आज बौद्धिक सहिष्णुतेची गरज आहे

आज बौद्धिक सहिष्णुतेची गरज आहे

एका पुरस्कार समारंभात अमोल पालेकर ह्यांनी नसिरुद्दीन शाह आणि टी एम कृष्णा यांच्या म्हणण्याला पाठींबा देत, मतभेद आणि निर्भय संवाद ह्याचा स्वीकार करण्याचे आवाहन प्रेक्षकांना केले आहे.

कलाकार गप्प का आहेत?
आम्ही एकत्र आहोत!
अमोल पालेकरांचे मुद्दे औचित्यभंग नव्हे तर औचित्यपूर्ण! सांस्कृतिक मंत्रालयाला सर्व मुद्दे मान्य!

पुरस्काराचा स्वीकार करण्यापूर्वी, मला हा पुरस्कार कोणाच्या हस्ते दिला जाणार आहे अशी विचारणा मी केली होती. ज्यांनी बनवलेल्या चित्रपटांची संख्या दोन आकडी सुद्धा नाही अशा, कॉम्रेड कुमार सहानी ह्यांच्या हस्ते होणार असल्याचे समजल्यावर मला बरे वाटले. १९८४ मधली गोष्ट. एक दिग्दर्शक म्हणून त्यांनी मला त्यांच्या ‘तरंग’ चित्रपटात स्मिता पाटीलसह एका उद्योजकाची भूमिका दिली होती. तोपर्यंत माझ्या अनेक चित्रपटांनी रौप्यमहोत्सव साजरे केले होते. तरीही सव्वा रुपया मानधन घेऊन मी तो चित्रपट केला. कारण  राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या कमी बजेटमधला तो चित्रपट होता.

भारतीय चित्रपटाचे भविष्य म्हणून सत्यजित रे ह्यांनी ज्या तीन दिग्गजांची निवड केली यापैकी एक असलेल्या कॉम्रेड कुमार सहानी यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळणे हा मला माझा सन्मानच वाटतो आहे. आपल्याला कोणत्या प्रकारचे चित्रपट बनवायचे आहेत हे कुमार सहानी ह्यांना नेमके ठाऊक होते. छोट्यात छोट्या तपशिलाबाबत सुद्धा त्यांनी कधीही तडजोड केली नाही. चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी, संधीकाळाच्या काही मिनिटे टिकणार्‍या कालावधीत करावयाचे चित्रीकरण, त्यांनी रद्द केले होते. कारण चित्रपटाच्या कपडेपट डिझायनर भानू अथैया ह्यांनी माझ्या भूमिकेसाठी ज्या रंगाच्या सूटची निवड केली होती ती रंगछटा त्यांना पसंत पडली नव्हती !

‘बिग बजेट’ चित्रपटाच्या चाकोरीपासून, किंवा बाजारपेठेच्या मागणीनुसार बेतल्या जाणाऱ्या चित्रपटांपासून दूर राहणारे, किंवा बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या गल्ल्यावर चित्रपटाचे यश मोजणे नाकारणारे काही मोजके चित्रपट दिग्दर्शक त्यावेळी होते. बॉक्स ऑफिसची गणिते किंवा चित्रपटासाठी मिळणारे मानधन यावर डोळा ठेवून चित्रपट न स्वीकारणाऱ्या ‘मोजक्यां’ पैकी  मी एक होतो / आहे, ह्याचा मला अभिमान आहे. संहितेचा ओघ हा माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा होता. मुख्य प्रवाहातील व्यावसायिक चित्रपटाचा मोह मला कधीच पडला नाही कदाचित त्यामुळेच असेल, पण माझ्या कारकिर्दीत मी नाकारलेल्या चित्रपटांची संख्या स्वीकारलेल्या चित्रपटांपेक्षा अधिक आहे.

दुर्दैवाने, बॉलीवूड हा भारताच्या राष्ट्रीय चित्रपटाचा चेहरा मानला जातो. पण हा दृष्टिकोन प्रादेशिक चित्रपटाच्या वैशिष्ट्यावर/अस्तित्वावर घाला घालणारा आहे. प्रादेशिक चित्रपटांचा मी कट्टर पाठीराखा आहे. बॉलिवूडच्या व्यावसायिकतेचे संकेत झुगारून मी बंगाली, मल्याळम, कन्नड, आणि अर्थात मराठी चित्रपटातील भूमिका स्वीकारल्या.

चित्रकला, चित्रपट किंवा रंगभूमी… या तीन वेगवेगळ्या माध्यमांमध्ये मला संचार करता आला ह्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. या माध्यमांच्या द्विमिती असो वा त्रिमिती अवकाशातील प्रयोग मी करत राहिलो  आणि त्यातील दृश्य शक्यता आजमावून बघितल्या. अवकाश आणि त्यातील दृश्य, हे वर्तुळ आणि त्यातील केंद्र्बिन्दुसारखे असते; एकमेकांशिवाय त्यांना अस्तित्व नसते. जेव्हा मी चित्रकलेकडून नाटकाकडे वळलो तेव्हा त्या त्रिमिती अवकाशाने माझ्यासमोर अक्षरशः रचना, प्रकाश, जिवंत माणसांचा वावर, हालचाली, आणि ध्वनी रचना ह्याच्या असंख्य शक्यता भिरकावल्या. पारंपरिक, शब्दबंबाळ नाटकापासून दूर जात लेखनातून, घाटातून जे प्रवाह निर्माण झाले त्यातून शब्दांचे अर्थ मी जाणून घेतले. अशा प्रयोगातून माझ्या नाटकांना अवास्तववादी अशी बैठक दिली.

 'मी बंडखोरी केली, म्हणून टिकून राहिलो' हे कामूचे वाक्य माझ्या पाच दशकाच्या कारकिर्दीचे नेमके वर्णन करणारे आहेत.

‘मी बंडखोरी केली, म्हणून टिकून राहिलो’ हे कामूचे वाक्य माझ्या पाच दशकाच्या कारकिर्दीचे नेमके वर्णन करणारे आहेत.

एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून कॅमेर्‍यामुळे माझ्यासमोर ज्या अनंत शक्यता निर्माण झाल्या, त्यांमुळे मी अनावश्यक फापटपसार्‍यापसून मुक्त झालो. माझ्या प्रत्येक चित्रपटात मी दृश्यात्मकता आणि विषयांच्या विविध रंगछटा याचा वेगळ्या तऱ्हेने वापर करण्याचा प्रयत्न केला आहे. हॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये सुद्धा, स्त्रियांची पात्रे नेहेमी दुय्यम आणि उथळ असतात. पण माझे जवळपास सगळे चित्रपट स्त्रीकेन्द्री  आहेत. आज्ञाधारक, कणा नसलेली किंवा मूर्ख अशी स्त्रीपात्रे मी कधीही रंगवली नाहीत याचा मला अभिमान आहे.

मागे वळून बघतांना मला जाणवते, माझा आजवरचा प्रवास कधीच आखीव आणि एकरेषीय नव्हता. पण मी हेही जाणून होतो की मुख्य प्रवाहाशी मी कधीच जमवून घेऊ शकणार नाही. ‘मी बंडखोरी केली, म्हणून टिकून राहिलो’ हे कामूचे वाक्य माझ्या पाच दशकाच्या कारकिर्दीचे नेमके वर्णन करणारे आहेत. कलेपासून वेगळा होऊन मी जगूच शकत नाही, किंबहुना तेच माझ्या जगण्याचे सार आहे. माझ्यातील कलाकाराला प्रोत्साहन देणाऱ्या, माझ्यावर निखळ प्रेमाचा आणि सन्मानाचा वर्षाव करणाऱ्या माझ्या प्रेक्षकांचा, तुम्हा सर्वांचा आभारी आहे. मी प्रेक्षकांना कधीही बाळबोध समजलं नाही कारण प्रेक्षकांच्या बुद्धीमत्तेवर माझा विश्वास आहे. सदैव त्यांच्याशी सच्चेपणाने वागलो.

आणि त्याच सच्चेपणाने आज मी प्रेक्षकांना आणि सर्वांना विनंती करतो आहे, जगाच्या कृष्णधवल द्वंद्वावर विश्वास न ठेवता शहाणे होऊ या. काळे आणि पांढरे या दोन रंगांच्या दरम्यान असलेल्या  छटेचा, विचारसरणीतील मतभेदांचा स्वीकार करीत निर्भय संवाद करू या. जिथे परस्पर विरोधी विचारही सखोल चिकित्सेशिवाय मोडीत काढला जाणार नाही, अशी दोन रंगांच्या दरम्यानची ‘संधीछटा’ स्वीकारणे ही आज काळाची गरज आहे.

एकदा ही संधीछटा पुनरुज्जीवित झाली की, इतिहासाचे चुकीचे चित्रण केल्याबद्दल ‘पद्मावत’वर टीका करणारे, त्या चित्रपटाचा ‘एक सन्माननीय कलाकृती’ म्हणून गौरविणार्‍या लोकांचाही स्वीकार करतील; येशू किंवा अल्लाची गाणी म्हणण्याची टी.एम.कृष्णा ह्यांची कल्पना आवडत नसली, तरी तेच लोक टी.एम.कृष्णा ह्यांच्या मैफिली रद्द केल्याचा निषेध करू शकतील;

हिंसेबद्दल नसिरुद्दीन शाह ह्यांना वाटणारी भीती अमान्य करूनही, एक कलाकार म्हणून नसिरुद्दीन ह्यांच्याबद्दल आदर आणि प्रेम कायम राखू शकतील; निव्वळ एक ‘खान’ असल्यामुळे, महाभारतात कृष्णाची भूमिका केल्याबद्दल आमीर खान ह्याला ट्रोल केले जाणार नाही.

समाज टोकाच्या विभाजनाने ग्रासलेला असलेल्या ह्या काळात, सामाजिक दृष्ट्या एक जबाबदार नागरिक म्हणून मी ह्या काळ्या-पांढऱ्या रंगाच्या दरम्यान असलेल्या ‘संधीछटेच्या’ शोधात आहे. ‘शहरी नक्षली’ नावाचे कोणी खलनायक आपल्यापुढे उभे करणाऱ्या भाकडकथांना बळी जाण्यापासून आपण स्वतःला वाचवू या. आपल्यातल्या  मतभिन्नतेचा आदर करू या.

सदर लेख अमोल पालेकर यांनी  २५ डिसेंबर २०१८ रोजी झेनिथ एशिया अवॉर्ड कार्यक्रमात केलेल्या भाषणाचा संपादित अंश आहे.

लेख मूळ इंग्रजीतील लेखाचा अनुवाद आहे.

(अनुवाद – वंदना अत्रे)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: