बोरिस जॉन्सन ब्रिटनचे नवे पंतप्रधान

बोरिस जॉन्सन ब्रिटनचे नवे पंतप्रधान

लंडन : लंडनचे माजी महापौर, माजी परराष्ट्रमंत्री व हुजूर पक्षाचे नेते बोरिस जॉन्सन ब्रिटनचे नवे पंतप्रधान असतील. मंगळवारी त्यांनी पक्षांतर्गत लढतीत आपले प्रतिस्पर्धी जेरेमी हंट यांचा पराभव केला. जॉन्सन यांना ९२,१५३ तर हंट यांना ४६,६५६ मते मिळाली. जॉन्सन बुधवारी मावळत्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्याकडून पंतप्रधानपदाची सूत्रे घेतील.

जॉन्सन यांची पंतप्रधानपदी निवड होताच काही मिनिटात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जॉन्सन यांचे अभिनंदन करत त्यांची निवड योग्य असल्याचे ट्विट केले.

आपल्या निवडीनंतर बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटनला ब्रेक्झिट मिळवून देईन (Deliver), दुभंगलेला देश एकत्र आणेन (Unite) व प्रमुख विरोधी नेते जेरेमी कॉर्बन यांना पराभूत करेन (Divide) अशा शब्दांत आत्मविश्वास व्यक्त केला. जॉन्सन यांनी यासाठी ‘DUD’ हा शब्द वापरला.  ब्रिटनमध्ये ऊर्जा आणण्याची गरज आहे ती आणण्याचा मी प्रयत्न करेन. ३१ ऑक्टोबरपर्यंत ब्रेक्झिट पूर्ण केले जाईल असे ते म्हणाले.

ब्रिटनचा नवा पंतप्रधान कोण असेल यासाठी हुजूर पक्षामध्ये मतदान घेतले गेले. सुमारे १,६० हजार सदस्यांपैकी ८७.४ टक्के सदस्यांनी मतदान केले. त्यात जॉन्सन याना ६६.४ टक्के मिळाले. २००५ मध्ये डेव्हिड कॅमेरून यांना ६७.६ टक्के मते मिळाली होती. त्या तुलनेत कमी मते जॉन्सन यांना मिळालेली आहेत.

बोरिस जॉन्सन हे ब्रिटनच्या राजकारणात अत्यंत कलंदर व्यक्तिमत्व समजले जातात. त्यांच्या अनेक वादग्रस्त विधानाने ते नेहमीच चर्चेत असतात. ब्रिटनला ब्रेक्झिटशिवाय पर्याय नाही अशी भूमिका त्यांनी सातत्याने घेतली होती. त्यासाठी कोणत्याही थराला जायची त्यांची तयारी होती. पण त्यांच्या भूमिकेवर हुजूर पक्षात असहमती असल्याने त्यांना परराष्ट्रमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

मंगळवारी त्यांच्या निवडीवेळी हुजूर पक्षातले अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री गैरहजर होते. शिक्षणमंत्री अॅनी मिल्टन यांनी काही मिनिटात राजीनामा दिला. तर कॅबिनेटमधील अनेक ज्येष्ठ मंत्री राजीनामा देण्याच्या पवित्र्यात आहे.

COMMENTS