बुरखा/हिजाब कालबाह्य की कालसुसंगत?

बुरखा/हिजाब कालबाह्य की कालसुसंगत?

परंपरा, रूढी या पुरुषसत्ताक समाजाने स्वतःच्या सोयीसाठी बनवलेल्या आहेत आणि हे तत्व सर्व धर्मांना लागू पडते. यातून बाहेर पडायला पाहिजे.

करोना आणि कृत्रिम बुद्धिमता
तेलंगणमधील न्यायालयाच्या निर्णयावर ‘द वायर’चा खुलासा
लोकानुनयवाद आणि इतिहास

कर्नाटकात बुरखा/हिजाब घातला म्हणून कॉलेजच्या विद्यार्थिनींना प्रवेश नाकारला! या घटनेची माध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. हळूहळू ही बाब गंभीर स्वरूप धारण करून सामाजिक व राजकीय समस्या म्हणून समोर येत आहे. या घटनेला अनेक कंगोरे आहेत, त्यामुळे प्रतिक्रिया सुद्धा वेगवेगळ्या आहेत. विद्यार्थीनी धर्माने मुस्लिम आहेत म्हणून सहानभूती कशाला?, विद्यार्थिनींसाठी गणवेश असताना वर हिजाब कशाला? आवडीचे कपडे घालण्याचे, धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य आम्हाला संविधानाने दिलेले आहे. तुम्ही कोण अडवणारे? अशा प्रतिक्रियांचा रोख प्रामुख्याने या अंगाने दिसतो. स्व-इच्छेने आवडीचे कपडे घालण्याचे महिलांना असलेले स्वातंत्र्य; धर्मामुळे धोक्यात आलेले आहे! या बद्दल सुद्धा चर्चा दिसली. बुरखा/हिजाब घालणे कुराणातील कोणत्या आयतीमुळे बंधनकारक आहे किंवा संविधानातील कोणत्या कलमामुळे त्याचे स्वातंत्र्य आहे; या चर्चेत न पडता, बुरखा/हिजाब घालणे कालसुसंगत, व्यवहार्य आहे का? याच उत्तर शोधावे लागेल.

मानवाच्या मुलभूत गरजांपैकी वस्त्र ही एक गरज आहे. त्यामुळे ज्या प्रमाणे अन्न आणि निवारा भौगोलिक परिस्थिती प्रमाणे भिन्न भिन्न आहेत; त्याच प्रमाणे वस्त्रसुद्धा भौगोलिक परिस्थितीमुळे वेगवेगळ्या प्रदेशात, वेगवेगळ्या वातावरणात किंवा ॠतूमध्ये भिन्न आढळतात. सद्यपरिस्थितीत आपण बुरखा/हिजाब घालण्याबद्दल फक्त बोलायचे म्हटले; तर तो सुद्धा विशिष्ठ भौगोलिक परिस्थिती असलेल्या ठिकाणी स्त्रियांबरोबर पुरुष सुद्धा वापरताना दिसतात. उष्ण कोरड्या हवेत, वाळवंटी प्रदेशात विशेषकरून बुरखा/हिजाब घालण्याची प्रथा आढळते. दिवसभर उन्हामुळे वाळू/माती तापते आणि हलक्या वाऱ्याबरोबर वाहायला लागते. अशा तापलेल्या वाळू/मातीमुळे डोळे, कान, चेहऱ्याला इजा होण्याची शक्यता असते. या परिस्थितीत संपूर्ण शरीर झाकून घेवून शरीराला इजा होण्यापासून टाळण्यासाठी अंगघोळ अंगरखा घालणे अनिवार्य ठरते. पूर्वी अशा प्रदेशात वाहतूक, दळणवळण करण्यासाठी मुख्यत: उंट किंवा घोड्यांचा उपयोग केला जात असे. त्यांच्या चालण्याने उडणारी धूळ, वाळू यापासून संरक्षण करण्यासाठी प्रवासात अंगघोळ अंघारखा घालणे; ही त्या विशिष्ठ भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेण्याचा मानवाचा यशस्वी प्रयत्न आहे.

अशी परिस्थिती साधारणता आखाती वाळवंटी प्रदेशापासून ते अगदी राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशापर्यंत अनुभवायला मिळते. नाजूक त्वचा, सौंदर्यची काळजी यामुळे चेहरा झाकून ठेवण्यासाठी बुरखा/हिजाब घालणे किंवा साडीच्या पदराने संपूर्ण चेहरा झाकून घेणे स्त्रियांना आवश्यक वाटते. शहरात दुचाकी चालवताना किंवा कडक उन्हातून चालताना जवळपास सर्वच स्त्रिया बुरखा किंवा ओढणीने संपूर्ण चेहरा झाकून घेतात ही वस्तुस्थिती आहे. मी स्वतः राजस्थान आणि दुबईमध्ये वाळूतून चालण्यापूर्वी गॉगल घालून, रुमालाने संपूर्ण चेहरा झाकून घेतला होता. हॉटेलवर परत आल्यावर लक्षात आले की कपड्यांवरील प्रत्येक घडीमध्ये आणि शिलाईच्या विणीमध्ये बारीक वाळू अडकून आलेली आहे. शरीरावर अजून बऱ्याच ठिकाणी वाळूचे कण अडकलेले जाणवत होते. दररोजचा हा त्रास टाळण्यासाठी अजिबात घडी नसलेला आणि किमान शिलाई असलेला अंगघोळ अंगरखा परिधान केल्याशिवाय घरातून बाहेर न जाणे; त्या भौगोलिक परिस्थितीत वावरण्यासाठीची गरज बनली. असा हा अंगरखा (over coat) घराबाहेर जाताना घातला आणि घरात/ बंदिस्त वातावरणात फिरताना काढून ठेवला; हाच त्याचा उपयोग आणि वापर. धूळ उन्हापासून संरक्षण करण्यासाठी बुरखा/हिजाब वापरला किंवा थंडीपासून संरक्षण मिळण्यासाठी लोकरीचे कपडे घातले किंवा पाऊस पडतोय म्हणून रेनकोट घातला; तर हे परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठीचे मानवी वर्तन झाले. निव्वळ गरजेतून निर्माण झालेली पेहरावाची पद्धत. बाकी काही नाही.

बुरखा/हिजाब घातल्यामुळे स्त्रियांची ओळख विशिष्ट धर्माची बनणे, त्याचा त्या स्त्री पुरुषांना अभिमान असणे हे वास्तव विचार करण्यास भाग पाडते. हीच धर्मपरंपरा, रूढी असेल; यालाच धर्म म्हणत असतील तर हाच बुरखा/हिजाब कालसुसंगत, व्यवहार्य आहे का? बुरखा/हिजाब घालणे कुराणातील कोणत्या आयतीमुळे बंधनकारक आहे किंवा संविधानातील कोणत्या कलमामुळे त्याचे स्वातंत्र्य आहे हा वाद न्यायालयावर सोपवला; तरी त्याही पलीकडे समाजाची स्वतःची अशी एक अलिखित नियमावली असते. तिथे ‘ऑड मॅन आऊट’ राहात असतो. त्याला कायमच सवलत आणि सहानुभूती मिळतेच असं नाही. तेव्हा ‘ऑड मॅन आऊट’ न होण्यासाठी त्याला स्वतःला विशेष प्रयत्न करून समूहात राहावं लागत. तसा प्रयत्न न होणं हेही या समस्येच्या अनेक कारणांपैकी एक आहे. शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गणवेश (Uniform) सक्तीचा असेल; तर तो परिधान करणे आवश्यकच आहे. विद्यार्थ्यांमध्ये समानता व शिस्त असावी, इतका स्वच्छ विचार गणवेश (Uniform) सक्तीचा करण्यामागे असतो. अशावेळी धर्माच्या आधारे बुरखा/हिजाब किंवा भगव्या उपरण्याचा वापर करून गणवेशात बदल करून, केवळ धर्मामुळे समानतेच्या तत्त्वाचा आणि शिस्तीचा भंग करणे पूर्णतः चुकीचे आहे. किंबहुना शालेय विद्यार्थ्यांमध्ये धर्माची प्रतीकं सुद्धा उघडउघड बाळगण्यास कायद्याने सज्ञान होईपर्यंत बंदी असावी. या अशा पळवाटांमुळे गणवेश वापरण्याच्या उद्देशाचा गाभाच तुटून पडत आहे, हे लक्षात घ्यायला हवं. मुस्लिम समाज मुख्य प्रवाहात येत नाही, शिक्षणासाठी निष्कारण उर्दू माध्यम निवडतात किंवा मदरशांमध्ये शिक्षण घेतात; अशा काही तक्रारी सुधारणावादी विचारांच्या लोकांकडून होत असतात. ज्या पूर्णपणे नाकारता येत नाहीत. आमच्या धर्मात आगरकर, आंबेडकर जन्माला आले नाहीत अशी एक व्यथा मुस्लिम सुधारणावादी चर्चेत मांडताना दिसतात. केवळ बुरखा सक्तीचा आहे म्हणून खेळांच्या सामन्यातील सहभाग रद्द होणे, नीट परीक्षेच्या प्रवेशद्वारावर वाद होणे, परीक्षेला उशीर होणे. सुरक्षेच्या कारणास्तव त्यावर बंधन आलेली अनेक उदाहरणे आहेत. पूर्वी कधीतरी घराबाहेर जावं लागणे आणि आता कामानिमित्त महिलांना दिवसभर घराबाहेर राहावं लागणे हा काळानुसार झालेला खूप मोठा फरक आहे. अशावेळी दिवसभर बुरखा/ हिजाब घालणे त्रासदायक ठरतोय. तो दिवसभर घातल्याने महिलांचे मानसिक व शाररिक आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत असं डॉक्टरांचे मत आहे. या आणि अशा बाबी व्यावहारिक जीवनात टाळण्याचा स्वतःकडून किती प्रयत्न केला जातो? धर्म आणि कायद्याने संरक्षण असले तरी दैनंदिन आयुष्यातील संघर्ष टाळण्यासाठी स्वतः किती तडजोड करतो हे सुद्धा तपासायला हवं. तर्कसुसंगत भूमिका घेण्याची ही सुद्धा संधीच असते पण ती अपवादानेच स्वीकारलेली दिसते.

त्याची दुसरी बाजू अशी की सुधारणावादी दृष्टिकोन बाळगायचा म्हटले तर केवळ बुरखा/ हिजाब घातला म्हणून प्रवेश नाकारणे; हा तर अघोरीच प्रकार आहे; अशाने समस्या अजूनच गंभीर होत जातील. तरीपण सुधारणावाद्यांनीच आपला प्राधान्यक्रम बदलावा; अशी अपेक्षा किंवा एकांगी भूमिकेचा आग्रह बदलायला हवा. कपडे घालण्याच्या, धर्म पाळण्याच्या स्वातंत्र्याला कायद्याने संरक्षण असणे; या बाबी आदर्श लोकशाही समाजात असू शकतात, पण वास्तवात असं होत नाही. तिथे तडजोड करावीच लागते. धर्म परंपरांना बिलगून मृत्यू नंतरच्या पारलौकिक आयुष्यातील सुखासाठी प्रत्यक्षात भौतिक आयुष्य कष्टप्रद करण्यात काहीही हशील नाही. या बाबी मान्य नसणे, हे या समस्यांचे अजून एक कारण आहे. सुमारे ३५-४० वर्षांपूर्वी ‘असे विषय’ ही समस्याच नव्हती. कदाचित नजीकच्या २०-२५ वर्षांत मध्यपूर्वेतील बदललेले राजकारण आणि कामानिमित्त तिथे असलेला भारतीयांचा सहभाग याच्या मुळाशी असेल. भारतातील बहुसंख्य मुस्लीम असलेल्या काश्‍मीरमध्ये मी जाऊन आलेलो आहे आणि मुस्लिम राष्ट्र असलेल्या बांगलादेशात सुद्धा जाऊन आलेलो आहे; पण बुरखा/हिजाब घालण्याचे अवडंबर भारतात जेवढे आहे; तेव्हढे या दोन्ही ठिकाणी अजिबात जाणवलेले नाही.

सकाळी व्यायामासाठी चालायला जाताना, उष्ण आणि दमट वातावरण असलेल्या मुंबईत लोकल पकडताना किंवा वातानुकूलित मॉलमध्ये सरकत्या जिन्यावर चढताना बुरखा/हिजाब घातल्याने तारांबळ उडते हे आपण बऱ्याचदा पाहिलेलं आहे, अशावेळी बुरखा/हिजाब किंवा पदराने चेहरा झाकून घेण्याची आवशकता आहे का? सकाळी व्यायामासाठी चालायला जाणाऱ्यांमध्ये एक दृश्य दिसते. एक जोडपे चालत आहे, त्यापैकी पुरुषाने विदेशी बूट, ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट परिधान करून रुबाबात चाललेला असतो आणि सोबतची स्त्री पदर ओढून/बुरखा घालून, हातात सोगा सांभाळत चालत असते. इथं त्या स्त्रीची होत असलेली तारांबळ गैर असल्याचे त्या पुरुषाला वाटत नाही. इतर वेळी लग्न समारंभापासून ते मयता पर्यंत वेशभूषेसाठी संकेत पाळणारे अशावेळी धर्मपरंपरा, रूढीमध्येच का अडकतात? ती स्त्री कदाचित यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत असेल सुद्धा; परंतु पुरुषसत्ताक समाजात ती एकटी पडते. सोबतचा पुरुष नवरा, बाप किंवा मुलगा असूनसुद्धा तो स्वतः सुखसोयी उपभोगतो; पण तिला जोखडात ठेवतो. तोच अनुभव दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या जोडप्याचे असतात. नवरा दुचाकी चालवत असतो आणि ती पदर ओढून/बुरखा घालून मुलाला सांभाळत स्वतःचा जीव मुठीत धरून बसलेली असते. अशी तारांबळ होण्यात त्या पोशाखामुळे भर पडत असते. तेव्हा सुद्धा तो पुरुष तिच्या अगतिकतेचा विचार करत नाही. बरेच धर्मांध पुरुष याचे समर्थन करण्यासाठी सांगतात की ‘आमच्या धर्मात तसे सांगितले आहे’. मान्य, पण याच धर्मात ही प्रथा का आणि कशी आली असेल? असे साधे प्रश्न सुद्धा त्यांना पडत नाहीत. बरेच धर्मांध पुरुष याचे समर्थन करण्यासाठी सांगतात की ‘स्त्रियांचा वाईट नजरेपासून बचाव होण्यासाठी बुरखा/हिजाब आवशक आहे’. हा कुठला न्याय? स्वतःच्या नजरेवर नियंत्रण ठेवायला जमत नाही म्हणून समोरच्याला बंधनात राहायला सांगायचे. हा प्रकार म्हणजे स्त्रियांची पुरुष किती काळजी करतात हे आव आणून दाखवणे होय. एवढीच काळजी असेल तर सार्वजनिक ठिकाणी पुरुषांनी मान खाली घालून चालायला पाहिजे. बरेच धर्मांध पुरुष याचे समर्थन करण्यासाठी सांगतात; की बऱ्याच स्त्रिया स्कार्फने चेहरा झाकून घेतात. तर ती फॅशन होते आणि बुरखा घातला/ पदर डोक्यावर घेतला तर परंपरावादी म्हणून हिणवतात. पण या धर्मांधांना हे समजत नाही की स्त्रियांचे तोकडे कपडे किंवा स्कार्फ घालणे हे त्यांनी स्वतः निवडलेले असतात, ते त्यांना कोणी बंधनकारक केलेले नसतात. स्वेच्छेने आवडीचे कपडे घालणे आणि ते बंधनकारक असणे यातला फरक समजने आवश्यक आहे.

परंपरा, रूढी या पुरुषसत्ताक समाजाने स्वतःच्या सोयीसाठी बनवलेल्या आहेत आणि हे तत्व सर्व धर्मांना लागू पडते. यातून बाहेर पडायला पाहिजे. विज्ञानाने माणसाची प्रगती झाली, रहदारी दळणवळणासाठीचे उंट-घोडे कालबाह्य झाले आणि अलिशान वातानुकूलित वाहनांचा वापर सुरू झाला; पण आम्ही अशा वाहनात सुद्धा बुरखा/हिजाब घालून बसतो. धर्म पाळण्याचं स्वातंत्र्य संविधानाने दिल असलं तरी अशा धर्मपरंपरा कालसुसंगत आहेत का? याचा तर्कबुद्धीने विचार केला पाहिजे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0