अदानी कंपन्या कर्जाच्या सापळ्यात अडकण्याचा धोका?

अदानी कंपन्या कर्जाच्या सापळ्यात अडकण्याचा धोका?

अदानी उद्योगसमूहाने रिलायन्स उद्योगसमूहाच्या तुलनेत अतिरेकी कर्ज उचलून चालवलेल्या विस्तारीकरणाच्या योजना समूहाला कर्जाच्या भीषण सापळ्यात अडकवू शकतात असा इशारा क्रेडिटसाइट्स या पत संशोधन (क्रेडिट रिसर्च) फर्मने दिला आहे.

‘अदानींची कोणती प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात होती?’
अदानी समूह एनडीटीव्ही खरेदी करण्याच्या तयारीत
‘अदानी ग्रुपला ऊर्जा प्रकल्प द्यावा म्हणून मोदींचा दबाव’

अदानी उद्योगसमूहाने रिलायन्स उद्योगसमूहाच्या तुलनेत अतिरेकी कर्ज उचलून चालवलेल्या विस्तारीकरणाच्या योजना समूहाला कर्जाच्या भीषण सापळ्यात अडकवू शकतात असा इशारा क्रेडिटसाइट्स या पत संशोधन (क्रेडिट रिसर्च) फर्मने दिला आहे. याची परिणती म्हणून समूहातील एक किंवा अधिक कंपन्या धोक्यात येऊ शकतात किंवा दिवाळखोरीची परिस्थिती ओढवू शकते, असा इशारा फर्मने दिला आहे.

अदानी समूहाला तसेच एकंदर बाजार विश्लेषक व समभागधारकांना चिंतेत टाकणाऱ्या अनेक आर्थिक मुद्दयांवर फर्मच्या अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे. नवीन किंवा आत्तापर्यंत संबंध न आलेल्या क्षेत्रात प्रवेशासाठी समूहाने अतिरेकी कर्ज उचलून केलेल्या आक्रमक विस्तार योजना; पर्यावरणविषयक, सामाजिक व प्रशासकीय (ईएसजी) जोखमी; रिलायन्ससारख्या उद्योगसमूहांशी असलेल्या स्पर्धेतून निर्माण होणारे धोके आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गौतम अदानी व त्यांच्या कुटुंबाने ओतलेल्या इक्विटी भांडवलाचा मर्यादित पुरावा यांचे विश्लेषण अहवालात करण्यात आले आहे.

ऑगस्ट २०२२ मध्ये उपलब्ध आकडेवारीनुसार, रिलायन्स व टाटा या उद्योगसमूहांनंतर, बाजार भांडवलाच्या निकषावर (२०० अब्ज डॉलर्सहून अधिक) अदानी समूह हा देशातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा उद्योगसमूह आहे. १९८८ साली गौतम अदानी यांनी एक कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून स्थापन केलेल्या या कंपनीने जलदगत्या, वीज, सोयीसुविधा व वाहतूक अशा  सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये प्रवेश केला आहे. अदानी एंटरप्रायजेस (एईएल), अदानी ग्रीन एनर्जी (एजीईएल), अदानी पोर्ट्स अँड स्पेशन इकोनॉमिक झोन (एपीएसईझेड), अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस व अदानी ट्रान्समिशन अशा समूहाच्या सहा प्रस्थापित सूचित कंपन्या आहेत.

अदानी समूहाच्या कर्जावर आधारित विस्तार महत्त्वाकांक्षांचे क्रेडिटसाइट्स सावधगिरीने निरीक्षण करत आहे हे नमूद करून अहवालात म्हटले आहे:

“एकंदर समूह सध्या अस्तित्वात असलेल्या व नवीन व्यवसायांमध्ये आक्रमकपणे गुंतवणूक करत आहे, निधी प्रामुख्याने कर्जांद्वारे उभा केला जात आहे, परिणामी उचललेला लाभ व पतदारीचे प्रमाण वाढत आहे. यामुळे संपूर्ण समूहाबद्दल तसेच रोखे जारी करणाऱ्यांबद्दल साहजिकच चिंता निर्माण होत आहे. अतिमहत्त्वाकांक्षी कर्जाधारित वाढीच्या योजना अखेरीस कर्जाच्या भीषण सापळ्यात अडकू शकतात आणि त्याची परिणती काही कंपन्यांवर दिवाळखोरीची परिस्थिती ओढवण्यात होऊ शकते.”

जलद विस्तारासाठी प्रामुख्याने कर्जाच्या माध्यमातून निधी पुरवला जात आहे आणि त्यामुळे समूहातील अनेक कंपन्यांवर गेल्या काही वर्षांत कर्जाचा मोठा बोजा आला आहे. याचा समूहातील रोखे जारी करणाऱ्या घटकांच्या पतदर्जावर अत्यंत वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे समूहातील कंपन्यांना दिवाळखोरीचा धोका आहे, असेही अहवालात म्हटले आहे.

