आयर्लंड आणि ब्रिटन : दुर्दशांची मीमांसा करणारी पुस्तकं.

आयर्लंड आणि ब्रिटन : दुर्दशांची मीमांसा करणारी पुस्तकं.

देश आपला कां असेना, परखडपणे आपल्या देशात घडणाऱ्या घटनांची समीक्षा करणं हे ब्रिटन, अमेरिका इथल्या समाजाचं वैशिष्ट्यं. फिंटन ओ टूल यांची पुस्तकं हे त्या

भारतीय राष्ट्रवादाची ओळख : भारत अमुचि माता
‘96 मेट्रोमॉल’ समजावून घेताना…
‘आठवडी बाजारा’ची मुशाफिरी

देश आपला कां असेना, परखडपणे आपल्या देशात घडणाऱ्या घटनांची समीक्षा करणं हे ब्रिटन, अमेरिका इथल्या समाजाचं वैशिष्ट्यं. फिंटन ओ टूल यांची पुस्तकं हे त्याचं एक उदाहरण. फिंटन ओ टूल हे आयरिश लेखक आहे आणि आयर्लंड या देशातील घटनांवर ते सतत लिहीत असतात.

फिंटन ओ टूल यांचं ” हिरोईक फेल्युअरः ब्रेक्झिट अँड द पॉलिटिक्स ऑफ पेन ” हे पुस्तक गेल्या वर्षी (२०१८) प्रसिद्ध झालं. ब्रिटननं युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचं अपयश कसं आपणहून ओढवून घेतलं याचं विश्लेषण ब्रेक्झिटचा तमाशा ऐन रंगात आला असताना ओ टूल यांनी पुस्तकात केलंय.

त्या आधी २००९ मधे त्यांचं ” शिप ऑफ फूल्स, हाऊ स्टुपिडिटी अँड करप्शन सँक द सेल्टिक ” हे पुस्तक प्रसिद्ध झालं होतं. आयरिश लोकांनी १९९४ ते २००६ या काळात फार वेगानं आर्थिक विकास केला. दोन तीन वर्षातच या विकासाची फळं भ्रष्ट पुढाऱ्यांच्या टोपलीत गेली, आयर्लंडची धूळधाण झाली. इतकी की आयएमएफकडं भीक मागायची पाळी यावी. आयर्लंडच्या या दुर्गतीची मीमांसा ओ टूल यांनी शिप ऑफ फूल्समधे केली.

फिंटन ओ टूल

फिंटन ओ टूल

फिंटन साहित्य-लिटरेचर-संपादक आहेत आणि नाट्य समीक्षक आहेत. पण त्याच बरोबर परखड चिंतन करणारे पब्लिक इंटलेक्चुअलही आहेत. त्यांनी आयरिश टाईम्स आणि न्यू यॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्समधे विपुल लिखाण केलं आहे. अमेरिका आणि आयर्लंड या देशांचं राजकारण, अर्थ कारण यावर त्यानी १५ पुस्तकं लिहिलीत.

ओ टूल आयरिश आहेत. ओ टूल  यांचे काका, मावशा, आत्या, भावंडं इंग्लंडमधे-ब्रिटनमधे स्थायिक झाली आहेत. ओ टूलनी अनेक वेळा आपल्या नातेवाईकांकडं इंग्लंडमधे येजा केली आहे. पण ते इंग्लंडमधे स्थायिक झाले नाहीत, ते स्वतःला ब्रिटीश म्हणवत नाहीत, आयरिश म्हणवतात. हिरोईक फेल्युअर या पुस्तकाच्या पहिल्या धड्यात त्यांनी त्यांचे इंग्लंडमधले लहानपणाचे अनुभव सांगितले आहेत. इंग्लीश संस्कृती आणि आयरिश संस्कृतीतले भेद अनेक घटनांमधून त्यांनी त्या धड्यात स्पष्ट केले आहेत. इंग्लंडमधले लोक अँग्लो सॅक्सन आहेत, आयरिश लोक सेल्टिक आहेत; दोघांच्या भाषा वेगळ्या आहेत; इंग्लीश लोक प्रोटेस्टंट आहेत,आयरिश कॅथलिक आहेत; हे भेद इतके तीव्र आहेत की या दोन संस्कृती एक नांदणं कठीणच आहे हे त्यांचं पुस्तक वाचतांना समजतं. याच पुस्तकात इंग्लंड आयर्लंडच्या पुढं कसा गेला आहे तेही ओ टूल  मोकळेपणानं सांगतात.

ओ टूल काहीसे डावे आहेत. आपल्या विचारावर ते पक्के असतात.  इंग्लंडमधे आणि अमेरिकेत लोक डाव्या विचाराला  नाकं मुरडतात हे त्याना माहित आहे. तरीही ते तिथल्या पेपरांत धडाकून लिहीत असतात. राजकीय समीक्षा करताना विचार-आकडे-घटना-पुढारी-संस्था इत्यादी गोष्टी त्यांच्या लिखाणात विपुल येतात. त्यांच्या लिखाणात नाटकं, सिनेमे, सीरियल्स, कादंबऱ्या यांचे उल्लेख आणि अवतरणं इतक्या संख्येनं येतात की पुस्तकात त्या त्या ठिकाणी आपण कलासमीक्षा वाचत आहोत की काय असा भास होतो. बर्नार्ड शॉ, रिचर्ड शेरिडन, टॉम मर्फी या आयरिश नाटककारांची आणि शेक्सपियर या इंग्लीश नाटककाराची  समीक्षा करणारी पुस्तकंही ओ टूलनी लिहिली आहेत.

ओ टूल  यांची भाषा पेपरात असते तशी भरड आणि सरबरीत नाही. पश्चिमी संस्कृती, इंग्लीश आणि अमेरिकन साहित्य यातली मिथकं, गाजलेली रुपकं, पश्चिमी संस्कृतीत रुतलेल्या प्रतिमा त्यांच्या लिखाणात जागोजागी दिसतात.  आयर्लंडची वाट लागली असं म्हणायच्या ऐवजी   आयर्लंडची बास्केट केस झाली असं ते लिहितात. बास्केट केस हे दोन शब्द अपमानजनक मानले जातात, त्याना एक भीषण संदर्भ आहे. युद्धामधे एकाद्या सैनिकाचे हात आणि पाय नष्ट होतात त्या वेळी तो एक पाय नसलेली टोपली होतो. अशा नष्ट झालेल्या गोष्टीला बास्केट केस म्हणतात. हातपाय नसलेली टोपली. सूर्याकडं जाण्यासाठी एका माणसानं पंख शरीराला मेणानं चिकटवले, उंच उडाल्यानंतर ऊष्णतेनं मेण वितळलं, पंख गळून पडले, तो उडणारा माणूस पडून मेला ही ग्रीक मिथककथा ते आयर्लंडच्या दुर्गतीचं वर्णन करताना वापरतात. आयर्लंडमधल्या राजकीय भ्रष्टाचाराचं वर्णन करताना अमेरिकेतील टॅमानी हॉल संघटनेनं पसरवलेल्या भ्रष्टाचाराचा उल्लेख करतात. नुसतं आयर्लंडमधे भ्रष्टाचार झाला असं न म्हणता टेमानी हॉलचा उल्लेख झाल्यावर वाचकाला १८व्या शतकातल्या न्यू यॉर्कमधे जाऊन तिथं झालेला भ्रष्टाचार समजून घ्यावा लागतो.

शिप ऑफ फूल्समधे ओ टूल सांगतात. १९९० नंतर आयर्लंडनं अर्थव्यवस्थेत मोठ्ठे बदल केले. बँकेचा व्याजाचा दर कमी केला. परदेशातून येणाऱ्या भांडवल व व्यवहारावरची बंधनं कमी केली, त्यांच्यावरचे कर कमी केले. अमेरिकेतून आणि युरोपातून धडाधड कंपन्या आयर्लंडमधे आल्या. आयर्लंड जगात सर्वात जास्त वेगवान अर्थव्यवस्था झाली. डब्लीनमधल्या घरांच्या किमती ५१९ टक्क्यानं चढल्या, डब्लीन जगातलं महाग शहर झालं. आयर्लंड श्रीमंत झाला. नंतर  गोची झाली. मंत्र्यांनी आणि बँकेच्या पुढाऱ्यांनी न चालणाऱ्या कंपन्यांना कर्ज दिली,  ती कर्ज देण्यात भरपूर पैसे खाल्ले. मंत्र्यांच्या खिशात पैसे गेले पण कंपन्या न चालल्यानं शेवटी अर्थव्यवस्थेला फटका बसला. करांतून सूट देताना मंत्र्यांनी पैसे खाल्ले. खुद्द पंतप्रधानांनी एका सार्वजनिक निधीतले २.५ लाख युरो खाल्ले. अँग्लो आयरिश बँकेच्या चेयरमननं आपल्याच बँकेतून ८.४ कोटी युरोचं कर्जं घेतलं होतं. शेवटी व्हायचं तेच झालं. २००९ साली देश बुडाला.

ओटूल म्हणतात की डब्लीनचं काबूल झालं होतं. प्रगत जगाची अर्थव्यवस्था आणि मागास देशातली हात ओले करणं, पाठ खाजवणं, मित्रांचं भलं करणं अशी राज्यव्यवस्था असं आयर्लंडचं वर्णन त्यांनी केलं.

हिरोईक फेल्युअर, पॉलिटिक्स ऑफ पेन या पुस्तकात ब्रेक्झीटची कारणमीमांसा केली आहे. ब्रिटन या चार देशांच्या समुहाचा आणि त्यातल्या त्यात इंग्लंड या देशाचा मानसीक आजार ब्रेक्झिटला कारणीभूत आहे असं ओ टूल यांचं म्हणणं आहे.

औद्योगीक क्रांतीचा काळ ओसरला, वसाहती गेल्या. उत्तरोत्तर इंग्लीश समाज, ब्रिटीश,युरोपच्या मागं पडला, विषमता वाढली, गरीबी वाढली, उत्पादकता कमी होत गेली.  दुसऱ्या महायुद्धानंतर युरोप-अमेरिका पुढे गेले, इंग्लंड थबकलं.  आपण श्रेष्ठ आहोत पण नाईलाजानं, अन्याय सहन करतच आपण कॉमन मार्केट या एका आपल्यापेक्षा कनिष्ठ समुदायात सामिल होतोय अशा भावनेनं इंग्लंड कॉमन मार्केटमधे गेला. परिस्थिती सुधारली नाही. हताश ब्रिटननं युरोपियन युनियनमधून बाहेर पडायचा निर्णय घेतला.

असा निर्णय इंग्लंडनं घेतला कारण इंग्लंडला असलेले मनोरोग, मनोगंड,  ब्रेक्झिटच्या निर्णयाला  कारणीभूत आहेत असं फिंटन ओ टूलनी प्रस्तुत पुस्तकात लिहिलं आहे.

इंग्लीश जनतेचा एक मनोगंड असा.पहिलं आणि दुसरं महायुद्ध फार किमत देऊन आपण जर्मनीचा पराभव केला. पण युद्धानंतर विकास मात्र झाला जर्मनीचा, आपण मागं पडलो. दुसऱ्या युद्धात आपण इतका खर्च केला पण इटाली, फ्रान्स इत्यादी युरोपीय देश पुढे गेले, आपण मात्र संकटात आहोत. एकेकाळी आपण जगावर राज्य केलं आणि आता आपण युरोपियन युनियन या एका साम्राज्याचा मांडलीक असल्यासारखे आहोत. साम्राज्यातला एकेक देश बाहेर पडत गेला, अगदी आपलाच आयर्लंडही युकेमधून बाहेर पडला आणि आता स्कॉटलंडही बाहेर पडतोय. आपण थोर आहोत पण आपण हरत चाललोय. आपण हरतोय कारण आपल्यावर अन्याय होतोय.

इंग्लीश संस्कृतीचं एक वैशिष्ट्यं असं. अपयशं जोजवून, अपयशावर कविता करून त्या लहानपणापासून मुलांना शिकवल्या की त्यातून आपल्यावर कसा अन्याय झालाय ते सिद्ध होतं आणि त्यातूनच माघार घेताना इंग्लीश मनाला समाधान वाटतं. डंकर्कमधे माघार घ्यावी लागली हे अपयश झाकून आपण कसे यशस्वीरीत्या आपले सैनिक परत आणले याची गाथा इंग्लीश माणूस रंगवतो, जेणेकरून जगाला आपल्याबद्दल सहानुभूती वाटावी.

स्वतःला इजा करून घेतली की  इजेच्या दुःखामागं-वेदनेमागं  आपल्या दोषांचं दुःख लपतं. म्हणून संकटाच्या प्रसंगी स्वतःचं नुकसान करून घ्यायचं हाही एक मनोरोग इंग्लीश जनतेला आहे. दुसऱ्याला पीडा देणं आणि स्वतःलाही वेदना देणं यातून समाधान मिळवणं असा हा एक गुंत्याचा  गंड इंग्लीश जनतेला आहे.   युरोपियन युनियनमधून बाहेर पडून युरोपला छळणं आणि स्वतःचंही नुकसान करून घेणं असा इंग्लंडचा मानस आहे.

ओ-टूल यांनी त्रिभंगलेल्या ब्रिटनमधल्या इंग्लंड या विभागदेशाला उद्देशून विश्लेषण केलं आहे. इंग्लंड स्वतःला कायम श्रेष्ठ मानत आला आहे. काळाच्या ओघात इंग्लंडमधे आयर्लंड, स्कॉटलंड आणि वेल्श हे प्रदेशदेश मिसळले गेले तरीही इंग्लंडनं स्वतःचा श्रेष्ठत्व गंड जपला. या गंडापायी आयर्लंड वेगळा झाला, स्कॉटलंडही बाहेर पडू पहातोय. स्कॉटलंड ब्रेक्झिटच्या परिणामी बाहेर पडला तर बरंच झालं असं इंग्लीश जनतेला वाटतंय असं विश्लेषण ओ टूल करतात.

आजच्या शिल्लक ब्रिटनमधे गरीब-अती श्रीमंत, शहरी-ग्रामीण, गोरे व गौरेतर, ब्रिटीश आणि आफ्रोआशियाई अशा फळ्या पडल्या आहेत. आपले आंतरीक दोष दूर न करता युरोपीयन युनियनला दोष देत स्वतःला   समाधान मिळवायची खटपट ब्रिटननं करू नये असं ओ टूल सुचवतात.

निळू दामले, लेखक आणि पत्रकार आहेत.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: