राज्यात ब्रिटनमधून आलेल्या नव्या कोरोनाचे ८ रुग्ण

राज्यात ब्रिटनमधून आलेल्या नव्या कोरोनाचे ८ रुग्ण

ब्रिटनमधून आलेल्या ५४२ प्रवाशांपैकी १०९ प्रवाशांचा कुठेही संपर्क होत नाही, त्यांनी विमानतळ प्राधिकरणाला दिलेल्या संपर्क पत्त्यावर हे प्रवाशी राहात नाहीत, तर दुसरीकडे मुंबईमध्ये ब्रिटनमधून येताना काही प्रवासी कोरोना चाचणी वाचवण्यासाठी अन्य शहरातून मग रस्ते मार्गे मुंबईमध्ये येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यातच या जनुकीय बदल केलेल्या ब्रिटनच्या विषाणूचे ८ रुग्ण सोमवारी आढळून आल्याने पुन्हा एकदा महानगरी मुंबईसह राज्यात कोरोनाचा फेरा पुन्हा सुरू होण्याची भीती व्यक्त होत आहे

‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ कळंबोलीत दाखल
‘कोरोना फॅक्ट-चेक’ : अचूक माहितीचे जागतिक आव्हान !
पीएम केअर फंड एनआरआय, विदेशी देणगीदारांसाठी खुला

ब्रिटनमधून आलेल्या ५४२ प्रवाशांपैकी १०९ प्रवाशांचा कुठेही संपर्क होत नाही, त्यांनी विमानतळ प्राधिकरणाला दिलेल्या संपर्क पत्त्यावर हे प्रवाशी राहात नाहीत, तर दुसरीकडे मुंबईमध्ये ब्रिटनमधून येताना काही प्रवासी कोरोना चाचणी वाचवण्यासाठी अन्य शहरातून मग रस्ते मार्गे मुंबईमध्ये येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यातच या जनुकीय बदल केलेल्या ब्रिटनच्या विषाणूचे ८ रुग्ण सोमवारी आढळून आल्याने पुन्हा एकदा महानगरी मुंबईसह राज्यात कोरोनाचा फेरा पुन्हा सुरू होण्याची भीती व्यक्त होत आहे.

ब्रिटनमधून २५ नोव्हेंबरपासून डिसेंबर अखेरपर्यंत सुमारे ४,५०० प्रवासी मुंबई आणि राज्यातील अन्य शहरात आले आहेत. या सर्वांना शोधून त्यांची कोरोना चाचणी करण्याची कसरत आरोग्य विभाग करत आहे. पण यातील काही प्रवाशांनी दिलेले वास्तव्याचे पत्ते हे चुकीचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. जे प्रवासी सापडले त्यांची कोरोना चाचणी सुरू आहे. त्यातील ८ जणांचे नमुने हे ब्रिटनच्या विषाणूचे असल्याचे सिद्ध झाले. यामध्ये मुंबईचे ५ तर पुणे, ठाणे, मीरा-भाईंदर येथील प्रत्येकी एका प्रवाशाचा समावेश आहे. त्यामुळे त्यांना नव्या प्रोटोकॉल आणि मार्गदर्शक तत्वानुसार विलिगीकरण करून उपचार सुरू करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू आहे.

पण यातील एक धक्कादायक बाब म्हणजे पुणे येथे आलेल्या ५४२ प्रवाशांपैकी १०९ प्रवाशांचा कुठेही संपर्क होऊ शकत नाही. त्यांनी दिलेला पत्ता तसेच संपर्क क्रमांक चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे असे खोटे पत्ते देऊन पासपोर्ट घेणारे आणि प्रवास करणारे प्रवासी शोधण्यासाठी विशेष पोलीस यंत्रणा रात्रंदिन प्रयत्न करत आहे. हीच स्थिती मुंबईमधील काही प्रवाशांची आहे.

यामधील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे कोरोना चाचणी टाळण्यासाठी काही प्रवासी मुंबईमध्ये थेट न येता अन्य राज्यातील शहरातून रस्ते मार्गे येत आहेत. याची दस्तुरखुद्द कबुली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देऊन सर्व यंत्रणेला सतर्कतेचा आदेश दिले आहेत. लोकांची ही पळवाट आणि फसवणूक करून राज्यात येण्याची वृत्ती भविष्यात कोरोनाच्या स्फोटाचे कारण बनू शकते.

गेल्या वर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात लॉक डॉउन होण्यापूर्वी जे प्रवाशी परदेशातून येत होते त्यातील अनेकांनी अशी पळवाट शोधली होती. तर काही जण विमानतळावर उतरून तपासणी होण्याआधी ताप प्रतिबंधक गोळ्या घेत होते. त्यामुळे विमानतळावर होत असलेल्या अँटीजन चाचणीमध्ये त्यांचे रिपार्ट नकारात्मक येत होते. त्यावेळी सुद्धा अनेक प्रवाशी वेगवेगळ्या मार्गाने राज्यातील विविध शहरात आले होते. आताही या नवीन विषाणूच्या प्रकोपात पुन्हा लोकांची ही वृत्ती प्रचंड धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. पासपोर्ट देताना जे पत्ते दिले आहेत ते खरे की खोटे ? तसेच लोकांची ही फसवेगिरी करण्याची मनोवृत्ती कधी बदलणार असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

अतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: