बुद्धीमान बंडखोर लेखिका

बुद्धीमान बंडखोर लेखिका

वेवर्ड अँड वाईज या पुस्तकांच्या दुकानातल्या एका फेरीत  विराट चांडोक यांच्या टेबलावर नव्यानं मागवलेल्या पुस्तकांचे गठ्ठे होते. त्यात सुझन सोंटॅग अमेरिक

कोरोना निर्बंध शिथील; धार्मिक स्थळे, सिनेमागृहे बंदच
पोलिस व राजकीय नेत्यांच्या भ्रष्ट युतीचे दुबेला संरक्षण
भीमा-कोरेगांव प्रकरणात पुणे पोलिसांकडून हॅकिंगचे प्रयत्न

वेवर्ड अँड वाईज या पुस्तकांच्या दुकानातल्या एका फेरीत  विराट चांडोक यांच्या टेबलावर नव्यानं मागवलेल्या पुस्तकांचे गठ्ठे होते. त्यात सुझन सोंटॅग अमेरिकन लेखिकेच्या पुस्तकांची एक चळत होती. चळतीत ऑन फोटोग्राफी या पुस्तकाच्या दहा प्रती होत्या.ऑन फोटोग्राफी हे पुस्तक  १९७७ साली प्रसिद्ध झालं होतं.

मला आश्चर्य वाटलं. १९६० च्या दशकातल्या एका अमेरिकन लेखिकेची पुस्तकं मुंबईतल्या पुस्तकांच्या दुकानात? पटकन मला आठवलं, की या बाईंना मी फार वर्षांपूर्वी वाचलं होतं. त्यांच्याबद्दल लोकांची टोकाची मतं होती. काही लोक त्यांना आउटस्टँडिंग लेखिका मानत होते. तर काही लोक त्याना फ्रॉड म्हणत असत. अशा या अमेरिकन लेखिकेची इतकी पुस्तकं विराटनी का मागवली असा प्रश्न मला पडला. कोणीही दुकानदार  न खपणाऱ्या पुस्तकांनी शेल्फ भरत नसतो.

विराट म्हणाला- कॉलेजमधली मुलं मुली सोंटॅगच्या पुस्तकांची मागणी करतायत. मी वीस पुस्तकं मागवली. सगळी संपली. पुन्हा मागवली. तीही संपली. आता पुन्हा मागवलीत. मलाही आश्चर्य वाटतंय की सोंटॅगसारखी गेल्या शतकातली बाई ही पोरं आता कां वाचतायत.

सोंटॅग विचार करणाऱ्या बुद्धीमान बाई होत्या, बंडखोर होत्या. ऑन फोटोग्राफी या पुस्तकातून त्यांच्या विचारांचा अंदाज येतो. फोटोग्राफी या कलाप्रकाराचा मुळातून विचार या पुस्तकात सोंटॅग यांनी केला आहे. वस्तू-माणूस-प्राणी-निसर्ग इत्यादींचा ठसा म्हणजे फोटो. सिनेमा हेही फोटोच.

किल्लारीला भूकंप झाला. फोटोंनी पडलेली घरं दाखवली, गुडघ्यात मान घालून रडणारी माणसं दाखवली, ढिगाऱ्यातून बाहेर आलेला एक हात दाखवला.  किल्लारीचे फोटो वर्तमानपत्रात सकाळच्या चहा बिस्किटाबरोबर लोकांनी पाहिले. क्षणभर हळहळ आणि चांगला फोटो पहाण्याचा आनंद.

फोटोतलं  घर आणि असहाय्य स्त्री म्हणजेच किल्लारीचा भूकंप अशी लोकांची समजूत झाली.

फोटोत जे दिसलं त्या पलिकडं कायच्या कायच काही तरी वास्तवात होतं. मराठवाड्याचं आर्थिक मागासपण होतं. कित्येक शतकांचं. निझाम आणि भारत अशा दोन सरकारांत मराठवाड्याचं किंवा एकूण खेड्याचे तीन तेरा,  या पटकन न दिसणाऱ्या गोष्टी वास्तवात होत्या. किल्लारीतली घरं एका परीनं पडण्याची वाट पहात, पडण्यासाठी एक निमित्तक्षणाची वाट पहात होती. भूकंपानंतर घडलेलं पुनर्वसन हे आणखी एक जटील वास्तव होतं. त्यात सरकारची अनास्था, सरकारचं काहीही करून एकादी गोष्ट उरकणं होतं. त्यात पैशाचा अपव्यय होता. त्यात राजकारण होतं. त्यात मतांसाठी लोकांना आकर्षित करून घेणं होतं. आणखीही बऱ्याच गोष्टी होत्या.

फोटो म्हणजे किल्लारी नव्हतं. फोटोत जे दिसलं ते वास्तवात नव्हतं. दिसणं आणि असणं यात फरक होता.

सुझन सोंटॅगनी पुस्तक लिहिलं तेव्हां  व्हियेतनाम युद्ध संपलं होतं. टेलीव्हिजन हे माध्यम तेंव्हा ऐन भरात आलं होतं. चित्रपट तर आधीच प्रस्थापित झाले होते. व्हियेतनामधल्या संहाराचे विदारक फोटो आणि सिनेमे अमेरिकनांनी पाहिले होते. अरे बापरे, किती भयानक हा हिंसाचार असं अमेरिकन माणसं म्हणाली. आपण अमेरिकनानी असं करायला नको होतं असं मुळमुळीतपणे म्हणत अमेरिकन माणसं अमेरिकनांनी व्हियेतनामनंतर चालवलेल्या हिंसेकडं दुर्लक्ष करू म्हणत होती.

व्हियेतनाम युद्ध या विषयावरचे फोटो आणि सिनेमे हा सौदर्यशास्त्राचा, रसास्वादाचा विषय झाला होता. फोटोतलं सौंदर्य, फोटोतल्या विविध एलेमेंट्सची रचना आणि मांडणी, फोटोतले रंग, फोटोतल्या विविध घटकांचा तोल वा असमतोल याचा विचार माणसं करू लागली होती. सोंटॅगना फोटोच्या मागचं वास्तव हा सौंदर्यशास्त्राचा विषय व्हायला नको होता.

सोंटॅग पुस्तकात सांगतात की फोटो म्हणजे व्हियेतनाम नव्हे. व्हियेतनाममधली हिंसा, क्रौर्य म्हणजे सौंदर्यशास्त्राचा विषय नव्हे. त्यांचा दोष नसतानाही हज्जारो निरपराध व्हियेतनामी मारले जातात हा काही सौंदर्यशास्त्राचा विषय नव्हे.

सोंटॅगनी चित्रं, पेंटिंग, यांचा तात्विक अभ्यास तपासला. प्लेटोपासून तत्वज्ञ पेंटिंगकडं कसं पहात होते याचा अभ्यास मांडला. माणसं  फोटोला का नकार देतात तेही मांडलं. फोटो आणि फोटोत असणारी व्यक्ती वा घटना यातलं नातं त्यांनी तपासलं. फोटो आणि आजचं उथळ जग या दोन गोष्टींचा संबंध त्यांनी दाखवला. संस्कृती, कला, यांच्याकडं कसं पहाता येऊ शकतं हे सोंटॅगनी या पुस्तकात मांडलं.

सोंटॅग यांचं एक चरित्र (” Sontag.Her Life and Work “) नुकतंच प्रसिद्ध झालंय. बेंजामिन मोसर यांनी ते पुस्तक लिहिलंय.

त्या पुस्तकात सोंटॅग यांच्या संपूर्ण जीवनाचा वेध आहे, सोंटॅग यांची पुस्तकं आणि सोंटॅग यांचं जगणं या दोन्हीचा वेध आहे. सोंटॅग यांनी लिहून ठेवलेल्या नोंदी आणि रोजनिशा यांचे दोन खंड त्यांचा मुलगा डेविड रीफ यांनी आधीच प्रसिद्ध केले होते. त्या नोंदीत काही अप्रसिद्ध नोंदींची भर घालून आणि सोंटॅग यांच्या सहवासात आलेल्या व्यक्तींच्या मुलाखती असं मिळून नवं चरित्र लेखकानं सिद्ध केलं आहे.

सुझन सोंटॅग (१९३३-२००४) त्यांच्या काळात अमरिकेतल्या एक गाजलेल्या बुद्धीमान व्यक्ती होत्या. त्यानी तत्कालीन समाजाचा समाचार घेणारे निबंध, On PhotographyAgainst InterpretationStyles of Radical WillThe Way We Live NowIllness as MetaphorRegarding the Pain of Others, लिहिले.  Freud: The Mind of the Moralist  हा त्यांचा प्रबंध सोंटॅगनी केलेल्या मन आणि शरीर या विषयावरचा तात्विक प्रबंध होता. मन आणि शरीर यातील द्वंद्व, बौद्धिकता आणि शारीर आनंद यातील संबंध हा त्यांच्या विचारांचा आणि जगण्याचा विषय होता.  दिसणं आणि असणं, आशय आणि अभिव्यक्ती यातल्या संबंधावर त्यांनी विचार केला.सोंटॅगनी चित्रपट-डॉक्युमेंटऱ्या केल्या, कादंबऱ्या लिहिल्या, नाटकं केली, राजकीय सक्रीय भूमिका घेतल्या.

स्त्रीकडं सौदर्य, एक सेक्सचं साधन, पुरुषाला मदत करणारी दुय्यम व्यक्ती अशा रीतीनं पाहिलं जात असे. स्त्रीचा विचार स्वतंत्रपणे केला जात नसे, पुरुषांच्या संदर्भातच स्त्रीचे उल्लेख होत असत. मेरी क्युरी यांना संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळणं ही स्त्रीकडं पहाणाऱ्या जगाला एक कलाटणी होती. मेरी क्यूरी हे  सुझन सोंटॅग यांचं आदर्श व्यक्तिमत्व होतं. आपल्याला स्वतंत्रपणे नोबेल मिळालं पाहिजे असं सोंटॅग याना वाटत असे.

सोंटॅग घरापासून वेगळ्या झाल्या. सोंटॅगनी स्वतःच्या शरीरापासून मुक्त होण्याचा विचार केला. वाचन, चिंतन यात त्यांचा बहुतेक वेळ खर्च होत असे. हे करत असतानाच त्यांनी आपल्या सौंदर्याचा वापर प्रसिद्धीसाठी करून घेतला. त्या राजकारणातही सक्रीय होत्या, व्हियेतनाममधे गेल्या, बोस्नियात गेल्या. अकरा सप्टेंबर झाल्यानंतर लिहिलेल्या निबंधात त्या अमेरिकन माणसाला सांगत होत्या की मुस्लीम, जगातले इतर लोक अमेरिकेचा द्वेष कां करतात ते समजून घ्या. देशप्रेमानं भारलेली अमेरिका त्यांच्यावर खवळली.

सोंटॅग  विचार करणाऱ्या, बुद्धीमान, सक्रीय, स्त्रीचं स्वातंत्र्य मानणाऱ्या व्यक्ती होत्या. मी गे होईन, पुरुषांशीही संबंध ठेवेन, माझ्या शरीराचा वापर कसा करायचा ते मी ठरवेन, ते ठरवणारे तुम्ही कोण असा सवाल त्या तत्कालीन अमेरिकन, जागतीक समाजाला करत होत्या.

सोंटॅग यांचे विचार आणि आचार यात यात मेळ बसणार नाही अशा अनेक विसंगती  होत्या. हे सगळं बेंजामिन मोसर यांनी चरित्रात चितारलं आहे.

सोंटॅग सुरवातीला गे होत्या. नंतर त्या पुरुषांशीही संबंध ठेवत. सेक्स ही घाणेरडी गोष्ट आहे, असंही त्या म्हणत आणि तरीही त्यानी लग्नं केलं, शरीर उपभोगलं, त्याना मुलगा झाला, दोन गर्भपात झाले. त्यांचे अनेक पुरुष आणि स्त्रियांशी सेक्स संबंध होते. एकीकडं त्या बौद्धिकतेच्या बाजूनं असत तरीही स्वतःच्या आयुष्यात आपलं सुंदर दिसणं त्यांनी जपलं व वापरलं. लोकांचा वापर त्या साधन म्हणून करत असत. या गोष्टी मोसर यांनी मांडल्या आहेत. त्या मानानं सोंटॅग यांच्या वैचारिक कर्तृत्वाचे तपशील लेखकानं कमी दिले आहेत.

पुरुषानं काहीही केलं तरी चालतं पण स्त्रीनं स्वतंत्रपणे विचार केलेला चालत नाही, अशा जगात मोसर यांनी लिहिलेलं चरित्र कसं वाचलं जाईल? मला तरी त्यातून एक धडपणारी, स्वतंत्र प्रज्ञेची, बंडखोर स्त्री दिसली. ती भले नोबेलचं मटेरियल नसेल, भले ती मेरी क्यूरी नसेल, भले ती जोन ऑफ आर्क नसेल. नसूदे.

ती एक धडपडणारी मनस्वी बुद्धीमंत स्त्री होती, जगाला उडवून लाऊन स्त्रीचं स्वातंत्र्य धीटपणानं मांडत होती असं मला तरी या चरित्रातून दिसलं.

माणूस बेशुद्ध झाल्यावर आपण त्याच्या तोंडावर पाणी मारतो. त्याला थपडा मारतो. त्याला गदागदा हलवतो. माणूस जागा झाला तर त्याला काय झालंय ते कळेल, त्याच्यावर उपचार करणं शक्य होईल असा विचार आपण करतो.

सामान्यतः ज्याला तत्वज्ञ (फिलॉसफर) म्हणतात तो माणूस समाजाला तसंच जाग आणायचा प्रयत्न करतो. समाज जागा झाला तर तत्वज्ञाला कळतं, की समाजाला काय झालंय आणि कदाचित समाजालाही कळतं की आपल्याला काय झालंय.

सुझन सोंटॅग या लेखिका तसंच काहीसं करत होत्या.

निळू दामले, हे लेखक आणि पत्रकार आहेत.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0