क्रेडिटसाइट्सने चिंता व्यक्त केलेल्या प्रत्येक मुद्दयाचे पुढे तपशीलवार विश्लेषण करण्यात आले आहे.

नवीन व्यवसायांमध्ये प्रवेश व पूर्वीच्या व्यवसायांचा जबरदस्तीने विस्तार

अदानी समूह बहुतेक सर्व व्यवसायांमध्ये प्रवेश करत आहे आणि पूर्वीच्या व्यवसायांचा वेगाने विस्तार करत आहे, असे अहवालात म्हटले आहे. उदाहरणार्थ, अदानी ग्रीन या कंपनीने आपली कार्यात्मक नूतनीकरणीय ऊर्जानिर्मितीची क्षमता आर्थिकवर्ष २५ पर्यंत पाच पटींनी वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ज्या क्षेत्रांचा अजिबात पूर्वानुभव किंवा कौशल्य नाही, त्यांतही प्रवेशाच्या योजना समूह आखत आहे. तांबे शुद्धीकरण, डेटा सेंटर्स, दूरसंचार व अॅल्युमिनिअम उत्पादन या क्षेत्रांत प्रवेशाचा कंपनीचा विचार आहे. अंबुजा सिमेंट व एसीसी लिमिटेडमधील होलसिमचा वाटा अधिग्रहित करून अदानी समूह ‘अक्षरश: एका रात्रीत’ दुसऱ्या क्रमांकाचा सिमेंट उत्पादक झाला, याकडे क्रेडिटसाइट्सने लक्ष वेधले आहे. अदानी समूहाच्या छत्राखालील बहुतेक व्यवसाय मोठ्या भांडवलावर उभे करण्यात आले आहेत आणि त्यांत भल्यामोठ्या व सातत्यपूर्ण गुंतवणुकांची गरज सुरुवातीची काही वर्षे भासणार आहे. बहुतेक प्रकल्प/व्हेंचर्सना कर्जाद्वारे निधी पुरवला जात आहे. भारतात संरचना प्रकल्पांसाठी कर्जे चढ्या व्याजदराने घ्यावी लागतात. त्यामुळे कंपन्यांवरील व्याजाचा बोजाही वाढतो. पहिली काही वर्षे हे व्यवसाय नफा कमावणार नाहीत हे गृहीत धरल्यास त्यांची कर्जे फेडण्यासाठी पुन्हा कर्जे घ्यावी लागणार हे निश्चित आहे. म्हणून या अहवालात पुढील शब्दांत इशारा देण्यात आला आहे:

“अतिरेकी कर्ज आणि चढे व्याजदर असूनही, अदानी समूहातील सर्व कंपन्यांनी वाढीसाठी आक्रमक उद्दिष्टे ठेवली आहेत. हे धोरण आर्थिकदृष्ट्या शहाणपणाचे म्हणता येणार नाही.”

अदानी एंटरप्रायजेस लिमिटेडवर प्रकाशझोत

अदानी एंटरप्रायजेस लिमिटेड ही नवीन व विकसनशील व्यवसायांसाठी इनक्युबेटर कंपनी आहे हे गृहीत धरता, समूहातील कंपन्यांमध्ये या कंपन्यांचा भांडवली खर्च (कॅपेक्स) सर्वाधिक आहे. गेल्या पाच वर्षांत कंपनीने विमानतळ, सिमेंट, तांबे शुद्धीकरण, डेटा सेंटर्स, ग्रीन हायड्रोजन, पेट्रोकेमिकल शुद्धीकरण, रस्ते व सोलर सेल उत्पादन आदी नवीन वाढीच्या क्षेत्रांमध्ये प्रचंड गुंतवणूक केली आहे. दूरसंचार क्षेत्रातील एंटरप्राइज डेटामध्ये प्रवेश करण्याची कंपनीची योजना आहे आणि ग्रीन हायड्रोजन व विमानतळ व्यवसायांमध्ये वाढीचीही योजना आहे.

“या व्हेंचर्समध्येही भांडवल खूप मोठ्या प्रमाणात घातलेले आहे. त्यामुळे कॅपेक्स गरजांच्या पूर्ततेसाठी अतिरिक्त कर्जाची आवश्यकता भासू शकते आणि समूहावरील कर्जाचा बोजा आणखी वाढू शकतो,” असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

इक्विटी भांडवल घातल्याचा मर्यादित पुरावा

गौतम अदानी व कुटुंब यांसारख्या महत्त्वाच्या प्रमोटरतर्फे इक्विटी घातली जाणे ही अदानी समूहातील नेहमी घडणारी गोष्ट नाही. साधारणपणे अदानी कुटुंब प्रामुख्याने नवीन व्यवसायांमध्ये इक्विटी घालते. व्यवसाय स्वयंपूर्ण झाल्यानंतर ते स्वतंत्रपणे चालावेत असे अपेक्षित असते, यासाठी बहुतेकदा त्यांना शेअर बाजारांच्या सूचीत समाविष्ट केले जाते. मग ते व्यवसाय बहुतांशी, बँकांकडून घेतली जाणारी कर्जे, अंतर्गत जमा होणारा पैसा आणि भांडवली बाजारातील पैसा यांवर चालतात.

गौतम अदानी यांच्या संपत्तीतील अतिभव्य वाढ आणि बिल गेट्स यांना मागे टाकून त्यांनी जगातील चौथ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीचे स्थान प्राप्त करणे याचाही अहवालात उल्लेख आहे. मात्र, ही कागदी संपत्ती आहे आणि अलीकडील काही वर्षांमध्ये लक्षणीयरित्या वाढलेल्या अदानी समूहाच्या समभागधारणेच्या मूल्याशी निगडित आहे, असेही यात नमूद करण्यात आले आहे. समूहातील कोणत्याही कंपनीला प्रमोटरद्वारे इक्विटी ओतली जाण्याची गरज भासल्यास अदानी कुटुंब आपल्या स्वत:च्या निधीतून किती ओतू शकेल याचा अंदाज बांधणे कठीण असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

या अहवालात प्रशासनविषयक जोखमींचाही उल्लेख आहे. या ६ सूचित समूह कंपन्या कायदेशीरदृष्ट्या स्वतंत्र घटक असून, चांगली कामगिरी करणाऱ्या कंपनीने संकटातील कंपनीला समूहांतर्गत कर्ज देणे हा संबंधित पक्षाशी केलेला व्यवहार ठरेल आणि त्यातून काही कॉर्पोरेट प्रशासन समस्या निर्माण होऊ शकतात, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

रिलायन्स उद्योगाशी स्पर्धा

अदानी समूह व रिलायन्स समूह यांमधील स्पर्धेवर क्रेडिटसाइट्सने प्रकाश टाकला आहे. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने नूतनीकरणीय ऊर्जेच्या व्यवसायात २०१५ मध्ये प्रवेश केला, तर आरआयएलनेही २०२१ मध्ये या क्षेत्रात प्रवेशाची घोषणा केली. याउलट २०१५ मध्ये रिलायन्सने दूरसंचार बाजारपेठेत नव्याने प्रवेश केल्यानंतर अदानी समूहाने फाइव्हजी लिलावात भाग घेऊन या व्यवसायात पाऊल टाकले. व्यावसायिक ग्राहक दूरसंचार व्यवसायात शिरण्याचा विचार नसल्याचे अदानी समूहाने स्पष्ट केले असले, तरी अदानी समूह दूरसंचार क्षेत्रात प्रवेश करण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळली जाऊ शकत नाही.

‘भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रातील दोन विशाल समूह काही नवीन किफायतशीर व्यवसायांच्या बाजारपेठेतील वाट्यासाठी स्पर्धा करत असल्यामुळे, यातून दोन्ही बाजूंकडून वाढीव कॅपेक्स खर्च, आक्रमक बोली लावणे आणि अतिरेकी कर्जे उचलणे असे काही चुकीचे आर्थिक निर्णय केले जाण्याची शक्यता आहे.’ एकंदर आरआयएलने गेल्या काही वर्षांत कर्जाचा बोजा कमी केला आहे. उलट, अदानी समूहाने मोठ्या प्रमाणात कर्जे घेतली आहेत आणि यात मोठी आर्थिक जोखीम आहे.

प्रशासकीय धोके

अदानी समूहाच्या समभागांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या परदेशी गुंतवणूकदारांमध्ये अलबुला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंड यांसारख्या अर्धपारदर्शक फंडांचा समावेश आहे. या सर्व फंडांची नोंदणी मॉरिशसमधील पोर्ट लुईस येथील एकाच पत्त्यावर झालेली आहे. या फंडांची बहुतांश मालमत्ता अदानी समूहाच्या समभागांमध्ये गुंतवलेली आहे आणि या फंडांचा अंतिम लाभ कोणाला मिळणार याबद्दल फारशी स्पष्टता नाही. सेबीच्या अन्वेषणात समभागांच्या किमतीत फेरफार झाल्याची बातमी गेल्या वर्षी होती पण सेबीने अदानी समूहाच्या कंपन्यांना यातून क्लीनचिट दिली होती. प्रमोटर समूह व परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार यांचे वर्चस्व असलेली समभागधारणा रचना, त्यांपैकी काहींबाबत पारदर्शकतेचा अभाव हे सगळे एवढ्या मोठ्या भांडवली कंपन्यांच्या समभागांबाबत विचित्र आहे हे नक्की.

मूळ लेख:

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: