बोरिस जॉन्सन आणि ख्रिसमस पार्टी

बोरिस जॉन्सन आणि ख्रिसमस पार्टी

शेवटी बैल उधळता कामा नयेत, बैलगाडी रस्ता सोडून खड्ड्यात जाता नये, याची काळजी गाडीवानाला घ्यायची असते. असा हा गाडीवानच उधळलेल्या बैलासारखा असेल तर?

बोरिस जॉन्सन ब्रिटनचे नवे पंतप्रधान
ब्रिटनमध्ये बोरिस पुन्हा सत्तेवर
जॉन्सन, पोस्ट ट्रुथ आणि बहुसांस्कृतिवाद

बोरिस जॉन्सनना ख्रिसमस पार्टी महागात पडतेय.

गेल्या वर्षी म्हणजे २०२० सालाच्या डिसेंबरमधली गोष्ट. १७ तारखेला ‘दहा डाऊनिंग स्ट्रीट’ या पंतप्रधान निवासात सुमारे पन्नासेक लोक जमले होते. कम्युनिकेशन्स संचालक डॉयल त्या ठिकाणी हजर होते. त्या विभागात वर्षभर काम केलल्या लोकांची ती बैठक होती.

बैठकीचं रुपांतर पार्टीत झालं. खरं म्हणजे ती बैठक नव्हतीच, पार्टीच होती. वर्षभरात कामगिरी केल्याबद्दल लोकांना भेटवस्तू देण्यात आल्या. भेटवस्तू म्हणजे अर्धातच ख्रिसमसच्या भेटवस्तू होत्या. साहजिकच खाणं पिणं झालं. नाच झाला. खेळ खेळले. मध्य रात्र उलटेपर्यंत ही पार्टी चालली.

‘दहा डाऊनिंग स्ट्रीट’ म्हणजे सुमारे १०० खोल्यांची इमारत आहे. तिच्यात पंतप्रधान रहातात, त्यांचं कार्यालयंही तिथं असतं, तिथं अनेक खोल्या दालनात बैठकांची सोय असते. त्या पैकी एका खोलीत ही पार्टी झाली.

पंतप्रधान बोरीस जॉन्सनही काही वेळ या पार्टीत उपस्थित होते.

ते दिवस ऐन कोविड साथीचे होते. ब्रिटनभर कोविड रोरावत होता. आदल्या दिवशी सरकारनं आदेश काढला होता की सोशल डिस्टन्सिंग पाळावं, चार लोकांनी एकत्र जमू नये, रेस्टॉरंट आणि बार बंद, सिनेमा घरं बंद, पार्ट्या बंद, ख्रिसमस साजरा करायचा नाही.

नेमक्या त्याच दिवशी ब्रिटनमधे ४८९ माणसं कोविडमुळं मेली होती.

थापाडे आणि लपवाछपवी करण्यातले उस्ताद बोरिस जॉन्सन यांनी ही पार्टी लपवली, लोकांसमोर जाणार नाही याची व्यवस्था केली.

पण खोकला कधीही लपून रहात नाही.

परवाच्या नोव्हेंबरमधे म्हणजे जवळपास अकरा महिन्यांनी खोकला लोकांच्या कानावर पडला.

गंमतच झाली.

कधी तरी जॉन्सन सरकारच्या प्रसिद्धी विभागातले लोक पत्रकार परिषद कशी हाताळायची याचा सराव करत होते. म्हणजे अभिरूप न्यायालय भरवतात तशी पत्रकार परिषद ‘दहा डाऊनिंग स्ट्रीट’मधे चालली होती. एक बाई मंत्री किंवा पंतप्रधानाच्या भूमिकेत उभ्या होत्या आणि पत्रकाराची भूमिका करणारे कर्मचारी समोर बसले होते.

समोरच्या ‘पत्रकारांनी’ प्रश्न विचारला ”सतरा तारखेला पार्टी झाली होती हे खरं आहे कां?”

सराव पत्रकार परिषदेत भाग घेतलेले पत्रकार सतरा तारखेच्या पार्टीत असल्यानं त्यांनी अगदी निष्पाप पद्दतीनं तो प्रश्न विचारला.

मंत्र्याच्या भूमिकेतल्या बाई गोंधळल्या, हसल्या. शेक्सपियरच्या नाटकातल्या नाटकासारखी अवस्था झाली. थातूर मातूर पद्धतीनं त्या म्हणाल्या की पार्टी झालीच नाही. सराव परिषदेतले सगळे हसले.

सराव हा अभ्यासच असल्यानं कोणी तरी या सराव परिषदेचं चित्रीकरण करत होतं, केवळ अभ्यास करण्यासाठी.

पण कसं ते कळत नाही, हे चित्रीकरण डेली मिरर या पेपरच्या हातात पडलं.

अरेच्चा. म्हणजे ऐन कोविड महामारीत सरकारनंच सरकारचे आदेश धुडकावून लावून पार्टी केली होती तर.

मिररची ट्यूब पेटली. त्यांनी बातमीदार सरकारच्या मागं लावले. अशा किमान दोन तरी पार्ट्या झाल्याची माहिती त्यांना मिळाली. एक पार्टी व्हाईट हॉल म्हणजे सरकारी इमारतीत, शिक्षण विभागात झाली होती.

डेली मिररनं बातमी छापली.

आयटीव्ही या चॅनेलनं ती चित्रफीतच दाखवली.

ब्रिटीश माध्यमांना या अशा वाईट सवयी आहेत. बोरीस जॉन्सना या वाईट सवयींचा तिटकारा आहे. ते म्हणाले ”सरकारनं कोविडच्या सूचना आदेशांचं स्वतः योग्य पालन केलं आहे.” पण पार्टी किवा पार्ट्या झाल्या की नाहीत ते बोलायला ते तयार नव्हते.

पोपट निपचीत पडला होता. पोपट खात नव्हता. पोपट बोलत नव्हता. पोपट हालचाल करत नव्हता. प्रश्न होता पोपट मेला होता की नाही.

माध्यमांनी प्रकरण लावून धरलं. बीबीसी, गार्डियन इत्यादी तमाम माध्यमांनी बातम्या छापल्या.

जॉन्सन यांचं एकच उत्तर- सरकार नियमांचं पालन करत आलं आहे.

या पार्टीत भाग घेतलेल्या एका महिला कर्मचाऱ्याच्या आईला कोविड झाला आणि ती मेली. बहुदा तो कोविड त्या कर्मचारी महिलेनं पार्टीतून स्वीकारला होता.

पार्लमेंटात हा प्रश्न आला नाही तरच नवल. सत्ताधाऱ्यांना धुणं हे तर विरोधी पक्षाचं कामच असतं.

खासदारांनी प्रकरण लावून धरलं.

बरीच धुलाई झाल्यानंतर जॉन्सन यांनी कबूल केलं की एका सरकारी अधिकाऱ्याला या प्रकरणाची चौकशी करायला सांगितलं आहे.

खासदारांनी विचारलं की अरे तुम्ही तर म्हणत होतात की असं काही घडलच नाही मग चौकशी कसली करताय.

जॉन्सन म्हणू लागले की चौकशीतून जे काही बाहेर येईल तेव्हां योग्य ती कारवाई केली जाईल, कोणालाही सोडलं जाणार नाही.

खासदारांनी विचारलं की तुम्ही तर म्हणताय की पार्टीच झाली नव्हती मग हे कोणालाही सोडणार नाही वगैरे काय आहे.

सभागृहात गोंधळ झाला, जॉन्सन त्यांच्या ‘पोपट निपचीत पडला आहे,’ या उत्तराला चिकटून राहिले.

विरोधी पक्ष नेत्यानं सरकार, जॉन्सन बेशरम आहेत असा शिक्का मारला. जॉन्सन चिडले वगैरे नाहीत, पोपट निपचीत पडलाय यावर ते ठाम राहिले.

चूक तर घडलीच होती. ती टळती तर बरं झालं असतं. चुका हे मानवी वागण्याचं एक स्वाभाविक अंग आहे. त्यामुळं वेळीच सरकारनं चूक मान्य केली असती, संबंधितांना तंबी वगैरे दिली असती तर प्रकरण तिथंच संपलं असतं. कोविडच्या काळात जगभरच्या सरकारांनी घोळ घातले आहेत, चुकीचे निर्णय घेतले आहेत. त्यापैकीच हाही एक गाढवपणा असं म्हणून जगानं सोडून दिलं असतं.

पण जॉन्सन यांचं पोरकट आणि अहंमन्य वागणं महागात पडलं.

लोकशाहीचा गाडा अनेकानेक माणसं आणि संस्था मिळून चालवत असतात. पण गाडा हाकारणारा गाडीवान कळीची भूमिका पार पाडत असतो. शेवटी बैल उधळता कामा नयेत, बैलगाडी रस्ता सोडून खड्ड्यात जाता नये, याची काळजी गाडीवानाला घ्यायची असते. असा हा गाडीवानच उधळलेल्या बैलासारखा असेल तर?

एकटे ट्रंप, एकटे बोरीस जॉन्सन. अख्खा देश वेठीस धरला आहे. निवडणुकीत निवडून आल्यामुळं त्यांना राज्य करण्याचा अधिकार मिळतो. पण त्या अधिकाराचा वापर करून ते संसदेचीच ऐशी की तैशी करतात, व्यवहारावर लक्ष ठेवण्यासाठी निर्माण केलेल्या यंत्रणाच मोडीत काढतात. लोकशाही पद्धतीनं निवडून येतात आणि लोकशाहीचीच वाट लावतात.

लोकशाहीची शिडी फक्त माझ्यासाठी. मी मुख्य जागेवर पोचलो की शिडी मोडून टाकणार, इतर कोणालाही ती शिडी सापडू नये याची व्यवस्था करणार.

ख्रिसमस पार्टीचं प्रकरण म्हणजे एका पाच पन्नास माणसांनी केलेल्या वर्तनाचं प्रकरण नाही, ते प्रकरण लोकशाहीतल्या फटी दाखवतं.

निळू दामले लेखक आणि पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: