आणि हिलरी क्लिंटनला वुहान जंतू टोचून मारून टाका अशी गाणी  माणसं म्हणतात.

माईक पेन्स, डोनाल्ड ट्रंप, रुडी जुलियानी यांची यथेच्छ टिंगल चित्रपटभर पसरलेली आहे. साचा कोहेन हा चित्रपटाचा निर्माता जाम ट्रंप विरोधी आहे. २०१६ साली ट्रंप निवडून आल्यावर तो जाहीरपणे म्हणाला होता की आता लोकशाहीची वाट लागणार. चित्रपटात बोराट ट्रंपचं सोंग परिधान करून पेन्सच्या रॅलीत घुसतो, खांद्यावर टुटार असते.

हे झाले या पटातले राजकीय धागे.

आणखीही अनेक धागे आहेत, पण त्यांचं वर्णन करणं कठीण आहे. कारण ते विरूप, विक्षिप्त, सुरवातीला किळसवाणे आणि हिडीस आहेत.

टुटार स्तन मोठे करण्यासाठी डॉक्टरकडं जाते आणि म्हणते की मला पुरुषांनी अत्याचार करावा इतकी उत्तेजक करा.

पुरुषांच्या लेखी स्त्री काय असते ते दाखवणारी अनेक दृश्य चित्रपटभर पसरलेली आहेत. देखणी व्हावी यासाठी केसांचा रंग व रुप बदलण्यासाठी टुटार एका दुकानात जाते. यातली ॲब्सर्डिटी दाखवण्यासाठी हा प्रसंग आचरट विनोदाच्या पद्धतीनं दाखवलाय. टुटार स्कर्ट वर करून जांघेतले केसही रंगवावे लागतील कां असा  प्रश्न विचारते.

स्त्री पुरुषांचे अवयव, संभोग इत्यादी गोष्टींची अगदी छोटी, तीनेक सेकंदांची दृश्य चित्रपटात आहेत.ती दाखवण्याची पद्धत अशी की ती कामोत्तेजक वगैरे वाटत नाहीत, सुरवातीला किळस वाटते नंतर नंतर हसू येतं.

अमेरिकन समाजातल्या विकृतींवर बोराट बोट ठेवतो. जगातल्या सर्व गोष्टींना अमेरिकेत कमोडिटी, उपभोग्य वस्तूचं स्थान दिलंय.

आपल्याकडं अती झालं आणि हसू आलं असं म्हणायची पद्धत आहे.

अतिरेक करून बोचरं वास्तव दाखवणं ही एक विनोदाची पद्धत असते. एखादी गोष्ट प्रमाणाबाहेर दाखवणं. माणूस, घटना, विचार इत्यादी गोष्टींची परिमाणं प्रमाणाबाहेर विस्तारून दाखवणं.

माणसाचे चेहरे आणि अवयव त्यांची नैसर्गीक परिमाणं बदलून पिकासोनं चितारली. डोळे आणि स्तन कायच्या कायच मोठे आणि बटबटीत दाखवले. माणसं, प्राणी वेडेवाकडे दाखवले. त्याचं गर्निका हे चित्रं गर्निका या गावात झालेल्या नरसंहाराचं चित्रण करतं. पण पारंपरीक आकार आणि रुपाची सवय असलेल्या माणसाला ते चित्र समजत नाही.

पहिल्या युद्धाच्या आसपास जर्मन चित्रपटात ‘काळ्या’ पटांनी प्रवेश केला. तो हिटलरचा काळ होता. अमानुषता दैनंदिन जीवनात दिसू लागली होती. चित्रपटाचं गोडगुलाबी उपदेशात्मक वगैरे रूप बदललं, चित्रपटात हिंसा दिसू लागली. जर्मनीतली एक्सप्रेशनिस्ट चित्रकारी चित्रपटात प्रवेश करती झाली.  नंतर तो प्रवाह फ्रान्समधे गेला आणि नंतर अमेरिकेत गेल्यानं जागतीक झाला.

विषमता, वर्णद्वेष, परद्वेश, स्त्रीविरोधी विचार या गोष्टी समाजामधे  प्रतिष्ठित झाल्या,अतिरेक झाला. चित्रपटातून प्रतिक्रिया उमटू लागली. व्हीयेतनाम युद्ध आणि काळ्यांना दिली जाणारी विषम अमानवी वागणूक या दोन मुद्द्यांवर अमेरिकेत किती तरी चित्रपट निघाले.

वस्तू, रंग, शरीर, विचार,  यांची परिमाणं बदलून कलाकार त्याचं मन व्यक्त करत असतो. जाझ, पंक,मेटल इत्यादी संगितात ध्वनीची पट्टी, लय, गोडवा इत्यादी गोष्टींची परिमाणं बदलून संगीतकार त्यांचा राग, त्यांचं आक्रंदन व्यक्त करत असतात.

पाचेक वर्षांपूर्वी अलेजांद्रो जोदोरवस्की याची एंडलेस पोएट्री नावाची फिल्म मामी फिल्मोत्सवात सादर झाली होती. तो एक कल्पनाविष्कार होता.  त्यात माणसं म्हणजे हाडाचे सापळे होते. घरं म्हणजे स्टुडियोत उभारतात तशी घरं होती. रक्त मुक्तपणे वहात होतं. सेक्स अत्यंत हिडीस वाटावा अशा रीतीनं दिसत होता. स्तन, लिंग यांचे येवढे मोठे आकार होते की शेवटी शेवटी हसू येऊ लागतं. मनात विचार येतो की हे सारे अगदी उघड विक्षिप्त उद्योग कलाकार का करतोय?

विक्षिप्त,विरूप.

अलेजांद्रो जगातल्या सर्वच व्यवस्थांना आव्हान देतो. त्याला माणसाच्या वागण्यावर कोणतीही बंधनं नको आहेत. तो कुटुंब, चर्च,सरकार, अर्थव्यवस्था (भांडवलशाही), निर्व्यसनीपणा,  इत्यादी सर्व गोष्टींच्या विरोधात आहे.

एंडलेस पोएट्री हा चित्रपट कलात्मक होता. त्या तुलनेत बोराट हा चित्रपट भरड विनोदाच्या रुपाचा आहे.

अलीकडं बंड कमी झालीत. माणसं स्वतःमधे फार मग्न झालीत. ती शक्तीसमोर शेळी झालीत.

थंड गोळ्यात कधी कधी एकादी एंडलेस पोएट्री किंवा बोराट अशा छोट्या होळ्या जगण्याची ऊब देतात.

या चित्रपटाची पटकथा ९ जणांनी लिहीलीय. पटकथेसाठी चित्रपटाला नामांकन आहे. समजा बक्षीस मिळालं तर इतक्या ऑस्कर मूर्त्या कराव्या लागणार.

सहाय्यक अभिनय या वर्गातलं नामांकन मारिया बाकालोवा हिला आहे.

साचा बॅरन कोहेन या चित्रपटाचा निर्माता आहे. त्याला जुडास अँड ब्लॅक मेसिया या चित्रपटासाठी सहाय्यक अभिनेता नामांकन आहे.

असे चित्रपट निर्माण होतात आणि ते ऑस्करमधे पोचतात याचा आनंद वाटतो.

निळू दामले, लेखक आणि पत्रकार आहेत.

बोराट
दिग्दर्शक – जेसन वोलीनर 
कलाकार – मारिया बाकालोवा, साचा बॅरन कोहेन 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0